माणसाला रंगाचं वेड आहे, तसंच आकर्षणही! पुरातन गुंफांमधून आढळणारी रंगीत चित्रं ही याचीच साक्ष देतात. त्यामुळे माणसाच्या स्वप्नातलं सुंदर घर साकारताना, घराला रंग काढणं हा एक अपरिहार्य भाग असतो. परंतु केवळ घराचं सौंदर्य वाढवणं एवढाच रंग काढण्यामागचा उद्देश नसतो, तर प्लॅस्टर केलेल्या िभतींचं हवामानाच्या घटकांपासून संरक्षण करणं, भिंतींना रंगांमुळे उजळपणा आणून खोलीतला प्रकाश वाढीला लावणं हेही या मागचे उद्देश आहेत.
बऱ्याचदा नवीन इमारतींमध्ये बिल्डरकडून घराचा ताबा देताना विशिष्ट रंग लावण्याऐवजी चुन्याची सफेती लावली जाते. नंतर आपण ज्यावेळी रंग काढून घेतो, तेव्हा आपल्याला िभतींसाठी रंगांचे विविध पर्याय उपलब्ध असतात. या रंगामध्ये प्रामुख्याने दोन घटक असतात. एक म्हणजे कलर पिग्मेंट आणि दुसरा घटक असतो, तो द्रव पदार्थ असतो. यातल्या कलर पिग्मेंटमुळे त्या रंगाला विशिष्ट रंगछटा प्राप्त होते, तर द्रव पदार्थात बाईंडर आणि रंग पातळ करण्यासाठीचा थिनर असतो. या बाईंडरमुळे िभतीच्या पृष्ठभागावर रंग पकडून ठेवला जातो. मध्यंतरी पिग्मेंटच्या टय़ूब बाजारात मिळायच्या. परंतु सध्याच्या काळात रंगाच्या दुकानांमधून हव्या त्या रंगाची रंगछटा कॉम्प्युटरवर आधी तयार केली की, स्वयंचलित पद्धतीने त्या रंगछटेचं पिग्मेंट तयार होऊन मशीनमधून बाहेर पडतं. ते द्रवपदार्थात मिसळून रंग लावता येतो. िभतींबरोबरच लोखंडी ग्रील, लाकडी खिडक्या आणि दरवाजे यांनाही रंग लावला जातो. परंतु या गोष्टी प्रामुख्याने ऑइल पेंटमध्ये रंगवल्या जातात.
रंग लावण्याआधी ज्यावर तो लावायचा तो पृष्ठभाग सँडपेपरने घासून घेतला जातो. िभत, लोखंड, लाकूड यासाठी वेगवेगळ्या क्रमांकाचे सँडपेपर वापरावे लागतात. त्यानंतर िभत रंगवताना तिच्या पृष्ठभागावरचे खाचखळगे एका समांतर पातळीत आणले जातात. खिळ्यांची भोकं बुजवली जातात. यासाठी पुट्टीचा वापर केला जातो. नंतर पृष्ठभाग पुन्हा एकदा घासून गुळगुळीत केला जातो व मग त्यावर प्रायमर नावाचं रसायन लावलं जातं. त्यामुळे रंग िभतीवर चांगली पकड घेतो. मग त्यावर रंगाचा पहिला हात मारला जातो. पहिल्यांदाच रंग लावताना रंगाचे सर्वसाधारणपणे तीन हात मारावे. त्यानंतर दोन हात लावले तरी चालतात. काहीजण एक हात उभा आणि एक हात आडवा याप्रमाणे आलटूनपालटून रंग लावतात. रंग लावून झाल्यावर मग त्यावर रोलर फिरवला जातो. त्यामुळे िभतीचा पृष्ठभाग गुळगुळीत होण्याबरोबरच जास्तीचा लागलेला रंग रोलरच्या स्पंजमध्ये शोषून घेतला जातो. त्यामुळे रंग िभतीवर एकसारख्या जाडीचा पसरला जातो.
