कमला मिलच्या आगीसारख्या दुर्घटना घडतात तेव्हा त्याच्या तपशिलात गेल्यावर हे लक्षात येतं की हे अपघात नसून, आवश्यक ती खबरदारी घेतली गेली तर या टाळता येण्याजोग्या दुर्घटना आहेत. त्यामुळेच अशा दुर्घटनांना यंत्रणा जितक्या जबाबदार असतात, तितकेच बेपर्वा व्यावसायिक आणि त्यांच्या बेपर्वाईला उत्तेजन देणारे नागरिकही जबाबदार असतात. म्हणूनच अशा दुर्घटनांना कोणा एकाला जबाबदार धरता येणार नाही, तर ही सर्वच संबंधितांची सामूहिक जबाबदारी आहे.
‘‘माणूस, हा असा एकमेव प्राणी आहे की, जो आग चेतवतो आणि जळत्या आगीबरोबर जगू शकतो, कारण आग नियंत्रणात कशी आणायची हे फक्त त्यालाच ठाऊक आहे.’’ हे वाक्य आहे हेन्री जॅक्सन व्हॅन डाईक ज्युनिअर या सुप्रसिद्ध अमेरिकी विचारवंताचं! पण त्याचबरोबर ज्या इसापाच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो, त्याचं आगीबद्दलचं एक मार्मिक भाष्य आहे. तो म्हणतो, ‘‘आग ही एक चांगला सेवक आणि अतिशय वाईट मालक आहे.’’ म्हणजेच जोपर्यंत आग तुमच्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत शेकोटीसाठी, अन्न शिजवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी एखाद्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे ही आग तुमची सगळी कामं करून देते. पण एकदा का या सेवकाने मालकाची जागा घेतली, म्हणजेच तुम्ही तिच्यावरचं नियंत्रण गमावल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली तुम्ही आलात, की भडकलेली ही आग निर्दयपणे सगळं जाळून खाक केल्याशिवाय शांत होत नाही. या एका वाक्यात इसापाने सोप्या शब्दात आगीबद्दलचं फार मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. पण निव्वळ बाजारू व्यावसायिक, विविध कारणांसाठी (?) सर्व काही दिसत असूनही डोळ्यांवर पट्टी बांधणारं महापालिका आणि पोलीस प्रशासन आणि खिशात बक्कळ पसे आहेत म्हणून करमणुकीच्या नावाखाली कसलाही विचार न करता पसे मोजून फायर स्टंटसारखे प्रकार आवडीने पाहायला तयार असणारे आणि जळत्या निखाऱ्यांवर हुक्क्याची गुडगुडी ओढून बेधुंद होऊ पाहणारे ग्राहक, यांना मात्र हे तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ मूर्खपणाच वाटत असावा, नाहीतर साध्या साध्या गोष्टींकडेही दुर्लक्ष केल्यामुळे नुकतीच कमला मिल कम्पाऊंडमध्ये जी एवढी मोठी आगीची दुर्घटना घडली, ती घडली नसती. तसं पाहता, या आगीचं कारण हे ‘‘काहीच कळू न शकल्यामुळे?’’ शॉर्टसíकट असावं, असा एक कयास सध्या तरी बांधण्यात आला आहे. पण आता मात्र, वन अबाव्ह पबचे मालक हे मोजोज ब्रिस्टोजवर या दुर्घटनेचं खापर फोडत आहेत, तर राजकारणातले राजकीय विरोधक हे या संधीचं (?) निमित्त साधून महापालिका आणि राज्य सरकारवर याचं खापर फोडत आहेत, तर काही प्रसारमाध्यमांनीही पारंपरिक पद्धतीने यंत्रणांवर खापर फोडण्याचे सोपस्कार पार पाडले.
