कविता भालेराव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मथळा वाचून थोडे गोंधळला ना! आपलं घर ही आपली दुनियाच असते. आणि सुंदर घराला जर का साजेसं लायटिंग अर्थात प्रकाशयोजना असेल तर घराला चार चांद लागणं म्हणजे काय असतं, हे कळतं.

इंटिरिअरमध्ये प्रकाशयोजनेला फारच महत्त्व आहे. मी मुद्दाम प्रकाशयोजना म्हणतेय.. कारण अनेकदा आपण घरात प्रकाशाची सोय करतो, ती योजना नसते. ती नीट प्रकारे केली नाही तर आपले घर म्हणावे तसे दिसत नाही. नुसतेच टय़ूब, हँगिंग लाइट किंवा झुंबर लावून पाहिजे तसे लाइट इफेक्ट्स मिळत नाहीत. त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावे लागते. लाइट्समुळे अगदी साधे घरदेखील एकदम वेगळे आणि छान दिसते.

खोलीनुसार, नैसर्गिक प्रकाशाचा अभ्यास करून आपण कुठे काय ठेवणार यानुसार प्रकाशयोजनेची आखणी करायला हवी.

प्रकाशयोजनेचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात.

* अ‍ॅम्बिअंट लायटिंग

अ‍ॅम्बिअंट म्हणजे एकसारखी प्रकाशयोजना. म्हणजे रूममधील असतील तेवढे सगळ्या प्रकारचे लाइट्स जसे- वॉल लाइट, सीिलग लाइट, झुंबर, ट्रॅक लाइट. आपल्या सभोवतालच्या सगळ्या लाइटच्या प्रकाशाला अ‍ॅम्बिअंट लायटिंग असे म्हणतो.

* टास्क लायटिंग

टास्क लायटिंग हे नावाप्रमाणेच जिथे काही विशिष्ट काम करायचे आहे तिथे लावण्यात येणाऱ्या लाइट्सना टास्क लायटिंग म्हणतात. जसे- स्टडी टेबल, किचनमध्ये ओटय़ावर काम करताना.. म्हणजे जिथे उजेडासाठी जी प्रकाशयोजना केली जाते ती टास्क लायटिंग.

* अ‍ॅक्सेंट लायटिंग

या प्रकारचे लायटिंग म्हणजे एखादी वस्तू, भिंत हायलाइट करणे. म्हणजे एखाद्या पेंटिंगवर लावलेले लाइट्स. जसे फिक्स्चरच्या प्रकाशाने ते पेंटिंग अधिक उठून दिसते. एखादे आर्टवर्क, भिंत हायलाइट करण्यासाठी केलेले लायटिंग म्हणजे अ‍ॅक्सेंट लायटिंग.

प्रकाशयोजनेचे हे तीन प्रमुख प्रकार समजायला सोपे आहेत. पण काम करतेवेळी फारच काळजीपूर्वक यांचा वापर करावा लागतो. नाहीतर लाइटवर खूप खर्च करूनही त्यांचा परिणाम साधता येत नाही. उत्तम प्रकाशयोजना फक्त कोणत्या प्रकारचा लाइट आणला यापेक्षाही अधिक तो कुठे आणि कसा लावला यावर अवलंबून असते. प्रमुख्याने प्रकाशयोजना हे ती खोली कोणती आहे, नैसर्गिक प्रकाश किती आहे, त्यात फर्निचर कसे ठेवले आहे यावर अवलंबून असते. घरात प्रकाशयोजना करताना थोडा वेळ देणे आवश्यक असते. बऱ्याचदा एकाच घरात राहणाऱ्या लोकांचे लाइट्सबद्दलचे मत वेगवेगळे असते. जसे- काहींना पिवळ्या प्रकाशाचा दिवा आवडतो तर काहींना पांढऱ्या. मग आपल्याला फारच विचार करून लाइट्सची योजना करावी लागते. आजकाल बाजारात रंगीत लाइट्सही मिळतात. तसेही लाइट्स बऱ्याच लोकांना आवडतात. त्यामुळे नेमकी प्रकाशयोजना करणे हे फारच जिकिरीचे काम आहे. खोलीत जर डीम लाइट असेल तर वाचन करायला त्रास होतो. त्यामुळे प्रकाशयोजना करताना खोलीच्या सोयीनुसार करावे.

प्रकाशयोजना करताना काय लक्षात घ्यायचे

*अंधार असलेल्या जागा

प्रत्येक घरात अशी एक तरी जागा असते जिथे नैसर्गिक उजेड फार नसतो. बऱ्याचदा एखादी खोली असते, कोपरा असतो. ते लक्षात घेऊन त्याचा आपण कसा वापर करतोय यावर प्रकाशयोजना ठरते. आपण जर का कमी उजेडाच्या रूमचा वापर हा स्टडी रूम म्हणून करत असू तर तिथे पांढऱ्या प्रकाशाच्या लाइटचा वापर जास्तीतजास्त करावा. म्हणजे वाचन, लिखाण करताना त्रास होत नाही.

* गडद रंग आणि भिंती

आपण जर का एक भिंत गडद रंगाची केली आणि बाकीच्या भिती सफेद रंगाच्या ठेवल्या तर जरा लाइटचा प्रकाश जास्त पडतो. मग तो गडद रंगही खुलून दिसतो. गडद रंगाच्या भिंतीवर जर का अ‍ॅक्सेंट लायटिंग केले तर ती भिंत अजूनच छान दिसते. योग्य आणि सुनियोजित प्रकाशयोजना असेल तर डार्क रंगाची निवड करायला अजिबातच घाबरू नका.

* लाइट फिटिंगची निवड

बऱ्याचदा लाइटच्या दुकानात गेल्यावर आपल्याला सगळेच लाइट्स आवडतात. मग सुरू होतो गोंधळ.. आपण ठरवू शकत नाही आपल्याला नक्की काय हवे. अशा वेळी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. म्हणजे आपल्या खोलीत नक्की कोणता लाइट हवा हे ठरवता येते.

एकाच खोलीसाठी सगळ्या प्रकारचे लाइट्स बऱ्याचदा चांगले दिसत नाहीत आणि मग एवढे लाइट्स असूनही मनासारखा प्रकाश आणि त्याचे पोरिणाम दोन्ही मिळत नाहीत. त्यामुळ खोलीनुसार जर का लाइटची निवड केली तर उत्तमच.

* लिव्हिंग रूम/ लिव्हिंग डायनिंग रूम

घरातील प्रथमदर्शनी खोली छान तर असलीच पाहिजे. रूममधील फर्निचर रचनेनुसार तसेच नैसर्गिक प्रकाशाचा अभ्यास करून प्रकाशयोजना करणे गरजेचे असते. आपण हॉलमध्ये छोटे-मोठे आर्ट पीस ठेवत असतो, भिंतीवर पेंटिंग लावत असतो, त्यामुळे आपण या सगळ्या शोभेच्या वस्तूंवर प्रकाश कसा नीट पडेल, त्या कशा हायलाइट करता येतील याचा नीट विचार झाला पाहिजे. विविध प्रकारच्या लाइट्सचा वापर करून आपण मूड लाइटही करू शकतो.

आजकाल लिव्हिंग आणि डायनिंग या दोन्ही रूम एकत्रच असतात. तेव्हा आपण दोन्हीचा एकत्र विचार करून प्रकाशयोजना करणे आवश्यक आहे. डायनिंग टेबलवर पेन्डंट लाइट छानच दिसतो. पण तो लावल्यावर त्याची किती उंची ठेवायची म्हणजे व्यवस्थित प्रकाश आपल्या टेबलवर पडेल याचा विचार होणे आवश्यक.

क्रोकरी युनिटमध्येही छोटे लाइट वापरून डायनिंगची शोभा वाढवू शकतो. लिव्हिंग आणि डायनिंगचे एकाच सीिलगवरून आपण त्यात कव्ह लायटिंग देऊ शकतो ज्यात आपण led strip वापरू शकतो. सीिलगमध्ये पॅनल लाइट वापरून आपण रूममध्ये एकसारखा प्रकाश करू शकतो. आपण लिव्हिंग रूममध्ये अ‍ॅम्बिअंट, टास्क आणि अ‍ॅक्सेंट लायटिंगचा योग्य वापर करू शकतो.

* किचन

किचनमध्ये आपल्याला भरपूर उजेडाची गरज असते. संध्याकाळनंतर तर फारच. पण बऱ्याच घरांत सकाळीही कृत्रिम प्रकाशाची गरज असते. आपण सीलिंगला लाइट लावतोच, पण बऱ्याचदा हे लाइट्स काम करताना कमी वाटतात, तेव्हा आपण टास्क लाइटचा सुयोग्य पद्धतीने वापर करू शकतो. आपण कॅबिनेटच्या खाली लाइट देऊ शकतो, जेणेकरून किचन प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट उजेड पडेल आणि काम करणे सोपे होईल. स्वयंपाकघरात काम करताना भरपूर उजेडाची गरज असते. त्यामुळे किचनचे लायटिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते.

* बेडरूम

बेडरूममध्ये आपल्याला आरामदायी वाटले पाहिजे म्हणून आपण उत्तम बेड बनवतो. गादीही भारीची निवडतो, मग लाइटही छान घेतलेच पाहिजेत. लाइटची निवड करताना डोळ्यांना खूप त्रास होईल असे लाइट्स घेऊ नयेत. रीिडग लाइटची सोयही केलीच पाहिजे. याशिवाय जर का आपण याच रूममध्ये बसून काम करणार असू तर टास्क लाइटचाही वापर करणे आवश्यक आहे. एखाद्या छोटय़ा लाइटची आखणीही केलेली असावी आणि ती आखणी अशी करावी, की तो लाइट रात्रभर सुरू राहिला तरी डोळ्यांना त्याचा त्रास होणार नाही. साइड टेबलवर जर का लॅम्प ठेवले तर अजूनच छान. बेडरूममध्ये आपण recessed light चा वापर करूच शकतो.

* बाथरूम

बाथरूममध्ये उजेड असणे आवश्यक. स्वच्छतेच्या दृष्टीने थेट आणि भरपूर प्रकाश असलेले लाइट वापरणे. याशिवाय मिररवरही लाइट हवा. बाथरूममध्येच जर वॉर्डरोब असेल तर मात्र प्रकाशयोजना अगदी व्यवस्थित करणे आवश्यक असते.

लाइटचा वापर आणि त्याची रचना फारच काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. नाहीतर लाइटचा पाहिजे तसा परिणाम साधता येत नाही.  अतिशय खर्च करून बनवलेल्या घराचे लायटिंग नीट नसेल तर त्या सगळ्या वस्तूंनाही न्याय मिळत नाही आणि घरही सुंदर वाटत नाही.

(इंटिरियर डिझायनर)  kavitab6@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about smart lighting systems for the home