डॉ. मिलिंद पराडकर
पुरातत्त्व, शिलालेख व ताम्रपट, नाणकशास्त्र, काळ्यापांढऱ्यात लिहिलं गेलेलं समकालीन लेखन आणि लोककथा-दंतकथा या पाचांच्या कडबोळ्याला इतिहास असं गोंडस नाव दिलं गेलं आहे. काळ्यापांढऱ्यात लिहिलेल्या समकालीन इतिहासलेखनाला बखर असाही एक शब्द. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बखर म्हणजे त्रोटक गद्य इतिहास. शिवकालाविषयी भाष्य करणाऱ्या अनेक बखरी आज उपलब्ध आहेत. काही समकालीन आहेत तर काही शे-शंभर वर्षांनी लिहिल्या गेलेल्या आहेत. बखर विश्वासार्ह आहे किंवा नाही हे बहुधा तिचा लेखनकाल पाहून ठरवलं जातं. या बखरींची भाषा बहुतेकदा अलंकृत तर असतेच, मात्र प्रसंगविशेष तीत कधीकधी काही अंशी अतिशयोक्तीचं अंगही आढळतं. समकालीन बखरी या बहुधा प्रत्यक्षदर्शी या नात्याने लिहिल्या गेलेल्या असतात, मात्र नंतरच्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या बखरी या बहुधा स्मरणावर भिस्त ठेवून, ऐकीव माहितीवर, लोककथा वा दंतकथा यांवर आधारलेल्या असतात. साहजिकच त्यांची विश्वासार्हता बहुतेक वेळा शंकास्पदच असते. कृष्णाजी अनंत सभासद या शिवछत्रपतींच्या दफ्तरातील एका अधिकाऱ्याने सतराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात एक बखर लिहिली. ‘सभासदाची बखर’ या नावाने ही बखर विख्यात आहे. शिवछत्रपती आणि त्यांचे दोन्ही पुत्र यांच्या राजवटी या कृष्णाजी अनंतानं पाहिलेल्या होत्या. साहजिकच शिवकाळाचे वर्णन करणाऱ्या साऱ्या बखरींपैकी ही बखर निश्चितच जास्त विश्वासार्ह आहे.
काही कारणांमुळे स्वराज्याची राजधानी राजगडाहून हलवून रायगडी नेण्यात आली. रायगड हा दुर्ग राजधानी म्हणून सजवायचे ठरले व ते प्रत्यक्षातही आले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना सभासद म्हणतो : ‘..तक्तास जागा गड हाच करावा असे करारी करोन, तेच गडी घर, वाडे, माडिया, सदरा, चौसोपे आणि अठरा कारखाने यांस वेगळाले महाल, व राणियांस महाल, तशीच कारकुनांस, सरकारकुनांस वेगळी घरे व बाजार, पंचहजाऱ्यांस वेगळी घरे व मातबर लोकांस घरे व गजशाळा व अश्वशाळा व उष्टरखाने, पालखी महाल व वहिलीमहाल, कोठी, थटीमहाल चुनेगच्ची चिरेबंदी बांधिले.’
अर्थ असा की, रायगड ही राजधानीची जागा म्हणून ठरल्यानंतर शिवछत्रपतींनी घरे, वाडे, माडय़ा- म्हणजे एक मजला असलेली घरे, चौसोपी म्हणजे चार सोपे वा पडव्या असलेले वाडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अठरा कारखान्यांच्या इमारती हे सारे बांधले. कारखाने याचा अर्थ राज्यकारभाराच्या सोयीसाठी असलेले प्रशासकीय विभाग. हे कारखाने वा विभाग पुढीलप्रमाणे होते : खजिना-कोशागार, जवाहीरखाना-रत्नशाळा, अंबारखाना-धान्यसंग्रह, शरबतखाना-पेयस्थान, तोफखाना, दफ्तरखाना-लेखशाला, जामदारखाना-वसनागार, जिरातखाना-शस्त्रागार, मुदबखखाना-पाकशाला, उष्टरखाना-उंटशाला, नगारखाना, तालीमखाना-व्यायामशाळा, पीलखाना-हत्तीशाला, फरासखाना-राहुटय़ा, डेरे, इ., आबदारखाना-जलस्थान, शिकारखाना-पशुपक्ष्यांची जागा, दारूखाना-दारूगोळा साठवण्याची जागा, शहतखाना-औषधीशाळा वा आरोग्यगृह.
