अलकनंदा पाध्ये
उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही एका स्नेह्य़ांच्या घरी राहायला गेलो होतो. ते वन अधिकारी असल्यामुळे जंगलातील त्यांच्या बंगल्यातले वास्तव्य आमच्यासाठी हटकेच होते. खऱ्याखुऱ्या निसर्गसान्निध्यात शहरी कोलाहलापासून दूर राहणे म्हणजे काय त्याचा अनुभव मिळाला. एरवी डोंगराच्या कुशीतले वास्तव्य वगैरे घरांच्या जाहिरातीसाठी वापरले जाणारे शब्द किती थिटे पडतात ते तिथे समजले. त्यांच्या बंगल्याच्या बाहेर कुंपणापर्यंत म्हणजे साधारण ५-६ फुटांपर्यंत माती किंवा लाद्या नव्हत्या, गोटय़ांच्या आकाराचे गुळगुळीत दगड पसरले कुतूहलाने. त्यामागचे कारण विचारल्यावर समजले की साप किंवा तत्सम प्राण्यांना अशा प्रकारच्या जमिनीवरून सरपटणे कठीण असते म्हणून ही जंगलातील घरासाठीची सुरक्षाव्यवस्था होती. माणसाने शोधलेला एक सुरक्षेचा प्रकार नव्यानेच तिथे समजला.
ताजेतवाने होऊन आम्ही मुंबईत परतलो. घरात भरून राहिलेला कोंदटपणा घालवण्यासाठी भराभर दारे खिडक्या उघडून मोकळी हवा घ्यायचा प्रयत्न केला. बाल्कनीत पाय ठेवल्यावर मात्र अक्षरश: ब्रह्मांड आठवले. कारण.. कबुतरांनी बाल्कनीचे रूपांतर चक्क एका प्रसूतिगृहात केले होते. चपलांच्या कपाटामागे खूप साऱ्या काडय़ांमधे दोन छोटय़ाशा कबुतरांच्या पिल्लांचे संगोपन त्यांची आई करत होती. संपूर्ण बाल्कनीत काडय़ा, पिसे, विष्ठा आणि बरंच काही.. त्यामुळे तिथे पाय ठेवणे कठीण झाले होते. आजकाल कबुतरांच्या वाढत्या त्रासाविषयक बरेच वाचनात आले होते त्याचा अनुभव प्रत्यक्ष मिळाला. झाडू घेऊन झाडझूड करण्याच्या कामाला लागण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. शांतिदूतांच्या या जमातीने माझी मन:शांती मात्र बिघडवली होती. मी नव्याने या घरात आल्यावर प्रशस्त बाल्कनी मोकळीच ठेवायचे ठरवले होते. तिथे आवडीने चार झाडे लावून त्याच्या सान्निध्यात आरामखुर्ची टाकून पुस्तक वाचायचे माझे स्वप्न होते. पण आजूबाजूला अशा उघडय़ा बाल्कनीतून घरात शिरून झालेल्या एखाद्-दोन चोरीच्या घटना कानी आल्यावर मुकाटय़ाने सुरक्षेच्या दृष्टीने बाल्कनीला बॉक्स ग्रिल लावले. तेव्हाच थोडे बंदिवान झाल्यासारखे वाटले होते. आणि आता तर पक्ष्यांच्या त्रासातून वाचण्यासाठी ती पिले उडाल्यानंतर इतर शेजाऱ्यांप्रमाणे आम्हालाही स्वत:भोवती पातळसर जाळीचे कुंपण घालावे लागणार होते. थोडक्यात, पक्ष्यांनीच माणसाला जाळीच्या िपजऱ्यात अडकवले म्हणायला हरकत नाही. सहज बाल्कनीतून खाली भिंतीवरच्या पाइपवर नजर गेली. त्यावरून उंदीर घुशींना घरात शिरायला मज्जाव करण्यासाठी पत्र्याच्या करवतीसारख्या काटेरी टोप्या लावल्यामुळे निदान खिडक्या उघडय़ा ठेवून तरी झोपायची सोय झाली होती. उंदीर घुशींच्या वावरावरून पूर्वीची चाळी-वाडय़ातली घरे आठवली. सर्वच बिऱ्हाडांची दारे दिवसभर माणसांसाठी सताड उघडी असायची, पण त्यामुळे उंदरांनाही घराघरात वावरायला भरपूर वाव असे; तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मात्र दीड-दोन फुटांच्या लाकडी फळ्या उंबरठय़ावर लावलेल्या असत, ज्यांचा रांगत्या बाळांनासुद्धा घराबाहेर जाण्यासाठी अडथळ्यासारखा उपयोग होई. जंगलातील शुद्ध मोकळ्या वातावरणाच्या आठवणी ताज्या असल्याने आल्या प्रसंगावर वैतागत केरसुणी घेऊन बेडरूममधे शिरले आणि पुन्हा चिडचिड झाली. त्याचे कारण.. खिडकीला लावलेल्या बारीक जाळ्या. पूर्वी या उघडय़ा खिडक्यातूनसुद्धा मुक्तपणे उजेड आणि वारा येई, पण नंतर त्यातून होणाऱ्या डासांच्या मुक्त प्रवेशाला आणि उपद्रवाला टाळण्यासाठी तिथेही त्यांच्यापेक्षा छोटय़ा आकाराच्या जाळ्या बसवाव्या लागल्या होत्या. पुन्हा एकदा डासासारख्या क्षुद्र कीटकासाठी माणसाने स्वत:ला बंदिवान केले या कल्पनेने माणसाचा क्षुद्रपणा जाणवला.
