डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com
अमात्य हे पद शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातले क्रमांक दोनचं पद. पेशवा हा मुख्य प्रधान. त्याखालोखाल अमात्य. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी साक्षात शिवछत्रपतींचे अमात्यपद भूषविलेल्या रामचंद्रपंत बावडेकर या असामान्य बुद्धीच्या राजकारणधुरंधराने इ.स. १७१६च्या सुमारास आज्ञापत्र लिहिलं. त्या आज्ञापत्राच्या पहिल्या प्रकरणात ते लिहितात : ‘..तथापि श्रींस या राज्याचा व स्वामीचा पूर्ण अभिमान. पुढे प्रतिपच्चंद्रन्याये दिनप्रतिदिनी या राज्याची अभिवृद्धि व्हावी, हे ईश्वरेच्छा बलोत्तर. तीर्थस्वरूप थोरले सिवछत्रपती कैलासवासी स्वामी यांणी हे राज्य कोणे साहसे व कोणे प्रतापे निर्माण केले, ..पंधरा वर्षांचे वय असता, त्या दिवसापासून तितकेच स्वल्पमात्र स्वास्तेवरी उद्योग केला..
..दृढ बुद्धीने शरिरास्ता न पाहता केवल आमानुष पराक्रम जे आजपर्यंत कोण्हे केले नाहीत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना, यसे स्वांगे केले. मनुष्यपरीक्षेने नूतनच सेवक नवाजून योग्यतेनुसार वाढवून महत्कार्योपयोगी करून दाखविले. येकास येक असाध्य आसतांहि स्वसामथ्य्रे सकलांवरी दया करून येकाचा येकापासोन उपमर्द होऊ न देता येकरूपतेने वत्तर्ऊन त्या त्या हातून स्वामिकाय्रे घेतली..
..बुद्धिवैभवे व पराक्रमे कोण्हाची गणना न करिता, कोण्हावरी चालोन जाऊन तुंबल युद्ध करोन रणास आणिले, कोण्हावरी छापे घातले, कोण्हास परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केले; कोण्हाचे डेरियांत सिरोन मारामारी केली, कोण्हासी येकांगी करून पराभविले, कोण्हासी श्नेह केले, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिले, कोण्हास परस्परे दगे करविले, जे कोण्ही इतर प्रेत्ने नाकलेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थले बांधून पराक्रमे करून आकलिले, जलदुर्गाश्रईत होते, त्यांस नूतन जलदुग्रेच निर्माण करून पराभविले, दुर्घट स्थली नौकामाग्रे प्रवेशिले, यसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकलावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी-अहिवंतापासोन चंदीकावेरीतीपर्यंत निष्कंटक राज्य, शतावधि कोटकिले, तसीच जलदुग्रे व विषम स्थले हस्तगत केली.
..चालीस हजार पागा, साठ हजार शिलेदार व दोन लक्ष पदाति, कोटय़वधि खजाना, तसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुज्यात संपादिल्या. शाहणव कुलीचे मराठियांचा उद्धार केला; सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपति म्हणविले. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थानी स्थापून यजनयाजनादि षट्कम्रे वर्णविभागे चालविली. तस्करादि अन्यायी यांचे नांव राज्यात नाहीसे केले. देशदुर्गादि सन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन शृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखे महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न करून दिगांत विख्यात कीíत संपादिली..’
हे असं काही करावं असं शिवछत्रपतींस का वाटलं असेल; हे राज्य देवाधर्माचं आहे, हे राज्य व्हावं असं देवाच्याच मनी आहे, हे माझे मनोरथ तो सफल करणार आहे- एवढा या कार्याविषयीचा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या मनी कुठून उपजला असेल अन् तोच ध्यास घेऊन त्या लोकोत्तर महापुरुषाने अवघं आयुष्य कसं वेचलं; अन् योजलेल्या कार्यात तो महानुभाव कसा सफलही झाला यावर विचार करू जाता जाणवतं, की शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाच्या पटावरून दुर्गाचं अस्तित्व पुसून टाकलं तर? कसं दिसेल चित्र? खात्री पटते की, चित्र दिसणारच नाही. केवळ कोरा पटच दृष्टीस पडेल!
रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात म्हटलं आहे : ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! दुर्ग नसता मोकळा देश प्रजाभग्न होऊन उद्वस होतो. देश उद्वस जाल्यावरी राज्य तरी कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे जाले त्याणी
आधी देशामध्ये दुग्रे बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले संकट त्या दुर्गाश्रयी परिहार केले.’
शिवछत्रपतींनीसुद्धा हे राज्य दुर्गाचा योग्य असा उपयोग करून शून्यातून निर्माण केले. जो जो भाग स्वत:च्या अधिपत्याखाली येत नव्हता, त्या त्या ठिकाणी त्यांनी नेमक्या जागा निवडल्या, अन् गिरिदुर्ग वा जलदुर्ग बांधून ते ते भाग स्वत:च्या अधिपत्याखाली रुजू करून घेतले. याच पद्धतीचा अवलंब करत त्यांनी नाशिकच्या उत्तर सीमेवर असलेल्या साल्हेर व अहिवंतगडापासून दक्षिणेस कावेरीच्या तीरावर वसलेल्या तंजावर, जिंजीपर्यंत स्वायत्त स्वराज्याची प्रतिष्ठापना केली.
दुर्ग हे शक्तिकेंद्र, सत्ताकेंद्र अशी कल्पना करून, त्यानुसार त्याभोवताली विणलेले हे राज्य सर्वच दृष्टीने इतकं बलिष्ठ अन् त्याचसवे चिवटही ठरलं, की उत्तरकाळात औरंग्यासारख्या सर्वशक्तिमान अशा पातशहानं आपल्या संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेवर आक्रमण केलं. इदलशाही, कुतुबशाहीसारखी मुळं घट्ट झालेली साम्राज्यं एका फटकाऱ्यानिशी धुळीस मिळाली. हिंदुस्थानच्या त्या पातशाहाच्या लेखी अतक्र्य, अशक्य असं काहीच नव्हतं. मात्र, शिवछत्रपतींनी रचलेल्या या दुर्गाच्या जाळ्यात तो पुरता अडकला. पुरती पंचवीस वष्रे तो मुघल सम्राट या जाळ्यातून सुटण्यासाठी घुसमटून तडफडत राहिला, पण ते त्यास त्याच्या मृत्यूपर्यंत शक्य झालं नाही. मात्र शिवछत्रपतींच्या राज्यात दुर्ग होते म्हणूनच हे राज्य शिल्लक राहिलं. पंचवीस र्वष या महाराष्ट्रदेशी विध्वंस उभा केलेल्या त्या वादळातून नव्या जोमानं पुन्हा उठून उभं तर राहिलंच, पण फोफावलंही!
रामचंद्रपंत अमात्य म्हणतात की, ज्या विजिगीषु राज्यकर्त्यांस आपलं राज्य वíधष्णू झालेलं पाहायचं आहे त्यानं स्वत:च्या राज्यातील दुर्गाची उपेक्षा करू नये. अतिशय सावधतेनं आहेत त्या दुर्गाची नेटकी डागडुजी करावी, नीट निरातीनं काळजी घ्यावी, आपले दुर्ग बऱ्या मजबुतीनं सांभाळावेत. जो नवीन प्रदेश स्वत:च्या अमलाखाली आणायचा त्या प्रदेशातील दुर्ग प्रथम जिंकून घ्यावेत. ज्या प्रदेशात दुर्ग नसतील तर तेथे नवीन दुर्ग बांधून, त्या नूतन दुर्गाच्या आश्रयास सेना ठेवून तो अवघा प्रदेश मग स्वत:च्या स्वामित्वाखाली आणावा. स्वत:च्या राज्याचा विस्तार हा या प्रकारे करावा. याचं कारण अतिशय स्पष्ट आहे : जर परक्या प्रदेशात स्वत:चे दुर्ग नसतील तर आपलं सन्य कशाच्या आसऱ्याने लढणार? त्या सन्यास त्या अनोळखी अशा प्रदेशात पाय रोवून राहणं नि:संशयपणे दुष्कर ठरणार. अर्थ असा की, दुर्ग नसलेलं राज्य म्हणजे जणू तलम, विरळ असा धुक्याचा पडदाच. शत्रूच्या आक्रमणाचे वादळ वाहताक्षणी ते क्षणभरात होत्याचं नव्हतं होणार.