यावेगळे बारा महाल, हे पुढीलप्रमाणे होते : पोते-तिजोरी, सौदागीर-व्यापार, पालखी, कोठी-धान्यागार, इमारत-बांधकामे, वहिली-रथशाला, पागा-घोडदळ, सेरा-खासगी, दरूणी-राणीवसा, थट्टी-गोशाला वा कुरणे, टंकसाल-टाकसाळ, छबिना-रात्रीचा पहारा वा गस्त.
इथं संकेत असा की, कारखाने हे राज्याच्या मालकीचे अन् महाल राजाच्या मालकीचे. वर दिलेली यादी ही सभासदानं त्याच्या बखरीत दिलेली आहे. इथं तिचा उल्लेख हा केवळ संदर्भापुरता केलेला आहे. मात्र या बारा महालांपैकी इमारत, पागा, थट्टी अन् टंकसाल हे महाल अन् शरबतखाना, मुदबखखाना वा मुदपाकखाना, तालीमखाना, शिकारखाना हे कारखाने यांची विभागांची अदलाबदल केली की हे विभाग परिपूर्ण वाटतात. या तीस विभागांच्या मदतीने दुर्गाची अन् राज्याची सारी व्यवस्था शिवकालात पाहिली जात होती. किंबहुना, ही व्यवस्था त्याही पूर्वीपासून, अगदी यादव वा बहमनी काळापासूनही अस्तित्वात होती.
हे झालं राजधानीच्या दुर्गासंबंधीचे उदाहरण. राजधानीच्या दुर्गामध्ये प्रशासकीय व्यवस्थेसाठी तर हे सारे कारखाने आणि महाल असायलाच हवेत. मात्र अनेक दुर्ग लहानसे. अगदी आडबाजूला. तेथे या साऱ्याच कारखान्यांची वा महालांची बहुतेक वेळा गरज भासत नसे. मग दुर्गाचा आवाका पाहून, स्थळ पाहून या साऱ्याची योजना केली जात असे. बहुत विचारांती याविषयीचे निर्णय घेतले जात. कारण दुर्गाचे स्थळ निवडताना तेथील जागेच्या उपलब्धतेबरोबरच दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असे तो त्या दुर्गाच्या दृष्टीने असलेल्या वर्तमान व भविष्यकालीन गरजांचा. त्यानुसार जर ते बांधकाम झाले तर ते सार्वकालिक या अर्थाने उपयोगी ठरते. तात्कालिक गरजा लक्षात घेऊन केलेले बांधकाम थोडय़ाच अवधीत कालबाह्य़ ठरण्याचा धोका संभवतो अन् हे राज्याच्या योगक्षेमाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.
शिवकाळामध्ये तर दुर्ग ही सत्तेची केंद्रस्थाने होती. लष्करी व मुलकी सत्ता दुर्गाच्या ठायी एकवटलेल्या होत्या. किंबहुना आक्रमण, संरक्षण अन् व्यवस्थापन यांसाठी कराव्या लागणाऱ्या सर्वच हालचालींची दुर्ग ही अतिसंवेदनशील अशी केंद्रे होती. वयाच्या सतराव्या वर्षी, म्हणजे साधारण इ.स. १६४७ च्या आगेमागे शिवछत्रपतींनी राजगड बांधायला घेतला असावा. हे बांधकाम दूरदृष्टीने व भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊनच झाले होते, हे त्यानंतर घडलेला इतिहास सिद्ध करतो. इ.स. १६७०-७१ पर्यंत म्हणजे राजारामाच्या जन्मापर्यंत तरी त्यांचा मुक्काम राजगडावरच होता. याचा अर्थ असा की, सर्व गरजा, म्हणजे सद्यकालीन व भविष्यकालीन, जवळजवळ पंचवीस वर्षांपर्यंत भागवू शकेल असा दुर्ग त्यांनी १६४७ मध्येच बांधायला घेतला. त्यानंतरच्या काळात राज्याचा विस्तार भराभरा वाढत चालला. त्याच प्रमाणात लष्करी व प्रशासकीय गरजाही वाढत गेल्या. इ.स. १६४७ साली असलेल्या राज्याच्या सीमांमध्ये इ.स. १६७० पर्यंत प्रचंड उलथापालथी झाल्या. राज्याच्या सीमांच्या सुरक्षिततेच्या, राज्यकारभाराच्या व अर्थकारणाच्या दृष्टीने अधिक मोक्याच्या जागी असलेल्या व अधिक मोकळी जागा असलेल्या दुर्गाची आवश्यकता भासू लागली. ही गरज भागवण्यासाठी त्यांनी इ.स. १६६९-७० च्या सुमारास रायगडावर राजधानी थाटण्याच्या उद्देशाने बांधकाम सुरू केले गेले.
एक अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे ध्यानी घ्यायला हवी की, केवळ नैसर्गिक दुर्गमता वा भरपूर जागेची उपलब्धता एवढय़ाच निकषांवर रायगडची निवड राजधानी म्हणून केली गेली नाही. अर्थात हे मुद्दे महत्त्वाचे होतेच, मात्र त्यांहून अतिशय महत्त्वाचा होता तो आर्थिक निकष. याचे मूळ, शिवछत्रपतींनी इ.स. १६५६ मध्ये जावळी जिंकली, त्या घटनेपासून सांगता येते. राज्याची स्थापना वा राज्यविस्तार करणाऱ्यास राज्याच्या भूगोलाचे सखोल ज्ञान असावे लागते. शिवछत्रपतींच्या जावळी विजयाचे महत्त्व यातच दडलेले आहे. ज्या क्षणी जावळी शिवछत्रपतींच्या ताब्यात आली त्याक्षणी तोपावेतो त्यांच्यासाठी पोहोचेबाहेर असलेल्या समृद्ध व संपन्न अशा कोकणाचे दार खुले झाले. नुसत्या जावळीचाच विचार केला तर कोकणातून वरघाटी जाणारे जवळजवळ सोळा व्यापारी मार्ग व त्यांवरील जकातीची ठाणी जावळीच्या रूपाने अलगद त्यांच्या ताब्यात आली अन् कोकणचा नुसता भूभागच नव्हे, तर रोख उत्पन्नाचे असंख्य स्रोत नूतन राज्यास जोडले गेले. जावळी प्रकरण ही शिवछत्रपतींच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीस घडलेली घटना आहे. त्यांच्यासमोर यक्षप्रश्न म्हणून उभ्या असलेल्या, राज्याच्या आर्थिक मजबुतीची चिंता जावळी हस्तगत होण्याने दूर झाली अन् त्याचबरोबर कोकणातील प्राचीन संपन्न बंदरे व प्रदेशही कालौघात त्यांच्या हाती लागले. त्या काळातील राज्यांचे केवळ जकातीचे उत्पन्न किती असावे, यासंबंधाने दिल्लीच्या मुघल पातशाहीचे उदाहरण देता येईल : मुघल पातशाहीच्या एकूण बावीस सुभ्यांचे उत्पन्न सुमारे शंभर कोटी रुपयांचे होते व त्यापैकी निव्वळ जकातीचे उत्पन्न शेहेचाळीस कोटी रुपयांचे होते! पेशवे दप्तरात सापडलेल्या एका अप्रकाशित नक्कल कागदावर शिवछत्रपतींच्या राज्याचे उत्पन्न दिले आहे. त्यात तळकोकणातील १३ सुभ्यांचे उत्पन्न १,४२,००,००० होन, वरघाटीच्या ८ सुभ्यांचे ७,२५,००० होन व देशावरील १५ सुभ्यांचे १५,७५,००० होन इतके उत्पन्न दाखवले आहे. या उत्पन्नामध्ये बारामती, इंदापूर व जुन्नरच्या १३ तर्फाच्या उत्पन्नाचे आकडे समाविष्ट केलेले नाहीत. अर्थ असा की, जकातीच्या एक कोटी पासष्ट लक्ष होन एवढय़ा उत्पन्नापैकी एक कोटी बेचाळीस लक्ष होन इतके उत्पन्न एकटय़ा कोकणातून स्वराज्याला मिळत होते. ज्या भागातून एवढे प्रचंड उत्पन्न मिळते आहे, तो भाग राज्याच्या दृष्टीने आर्थिकच नव्हे तर अगदी राजकीय दृष्टय़ाही महत्त्वाचा ठरावा यात नवल नाही. याच कारणामुळे वरघाटावरील राजधानी कोकणात रायगडावर हलली.
शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीच्या काळात सतत युद्धस्थिती होती. युद्ध शत्रूच्या भूमीवर लढलं जावं अशी युद्धनीती असली तरी असं नेहमीच घडे असंही नाही. पुणे, सासवड, चाकण, वाई, जावळी, कल्याण, भिवंडी, नाशिक, पन्हाळा व त्याचा परिसर, दक्षिण कोकण या साऱ्याच रणभूमी होत्या. मात्र दक्षिण कोकणचा अपवादवगळता, या साऱ्याच रणभूमी वरघाटावर होत्या. युद्धांच्या या नित्य उपद्रवापासून राजधानी थोडी आडमार्गावर असावी, असाही विचार राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्यामागे केला गेला असावा. मग त्यासाठी रायगड ही निसर्गत:च अभेद्य अशा डोंगरावर रचलेली राजधानी, त्याच्या जोडीला सागरकिनाऱ्यावरील व्यापारी बंदरांची राखण करणाऱ्या जलदुर्गाची मालिका व सागरातला दुभ्रेद्य, जणू प्रतिलंका असा जंजिरा सिंधुदुर्ग, हा सारा मांड त्यांनी भविष्याचा वेध घेऊनच मांडला होता. दुर्ग केंद्रस्थानी ठेवून शिवछत्रपतींनी राज्याची उभारणी कशी केली असावी हे इथं ठळकपणे ध्यानी येतं. राज्याची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी, केवळ जकातीतून जवळजवळ दीड कोटी होन उत्पन्न देणाऱ्या भागातील रायगडाची राजधानी म्हणून केलेली निवड अतिशय अचूक ठरली. इथं अजूनही एक उदाहरण जाता जाता आठवतं. मिर्झाराजा जयसिंगाशी झालेल्या तहामध्ये जे बारा दुर्ग राजांनी स्वत:कडे ठेवले, त्यांतील नऊ दुर्ग कोकणातील होते हे लक्षात आलं की, कोकणाचं शिवकालीन महत्त्व आपल्या ध्यानी यायला वेळ लागत नाही.
कोकण किनारपट्टीवरील जंजिऱ्याच्या सिद्यांचा, डचांचा, वसई-गोव्याच्या पोर्तुगिजांचा अन् मधेमधे ठायीठायी बोटे खुपशीत असलेल्या इंग्रजांचा बंदोबस्त करण्यासाठी नुसते आरमार बाळगून चालणार नाही हे ध्यानी येताक्षणी शिवछत्रपतींनी संपूर्ण कोकणकिनाऱ्यालगत जलदुर्गाची मालिकाच बांधून काढली. भविष्यात कधीतरी मुघल पातशहाशी जबरी झुंज द्यावी लागेल, पूर्ण सामर्थ्यांनिशी टक्कर द्यावी लागेल हे बहुधा शिवछत्रपतींनी जाणलं होतं. त्या संभाव्य आक्रमणाच्या वेळी, बचावाची अन् आक्रमणाचीही दुसरी फळी म्हणून पश्चिम किनाऱ्यावर जलदुर्गाची ही मालिका अन् स्वयंपूर्ण आरमार यांची नेमस्त उभारणी त्यांनी केली. त्यांच्या स्वत:च्या हयातीत तशी पाळी आली नाही, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेबाचा सेनासागर महाराष्ट्रावर कोसळला, तेव्हा याच बचावफळीने अतुलनीय कामगिरी बजावली. हे शिवछत्रपतींच्या भविष्यकालीन गरजा जाणणाऱ्या द्रष्टय़ा दृष्टीचेच परिपक्व असे फळ होते.
