आजच्या काळात वाढलेली स्पर्धा, बदललेली जीवनशैली आणि व्यावसायिक यश म्हणजे व्यवसायातून मिळणारी अधिकाधिक अर्थप्राप्ती अशी नवी व्याख्या निर्माण झाली आहे. ती चूक की बरोबर यावर चर्चा करायचा हा मंच नसला, तरी आजचे पालक मुलांना बदललेल्या जीवनशैलीत जुळवून घेऊन व्यावसायिक स्पध्रेत टिकाव धरतानाच याआधी सांगितलेल्या व्याख्येतलं व्यावसायिक यश मिळवण्यासाठी अगदी प्ले स्कूलपासून ते उच्च शिक्षणापर्यंत ‘चांगल्या’ शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसतात. या ‘चांगल्या’ शैक्षणिक संस्थांमधल्या शिक्षकांना किंवा संस्थाचालकांना किंवा अगदी पालकांनासुद्धा जर या ‘चांगल्या’ म्हणजे नेमक्या कशा, असा प्रश्न विचारला तर अर्थातच उत्तम अभ्यासक्रम, चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित तसेच अनुभवी शिक्षक असलेल्या संस्था म्हणजे ‘चांगल्या’ शैक्षणिक संस्था, असं उत्तर यापकी सगळेच देतील आणि ते अगदी खरंही आहे. पण त्याचबरोबर अजूनही एका महत्त्वाच्या, पण सर्वसामान्यपणे दुर्लक्षित अशा घटकाचा परिणाम मुलांची जी शिकण्याची प्रक्रिया आहे, त्यावर होत असतो, असं शास्त्रीय संशोधनातून आढळून आलं आहे. हा घटक म्हणजे व्याख्यानाचे वर्ग, प्रयोगशाळा किंवा ज्याला ‘टय़ुटोरिअल रूम’ म्हणजेच ‘स्वाध्याय कक्ष’ म्हणता येईल अशा खोल्यांमधली रंगसंगती कशी आहे, यावरही अध्ययनाचा दर्जा आणि आकलन किती आणि कसं होईल, हे काही प्रमाणात अवलंबून असतं. आतापर्यंत झालेल्या शास्त्रीय संशोधनाची अनुमानं वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने या सर्वाचा एक निष्कर्ष समान आहे, आणि तो म्हणजे अध्ययनाच्या खोलीतली रंगसंगती ही अध्ययन आणि आकलनावर परिणाम करते. उत्तर अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय रंग सल्लागार संघटनेच्या अभ्यास पाहणीनुसार असं आढळून आलंय की, शैक्षणिक संस्थांमधली सुयोग्य रंगसंगती ही डोळ्यांचं आरोग्य राखते, शिक्षणाला पोषक असं आजूबाजूचं वातावरण तयार करते आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्य राखायलाही मदत करते.
पूर्वी असा एक समज होता की, प्ले-ग्रुप तसेच ज्युनिअर किंवा सीनिअर केजीचे वर्ग म्हटले की, रंगीबेरंगी भिंतींचा वापर हा मुलांना आनंददायी ठरतो. पण एका नवीन संशोधनानुसार रंगांचा हा भडिमार काही मुलांच्या मनावर खोलवर नकारात्मक परिणाम साधायलाही कारणीभूत ठरतो. काही मुलांना मग पालकांशिवाय अशा भडक रंगसंगतीत अधिकच एकटेपणा जाणवायला लागतो आणि ती शाळेत जायला किंवा शाळेत गेल्यावर रडून रडून आकाशपाताळ एक करतात. छायाचित्र १(अ)मध्ये असा रंगीबेरंगी वर्ग दाखवला आहे, तर छायाचित्र १(ब)मध्ये रंगाचा मोजकाच वापर असूनही प्रसन्न वाटणारा वर्ग दिसतो आहे.
महाविद्यालयातल्या मोठय़ा मुलांच्या बाबतीतही हे रंगशास्त्र लागू पडतं. छायाचित्र २(अ) मध्ये आजूबाजूच्या भिंती तसेच समोरची भिंतही सफेद आहे. सर्वसाधारणपणे कॉलेजमधल्या वर्गासाठी हाच रंग निवडला जातो. पण पांढऱ्या रंगाचा एक अथांगपणा अभ्यासाला आणि एकाग्रतेसाठी आवश्यक असलेली बंदिस्त चौकट पुरवण्याऐवजी खुलेपणा देतो. त्यामुळे मुलांचं लक्ष विचलित व्हायची शक्यता असते. तसेच पांढऱ्या रंगातल्या भिंतीवर बसवलेल्या पांढऱ्या फळ्याकडे पाहताना नजरेला ताण द्यावा लागतो. त्याऐवजी छायाचित्र २(ब)मध्ये दाखवलेल्या वर्गाच्या भिंतींचा रंग हा गुलाबसर पांढरा आहे. त्यामुळे तांबडय़ा रंगांतला तजेलदारपणा आणतानाच हा रंग फिक्कट स्थितप्रज्ञ रंग असल्यामुळे तांबडय़ाचे वाईट गुण टाळतो. तसेच गडद हिरव्या रंगातल्या फळ्यामागे याच फिक्कट रंगातली भिंत असल्यामुळे फळा उठून दिसतोय. त्यामुळे आजूबाजूच्या फिक्कट भिंतींकडे लक्ष जाण्याऐवजी गडद रंगाल्या फळ्याकडे लक्ष वेधायला मदत होते. तसेच विरोधामुळे नजरेवर ताण पडत नसल्यामुळे डोळ्यांना लवकर शीण येत नाही.