प्रवासाचा शीण गेल्यावर घरची घडी नीट बसल्यावर मत्रिणीच्या नवीन घरी जाण्यास निघाले. एका खूप मोठय़ा दिमाखदार गृहसंकुलात तिने घर घेतले होते. भव्य प्रवेशद्वाराकडे विस्फारल्या नजरेने बघत आत जाऊ लागले तोच सुरक्षारक्षकाने हाक मारून हटकले आणि प्रथम अभ्यागतांच्या वहीत नोंद करण्यास सांगितले त्यानुसार तिथे माझे नाव.. ज्यांना भेटायचे त्यांचे नाव.. वेळ, भेटीचे कारण.. अशा मी केलेल्या सर्व नोंदी त्याने तपासून पाहिल्या. एका कागदावर त्याच्या गिचमिड अक्षरात तिच्या पत्त्याची नोंद करून तो कागद माझ्या हाती देऊन तिला फोन करून मी येत असल्याची वर्दी दिली आणि मगच मला तिच्याकडे जाण्याची परवानगी मिळाली.
प्रवासाचा शीण गेल्यावर घरची घडी नीट बसल्यावर मत्रिणीच्या नवीन घरी जाण्यास निघाले. एका खूप मोठय़ा दिमाखदार गृहसंकुलात तिने घर घेतले होते. भव्य प्रवेशद्वाराकडे विस्फारल्या नजरेने बघत आत जाऊ लागले तोच सुरक्षारक्षकाने हाक मारून हटकले आणि प्रथम अभ्यागतांच्या वहीत नोंद करण्यास सांगितले त्यानुसार तिथे माझे नाव.. ज्यांना भेटायचे त्यांचे नाव.. वेळ, भेटीचे कारण.. अशा मी केलेल्या सर्व नोंदी त्याने तपासून पाहिल्या. एका कागदावर त्याच्या गिचमिड अक्षरात तिच्या पत्त्याची नोंद करून तो कागद माझ्या हाती देऊन तिला फोन करून मी येत असल्याची वर्दी दिली आणि मगच मला तिच्याकडे जाण्याची परवानगी मिळाली. ती चिठ्ठी सांभाळत इमारतीत शिरल्यावर माझे लक्ष पुन्हा तिथल्या तळमजल्यावरच्या छोटय़ा टी.व्ही.कडे गेले. त्यात माझीच भांबावलेली छोटी आकृती मला दिसली. पावलापावलावर आपल्याकडे कुणीतरी डोळे लावून बसलंय या कल्पनेने मला उगीचच चोरटय़ासारखं वाटायला लागलं. लिफ्टमध्येही डोक्यावरचा सीसीटीव्ही आपल्याकडे रोखून बघतोय असे वाटले. तिच्या घराची बेल वाजवली तेव्हा आतून प्रथम तिच्या लाडक्या श्वान महाराजांनी भुंकून सलामी दिली.