मग अगदी याच कारणासाठी स्वये शिवछत्रपतींचं व त्यांच्या पदरीच्या विचारवंत मुत्सद्दय़ांचं मत असं की, दुर्ग म्हणजेच राज्य, दुर्ग म्हणजे राज्याचा पाया, दुर्ग म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था, दुर्ग म्हणजेच राज्यलक्ष्मी, दुर्ग म्हणजेच सन्याचं बळ, दुर्ग हीच आपली आश्रयस्थानं, दुर्ग हेच सुखनिद्रागार. किंबहुना, दुर्ग हेच स्वत:च्या व राज्याच्या प्राणसंरक्षणाचं एकमेव साधन आहे असं कुण्याही राज्यकर्त्यांनं सदोदित मनी बाळगायला हवं. याविषयी कुणाच्याही भरवशावर विसंबून राहू नये. आहेत त्या दुर्गाच्या निगराणीचा अन् संरक्षणाचा व नवीन दुर्गाच्या निर्मितीचा ध्यास राजानं स्वत:च बाळगावा. कुणावरही विश्वास न ठेवता या बाबी स्वत:च्या अखत्यारीत ठेवाव्यात.
शिवछत्रपतींची त्यांच्या दुर्गाकडे वा दुर्गाच्या राज्यउभारणीतील सहभागाकडे पाहण्याची दृष्टी ही अशी होती. दृष्टी नव्हेच ती, द्रष्टी नजर म्हणायचे तिला. याच नजरेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: शून्यामधून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पराक्रमाचा डिडिम दशदिशांत गर्जविला. अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दुर्गाची व्यवस्थासुद्धा शिवकाळात अतिशय नेटकी अन् आखीवरेखीव होती. दुर्गाचा वेगळा विभाग नव्हता, कारण तो त्यांच्या व त्यांच्या राज्याच्या रोजच्या जीवनाचाच अविभाज्य असा भाग होता!
दुर्गाच्या संरक्षणाचं कार्य हे अतिशय अवघड अन् थोरल्या जबाबदारीचं. दुर्गावरील अधिकाऱ्यांनी फितुरी केल्यामुळे किंवा शत्रूनं आक्रमण केलं असता नामर्दपणा दाखवल्यामुळे दुर्गास दगाफटका झालाच तर ते केवळ स्थळच नव्हे तर त्या दुर्गाच्या अखत्यारीतील महसुली प्रदेशही राज्यातून गेला, ही भावना अगदी प्राथमिक होती. त्यामुळे राज्यातील वा त्या प्रदेशातील अवशिष्ट दुर्गास शत्रूचा उपसर्ग होण्याची शक्यताही बळावते अन् ज्यांनी भ्याडपणामुळे दुर्ग शत्रूच्या स्वाधीन केला, त्या भ्याड मनोवृत्तीचे अनुकरण करण्याची वृत्ती इतर दुर्गावरील शिबंदीत शिरून ते दुर्ग अन् त्यांपाठोपाठ राज्यही शत्रूच्या हाती जाण्याची शक्यता बळावते हा यामागचा महत्त्वपूर्ण विचार होता. ही गोष्ट सामान्य नव्हे, हे ध्यानी घेऊन राज्यातील दुर्गाची तशी जपणूक राज्यकर्त्यांने व प्रशासनाने करायला हवी असं या धुरिणांचं मत होतं.