स्थळमाहात्म्याच्या मागोमाग दुर्ग बांधताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रचंड बांधकामांसाठी लागणारा अपरंपार पसा. राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अमुक एका जागी दुर्ग बांधणे अतिशय आवश्यक झाले, मात्र खजिन्यात पुरेसा पसा नसेल, तर एकंदरच राज्यकारभाराच्या दृष्टीने तो मोठा अडसरच ठरू शकतो. म्हणून राज्यकर्त्यांच्या दृष्टीने दुर्गबांधणीचा विचार करण्याअगोदर राज्याच्या आर्थिक बाजूंचा विचार करणे, उत्पन्नाची साधने पडताळून पाहणे अन् मगच निर्णय घेणे अतिशय आवश्यक ठरते.
नाना प्रकारचे कर हे राज्यासाठी उत्पन्नाचे एक प्रमुख साधन असते. शिवकालीन पत्रव्यवहारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करांची पन्नासेक नावे आढळतात, ती पुढीलप्रमाणे : इनामपट्टी, इनामती खंडणी, मिरासपट्टी, सराफपट्टी, धनगरी, मागटका, पायपोशी, कारूक, तेलपट्टी, वेठबिगार, मोहतर्फा, फर्माईश, हेजीबपट्टी, जकात, सादिलवारपट्टी, खर्चपट्टी, लग्नटका, पाटदाम, घरटका, तूटपट्टी, कापूरपाईक, नफरटका, कोतवाली, इमारतपट्टी, गडछावणी, करसाई, नदीटोकरा, कर्जपट्टी, कापडपट्टी, जंगमपट्टी, दसरापट्टी, मेजवानी पट्टी, तोरणभेटी, गावटका, ठाणपट्टी, मोहीमपट्टी, बकरापट्टी, ईदसुभराती, हुमायूनपट्टी, कोंबडीपट्टी, उरूसपट्टी, भूतफरोशी, मुलाणसारा, शिकेपट्टी, सिंहासनपट्टी, गझपट्टी, निपुत्रिक, सिंहस्थपट्टी, घांसदाणा इत्यादी.
या करांपासून मिळणाऱ्या महसुलाव्यतिरिक्त रोख रक्कम हाती येण्याचे दुसरे मुख्य साधन म्हणजे परराज्यातील मुलूखगिरीतून मिळणारा पसा. सोने, चांदी, जडजवाहीर, हिरे, माणिके, नाना प्रकारची रत्ने, जनावरे, दारूगोळा, औषधी, रोख रक्कम- अशा नाना स्वरूपात हा पसा असे. शाहिस्तेखानाने तीन वर्षांपर्यंत स्वराज्याची धूळधाण व नासाडी केल्यानंतरच शिवछत्रपतींनी मुघलांची व आदिलशाहीची शहरे लुटायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इ.स. १६८० पर्यंत चौदा वेळा केवळ लुटीच्या मोहिमा काढल्या. सुरत पहिल्यांदा लुटून मिळवलेली जवळजवळ एक कोटी होनांची संपत्ती शिवछत्रपतींनी सिंधुदुर्गाच्या उभारणीसाठी खर्च केली. तोरण्यावर सापडलेलं प्रचंड गुप्त धन त्यांनी राजगडाच्या उभारणीसाठी खर्च केलं. पन्हाळ्याच्या दुरुस्तीच्या वेळीही त्यांना सापडलेलं धन त्यांनी तो दुर्ग मजबूत करण्यासाठी वापरलं, अशा नोंदी तत्कालीन कागदपत्रांमध्ये आहेत. जे राज्य दुर्गाच्या आधारावर उभे राहिले, त्या दुर्गाच्या उभारणीला, त्यांच्या डागडुजीला वा त्यांचं योगक्षेम चालवायला शिवकाळात धनाची कधीही कमतरता पडली नाही हे त्यानंतर घडलेल्या इतिहासानं दाखवून दिलं. शिवछत्रपतींच्या या दणकट दुर्गानी आणि त्यांनी पेटवलेल्या माणसांनी औरंजेबाला अन् त्याच्या सहा-सात लाख सन्याला, अपरंपार खजिन्याला पंचवीस वर्ष लढायला लावून पुरतं जेरीस आणलं. सरतेशेवटी पराभूत करून इथेच गाडलं.