एकेकाळी खेडेगावात पूर्वी घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळला जाई जो एरवी घराभोवती असाच कुठेही फिरत असे. पण आजकाल इतर अनेक सुरक्षा व्यवस्थांमुळे कुत्रे जमातीचे ते काम बंद होऊन उलट त्यांनाच घरात बंदिस्त आणि सुरक्षित ठेवले जाते, निदान शहरात तरी. असो.. मुख्य दरवाजा उघडताना तिने मुश्किलीने कुत्र्याला थोपवले आणि मगच बाहेरचा सेफ्टी दरवाजा उघडत स्वागत केले. सुरक्षेचे सर्व सोपस्कार पार करत हुश्श म्हणत सोफ्यावर टेकताना माझे लक्ष समोरच्या भिंतीवरच्या सीसीटीव्हीच्या पिटुकल्या पडद्याकडे गेले त्यात लिफ्ट आणि जिन्याजवळचा भाग स्पष्ट दिसत होता. मत्रिणीकडे येईपर्यंतच्या प्रवासातल्या अनेक अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थांचा विचार करताना जाणवले माणसाला घरात राहताना किती पातळ्यांवर आणि कुणाकुणापासून सुरक्षेचा उपाय करावा लागतोय. मुळात मानवी संस्कृतीच्या आरंभी जंगलात राहणाऱ्या आदिमानवाने फक्त हिंस्र पशू आणि वाऱ्यावादळापासून संरक्षणाच्या हेतूने घर नावाची संकल्पना आकारास आणली. थोडक्यात, त्याच्या दृष्टीने घर हीच एक सुरक्षा व्यवस्था होती. पण आज अत्यंत प्रगत अशा माणसाच्या त्याच घराला कितीजणांपासून धोका वाटावा.. क्षुद्र कीटक.. प्राणी-पक्ष्यांपासून चोरांपर्यंत म्हणजेच त्याच्याचसारख्या माणसांपर्यंत!
माणसे चाळी-वाडय़ांतून ब्लॉक संस्कृतीकडे वळल्यावर म्हणजेच सहजीवनाकडून स्वतंत्र जीवनाकडे वळल्यावर सुरक्षेचा प्रश्न जरा गंभीर होऊ लागला. चाळीत दाराला फक्त कडी लावून शेजाऱ्याला सांगून जवळपास कुठे गेले तरी जी धास्ती वाटत नव्हती ती आता कुलूप लावूनसुद्धा वाटू लागली. एकेकाळी मजबूत कुलपे बनवण्यात आपल्याकडे एका कंपनीची मक्तेदारी होती, आज बाजारात अनेक प्रकारची नवनवीन कुलपे आली तरी त्या कंपनीची विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. पण वाढते शहरीकरण, लोकसंख्या, बेकारी आणि त्यातून वाढत चाललेली गुन्हेगारी.. त्यामुळे एका छोटय़ाशा कुलपावर भिस्त परवडेनाशी झाली. कडीला लावलेले कुलूप तोडण्याच्या, नकली चावीने कुलूप उघडण्याच्याही क्लृप्त्या निघाल्या. त्यावर नवा उपाय म्हणून दार आणि त्याच्या चौकटीतच अंतर्गत कुलपाची सोय वापरली जाऊ लागली. शिवाय दाराबाहेरच्या व्यक्तीला उघडय़ा दारातून पटकन् आत घुसता येऊ नये यासाठी चौकट आणि दाराला अडकवता येईल अशा साखळीची सोय केली गेली. तसेच दाराच्या आतून बाहेरची व्यक्ती दिसावी म्हणून दाराला छोटेसे छिद्रही पाडले गेले. अधिकच्या सुरक्षेसाठी मुख्य दारापुढे आणखी एका दाराची सोय झाली. सामान्यजनांच्या इमारतींसाठीही सुरक्षाररक्षक नेमणे आवश्यक झाले. त्यापुढच्या आधुनिक सुरक्षा पद्धतींचा अनुभव नुकताच मत्रिणीकडे घेत होते.
मत्रीण माझ्याबरोबरच संकुलातल्या देवळात देवदर्शनासाठी खाली उतरली. मंदिराशी पोचल्यावर पुन्हा एकवार गंमत वाटली, कारण तिथली अत्यंत सुंदर अशी संगमरवरी कृष्णमूर्तीसुद्धा कुलपात बंदिस्त केलेली होती. म्हणजे, ज्याच्याकडे माणूस सदासर्वकाळ स्वत:च्या रक्षणासाठी प्रार्थना करतो त्या परमेश्वराभोवतीसुद्धा माणसाने सुरक्षा कवच तयार केले होते. अखेर.. भय इथले संपत नाही हेच सत्य असावे का?
alaknanda263@yahoo.com