शिवकाळात दुर्गाची जबाबदारी दोन मुख्य अधिकाऱ्यांवर विभागून दिलेली असे : दुर्गाचा मुलकी अधिकारी हवालदार अन् लष्करी अधिकारी सरनौबत. शरीरात जसा प्राण तसा हवालदार म्हणजे दुर्गाचा प्राण. मग अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करताना ती तेवढय़ाच काळजीपूर्वक व्हायची. हे दोन अधिकारी नेमताना ते पक्षपाती वा कुणाचे मिंधे नसावेत हे पारखलं जाई. कुणाच्या आग्रहाखातरही त्यांची नेमणूक होत नसे. ते नामवंत कुळातील असत. राजाचा आणि राज्याचा आब राखणारे असत. कुटुंबवत्सल, विश्वासू, निरंतर उद्योगी, लालूच नसणारे, दिल्या कार्याशी प्रामाणिक, साऱ्यांनाच सांभाळून घेत स्वामिकार्य निभावणारे, दुर्ग ही धन्याने आपल्यापाशी सांभाळायला दिलेली ठेव आहे असे मनी धरून दुर्गाचे जीवापाड रक्षण करणारे, धन्याने घालून दिलेल्या कायदेकानूंमध्ये तीळभरही अंतर न पाडणारे अन् नेमलेली कामं वेळच्या वेळी करण्यात तत्पर असेच असत.
यांच्या मदतीस सबनीस म्हणजे सेनालेखक असत. कारखानीस म्हणजे खातेप्रमुख असत. राज्यव्यवस्था ही अठरा कारखान्यांमध्ये म्हणजे विभाग वा खात्यांमध्ये विभागलेली असे. दुर्ग पाहून, त्याचा आवाका पाहून मग तद्नुरूप त्यांवर ही खाती असत. राजगड, रायगडासारख्या राजधान्यांच्या दुर्गावर या अठराही कारखान्यांचे विभागप्रमुख हजर असत. हे अधिकारी धन्याने आखून दिलेल्या मार्गाने चालणारे, धन्याच्या राज्यविषयक ध्येयधोरणांशी सुसंवाद असलेले, स्वामिकार्य इतरांकडून यथास्थित करून घेणारे अन् कामाच्या बाबतीत कुणाचीही भीड न ठेवणारे व कुशल असे प्रशासक असत.
तटसरनौबत हा आणखी एक लष्करी अधिकारी दुर्गावर असे. नावावरून वाटते की, बहुधा हा तटबंदीच्या एखाद्या भागाचा प्रमुख असावा किंवा संपूर्ण तटबंदीची जबाबदारी याच्यावर असावी. बखरकार सभासद म्हणतो : ‘गड तोलदार आहे, त्या गडाचा घेरा थोर, त्या जागा पांच सात तटसरनोबत ठेवावे. त्यांस तट वाटून द्यावे. हुषारी, खबरदारीस त्यांनी सावध असावं.’ याखेरीज बारगीर म्हणजे सरकारी घोडे व शस्त्रे बाळगणारा, शिलेदार म्हणजे स्वत:चा घोडा व शस्त्र वापरणारा, नाईक म्हणजे पायदळाच्या पथकाचा प्रमुख, सरलष्कर ही सारी मंडळी मर्दानी, लेकुरवाळी, विश्वासू अशी पारखून ठेवीत. याबाबत एवढी काळजी घेतली जाई की, अगदी सामान्य सनिकदेखील धन्याच्या परवानगीविना ठेवला जात नसे. पंतअमात्य आज्ञापत्रात म्हणतात : ‘किल्यास दाहा टक्याचा प्यादा ठेवणे तोही हुजूरचे सनदेखेरीज न ठेवावा. कारस्थानी, खुनी, तऱ्हेवाईक, मद्यपी, व्यसनी, फितुरी माजविणारे अशा व्यक्ती चाकरीस कदापि ठेवू नयेत अन् जे ठेवावे ते पूर्णतया परीक्षून ठेवावे.’
