मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा मामेभावजयीने मोयक्रोवेव्हमध्ये झटक्यात गरम केलेली कॉफी माझ्या पुढय़ात ठेवली. कॉफीच्या कपातून निघणाऱ्या वाफांकडे पाहताना मला आम्हा नातवंडांच्या पुढय़ात चुलीवर तापवलेल्या दुधाचे कप ठेवणारी बैठय़ा ओटय़ावर बसलेली आजी.. ती चूल.. तिथून छोटय़ा खिडकीबाहेर जाणारा धूर.. सर्वकाही डोळ्यांसमोर आले.

मे महिन्यात कित्येक वर्षांनी कोकणात एका कामासाठी गेले होते. तिथून जवळच असलेल्या माझ्या आजोळी धावतपळत का होईना जायचा मोह आवरला नाही. खूप दिवसांनी अशी अचानक भेट झाल्यावर वृद्ध मामी आणि घरच्या सर्वानाच आनंद झाला. संपूर्ण घराचा आता कायापालट झाला होता. चकित नजरेने तो बदल न्याहाळत मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा मामेभावजयीने मोयक्रोवेव्हमध्ये झटक्यात गरम केलेली कॉफी माझ्या पुढय़ात ठेवली. कॉफीच्या कपातून निघणाऱ्या वाफांकडे पाहताना मला आम्हा नातवंडांच्या पुढय़ात चुलीवर तापवलेल्या दुधाचे कप ठेवणारी बैठय़ा ओटय़ावर बसलेली आजी.. ती चूल.. तिथून छोटय़ा खिडकीबाहेर जाणारा धूर.. सर्वकाही डोळ्यांसमोर आले. घरातील स्वयंपाक शेणाने सारवलेल्या दोन चुलीवर तयार होई आणि त्या दोन चुलींच्या शेजारी असायची वैल नावाची छोटी चूल- जी वरून चुलीसारखीच वाटायची, पण तिच्यात पुढून चुलीसारखी लाकडे सारायची सोय नसायची. मात्र चूल आणि वैलाच्या मध्ये छोटा बोगदा असायचा ज्यातून चुलीतील लाकडांची धग तिथपर्यंत पोचायची. चुलीवर स्वयंपाक चालू असताना एखादा पदार्थ नुसताच गरम करायचा असल्यास किंवा दूध दुसऱ्यांदा मंद आचेवर राहण्यासाठी वैलावर ठेवला जायचा. एकदा पावसाळ्यातल्या पहाटे आजी चुलीत सरपण टाकायला गेली तेव्हा तिला वैलात छोटासा साप (आजी उल्लेख न करता फक्त जनावर किंवा ‘तो’ म्हणायची) दिसला त्याबरोबर तिने तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटत त्याला एका फळकुटानेच हलवून बाहेर जायला वाट करून दिली होती. ही कथा तिच्याकडून आम्ही बरेचदा ऐकल्यामुळे मला तो वैल नामक इंधन वाचवणारा कायमचा स्मरणात राहिलाय.

