सुचित्रा प्रभुणे
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सजावटीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी बाजारात विकत मिळत असल्या तरीदेखील स्वत:च्या हातांनी आणि कुंटुंबातील मंडळींच्या सहकार्याने अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींच्या माध्यमातून देखणी सजावट घरच्या घरी सहज करता येते. जाणून घेऊ या त्याविषयी थोडक्यात
एव्हाना मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्या असतील आणि घरोघरी फराळाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असेल. घर कितीही स्वच्छ असले तरीही दिवाळीनिमित्त का होईना साफसफाई ही केलीच जाते. त्यातच ‘यंदा महागाई वाढली आहे’, ‘अजून बोनस झाला नाही’.. ही दरवर्षीची रडकथा असली तरीही दिवाळीला घराची सजावट जरा हटकेच करावी याबाबतीत आपण मात्र आग्रही असतो.
मग अशा वेळी बाजारात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा घरच्या घरीच कमी साहित्यांमध्ये आकर्षक सजावट सहज करता येते. हाच विचार करून येथे हॉबी आयडियाज्च्या माध्यमातून काही सहज करता येण्याजोग्या, परंतु आकर्षक असणाऱ्या अशा काही सजावटीच्या कृती देत आहोत.
तयार रांगोळी
साहित्य : रंगविता येईल अशी ताटली (मातीची अथवा इतर अन्य स्वरूपाची), ए- थ्री आकाराचा पांढरा कागद, आवडीचे अॅक्रेलिक रंग, रंगीत खडे, लहान गोल आकारातील आरसे.
कृती : ए- थ्री आकाराचा पांढरा कागद घेऊन त्यावर तुमच्या आवडीची रांगोळीची नक्षी काढा. आता गोलाकार भांडे घेऊन त्यावर पिवळा, केशरी आणि गुलाबी अशा तीन रंगांमध्ये शेिडग करून रंगवा. इथे तुमच्या आवडीप्रमाणे रंगसंगती साधून तुम्ही रंगवू शकता.
आता कार्बनच्या साहाय्याने पांढऱ्या कागदावरील नक्षी या रंगविलेल्या भांडय़ावर ट्रेस करा. त्यावर आवडीच्या ग्लिटर्स रंगाने नक्षीला आउटलाइन करा. शक्यतो सोनेरी किंवा चंदेरी ग्लिटर्स रंगांचा वापर केल्यास नक्षी अधिक उठून दिसते. सुकल्यानंतर रंगीत खडे आणि आरशांनी सजावट करा. रंगीत खडय़ांमुळे थाळीमध्ये पाण्याचे थेंब असल्याचा भास होतो, तर आरशांमुळे सजावट अधिक चकचकीत दिसते.
आजकाल जागेअभावी आणि वेळेअभावी ऐनवेळी रांगोळी काढायला जमत नाही. अशा वेळी रांगोळीने सजविलेली ही तयार थाळी दाराजवळ, देवघरात किंवा घरात सजावटीच्या जागी ठेवल्यास आणि त्या सभोवती दिवा आणि फुलांनी सजावट केल्यास घराला एकदम दिवाळीचा पारंपरिक लुक प्राप्त होईल.
कंदील
बाजारात हरतऱ्हेचे कंदील उपलब्ध असले तरीही घरी स्वत:च्या हातांनी बनविलेल्या कंदिलाची मजा काही औरच असते. त्यामुळेच इथे सोप्या पद्धतीने कंदील बनविण्याची कृती दिली आहे.
साहित्य : ओएचपी शीटस् ,पट्टी, पेन्सिल, सोनेरी कार्डपेपेरची इम्पिरिअल शीटस् ,पेपर कटर, सोनेरी दोरा ,लाकडी मणी, रंगीत खडे, कात्री, रंग आदी.
कृती : सोनेरी रंगाचा कार्डपेपर घेऊन त्यावर ११ बाय ८ आकाराचे दोन आयत कापून घ्या. दोन्ही आयतांवर चिकटविण्यासाठी एक सेमीचे अंतर राखून ठेवा. आता या कटआउट आयतांवर अर्धा सेमी जागा ठेवून झिगझ्ॉग आकार काढून घ्या. झिगझ्ॉग आकारात तयार झालेले त्रिकोण पेपरकटरच्या मदतीने कापून घ्या. दोन कटआउट डिझाइन असलेले आयत फोिल्डग लाइनवर दुमडा. आता ओएचपी शीटस् घेऊन त्यावर तुमच्या आवडीच्या रंगाने झिगझ्ॉग आकार रंगवा आणि सुकू द्या.
