आपलं मन बऱ्याचदा नि:शब्द-शांत होतं. गेल्या भागात निळा रंग पाहताना, ही शांतता कशामुळे येते, याची चर्चा करताना आपण पाहिलं की, एक तर नराश्यामुळे किंवा मग मनातली वादळं शमल्यामुळे ही शांतता मनाला जाणवते. याच शांततेची पुढली छटा म्हणजे मनाला लागणारी अध्यात्माची ओढ! पण जसजसा माणूस अध्यात्माकडे झुकायला लागतो, तसा तो आत्मानंदी बनू लागतो. बाहेरच्या जगापेक्षा आणि जगातल्या आधिभौतिक गोष्टींपासून मिळणाऱ्या सुखापेक्षा त्याला आंतरिक आणि आत्मिक सुख हे अधिक मोठं वाटू लागतं. त्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी परमात्म्याचं दर्शन घडायला लागतं आणि तो त्याच्याशी आंतरिक संवाद साधू पाहतो. अशी माणसं कधीकधी स्वत:शीच हसत आहेत, बोलत आहेत असं इतरांना वाटतं. अशा माणसांमध्ये त्यांना वेडाची छटा दिसते; पण खरं तर ती असते आध्यात्मिकता! अर्थात, या अध्यात्माच्या मार्गावर जर योग्य प्रगती झाली नाही आणि अध्र्या वाटेवरच जर माणूस गडगडला तर मात्र, एकीकडे पुन्हा एकदा आधिभौतिक गोष्टींची मनाला ओढ लागते आणि बाहेरच्या जगातल्या तात्कालिक, नश्वर गोष्टींबद्दल अध्यात्मामुळे मनात निर्माण झालेल्या अर्धवट निरिच्छतेचं रूपांतर त्या गोष्टी न मिळाल्याची खंत मनात उत्पन्न होऊन त्याचं परिवर्तन नराश्यातून आलेल्या जगाबद्दलच्या तिटकाऱ्यात होतं. मग अवस्था अशी होते की, धड ना अध्यात्म ना धड आधिभौतिकता आणि मग या सगळ्याचा अतिरेक होऊन चिडचिड, जगाबद्दलचा राग, संताप यांचा अतिरेक झाला तर हिस्टेरिआसारखा मनाचा मोठा आजारही उद्भवू शकतो. हे सगळं इथे सांगायचं कारण म्हणजे निळ्या रंगानंतरचा असलेला इंद्रधनुष्यात किंवा रंगचक्रावरचा ‘तानापिहिनिपाजा’ या सप्तरंगांमधला ‘पा’ म्हणजे ‘पारवा’ किंवा इंग्रजीत ज्याला ‘Indigo’ म्हणतात तो रंग!
हा रंग तसा बहुचíचत नाही. त्याबद्दल सर्वसाधारणपणे बोललं किंवा लिहिलं जात नाही, कारण त्याच्या गडद निळसर छटेमुळे बऱ्याचदा त्याला गदड निळा असंही अनेक जण संबोधतात; पण हा रंग स्वतंत्र आहे. तो निळा नाही. निळ्या रंगाची वेव्हलेंग्थ म्हणजे तरंगलांबी ही ४६० ते ५०० नॅनोमीटर (nm) इतकी असते, तर पारवा या रंगाची तरंगलांबी ४४० ते ४६० ल्ले इतकी असते. त्याची तरंगलांबी कमी असल्यामुळेच त्याची वारंवारता ही निळ्या रंगापेक्षाही जास्त असते. वारंवारता अधिक असल्यामुळे अधिक तीव्र ऊर्जा या रंगाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यापर्यंत आणि तिथून मेंदूपर्यंत पोहोचत असते. म्हणूनच निळा रंग जे मानसिक परिणाम साधत असल्याचं आपण पाहिलं त्यापेक्षा अधिक तीव्र मानसिक परिणाम हा रंग साधतो. म्हणजेच वर उल्लेखल्याप्रमाणे मनाला केवळ शांती देऊन न थांबता तो आध्यात्मिक आनंद मिळवून देतो; पण नराश्य ही जशी निळ्या रंगाची नकारात्मक बाजू असू शकते तशीच, पण त्याहीपेक्षा अधिक तीव्र नकारात्मकता ही पारवा रंगाने साधली जाऊ शकते, कारण त्याचे मनावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याआधी सांगितल्याप्रमाणे या रंगाचा अतिरेकी किंवा सततचा वापर यामुळे