कॉलेजमधल्या प्रयोगशाळांमध्ये मात्र याच्या अगदी उलट परिणाम साधणं आवश्यक असतं. तिथं मनाचा खुलेपणा आवश्यक असतो. उघडय़ा डोळ्यांनी जी निरीक्षणं दिसत आहेत, त्यावरून मोकळ्या मनाने अनुमान काढणं गरजेचं असतं. अशा वेळी आजूबाजूला पांढरा रंग असलेली प्रयोगशाळा (छायाचित्र ३(अ)) ही एखाद्या हिरव्या रंगासारख्या विशिष्ट रंगावर भर देणाऱ्या प्रयोगशाळेपेक्षा (छायाचित्र ३(ब)) अधिक प्रभावी ठरते.
विशेषत: विज्ञान किंवा इंजिनीअिरग कॉलेजमधली आणखी एक अभ्यासाची जागा म्हणजे टय़ुटोरिअल रूम किंवा स्वाध्याय कक्ष. यामध्ये मुलांना व्याख्यानांच्या वर्गात जे काही शिकवलं जातं, त्या थिअरीवर आधारित प्रश्न किंवा गणितं दिली जातात. हे काहीसं उपयोजित अभ्यास या प्रकारात मोडतं. म्हणजे इथं मुलं एकमेकांशी चर्चा करून मिळवलेल्या ज्ञानाचं आदानप्रदान करून त्या चच्रेतून दिलेल्या प्रत्यक्ष परिस्थितीत एखादा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करून मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. या ठिकाणी अर्थातच सखोल चिंतनाची गरज असते. तसेच मुलं गटागटाने एकत्र बसून असे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे इथलं फíनचरही एका गोल टेबलाभोवती चार-पाच खुच्र्या वगरे असं असावं. शिक्षकांनाही मग गटागटाकडे जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवता येतात. त्यामुळे चिंतनासाठी आवश्यक असलेला निळा रंग जर इथं वापरला तर तो अधिक प्रभावी ठरू शकतो. असाच एक स्वाध्याय कक्ष छायाचित्र ४ मध्ये दाखवला आहे.
कॉलेजातली आणखी एक महत्त्वाची जागा म्हणजे वाचनालय! इथं पुरेसा प्रकाश असणं गरजेचं आहे. त्यामुळे नसíगक प्रकाशाबरोबरच जे रंग प्रकाश परावर्तित करतात असे रंग इथे वापरावेत. पण त्याच वेळी डोळ्यांवर प्रकाशाचा झोत येणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. फिक्कट स्थितप्रज्ञ रंगांचा वापर म्हणूनच अशा ठिकाणी सुयोग्य ठरतो. छायाचित्र ५(अ) मध्ये असं एक वाचनालय दिसतं आहे. इथं कॉम्प्युटरही प्रत्येक टेबलवर दिसतो आहे. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या फिक्कट रंगांमुळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांवर ताण जाणवणार नाही. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्टही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे जरी फिक्कट रंग नजरेसमोर असला तरी वाचनाच्या टेबलासमोरच भिंत असता कामा नये (छायाचित्र ५(ब)). त्यामुळे काही तरी सतत अंगावर येत असल्याची भावना मनात निर्माण होते व त्यामुळे वाचनाकडे एकचित्त होत नाही.
थोडक्यात, शैक्षणिक संस्था उभारताना जेवढं अभ्यासक्रम, शिक्षक आणि पायाभूतसुविधा या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे, तितकीच गरज मुलांच्या भावभावनांवर परिणाम साधणाऱ्या आणि म्हणूनच अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्या शाळा-कॉलेजांमधल्या विविध विभागांमधल्या रंगसंगतीकडेही शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि गांभीर्याने लक्ष द्यायची आवश्यकता आहे. तसं केलं तर त्या संस्थेतल्या मुलांची शैक्षणिक कार्यक्षमता वाढून ती मुलं शिक्षणात आघाडीवर राहायला रंगांचं हे सुयोग्य व्यवस्थापन हातभार लावेल.
(इंटिरियर डिझायनर)
anaokarm@yahoo.co.in