कितवा मजला? या प्रश्नाने सुरू होणारी ही संस्कृती कुठल्या एका मजल्यावर जाऊन थांबत नाही. ‘लिफ्ट लॉबी’, ‘क्लब हौस’, चेंजिंग रूम, सिक्युरिटी, नोटीस बोर्ड, कॉम्म्युनिटी हॉल, पंप रूम, लिफ्ट मशीन रूम, फायर फायटिंगअशा ज्या शब्दांना आपल्या संस्कृतीत पर्याय नव्हता असे शब्द कानी पडत ही संस्कृती पुढे चालूच राहते. या ऊध्र्व संस्कृतीमध्ये आपण नकळत सामील झालो. शहरीकरण चक्राच्या वाढीव मागणीमुळे असलेल्या जागेचा, वेळेचा व नवीन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून घेणे बांधकाम व्यावसायिकांना क्रमप्राप्त होते. त्याचेच पर्यवसान या टोलेजंग इमारतींमध्ये झाले आहे.
अलीकडे अगदी काही वर्षांपूर्वी चौकशी म्हणून-कितवे घर? कितवी गल्ली? कुठची बोळ? जास्तीत जास्त -पहिला का दुसरा मजला? हे प्रश्न कानावर ऐकू येत. त्या पुढील अगदी काही वर्षांतच अनेकांच्या बोळी, गल्लय़ा, घरचा पत्ता एकच झाला आणि फक्त उरला तो घर क्रमांक! अगदी काही वर्षांपूर्वी असलेल्या खेळ मैदाने, मोकळ्या जागा, व्यायामशाळा, बगीचे, नदी यामधल्या मोकळ्या जागा गायब होऊन त्यावर इमारतींचं जाळं पसरलं, खेळाची मैदाने बदलून खेळाचे ‘प्लॉट’ झाले, व्यायामशाळा इमारतींमध्ये कुठल्याशा मजल्यावर जिम्नॅशिअम झाल्या, बागबगीचे छोटे छोटे ‘गार्डन’ झाले आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या नाल्या झाल्या! हे सगळे स्थित्यंतर आमच्या पिढीसमोर झाले आहे आणि ते अजूनही होत आहे.
आपणही बैठय़ा घरांमध्ये राहून हळूच ४ ते ६ मजल्यांच्या इमारतींमध्ये कधी प्रवेश केला कळलेच नाही. लगेच १० -१२ मजली इमारत पण सहजच स्वीकारली. मोठय़ा शहरांमध्ये तर २२ ते ३० मजले आता सामान्य झाले आहेत. आणि हो, आता आपण हळूच शिरणार आहोत ५० ते ६० मजल्यांच्या इमारतींमध्ये. काळाचा ओघच तो. मुंबईला तर ६० ते ७० मजल्यांच्या इमारत बांधकामाची जणू स्पर्धाच चालू आहे.
या आकडेवारीला क्रिकेट मधल्या शतकासारखे वेध लागले आहेत. १०० मजली इमारत! हे कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाचे स्वप्न झाले आहे. सध्या तरी ७० ते ८० मजल्यावरच गाडी थांबली आहे. कारण यापुढील उंचीसाठी सरकारने परवानगी अजून तरी दिलेली नाही.
उंच इमारतींचा इतिहास एक शतकाचा आहे, त्यापूर्वी पण उंच इमारती झाल्या होत्या, पण त्या ‘राहत्या’ नव्हत्या म्हणून त्याचा उल्लेख इथे करत नाही. अमेरिकेत याची सुरुवात १९ व्या शतकाच्या शेवटी झाली. खऱ्या अर्थाने २० शतक हे उंच इमारतींचा काळ ठरला. २० व्या शतकातली औद्योगिक क्रांती बांधकाम उद्योगामध्येही छाप पाडून गेली. अमेरिकेत सर्वात पहिले १९०८ मध्ये ‘सिंगर’ नावाची इमारत उभी राहिली, ती होती जवळ जवळ ५० मजल्यांची ६२५. १९३० मध्ये न्यूयॉर्कमध्ये ‘ख्रिस्लर’ इमारत ८० मजल्यांची झाली, लगेच १९३२ मध्ये १०५ मजल्यांच्या ‘ऐस्र््र१ी स्टेट बिल्डिंग’ने जागतिक स्थान मिळवले. ते स्थान १९७४ साली ११० मजल्यांच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ने बळकावले. त्यापुढील जवळजवळ २५ वर्षे १२० मजल्यांच्या ‘सेअर्स टॉवर’ने जगाला भुरळ घातली. शतकभराच्या अमेरिकेच्या या एकाधिकाराला मलेशिया ने १९९८ मध्ये तडा दिला आणि जगातील सर्वात उंच इमारत पेट्रोनॉक्स टॉवर्सची निर्मिती केली. या जागतिक विक्रमला २००५ मध्ये तैवानमधील १३५ मजल्यांच्या तैपेई टॉवरने गवसणी घातली. या सगळ्या विक्रमी चढाईचा उच्चांक गाठला २०१० मध्ये तो २०० मजल्यांच्या दुबईस्थित बुर्ज खलिफा या उत्तुंग इमारतीने. सध्यातरी दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत जगात सर्वात उंच इमारत आहे आणि याच्याहून उंच झेंडा रोवायचा निश्चय काही उद्योगांनी केला आहे आणि त्यावर काम चालू आहे.