डिस्टेंपर, प्लॅस्टिक, लस्टर आणि वेलवट टच असे रंगाचे प्रामुख्याने चार प्रकार लावले जातात. यापकी डिस्टेंपरचे दोन उपप्रकार असतात. तेलाचा घटक असलेला डिस्टेंपर आणि पाण्यातला डिस्टेंपर. पूर्वी डिस्टेंपर रंगांमध्ये रंगवलेल्या भिंतींना पाठ टेकून बसलं तर पाठीला रंगाची सुटून आलेली पावडर कधीकधी लागत असे. आता मात्र चांगल्या दर्जाचे रंग उपलब्ध असल्याने ही समस्या उद्भवताना दिसत नाही. डिस्टेंपर रंग लावायचा असेल, तर साधारणपणे प्रतिचौरस फूट २० ते २२ रुपये इतका भाव असतो. दुसरा प्रकार म्हणजे प्लॅस्टिक रंग! हे धुता येण्याजोगे असतात. त्यावर डाग पडले, तर साबणाच्या पाण्यात स्पंज किंवा कापड बुडवून त्याने घासलं तर डाग जातात. प्लॅस्टिक रंग लावायचा भाव प्रतिचौरस फूट २६ ते २८ रुपये इतका आहे. तिसरा प्रकार म्हणजे लस्टर रंग. हेसुद्धा धुता येण्याजोगे असतात. पण प्लॅस्टिक रंगांपेक्षा थोडे जास्त टिकाऊ असतात. तसंच त्यांना प्लॅस्टिक रंगांपेक्षा थोडीशी जास्त चमक असते. त्यामुळे ते थोडे उठावदार दिसतात. अर्थात त्याची किंमतही थोडी जास्त म्हणजे प्रतिचौरस फूट २८ ते ३० रुपये इतकी असते. वेलवेट टच रंग हे पहिल्या तीन प्रकारांपेक्षा जास्त टिकाऊ आणि उठावदार असतात. त्यामुळे त्यांची किंमतही प्रत्येक चौरस फुटाला ३० ते ३२ रुपयांच्या घरात असते. हॉल, लििव्हगरूममध्ये तीन िभती एका रंगात आणि एक िभत टेक्श्चर रंगात रंगवली जाते. हा रंग लावलेल्या पृष्ठभागावरून हात फिरवला तर हाताला टेक्श्चरचा खरखरीतपणा जाणवतो. या टेक्श्चर रंगांची किंमत प्रतिचौरस फूट ८० ते १०० रुपयांपर्यंत असते.
इमारतीच्या बाहेरच्या बाजूने रंग लावताना सिमेंट-पेंटचा (स्नो-सेम रंगाचा) वापर केला जातो. कारण इमारतीचा बाहेरचा भाग हा ऊन, वारा आणि पावसाचा तडाखा सोसत असतो. इमारतीचा बाहेरचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी मऊ वायर ब्रशच्या साहाय्याने आधी तो घासून घ्यावा. नंतर त्यावर पाणी मारून तो ओला करावा, म्हणजे रंगातला द्रव पदार्थ तो शोषून घेणार नाही. पृष्ठभागावरचे पाणी निथळू द्यावे. नंतर त्यावर सिमेंट-पेंट लावला जातो.
लोखंडी ग्रील्स किंवा दरवाजे-खिडक्यांच्या लाकडी पृष्ठभागावर ऑईलपेंट लावला जातो. त्याकरता आधी काळ्या रंगाच्या सँडपेपरने रंग लावायचा पृष्ठभाग घासून घ्यावा लागतो. मग लाकडावर वुडप्रायमर, तर लोखंडी भागावर गंजविरोधी रेडऑक्साईड लावलं जातं. मग त्यावर आवश्यकतेनुसार रंगाचे एक किंवा दोन हात मारले जातात. रंगाचं आवरण देऊन त्याचं बाहेरच्या हवामानापासून संरक्षण करणं गरजेचं आहे.
सध्याच्या काळात रंग लावणं हे केवळ सौंदर्यासाठीच आवश्यक नसून कलर-थेरपी लक्षात घेऊन म्हणजेच रंगांचे मनावर होणारे परिणाम लक्षात घेऊन त्यानुसार कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मानसिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा घरातल्या विविध खोल्यांमध्ये त्यांच्या होणाऱ्या उपयोगांनुसार विशिष्ट रंगांचा वापर करायचं शास्त्र विकसित झालं आहे. त्याला अनुसरून रंगांची निवड केली जाते. कधीकधी काही मनाशी निगडित आजार बरे करण्यासाठीही विशिष्ट रंगछटांचा वापर केला जातो.
अशा प्रकारे रंगांची निवड करताना योग्य रंगाची निवड केली जाईल याची दक्षता घ्या. जरूर तर तज्ञ्जांचा सल्ला घ्या आणि घर सुंदर करण्याबरोबरच घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठीही सुयोग्य रंगाचा वापर करून घर अधिकाधिक सुंदर आणि आनंदी राहील याची काळजी घ्या.
anaokarm@yahoo.co.in