खरं तर कमला मिलच्या आगीसारख्या दुर्घटना घडतात तेव्हा त्याच्या तपशिलात गेल्यावर हे लक्षात येतं की, हे अपघात नसून आवश्यक ती खबरदारी घेतली गेली, तर या टाळता येण्याजोग्या दुर्घटना आहेत. त्यामुळेच अशा दुर्घटनांना यंत्रणा जितक्या जबाबदार असतात, तितकेच बेपर्वा व्यावसायिक आणि त्यांच्या बेपर्वाईला उत्तेजन देणारे नागरिकही जबाबदार असतात. म्हणूनच अशा दुर्घटनांना कोणा एकाला जबाबदार धरता येणार नाही, तर ही सर्वच संबंधितांची सामूहिक जबाबदारी आहे.
राज्य सरकारने अग्निसुरक्षेसाठी याआधीच कायदा केला आहे. पण त्याविषयी जाणून घेण्याआधी आगीविषयीची काही मूलभूत माहिती आपण जाणून घेऊ या. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, वाढलेलं तापमान आणि इंधन या तीन गोष्टी एकत्र आल्या की आग लागते, हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत आहे. पण इंधन म्हटलं की, सामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर येतात ती- पेट्रोल-डिझेल, केरोसीन किंवा कोळशासारखी ‘इंधन’ या अर्थाने असलेली पारंपरिक इंधनं. इथे मात्र, इंधन या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आणि अधिक व्यापक आहे. थोडक्यात सांगायचं, तर जे जे आग भडकायला कारणीभूत होतं, ते ते इंधन या प्रकाराखाली येतं. खरं तर ‘फायरप्रूफ’ अर्थात, आगीच्या भक्षस्थानी पडतच नाही किंवा आगीत वितळतंच, अशी पूर्णपणे अग्निविरोधी असलेली कुठलीही वस्तू नाही. सगळ्याच वस्तू या केवळ अग्निरोधक असतात. म्हणजेच काही काळापर्यंत त्या आगीचा सामना करू शकतात. त्यामुळेच विविध पदार्थाचं वर्गीकरण हे त्यांच्या अग्निरोधकतेवर केलं जातं. त्यानुसार एक तास, दोन तास, चार तास अग्निरोधकता असलेल्या प्रकारांमध्ये, विविध बांधकाम साहित्य मोडतात. त्यामुळेच जिथे हानी जास्त व्हायची शक्यता असेल, तिथे लोकांच्या सुटकेसाठी अधिक कालावधी मिळावा याकरता अधिक तासांची अग्निरोधकता असलेलं बांधकाम साहित्य वापरण्याची आवश्यकता असते. बांबू, लाकूड, कागद, प्लॅस्टिक अशा वस्तूंना अग्निरोधकता अजिबात नसल्यामुळे या वस्तू वर सांगितल्याप्रमाणे आगीसाठी उलट इंधन म्हणूनच काम करतात आणि नेमक्या याच वस्तूंचा वापर गच्चीवरच्या रेस्टोरंटमध्ये छत उभारण्यासाठी वन अबाव्ह आणि मोजोजमध्ये केल्याची माहिती आता उघड होते आहे. कारण उघड आहे. जिप्समबोर्डसारख्या अधिककाळपर्यंत अग्निरोधकता असलेल्या साहित्याचा जर बांधकामासाठी वापर करायचा, तर ते महागडं असतं. त्यामुळे बांबू, प्लॅस्टिकसारख्या वस्तूंच्या साहाय्याने उभारलेलं छत अगदीच स्वस्तात पडतं. पण लोकांच्या जिवांच्या दृष्टीने ते किती महागात पडेल, याची फिकीर या व्यावसायिकांना नाही. कमी गुंतवणुकीत उद्योग सुरू करून लोकांकडून जास्तीत जास्त पसे उकळून अधिकाधिक नफा कमवायचा हे सध्याचं प्रसिद्ध होत चाललेलं व्यवसायतंत्र वन अबाव्ह आणि मोजोजच्या मालकांनीही अवलंबलेलं दिसतं. शिवाय अशी बांधकामं बऱ्याच वेळा अवैध असल्यामुळे ती पक्की नाहीत असा दावाही करता येतो, शिवाय ती पाडली तरी फारसं नुकसान होणार नाही, असे अनेक हिशेब त्यामागे असतात. अशा मोठय़ा