आजपर्यंत या सगळ्या इमारती एकतर हॉटेल किंवा व्यावसायिक कार्यालयांसाठी वापरल्या गेल्या आहेत. अगदी या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टोलेजंग इमारतीत ‘घर’ ही संकल्पना बहुतेक रुजली नव्हती. बहुधा माणसाला जमिनीची ओढ असते आणि त्यामुळे तो जमिनीच्या जवळ राहायचा प्रयत्न करत असणार. पण तसे नव्हते! माणसाच्या ‘अप्राप्य’ ला ‘प्राप्य’ करून घ्यायच्या ईर्षेने आजपर्यंतच्या इतिहासात काय नाही घडले आहे. त्यात जागेचा अभाव, नवीन तंत्रज्ञानाची उपलबद्धता आणि वाढीव मागणी या कारणामुळे त्याला चालना मिळाली आणि या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगात टोलेजंग रहिवाशी इमारती वसण्यास सुरुवात झाली. २००१ मध्ये पूर्ण झालेला हाँगकाँगमधील ७० मजल्यांचे बेलचेर हे रहिवाशी संकुल जगातील पहिले टोलेजंग रहिवाशी संकुल होते, त्यानंतर दुबईस्थित ९० मजल्यांचे मरिना हे सध्या जगातील सर्वात मोठे अनेक टोलेजंग रहिवाशी संकुलांची कॉलनी आहे. पाठोपाठ दक्षिण कोरियामधील ८० मजल्यांचे बुसानमधील झेनिथ टॉवर, न्यूयॉर्कमधील ९६ मजल्यांच्या ४३२ पार्क अव्हेन्यू हे त्यानंतरच्या दशकामध्ये झालेल्या टोलेजंग रहिवाशी इमारती. ही झाली सुरुवात आणि येऊ घातलेल्या शेकडो इमारतींचे काम चालू आहे. अगदी आपल्या मुंबईमध्ये तर ८०,९० ,१०० मजल्यांच्या इमारतींची चढाओढ चालू आहे.
बैठय़ा बंगल्यातून, दोन मजल्यांच्या इमारतीत, तिथून १०-१२ मजले, पुढे १५ ते २० मजले, पुढे ३०, ४०, ५० .. ही मजला दर मजलाची ऊध्र्व वाटचाल कुठल्या टप्प्यापर्यंत आपल्याला नेऊन ठेवेल हे अजून तरी काही उमजत नाही. टोलेजंग संस्कृतीमधल्या त्या इमारती दिमाखाने, रुबाबदार उभ्या असतात. सभोवतालचं क्षितिज त्या न्याहाळत असतात जरूर पण एकमेकांशी त्या बोलत नाहीत, एकमेकांकडे त्या बघत नाहीत. अहो त्या इमारतींची ही गत तर त्यातील माणसांची काय अवस्था असणार?
माणूस हा जमिनीवरचा प्राणी, त्यामुळे जसे जसे आपण जमिनीपासून दूर जाणार तसे तसे आपण एकमेकांपासून पण दूर जाणार.
जसे जसे मजले वाढत आहेत -तशी जमीन धूसर होत आहे, माणुसकी मुंग्यांसारखी दिसत आहे, क्षितिजाचे परीघ मात्र वाढतच चालेले आहे आणि क्षितिजावरची ‘ती’ नवीन संस्कृती अगदी स्पष्ट दिसत आहे!
पराग केन्द्रेकर parag.kendrekar@gmail.com