मागेच मी म्हटल्याप्रमाणे functionality is more important than look. इंटिरियर डिझाइनचा मूळ गाभाच हा असतो की कोणतीही वस्तू डोळ्यांना सुखद दिसण्या बरोबरच ती वापरायला आणि वावरायला सुलभ असली पाहिजे. हा नियम बाथरूमला तर फारच काटेकोरपणे लागू होतो.
बाथरूममधील ९० टक्के कामेही पाण्याशी निगडित असतात आणि पाणीपुरवठा करणे तसेच सांडपाणी वाहून नेणे ही सर्व कामे सुरळीत होण्यासाठी गरजेचे असते योग्य प्लम्बिंग. थोडक्यात, प्लम्बिंग हे बाथरूमचे सर्वात महत्त्वाचे अंग. जर याकडे थोडेही दुर्लक्ष झाले तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. प्लम्बिंगचे पाइप हे शक्यतो भिंतीच्या आतून जातात. त्यामुळेच ते एकदा फिक्स केले की पुन्हा जेव्हा बाथरूमचे काम काढू तेव्हाच बाहेर निघतात. म्हणूनच प्लम्बिंगसाठी वापरले जाणारे साहित्य हे मोठे आयुष्यमान असणारेच असावे. भिंतीच्या आतून केल्या जाणाऱ्या प्लम्बिंगला कन्सिल्ड प्लम्बिंग असे म्हणतात. पूर्वी या कन्सिल्ड प्लम्बिंगसाठी G.I. म्हणजेच गॅल्वनाइझ्ड आयर्न पाइपचा वापर होत असे. पण गेल्या काही वर्षांत Pvc म्हणजेच पॉली विनायल क्लोराईड आणि Cpvc म्हणजेच क्लोरिनेटेड पॉली विनायल क्लोराईड या पाइपांनी घेतली आहे. यातही पुन्हा Pvc पाइप हे सांडपाण्यासाठी किंवा जेथे फक्त थंड पाण्याचा वापर होणार आहे अशा ठिकाणी वापरले जातात तर Cpvc हे शुद्ध पाण्याच्या पुरवठय़ासाठी वापरले जातात. या तीनही प्रकारच्या पाइपांमध्ये काय नेमका फरक आहे ते आपण सोबतच्या तक्त्यात पाहू या.
हा तक्ता पाहिल्यावर आपण आपल्या बाथरूमसाठी काय वापरायचे हे आपल्या लक्षात तर आलेच असेल. परंतु फक्त चांगल्या दर्जाचे पाइप वापरले म्हणजे आपले काम झाले का? तर नाही, कारण बाथरूम आणि पाण्याचा घनिष्ठ संबंध असल्याने वॉटरप्रूफिंगच्या मुद्यावरही चर्चा होणे अपरिहार्य आहे. बरेचदा बाथरूमच्या नूतनीकरणाचे कामच मुळी वॉटरप्रूफिंगच्या कारणांसाठी काढले जाते. ज्या प्रमाणे एकदा केलेले प्लम्बिंग आपल्याला वर्षांनुवर्षे वापरावे लागते, त्याचप्रमाणे एकदा वॉटरप्रूफिंग केले म्हणजे ते पुन्हा बाथरूमचे नूतनीकरणाचे काम निघेपर्यंत तरी किमान चालवावेच लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन बाथरूमचे इंटिरियर करताना वॉटरप्रूफिंग हे केवळ मलमपट्टीप्रमाणे न करता पूर्णत्वाने करण्यावर भर दिला पाहिजे. इथे आपण बाथरूम वॉटरप्रूफिंगविषयी जुजबी माहिती घेऊ या. बाथरूमचे वॉटरप्रूफिंग करताना सर्वात आधी फ्लोरिंग व त्या खालील ब्रिक बॅट कोबा पूर्णपणे तोडून काढून स्लॅबपर्यंत पोहोचून तेथे पहिली वॉटरप्रूफिंगची ट्रीटमेंट देणे गरजेचे. हे वॉटरप्रूफिंग करताना ते स्लॅब सोबतच बाथरूमच्या भिंतीवर किमान १८ इंच तरी येईल याची काळजी घेतलीच गेली पाहिजे, जेणे करून नंतर भिंत व स्लॅब यांच्या जोडातून पाणी खाली झिरपू नये. यानंतर नवा ब्रिक बॅट कोबा बनविण्यासाठी विटा लावून बाथरूममध्ये किमान तीन दिवस पाणी भरून ठेवणे आवश्यक असते. याच काळात आपल्या बाथरूमच्या भविष्यातील वॉटरप्रूफिंगची खरी परीक्षा होते. एकदा ही परीक्षा पास झाली की पुढचे काम करून घ्यायला तुम्ही मोकळे. पण बऱ्याचदा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने लोक हीच प्रक्रिया टाळतात. आणि शॉर्टकट वापरून काम पूर्ण करून घेतात. पण जर तुम्हाला तुमच्या बाथरूमचा उपभोग जास्तीत जास्त काळ घ्यायचा असेल तर मात्र असले शॉर्टकट टाळलेलेच बरे.