सहकारी गृहनिर्माण संस्था हा जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: शहरी भागांत फार मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्येच वास्तव्यास आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेस स्वत:चे स्वतंत्र कायदेशीर कृत्रिम व्यक्तिमत्त्व आहे. मात्र असे असले तरी कृत्रिम व्यक्तिमत्त्व असल्याने संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज सभासद, समिती आणि इतर पदाधिकाऱ्यांमार्फत चालतो. म्हणूनच सभासद, समिती, पदाधिकारी यांबाबत माहिती असणे अगत्याचे आहे.
प्रथमत: सभासदाचा विचार केल्यास कायद्यातील व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणी अर्जात सहभागी असणारी किंवा नोंदणीपश्चात सभासद करून घेतलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय, ज्यात सहसभासद आणि नाममात्र सभासद यांचादेखील समावेश होतो. या व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणी आवेदनावर सही असणारे आणि नोंदणीपश्चात सभासद करून घेतलेल्या व्यक्ती म्हणजे सभासद. तसेच व्याख्येनुसार सभासद, सहसभासद आणि नाममात्र सभासद असे सभासदांचे तीन प्रकार आहेत हेदेखील सुस्पष्ट आहे.
सहकारी सभासदाच्या व्याख्येनुसार सहकारी संस्थेचे भाग आणि मालमत्ता संयुक्तपणे धारण करणारी, मात्र जिचे नाव संस्थेच्या भाग प्रमाणपत्रावर अनुक्रमांक एकवर नोंदविलेले किंवा लिहिलेले नाही अशी व्यक्ती म्हणजे सहसभासद होय. हल्ली बरेचदा कर्ज काढण्याकरिता सोयीस्कर पडावे म्हणून किंवा इतर कारणाने, सदनिका या एक किंवा अधिक व्यक्तींच्या नावे संयुक्तरीत्या घेतल्या जातात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस करारातील नावे अनुक्रमे लिहिली गेल्यास करारातील अनुक्रमांक पहिले नाव असणारी व्यक्ती सभासद बनते व इतर सहसभासद बनतात. संयुक्त करार केल्याने त्या व्यक्तींच्या मालकीत किंवा अधिकारात काहीही फरक पडत नाही. मात्र संस्थेच्या सभासदत्वाचा विचार केल्यास जिचे नाव प्रथम आहे, तीच व्यक्ती सभासद व इतर व्यक्ती सहसभासद ठरतात हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्या अनुषंगाने आपण सदनिका खरेदी केल्यावर नक्की कोणाचे नाव पहिले लावायचे याचासुद्धा वेळीच विचारपूर्वक निर्णय करणे आपल्या फायद्याचे ठरते.
तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे नाममात्र सभासद. कायद्यातील व्याख्येनुसार संस्थेच्या नोंदणीनंतर सभासद करून घेतलेली आणि आदर्श उपविधींनुसार मालमत्तेत कोणताही हक्काधिकार नसलेली व्यक्ती म्हणजे नाममात्र सभासद. नाममात्र सभासदत्वाचे दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिला म्हणजे नाममात्र सभासद हे नेहमीच संस्थेच्या नोंदणीनंतर सभासद म्हणून सामील केले जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाममात्र सभासदांस सदनिका अथवा इतर मालमत्तेत कोणताही हक्काधिकार नसतो. हल्ली सदनिका किंवा गाळे लीव्ह आणि लायसेंस तत्त्वावर देण्यात येतात, त्या वेळेस त्या करारातील लायसेंसी, समजा एखादी सदनिका किंवा गाळा एखाद्या कंपनी किंवा ट्रस्ट किंवा भागीदारी संस्था इत्यादींच्या मालकीचा असेल आणि त्यांच्या परवानगीने सदनिका किंवा गाळा वापरणारी व्यक्ती किंवा त्यांचा नोकर किंवा वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तीची देखभाल करणारा काळजीवाहक, अशा सर्वाचा सामावेश नाममात्र सभासद या प्रकारात होतो.
सभासदांचा अजून एक महत्त्वाचा भेद आहे तो म्हणजे सक्रिय सभासद आणि निष्क्रिय सभासद. व्याख्येनुसार सक्रिय सभासद म्हणजे संस्थेच्या कामकाजात भाग घेणारा आणि संस्थेच्या किमान सेवांचा वापर करणारा सभासद. सक्रिय सभासदत्वाच्या काही अटी व शर्ती आहेत, त्यातील पहिली शर्त म्हणजे सदनिकेची मालकी. दुसरी शर्त म्हणजे मागील पाच वर्षांत किमान एका सर्वसाधारण सभेस उपस्थिती. तिसरी शर्त म्हणजे मागील पाच वर्षांत किमान एकदा संस्थेच्या मासिक शुल्काचा भरणा. या तीन शर्तीची पूर्तता करणारा सभासद सक्रिय सभासद आणि साहजिकच या शर्तीची पूर्तता न करणारा निष्क्रिय सभासद ठरतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा