सहकारी गृहनिर्माण संस्था हा जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: शहरी भागांत फार मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्येच वास्तव्यास आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेस स्वत:चे स्वतंत्र कायदेशीर कृत्रिम व्यक्तिमत्त्व आहे. मात्र असे असले तरी कृत्रिम व्यक्तिमत्त्व असल्याने संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज सभासद, समिती आणि इतर पदाधिकाऱ्यांमार्फत चालतो. म्हणूनच सभासद, समिती, पदाधिकारी यांबाबत माहिती असणे अगत्याचे आहे.
प्रथमत: सभासदाचा विचार केल्यास कायद्यातील व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणी अर्जात सहभागी असणारी किंवा नोंदणीपश्चात सभासद करून घेतलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय, ज्यात सहसभासद आणि नाममात्र सभासद यांचादेखील समावेश होतो. या व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणी आवेदनावर सही असणारे आणि नोंदणीपश्चात सभासद करून घेतलेल्या व्यक्ती म्हणजे सभासद. तसेच व्याख्येनुसार सभासद, सहसभासद आणि नाममात्र सभासद असे सभासदांचे तीन प्रकार आहेत हेदेखील सुस्पष्ट आहे.
सहकारी सभासदाच्या व्याख्येनुसार सहकारी संस्थेचे भाग आणि मालमत्ता संयुक्तपणे धारण करणारी, मात्र जिचे नाव संस्थेच्या भाग प्रमाणपत्रावर अनुक्रमांक एकवर नोंदविलेले किंवा लिहिलेले नाही अशी व्यक्ती म्हणजे सहसभासद होय. हल्ली बरेचदा कर्ज काढण्याकरिता सोयीस्कर पडावे म्हणून किंवा इतर कारणाने, सदनिका या एक किंवा अधिक व्यक्तींच्या नावे संयुक्तरीत्या घेतल्या जातात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस करारातील नावे अनुक्रमे लिहिली गेल्यास करारातील अनुक्रमांक पहिले नाव असणारी व्यक्ती सभासद बनते व इतर सहसभासद बनतात. संयुक्त करार केल्याने त्या व्यक्तींच्या मालकीत किंवा अधिकारात काहीही फरक पडत नाही. मात्र संस्थेच्या सभासदत्वाचा विचार केल्यास जिचे नाव प्रथम आहे, तीच व्यक्ती सभासद व इतर व्यक्ती सहसभासद ठरतात हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्या अनुषंगाने आपण सदनिका खरेदी केल्यावर नक्की कोणाचे नाव पहिले लावायचे याचासुद्धा वेळीच विचारपूर्वक निर्णय करणे आपल्या फायद्याचे ठरते.
तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे नाममात्र सभासद. कायद्यातील व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणीनंतर सभासद करून घेतलेली आणि आदर्श उपविधींनुसार मालमत्तेत कोणताही हक्काधिकार नसलेली व्यक्ती म्हणजे नाममात्र सभासद. नाममात्र सभासदत्वाचे दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिला म्हणजे नाममात्र सभासद हे नेहमीच संस्थेच्या नोंदणीनंतर सभासद म्हणून सामील केले जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाममात्र सभासदांस सदनिका अथवा इतर मालमत्तेत कोणताही हक्काधिकार नसतो. हल्ली सदनिका किंवा गाळे लीव्ह आणि लायसेंस तत्त्वावर देण्यात येतात, त्या वेळेस त्या करारातील लायसेंसी, समजा एखादी सदनिका किंवा गाळा एखाद्या कंपनी किंवा ट्रस्ट किंवा भागीदारी संस्था इत्यादींच्या मालकीचा असेल आणि त्यांच्या परवानगीने सदनिका किंवा गाळा वापरणारी व्यक्ती किंवा त्यांचा नोकर किंवा वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तीची देखभाल करणारा काळजीवाहक, अशा सर्वाचा सामावेश नाममात्र सभासद या प्रकारात होतो.
सभासदांचा अजून एक महत्त्वाचा भेद आहे तो म्हणजे सक्रिय सभासद आणि निष्क्रिय सभासद. व्याख्येनुसार सक्रिय सभासद म्हणजे संस्थेच्या कामकाजात भाग घेणारा आणि संस्थेच्या किमान सेवांचा वापर करणारा सभासद. सक्रिय सभासदत्वाच्या काही अटी व शर्ती आहेत, त्यातील पहिली शर्त म्हणजे सदनिकेची मालकी. दुसरी शर्त म्हणजे मागील पाच वर्षांत किमान एका सर्वसाधारण सभेस उपस्थिती. तिसरी शर्त म्हणजे मागील पाच वर्षांत किमान एकदा संस्थेच्या मासिक शुल्काचा भरणा. या तीन शर्तीची पूर्तता करणारा सभासद सक्रिय सभासद आणि साहजिकच या शर्तीची पूर्तता न करणारा निष्क्रिय सभासद ठरतो.