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दर तीन वर्षांनी गडाचा हवालदार बदलला जाई. चार वर्षांनी सरनौबत बदलला जाई. पाच वर्षांनी सबनीस अन् कारखानीस यांची बदली होई. या व्यक्ती दुसरीकडे जात व दुसरीकडल्या त्याच तोलामोलाच्या अन् जबाबदार व्यक्ती तिथं येत. स्वत: राजा त्यांना स्वत:च्या सान्निध्यात चारदोन दिवस ठेवी. हेतू इतकाच की, त्यांच्या मनीचे समज-गरसमज एकमेकांच्या सहवासाने दूर व्हावे. इथं एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे यात किती खोलवर विचार केला गेला आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलीची पद्धत आजही आहे. या कर्मचाऱ्याचे हितसंबंध एकाच ठिकाणी गुंतू नयेत वा अतिपरिचयामुळे त्याच्या कामात ढिलाई येऊ नये, हा यामागचा विचार आहे. मात्र याचे मूळ थेट शिवकाळात सापडतं. इतर शाह्यंमध्ये व मध्ययुगात इतर काळी ही पद्धती अस्तित्वात होती की नाही हे कळायला काही मार्ग नाही; कदाचित असेलही, मात्र शिवकाळातील या पद्धतीची खात्रीलायक माहिती आपल्याला आज्ञापत्रामुळे मिळते अन् दुर्गाच्या कारभारातल्या आणखी एका पलूवर व शिवकालीन विचारधारेवर नेमका प्रकाश पडतो.
व्यक्तीच्या कुवतीनुसार तिच्यावर काम सोपवले जाई. एवढेच नव्हे, तर हवालदार, तटसरनौबत वा अगदी एखादा सर्वसाधारण हशम यांनाही वरचेवर परीक्षून घेत. त्यांच्या हातून घडलेल्या एखाद्या उत्तम कृतीचा उचित सन्मान केला जाई तर दुष्कृत्यास तसेच कठोर शासन होई.
दुर्गाचा हवालदार सेवेत असताना मृत्युमुखी पडला तर त्याचं काम त्याच्या मुलास अथवा भाऊबंदांस कधीही सांगितलं जात नसे. त्यांस दुसऱ्या कोणत्यातरी कामावर नेमून त्यांची सेवा रुजू करून घेत. जर ते वडिलांच्या तोडीचे असतील तरीसुद्धा त्यांस त्याच जागेवर न नेमता दुसऱ्या दुर्गावर ठेवले जाई. एकाच घरातील दोन-तीन माणसे या प्रकारच्या कामाला लायक असली, तर त्यांना सेवेत रुजू करून घेतले जाई. कारण अशी माणसं मिळणं दुष्कर असे. मात्र त्यांस त्यांच्या राहत्या घरापासून जवळच्या दुर्गावर ठेवत नसत. अन् एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्ती असतील तर त्यांस एकत्र न ठेवता, ते सहजासहजी एकत्र भेटू शकणार नाहीत अशा लांबलांबच्या दुर्गावर त्यास ठेवीत. कारण स्पष्ट आहे की, साहचर्यामुळे कामात शिथिलता न यावी, अथवा या दुर्गावरली काही माहिती- जी राज्याच्या दृष्टीने नाजूक, ती अन्य दुर्गावर न जावी.
दुर्गाखालील प्रदेशाचे देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, पाटील, चौगुले असे जे मुलकी अधिकारी, त्यांस त्यांच्या राहत्या घरांजवळच्या दुर्गाचा कारभार सांगत नसत; त्यांच्या राहत्या घरापासून पाचदहा गांवे दूरच्या दुर्गावरली चाकरी त्यांस सांगावी, असा दंडक शिवकाळात होता. यामागची भूमिका स्पष्ट होती की, घर जवळ असले तर क्षणोक्षणी घरी जातील अन् मग धन्याने नेमून दिलेल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होईल. दुसरीही त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक लोक वतनाच्या आमिषास सहज बळी पडू शकतात; म्हणून दुर्गाजवळील लोक दुर्गावर न ठेवावे, अशी सहजसुलभ राजाज्ञा होती. मानवी स्वभावाची सहजप्रवृत्ती हेरून, त्याचा अभ्यास करूनच हा दंडक अंमलात आणला असावा. अगदी आजच्या काळातही ही आज्ञा लागू पडण्याजोगी आहे.