चुलीजवळच कोनाडय़ात एक छोटी चिमणी तेवत असे आणि शेजारीच पत्र्याच्या डब्यात पोस्टकार्ड किंवा कसल्यातरी जाड कागदाच्या बोटभर लांबीच्या पट्टय़ा ठेवलेल्या असत. कारण काडेपेटीतील काडय़ा जपून वापरण्याकडे कल असे. चुलीपलीकडे लाकडाच्या छोटय़ा ढलप्या गोवऱ्या आणि बाटलीत रॉकेल असायचे. शिवाय चूल व्यवस्थित पेटवण्यासाठी आतील निखारे हलवण्यासाठी काळीकुट्ट झालेली फुंकणी आवश्यकच होती- जिचा वापर वेळप्रसंगी मांजर किंवा तिच्याजवळ येणाऱ्या, पण सोवळ्यात नसलेल्या मुलांवर उगारण्यासाठी सुद्धा होई. स्वयंपाकघराप्रमाणेच एक चूल घराबाहेर न्हाणीघराच्या जवळ अंगणात सकाळच्या वेळी धडाधडा पेटत असायची. ज्यावर भलेमोठे आणि बहुतेक वेळा धुराने मूळचा रंग गमावून काळवंडलेल्या तपेल्यात घरच्यांच्या अंघोळीचे पाणी तापत असे. कालांतराने त्या पाणी तापवण्याच्या चुलीची जागा खासकरून शहरात बंब तसेच कोळशाच्या शेगडय़ांनी घेतली. लोखंडी गोलसर किंवा बादलीच्या आकाराच्या त्या चुलींमध्ये दगडी किंवा बदामाच्या आकाराचे असलेले ते बदामी कोळसे वापरले जात. शेगडी पेटवून आतील कोळसे विझेपर्यंत स्वयंपाक म्हणजे शक्यतर डाळ भाताचा कुकर तयार होई. शिवाय कोळसे विझत चाललेल्या मंद आचेचा दूध तापवण्यासाठी  छान उपयोग होई. अशा तापलेल्या दुधावर सायही दाट येई आणि दुधाचा स्वादही खमंग असे.. पुढे मात्र शेगडीचा वापर घरातून जवळपास हद्दपारच झाला. आजकाल तर मला वाटतं, भाजलेले बुट्टे विकणाऱ्यांकडेच या शेगडय़ांचे दर्शन होईल.

कालांतराने स्टोव्हचा जमाना आला आणि गृहिणींची चुली फुंकण्याची आणि त्याच्या धुरामुळे होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून बरीचशी सुटका झाली. घरोघरी प्रायमस स्टोव्ह दिसू लागले. त्यातही दोन प्रकार होते- एक भणभण्या डोके भणभणून सोडेल अशा आवाजाचा तर दुसरा प्रकार सायलेन्सर. आता चुलीजवळच्या ढलप्या फुकणी वगैरे साहित्याऐवजी स्टोव्हजवळ तो साफ करायच्या पिना रॉकेल भिजवण्यासाठीचा काकडा रॉकेल, स्पिरीट, फनेल आणि काडय़ापेटी अशा वस्तूची गर्दी झाली. पुढे त्याना पर्याय म्हणून वातींचे स्टोव्ह आले ते बिचारे शांतपणे आपले काम करायचे, पण त्यांच्या वाती नित्यनेमाने बदलायचे एक काम असायचेच. शिवाय लाकूडफाटय़ाच्याऐवजी आता केरोसिनचे कॅन स्पिरीट त्यासाठी परमिट सामग्री आवश्यक झाली.

