पराग केंद्रेकर – parag.kendrekar@gmail.com
जेव्हापासून यंत्रांचे वाहन आले तेव्हापासून त्याची जागा, त्याची निगा, देखभाल वगैरे गोष्टी सुरू झाल्या. विशेषत: त्याच्या जागेचा विचार भेडसावू लागला. यापासून एक नवीन ‘पार्किंग’ संस्कृती सुरू झाली.
दळणवळणासाठी वाहनाचा वापर मनुष्य अगदी पुरातन काळापासून करत आला आहे. इतकेच नव्हे, तर आपले देवी-देवतांचे आपआपली विशेष वाहने आहेत. विष्णूचे वाहन गरुड, इंद्र देवाचे वाहन ऐरावत- एक हत्ती, वरुणाचे वाहन मकर, वायूचे सहस्र घोडे, शिवाचे नंदी अशा अनेक देवदेवतांच्या वाहनाचा उल्लेख आपल्या धार्मिक ग्रंथात व इतरही आढळतो. अर्थात, ही वाहने प्रतीकात्मक होती. पण पुरातन काळापासून माणसाने वेगवेगळ्या वाहनांची निर्मिती स्वत:च्या उपयुक्ततेसाठी केली आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांची साथ माणसाला अगदी अश्मयुगपासून मिळाली आहे. कुत्रे, गाय, बैल, घोडा, उंट व इतर या पाळीव मंडळींनी आपल्याला सदैव साथ दिली आहे. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी साधने या प्राण्यांच्या साहाय्याने माणसाने विकसित केली. अगदी १८ व्या शतकापर्यंत माणसाला प्राणी आधारित वाहनाचा उपयोग झाला. १७८१ मध्ये जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनाने मात्र संपूर्ण जग बदलून गेले. वाफेच्या इंजिनापासून ते आतापर्यंतच्या सौरऊर्जा व विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या गाडय़ांचा घडणीचा प्रवास अत्यंत रोमांचकारी आहे.
माणसाचा हा ‘वाहन’ संस्कृतीचा पैलू आपल्याला आता पदोपदी जाणवतो आहे. अगदी बाजारात खरेदीसाठी जाताना असो वा गावाला जाताना, कार्यालयात जाताना असो वा कुणाकडे भेटीला जाताना, आपल्याला वाहनाचा विचार केल्याशिवाय गोष्ट सुरूच होत नाही. घर खरेदी करताना तर एखादी खोली कमी असली तरी चालेल, पण आपल्या वाहनासाठी ‘खोली’चा विचार तर पहिला येतो. आणि त्याप्रमाणेच निर्णय घेतला जातो.
जग बदलले आहे, कारण संदर्भ बदलले आहेत आणि संदर्भ बदलले आहेत म्हणून जग बदलले आहे. असाच एक बदललेला संदर्भ म्हणजे आपल्या ‘गाडीची जागा’ म्हणजे पार्किंग! या पार्किंगला आपल्या भाषेत नाव नाही, कारण आजपर्यंत आपली वाहनं मुख्यत: सजीव प्राणीच असत- मिळेल त्या जागेत ते जुळवून घेत. देखभालही फार क्लिष्ट नसे आणि अर्थात तो काळ लोकसंख्या कमी असण्याचा होता. जागाही मुबलक प्रमाणात होती. जेव्हापासून यंत्रांचे वाहन आले तेव्हापासून त्याची जागा, त्याची निगा, देखभाल वगैरे गोष्टी सुरू झाल्या. विशेषत: त्याच्या जागेचा विचार भेडसावू लागला. यापासून एक नवीन ‘पार्किंग’ संस्कृती सुरू झाली.
वेगवेगळ्या वाहनांची जागा कशा प्रकारची असावी आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा कसा उपयोग होईल यावर काम झाले आणि अनेक शोध पुढे आले. मागणीप्रमाणे वेगवेगळी यंत्रणा विकसित झाली. २०व्या शतकाच्या शेवटी जेव्हा जागतिकीकरणामुळे सर्व मुख्य देशांमध्ये शहरीकरणाचे वारे वाहू लागले तेव्हा पाठोपाठ वाहन संस्कृतीचा सगळीकडे संचार झाला.
वाहनांच्या जागेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा उदय झाला. पहिले ‘साधी’ पार्किंग जमिनीवरची, नंतर इमारतीच्या खाली असलेली संरक्षित राखीव पार्किंग, नंतर ‘तळघर’ पार्किंग. पुढे जसा जसा लोकसंख्येचा आकार वाढत गेला तसे नुसती पार्किंग न राहता- ‘पार्किंग लॉट’ झाले. आपण त्याला ‘गाडीतळ’ म्हणू. हे गाडीतळ प्रकरण- तळ मजला, भूमजला, पहिला मजला, दुसरा मजला असे करत सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. मागणी अजून वाढली म्हणून आहे त्याच जागेत दोन मजल्याचे पार्किंग यंत्र आले. त्याला ‘२३ूं‘’ पार्किंग म्हणतात. त्यात सुधारणा होऊन तीन मजल्यांचे पार्किंग यंत्र आले. भविष्यात मागणी वाढणार हे लक्षात आल्यावर वर ‘सरकणारी बहुमजली’ यंत्रं विकसित झाली आहेत, त्याला puzzle पार्किंग म्हणतात. ही यंत्रणा खूप कार्यक्षम आहे, परंतु त्याला खूप जागा लागते. म्हणून याचा उपयोग सार्वजनिक गाडीतळासाठी केला जात आहे.
शहरीकरणात जागेच्या कमतरतेमुळे उंच इमारतींना पर्याय राहत नाही. त्याच कमी जागेत अजून जास्त गाडय़ांसाठी सोयीचा प्रश्न उभा राहतो. त्याला पर्याय निघतो तो बहुमजली उंच गाडीतळाचा! Tower पार्किंगचा. त्यात वेगवेगळ्या परिस्थितीप्रमाणे वेगळे प्रकार तयार झाले आहेत. Rotary Tower पार्किंग आणि Puzzle Tower पार्किंग! याला काही अंतच नाही. हे सगळे बघता आणि माणसाची वाहनांची गरज बघता भविष्यातील ‘गाडीतळ’ हवेत तरंगणारा अथवा पृथ्वीच्या वर अवकाशात स्थिरावणारा असाही सहजच असू शकतो. त्यात काही नवल वाटून घेऊ नये!