मानसिक आजार उद्भवू शकतात. या रंगाची आवड असलेल्या लोकांच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा नाटकीपणा असतो. हा नाटकीपणा म्हणजे ढोंगीपणा नसतो. ही माणसं रूढी-परंपरांवर खूप प्रेम करणारी आणि त्याबाबत अतिरेकी आग्रह धरणारी असतात. मग एखादी गोष्ट ही अशीच असावी, या आग्रहापायी त्यांच्या त्या कल्पना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांच्या वागण्याबोलण्यातही नाटय़मयता येते. म्हणून वागणं नाटकी वाटतं. ही माणसं म्हणूनच एककल्ली असतात. निळा पारवा हा खरं तर एक पक्षी! कबुतर किंवा कबुतराच्या जातीचा हा पक्षी. दक्षिण कॅनडापासून अमेरिकेतल्या फ्लोरिडापर्यंत आढळणाऱ्या या पक्ष्याच्या डोक्याचा रंग पारवा असतो. (छायाचित्र १) पाहा. आपल्याकडे आढळणाऱ्या करडय़ा रंगाच्या कबुतरांच्या चोचीखाली गळ्यावर या रंगाची थोडीशी हिरवट छटा पाहायला मिळते. म्हणूनच काही लोक करडय़ा रंगालाच पारवा रंग असंही म्हणतात. त्यामुळेच कबुतराला काही ठिकाणी पारवा म्हटलं जातं.
या रंगाचे एकूणच परिणाम लक्षात घेता, घराच्या इंटीरिअरमध्ये या रंगाचा वापर जरा सावधपणे आणि संतुलितपणे करायला हवा. लििव्हगरूममध्ये केलेला पारव्याचा वापर (छायाचित्र २) मध्ये दाखवला आहे. सोफा, उशांचे अभ्रे किंवा कारपेट एवढाच मर्यादित वापर दिसतो. याव्यतिरिक्त या खोलीत असलेल्या पुस्तकांच्या कपाटासाठीही हा रंग उत्तम आहे, कारण याचं नातं थेट ज्ञानाशी आहे. स्टडीरूम कम बेडरूम यासाठीही या रंगाचा वापर केला जाऊ शकतो. (छायाचित्र ३) पण इतर रंगांप्रमाणेच थेट डोळ्यांसमोर हा रंग न ठेवता वाचायला बसताना बेडच्या मागच्या बाजूला येईल, असा ठेवावा. चादरी किंवा उशीचे अभ्रे यासाठीही या रंगाचा वापर करता येईल.
थोडक्यात, जिथे मनाची एकाग्रता साधायची असेल किंवा ज्ञानार्जन करायचं असेल, तिथे या रंगाचा वापर अधिक उपयोगी ठरू शकतो. या रंगाला ऊर्जा अधिक असल्यामुळे त्याचा वापर योग्य त्या प्रमाणात व योग्य ठिकाणी केला, तर त्याने खूप चांगले परिणाम साधले जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीला बऱ्यावाईट बाजू असतातच. म्हणूनच प्रत्येक गोष्टीतलं बरं असेल ते घेऊन वाईट भाग सोडून द्यावा, हेच संस्कार आपल्यावर लहानपणापासून केले जातात. त्याचा वापर जसा इतर गोष्टीत करावा, तसाच तो रंग निवडतानाही करावा.
रंगाचे एकूणच परिणाम लक्षात घेता, घराच्या इंटीरिअरमध्ये या रंगाचा वापर जरा सावधपणे आणि संतुलितपणे करायला हवा. लििव्हगरूममध्ये केलेला पारव्याचा वापर मध्ये दाखवला आहे. सोफा, उशांचे अभ्रे किंवा कारपेट एवढाच मर्यादित वापर दिसतो. याव्यतिरिक्त या खोलीत असलेल्या पुस्तकांच्या कपाटासाठीही हा रंग उत्तम आहे, कारण याचं नातं थेट ज्ञानाशी आहे. स्टडीरूम कम बेडरूम यासाठीही या रंगाचा वापर केला जाऊ शकतो. पण इतर रंगांप्रमाणेच थेट डोळ्यांसमोर हा रंग न ठेवता वाचायला बसताना बेडच्या मागच्या बाजूला येईल, असा ठेवावा. चादरी किंवा उशीचे अभ्रे यासाठीही या रंगाचा वापर करता येईल.
(इंटिरियर डिझायनर)
anaokarm@yahoo.co.in