त्यानंतर मात्र गॅसचा जमाना आला. सुरुवातीला गॅस कंपन्यांना गॅसचे फायदे ग्राहकांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे. डिपॉझिट भरून सिलेंडर घरी येई, पण शेगडय़ा मात्र विकत घ्याव्या लागत. गॅस भराभर काम करतो. मग एकच शेगडी पुरे की दोन शेगडय़ांवर खर्च करावा.. यावर मध्यमवर्गात चर्चा होऊन अखेर निर्णय होई. एखादीच्या घरी गॅस आला की ती इतरांना गॅसचे अनेक फायदे कौतुकाने सांगू लागे. उदा. आजकाल यजमान खालून येताना दिसले की मगच मी चहाचे आधण ठेवते. पूर्वीसारखे काकडा लावून स्टोव्ह पेटवा, अशी भानगड नाही. शिवाय गॅस वाटतो तितका महाग पडत नाही वगैरे प्रकारच्या तिच्या गॅस खरेदीच्या शिफारशीमुळे इतर गृहिणींनाही गॅस बुकिंग, त्याचा महिन्याचा खर्च अत्यावश्यक वाटू लागला. तरीही सुरुवातीला गॅसचा खर्च आटोक्यात राहण्यासाठी बऱ्याच घरात गॅससोबत स्टोव्हचाही वापर होत असे. थोडक्यात, सुरुवातीला तरी गॅस खरेदी ही थो..डी खर्चीक बाब वाटली होती. पण बघता बघता गॅसने आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि आजतागायत आपले अढळपद कायम राखले आहे. गंमत म्हणजे सुरुवातीला एक शेगडी घ्यावी की दोन असा विचार तर कालबाच झालाय आणि आता सर्रास तीन किंवा चार बर्नर असलेल्या शेगडय़ा वापरात आल्यात. तसेच एलपीजीप्रमाणेच महानगर गॅसचा पर्याय आलाय.. गॅसच्या वापराबरोबरच हळूहळू काडय़ापेटय़ांना पर्याय म्हणून लायटर आले- जे आधी इलेक्ट्रिकवर चालणारे होते, पण नंतर त्यातही सुटसुटीतपणा आला आणि आता फक्त इलेक्ट्रॉनिक लायटरच वापरले जातात. त्याही पुढची पायरी म्हणजे लायटरविना पेटणाऱ्या गॅसच्या शेगडय़ा प्रचलित होत आहेत. हळूहळू गॅसचा वापर प्रत्येकाला इतका सोयीचा झाला की वीज, पाणी याप्रमाणेच गॅसविना स्वयंपाक ही कल्पनाच अस वाटू लागली. काही वर्षांपूर्वी गॅसचीही टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे घरातील एकुलता एक सिलेंडर रिकामा झाल्यावर गृहिणींचा आणि पर्यायाने घरातल्या सर्वाचाच जीव खालीवर होऊ  लागला. त्यातूनच मग दुसरा सिलेंडर घेण्याची कल्पना पुढे आली, ज्यामुळे एक रिकामा झाल्याक्षणी दुसरा जोडण्याची सोय झाली. सुदैवाने निदान शहरात तरी सध्या गॅसचा पुरवठा वगैरे व्यवस्थित चालू आहे. गॅसला पर्याय म्हणून काही ठिकाणी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या हॉटप्लेट्स आणि इंडक्शन कुकिंगचे पर्यायही आलेत, ज्याचा अडीनडीला वापर नक्कीच होतो. पण त्यालाही काही मर्यादा आहेतच.

अन्न शिजवण्यासाठी, भाजण्यासाठी गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह नामक उपकरणाने स्वयंपाकघरात धमाल उडवून दिली. आजकालच्या इन्स्टंट किंवा दो मिनिटच्या जमान्यात अशा फटाफट पदार्थ बनवणाऱ्या.. गरम करणाऱ्या या उपकरणाने आपली उपयुक्तता पटवायचा प्रयत्न केला आणि मग.. एकेकाळी इंपोर्टेड वस्तूंमध्ये गणना होणारे हे उपकरण हळूहळू देशी वस्तू बनून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जागा पटकावून बसले.

‘‘आत्ते.. पुढच्या वेळी सावकाशीने राहायलाच ये मग झक्कपैकी तुला माझ्या हातचे घावन घाटले खाऊ  घालतो. बोट चाटत राहशील.. मी एक्सपर्ट झालोय त्यात..’’ कोकणातील स्वयंपाकघरातील चुलीपासून सुरू झालेला माझ्या आठवणीचा प्रवास माझ्या तरुण भाच्याच्या बोलण्याने थांबला आणि मी चकित होऊन मामीकडे पाहिले तेव्हा मामीने अगदी खरंय म्हणून कौतुकाने मान डोलावली. कॉफीचा कप सिंकशी ठेवताना मनात आले.. बदलत्या जमान्यानुसार घराघरातील चुली तर बदलल्याच आहेत, पण चुलीशी काम करणारे हातही बदलत आहेत की! अर्थात या बदलाची गती कदाचित मंद असेलही, पण सुरुवात झाली हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com