वरकरणी हे सभासदत्वाचे प्रकार महत्त्वाचे वाटत नसले तरी संस्थेच्या कामकाजातील सहभाग किंवा मालमत्तेचे हस्तांतरण इत्यादी बाबतीत प्रत्येक प्रकारच्या सभासदाकरिताचे नियम वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणत: संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदास अधिक आणि स्वाधीन अधिकार असतात. त्या तुलनेने सहसभासद आणि नाममात्र सभासदांस कमी अधिकार असतात. शिवाय असलेले अधिकार वापरण्याकरितादेखील सहसभासद आणि नाममात्र सभासदांना मूळ सभासदाची परवानगी लागते.

government to stop tendering process in midday meals
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
centers of Excellence will be established in the state to improve the quality of health care Mumbai news
आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
maharashtra government forced barti sarathi mahajyoti to adopt uniform guidelines
विश्लेषण : स्वायत्त संस्थांसाठी ‘समान धोरणा’चा स्पर्धा परीक्षार्थींना फटका कसा?
Students
मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या ४०० कोटींच्या निविदांचे धोरण फसले, लाखो विद्यार्थी वंचित
Loksatta anvyarth Bombay High Court decision regarding changes in the Information Technology Regulations of the Central Government
अन्वयार्थ: सत्यप्रियता म्हणजे सत्ताप्रियता नव्हे!

वरकरणी हे सभासदत्वाचे प्रकार महत्त्वाचे वाटत नसले तरी संस्थेच्या कामकाजातील सहभाग किंवा मालमत्तेचे हस्तांतरण इत्यादी बाबतीत प्रत्येक प्रकारच्या सभासदाकरिताचे नियम वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणत: संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदास अधिक आणि स्वाधीन अधिकार असतात. त्या तुलनेने सहसभासद आणि नाममात्र सभासदांस कमी अधिकार असतात. शिवाय असलेले अधिकार वापरण्याकरितादेखील सहसभासद आणि नाममात्र सभासदांना मूळ सभासदाची परवानगी लागते.
विशेषत: जेव्हा आपण एखादी सदनिका विकत घेतो तेव्हासुद्धा आपण ज्यांच्याशी व्यवहार आणि करार करीत आहोत ते सभासद आहेत का? असल्यास कोणत्या प्रकारचे सभासद आहेत याची खात्री करून घेणे आपल्याच फायद्याचे ठरते. सदनिका खरेदीनंतरदेखील जेव्हा संस्थेच्या भाग प्रमाणपत्रावर खरेदीदाराचे नाव लावण्यात येते तेव्हासुद्धा कोणाचे नाव पहिले लावायचे, कोणाचे दुसरे याबाबत विचारपूर्वक निर्णय करावा, जेणेकरून भविष्यात काही अडचण उद्भवणार नाही.
अ‍ॅड. तन्मय केतकर – tanmayketkar@gmail.com