दुर्गाच्या चाकरीमधील कुणीही चोरी, लाच, भांडण, कर्तव्याच्या बाबतीत कसूर वा नालायकपणा दाखवल्यास त्याची कामाची मुदत संपण्याची वाट न पाहता, त्यास त्याने केलेल्या अपराधाबद्दल लगेचच शासन केलं जाई. दुर्गावरील कुणाही अधिकाऱ्याने फंदफितुरीची दुर्बुद्धी धरली आहे असं समजताक्षणी, खऱ्याखोटय़ाची शहानिशा न करता, त्या व्यक्तीस सावध होऊ न देता, परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर व ही गोष्ट चौमुखी होण्याअगोदर त्या अधिकाऱ्यास धन्यापाशी आणलं जाई. अन् तात्काळ न्याय करून, गुन्हा शाबीत झाला तर कोणताही मुलाहिजा न बाळगता तत्क्षणी त्याचा शिरच्छेद केला जाई व ते मुंडके गडोगडी फिरविले जाई. त्याचसवे असे कृत्य जो करील त्यास हा परिणाम भोगावा लागेल अशी दवंडीही पिटली जाई. मात्र याचबरोबर, तो अधिकारी जर निरपराध ठरला तर त्याची यथास्थित समजूत घालून, चारसहा महिने स्वत:पाशी काम करावयास लावून, धनी मग त्यास एखाद्या नवीन जागी कामास पाठवीत. बहुधा, त्याला धन्याने दिलेल्या वागणुकीमुळे, जुन्या जागी कदाचित त्याचा आब राहत नसावा. फितूर होऊन, दुर्ग गनिमाच्या ताब्यात देणाऱ्या हरामखोर अधिकाऱ्यास हर प्रयत्नांनी पकडून आणून त्यास देहान्ताची शिक्षा दिली जाई. तो हाती लागला नाही, तर त्याच्या मुलांस पकडून गुलाम करावं अन् बायकांस दासीबटकी करावं असाही धारा होता!
दुर्गास शत्रूचा वेढा पडला तर धान्यधुन्य, दारूगोळा अन् शस्त्रसामग्री असेपर्यंत गडकऱ्यांनी गड झुंजता ठेवावा, हार न मानता दुर्गाचे रक्षण करावं अशीही राजाज्ञा होती. मग शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासू लागला अन् दुर्गाचं स्वामित्व धोक्यात आले तर दुर्गातील हत्यारबंदांचं प्राणसंरक्षण ही धन्याची जबाबदारी ठरे. मग त्या दुर्गास पुरेशी रसद तरी पुरवली जाई वा शत्रूशी तह तरी केला जाई.
हे सारं करण्यास धनी असमर्थ ठरला, अगदी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही, तर तिथला अधिकारी झुंजता झुंजता आत्मबलिदान करी, मात्र स्वत:च्या बुद्धीनं शत्रूशी तह करत नसे. अशा परमवीरांच्या कुटुंबाचा योगक्षेम स्वत: धन्याच्या खाती रुजू होई. मात्र असा तह करून स्वत:चा जीव वाचवून आलेल्या मूर्ख अधिकाऱ्याचे धन्याने तोंडसुद्धा पाहू नये अन् त्यास घरी बसवावे अशी सूचनाही आढळते. त्याच्याबद्दल कुणी शिफारस केली तर त्या शिफारसीचा विचारही केला जात नसे. कारण दुर्ग हे राष्ट्राच्या सप्तांगांपकी एक अविभाज्य अंग, मग त्याशी द्रोह करणारा हा एका अथ्रे राष्ट्रद्रोहीच अशी विचारधारा बहुधा यामागे असावी. अशा व्यक्तीस पुन्हा सेवा सांगितली जात नसे, कारण ती विषपरीक्षा ठरण्याचा संभव! अशा व्यक्तीचा अधिकार व मुलाहिजा कोणत्याही बाबतीत ठेवला जात नसे.