आगीत लोखंडी सळ्याही वितळतात आणि त्या कोसळणाऱ्या सळ्या अंगावर पडून सुटका न होऊ शकलेले लोक आगीमुळे नव्हे, तर वजन आणि गरम लोखंड यामुळे भाजून मृत्युमुखी पडायची शक्यता असते. कमला मिलच्या आगीची दृश्यं ज्यांनी बातम्यांमध्ये पाहिली असतील, त्यांनी अशा लालबुंद होऊन कोसळणाऱ्या लोखंडी वस्तूंची दृश्यं पाहिली असतील. या शिवाय जिथे प्रत्यक्ष अन्न शिजवलं जातं, त्या शेगडीच्या वरती किमान तीन ते चार फुटांपर्यंतच्या उंचीत कोणतेही लाकडी माळे किंवा कपाटं असता कामा नयेत. कारण फोडणी देताना कधी कधी आगीची ज्वाळा येते. या ज्वाळेच्या उंचीपर्यंत किंवा तिची धग जिथे पोहोचते अशा ठिकाणापर्यंत आगीसाठी इंधन ठरू शकणारं वर उल्लेखलेलं बांधकाम साहित्य कोणत्याही परिस्थितीत वापरू नये. पण सर्वसाधारणपणे लाकडी किचन कॅबिनेट्स ही हाताकडे वस्तू मिळाव्यात म्हणून सोय बघण्यासाठी शेगडीच्या वरच बांधली जातात. तसंच गॅस सििलडर घेऊन येणाऱ्या कामगाराला अतिरिक्त पशांची लाच देऊन जास्तीचे अनधिकृत सिलेंडर किचनमध्ये साठवले जातात. आग लागली तर अशा सिलिंडरचे स्फोट होऊन त्यात अधिक जीवित आणि वित्तहानी होते.
या आणि अशा अज्ञानीपणे किंवा निष्काळजीपणे किंवा मुद्दाम बेपर्वाईने केल्या जाणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठीच महापालिकेचा अग्निशमन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इमारती व कारखाने विभागांनी वेळोवेळी पाहणी करून तात्काळ योग्य ती कारवाई अशा बेमूर्वतखोर हॉटेल मालकांवर करणं अपेक्षित असतं. पण ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांमुळे त्याकडे कधी कधी दुर्लक्ष केलं जातं. कधी कधी अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असतात आणि नोटिसाही बजावल्या जातात, पण त्या हॉटेलमालकांच्या पाठीशी असलेल्या राजकीय दबावामुळे कारवाई करता येत नाही. अशा विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेली ही हॉटेलं आणि पब्ज मग अशा दुर्घटनांना बळी पडतात. सरकारने याबाबत ‘महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवन संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी ५ फेब्रुवारी २००७ या दिवशी राजपत्रात प्रसिद्ध करून याबाबतचा कायदा अस्तित्वात आणला. त्याबरोबरच २३ जून २००९ रोजी ‘महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना नियम २००९’ हे एका अधिसूचनेद्वारे जारी केले. याच्या नियम ९ नुसार संबंधित अधिकाऱ्याने पाहणी करून संबंधित मालकाला किंवा भोगवटाधारकाला विवक्षित उपाययोजना हाती घेण्यासाठी नोटीस द्यायची तरतूद आहे. या नोटिशीनुसार संबंधित मालकाला किंवा भोगवटाधारकाला अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला जातो. यात जर त्याने सुधारणा केल्या नाहीत, तर संबंधित जागा किंवा इमारत किंवा तिचा भाग सीलबंद करण्यासाठी त्या जागेतून निघून जायचे आदेश नियम १०(क) अन्वये दिले जातात, त्या आदेशाचं पालन न केल्यास महापालिकेचे संबंधित अधिकारी इमारतीच्या त्या भागातून अशा व्यक्तींना हलवण्याचे निर्देश पोलिसांना देतात. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून ती जागा सीलबंद करायची असते. कमला मिलच्या या प्रकरणात अशा नोटिसा वेळोवेळी दिल्याचं संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, तर पोलिसांनीही दोनच दिवस आधी म्हणजे बुधवारी रात्री आगीच्यावेळी बाहेर जाण्यासाठी असलेला जिना बंद केल्याचं हॉटेल मालकांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं सांगितलं होतं. मात्र, यावेळी या हॉटेल मालकांनी पोलिसांबरोबर बाचाबाची केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांबरोबर बाचाबाची करायची आणि त्यांना धुडकावून लावायची ही िहमत अवघ्या पंचविशीतल्या हॉटेल मालकांमध्ये कुठून येते? आणि इतकं करूनही पोलीस, कारवाई का करू शकत नाहीत? मोजोजच्या हॉटेल मालकांमधला एक हा एका उच्चपदस्थ माजी पोलीस अधिकाऱ्याचा जवळचा नातेवाईक होता, हे जे उघड झालंय, त्यातच याचं उत्तर दडलेलं असू शकतं.
प्रत्यक्ष आगीशी झुंझणाऱ्या सुरक्षारक्षकांचा अग्निशमन दलाचा विभाग हा या दलाच्या परवाना देणाऱ्या विभागापासून वेगळा करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. त्याने कामात सुसूत्रता येईल हे जरी खरं असलं, तरी दबाव आणि भ्रष्टाचार हे मुद्दे पुन्हा शिल्लक राहातातच. आग लागण्याआधी या दोन हॉटेलांमध्ये काय चालत होतं, याची काही वाहिन्यांवर दाखवलेली दृश्यंही बोलकी आहेत. त्यात दाखवल्याप्रमाणे मोजोजच्या बार काऊंटरवर बार टेंडर आग लावून आणि आगीने पेटलेल्या बाटल्या हवेत उडवून, त्या पकडून दाखवायचा खेळ करून दाखवत असे. पसे मोजून असे खेळ पाहणारे आहेत, म्हणूनच ते दाखवणारी असली हॉटेलं अस्तित्वात आहेत. यात प्राण गमावलेल्यांपकी अनेकजण हे विशी-पंचविशीतले होते, हे कोणाही संवेदनशील माणसाच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. पण रात्री बाराच्या पुढे आपली मुलं-मुली जर दारू पिऊन एखाद्या हॉटेलमध्ये पार्टीच्या नावाखाली धिंगाणा घालत असतील, तर त्यात पालकांना काहीच वाटू नये, हे आजच्या सामाजिक विचारधारेचं चित्र बोलकं आहे. त्यामुळेच असे आगीचे खेळ पसे देऊन पाहणं किंवा हुक्क्याची गुडगुडी ओढणं म्हणजे काहीतरी थ्रििलग करणं, हे वाटणारा समाजातला हा वर्गही अशा दुर्घटनांना जबाबदार आहे.
अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती जर भविष्यात टाळायची असेल, तर केवळ काही अधिकारी निलंबित करून किंवा हॉटेलांवर हातोडा चालवून काहीही होणार नाही, तर भ्रष्टाचारी वृत्तीला आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याबरोबरच भल्या-वाईटाचं भान न ठेवता अधिकऱ्यांना दबावाखाली नियम मोडायला भाग पाडणाऱ्या राजकीय बेबंदशाहीलाही लगाम घातला गेला पाहिजे आणि केवळ खिशात पसे आहेत, म्हणून स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाची पर्वा न करता बेछूटपणे वागणाऱ्यांनाही चाप लावला गेला पाहिजे, नाहीतर या अशा दुर्घटना भविष्यात घडतच राहतील आणि यात निष्पापांचे नाहक बळी जातील. त्यासाठी सर्वाचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे.
मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in