सुकल्यानंतर हे रंगीत ओएचपी त्रिकोण फॅब्रिक ग्लुच्या साहाय्याने कार्डपेपर कटआउटच्या एका बाजूला चिकटवा.
आयताकृती खोक्याचा आकार देण्यासाठी दोन आयत फॅब्रिक ग्लुच्या साहाय्याने जोडा आणि सुकू द्या.
आता कंदील लटकविण्यासाठी सोनेरी धागा घेऊन त्यात लाकडी मणी ओवून घ्या. अशा चार माळा तयार करा.
आयताकृती कंदिलाच्या चारही कोपऱ्यांना आतल्या बाजूने धागा बांधण्यासाठी थोडे मोठे छिद्र पाडा. अशा तयार झालेल्या कंदिलावर रंगीत खडे चिकटवून सजावट करा. त्याचबरोबर कंदिलाच्या टोकाशी चारही बाजूने गोंडे लावल्यास हा कंदील आणखीनच आकर्षक दिसेल. अगदी सहज व सोप्या पद्धतीने होणारा असा हा कंदील आहे.
क्विलिंगच्या साहाय्याने तयार केलेला कुंकवाचा करंडा
७ मिमी आकारातील हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगातील क्वििलगच्या पट्टय़ा, क्विलिंग टुल, मोती, सोनेरी, हिरव्या व गुलाबी रंगातील बॉल चेन.
कृती : सात मिमीच्या लाल रंगातील वीस पट्टय़ा एकत्र करून चिकटवा. त्या सुकू द्या.
आता क्विलिंग टुलच्या मदतीने या पट्टय़ांची घट्ट कॉइल बनवा आणि ग्लुच्या मदतीने चिकटवा. तयार झालेल्या या गोल चकतीवर थोडासा दाब देत घुमटासारखा आकार द्या. या पद्धतीने लाल व पिवळ्या रंगाचे डबे तयार करून घ्या. यांना तुमच्या आवडीच्या अॅक्रॅलिक रंगात रंगवा. तो सुकू द्या.
याच पद्धतीने हिरव्या रंगाची पट्टी वापरून करंडय़ासाठी लागणारे होल्डर तयार करून घ्या. हिरव्या रंगाच्या २० क्विलिंग पट्टय़ा घेऊन टुलच्या मदतीने घट्ट कॉइल तयार करून ग्लुच्या साहाय्याने चिकटवून घ्या. या तऱ्हेने दोन होल्डर तयार करा.
आता लाल रंगाच्या दोन पट्टय़ा घेऊन टुलच्या मदतीने सल कॉइल तयार करा आणि त्यांची टोके ग्लुच्या साहाय्याने चिकटवून घ्या. त्यांना थोडासा दाब देऊन थेंबासारखा आकार द्या, म्हणजे झाकण उघडण्यासाठीचा वरचा होल्डर तयार होईल.
या तऱ्हेने खालचा होल्डर, करंडे आणि ते उघडण्यासाठीचे वरचे होल्डर या गोष्टी तयार होतील. त्यावर तुमच्या आवडीचे अॅक्रॅलिक रंग देऊन मोती, खडे आणि बॉल चेनच्या साहाय्याने सजावट करा. डिझायनर कुंकवाचा करंडा पूजेच्या थाळीत मिरविण्यासाठी तयार आहे. याचे वैशिष्टय़ असे की, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगसंगतीमुळे हा अधिक उठावदार दिसतो.
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, साध्या-सोप्या गोष्टीतूनही आकर्षक सजावट करता येते. शिवाय, वर दिलेले पर्याय हे दिवाळीपुरतेच मर्यादित नाहीत तर एरवीही ते घराच्या सजावटीला तितकेच आकर्षक ठरतील. जसे- वर उल्लेख केलेल्या कंदिलाचा वापर दिवाळी संपल्यानंतर घरातील दिवाणखान्यात मध्यभागी लाइटलॅम्प म्हणून देखील होऊ शकतो.
तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर या ना त्या निमित्ताने आपण लाडू, चिवडासारखे पदार्थ खात असतो, पण तरीदेखील दिवाळीच्या निमित्ताने अनेक गृहिणी समरस होऊन फराळाचे पदार्थ तयार करीत असतात. मग त्यातून नवीन आणि पारंपरिक पदार्थाची सांगड घालत एखाद्या आरोग्यदायी पदार्थाची निर्मिती होते.अशाच प्रकारे सजावटीमध्ये देखील थोडीशी कल्पकता आणि भरपूर समरसता दाखवून निर्मिती केल्यास निश्चितच काहीतरी हटके केल्याचे समाधान तर लाभेलच, पण दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होईल.