दुर्गाची चाकरी परम कठीण. दुर्गाचे शासन अतिशय उग्र. दुर्गकारभाराचे प्रशासन असे तसेही होईल असं म्हणणं हे आत्मनाशाचं निमित्त असे स्पष्ट मत आज्ञापत्रात नोंदलेले आहे. कामातील हलगर्जीपणामुळे वा ढिलाईमुळे ज्यांना शिक्षा करण्यास संकोच वाटेल, असे आप्तस्वकीय, नातलग वा त्यांच्या पदरचे लोक अशांस दुर्गाच्या जबाबदारीच्या कामावर कधीही ठेवलं जात नसे. कारण त्यांस शिक्षा करण्यास संकोच वाटण्याची शक्यताच जास्त. अन् तसं घडलं तर इतर चुकारांस बोट दाखवायला जागा उरेल. हे दुष्टचक्र मग अव्याहतपणे सुरू राहील व नंतर त्यास आवर घालणं दुष्कर होऊन बसेल, म्हणून रोगाची ही कीड मुळातूनच खुडून टाकावी हा रास्त विचार बहुधा यामागे असावा. स्वत:च घालून दिलेल्या मर्यादांचा राज्यकर्त्यांस विसर पडला तर ते राष्ट्रनाशाचे कारण ठरतं म्हणून असा मर्यादाभंग दुर्गाच्या बाबतीत होऊ नये यावर कटाक्ष ठेवला गेला.
दुर्ग हे राज्य उभारणीचं अन् संरक्षणाचं प्रमुख साधन या सिद्धांतावर शिवछत्रपतींची निरतिशय निष्ठा होती. म्हणून मग हे दुर्ग राज्यभरात मोक्याच्या जागा पाहून निर्माण केले गेले. अशी स्थळं निवडायचे काही आडाखे, काही संकेत यांचा ऊहापोह झाला. त्यावर सखोल विचार अन् अभ्यास झाला. जुन्या संकेतांचा आदर करतानाच, त्यांतील चुकांची पुनरावृत्ती टाळली गेली, अन् प्राचीन काळापासून चालत आलेल्या दुर्गशास्त्राच्या संकेत-सिद्धांतांचं अन् प्रमेयांचं निखळ अन् निखोड रूप शिवकालीन दुर्गशास्त्राच्या रूपानं अभ्यासकांच्या अन् जनसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय ठरलं. यातील तत्वं अन् विचार इतके परिपूर्ण आहेत की, विचार करू जाता, त्यावेगळं काही सुचत नाही. स्वये शिवछत्रपतींसारख्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या राज्यकर्त्यांचा व त्याच तोलामोलाच्या त्यांच्या शिल्पशास्त्रींच्या विचारांचा परीसस्पर्श या शिवकालीन दुर्गशास्त्रास – ‘आज्ञापत्रा’ स – लाभला आहे, हे यामागचं इंगित असावं बहुधा!
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलीची पद्धत आजही आहे. या कर्मचाऱ्याचे हितसंबंध एकाच ठिकाणी गुंतू नयेत वा अतिपरिचयामुळे त्याच्या कामात ढिलाई येऊ नये, हा यामागचा विचार आहे. मात्र याचे मूळ थेट शिवकाळात सापडतं. इतर शाह्यंमध्ये व मध्ययुगात इतर काळी ही पद्धती अस्तित्वात होती की नाही हे कळायला काही मार्ग नाही; कदाचित असेलही, मात्र शिवकाळातील या पद्धतीची खात्रीलायक माहिती आपल्याला आज्ञापत्रामुळे मिळते अन् दुर्गाच्या कारभारातल्या आणखी एका पलूवर व शिवकालीन विचारधारेवर नेमका प्रकाश पडतो.