दुर्गबांधणीच्या कामी नैसर्गिक साधनसंपत्तीचीही तशीच आवश्यकता असे. या घटकांचा विचार केला नाही, तर या विषयास पुरेसा न्याय दिला जाणार नाही. पशाव्यतिरिक्त दुर्गाच्या बांधकामास दगड, चुना, पाणी, लाकूड, शिसं, कोळसा, मनुष्यबळ व जनावरं यांचीही तितकीच आवश्यकता भासे. अर्थात या घटकांची आवश्यकता कोणत्याही काळात व कोणत्याही प्रकारच्या बांधकामास लागतेच. मात्र प्रस्तुत बांधकामे ही लष्करी स्वरूपाची होती व त्यासाठी तशाच उच्च गुणवत्तेच्या व निकषांच्या कसोटीवर उतरलेल्या नैसर्गिक व स्वाभाविक घटकांची नितांत आवश्यकता होती. शेकडो वर्षे निसर्गाचे व मानवी उदासीनतेचे घाव सोसून आजही ताठ मानेने जागोजागी उभी असलेली ही वास्तुशिल्पे या विधानाची जणू पुष्टीच करतात!
महाराष्ट्रातील शिवकालीन बांधकामात, इथे मुबलकपणे आढळणाऱ्या काळ्याभोर बसाल्टचा उपयोग फार मोठय़ा प्रमाणात केला गेला. शिवकालात बहुधा गिरिदुर्ग वा जलदुर्गच रचले गेले. गिरिदुर्गाच्या बांधकामासाठी लागणारा मूलभूत घटक म्हणजे भक्कम असा दगड. तो तर सह्य़ाद्रीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे या प्रमुख घटकाची उणीव तत्कालीन स्थपतींना कधीच भासली नाही. मग ज्या जागी दुर्ग बांधायचा त्याच जागी दगडांच्या खाणी काढल्या गेल्या. त्या खाणीसुद्धा अशा जागी की, दुर्गाच्या सपाटीवर कोसळणारा पाऊस नैसर्गिक उतारावरून वाहत त्या ठिकाणी एकत्र व्हावा अन् आपसूकच पाण्याची गरज भागवणारा जलाशय तिथे निर्माण व्हावा. यामुळे दोन कार्ये साधली जात : पहिलं असं की, तटबंदीच्या कामी येणारा दगड उपलब्ध होई आणि दुसरे म्हणजे दुर्ग वसता झाल्यानंतर, पाण्याची अगदी प्राथमिक गरजही भागवली जाई. याचं अनुकरण प्राय: साऱ्याच मध्ययुगीन दुर्गावर केलेलं आढळतं. मात्र इथं या संदर्भात एक विचार नोंदवणं अतिशय अगत्याचं वाटतं. राजगड व रायगडाच्या संदर्भात या प्रकारे निर्माण झालेल्या तलावांचा उपयोग, पाण्याच्या साठय़ाव्यतिरिक्त आक्रमणास प्रतिरोध करणारा नैसर्गिक खंदक अशा स्वरूपातही केला गेला आहे.
राजगडावर पद्मावती माचीवर शिवछत्रपतींच्या राहत्या वाडय़ाचा चौथरा आहे. किंबहुना त्या काळात महत्त्वाच्या साऱ्याच इमारती पद्मावती माचीवर होत्या. या राजवाडय़ाच्या दक्षिण व उत्तर अशा दोन्ही बाजूंस तलाव आहेत. दक्षिणेस राणीवशाचे तळे आहे, तर उत्तरेस तटाला लागूनच पद्मावतीचा तलाव आहे. या दोन तलावांच्या बेचक्यात राजवाडा आहे. पश्चिमेस उभा कडा आहे तर पूर्वेस खोलवणात असलेल्या तटबंदीने हा परिसर बंदिस्त केला आहे.
रायगडावरदेखील महादरवाजाचा पुढचा चढ चढून पायऱ्या संपवून वर आलं की बालेकिल्ल्याची तटबंदी समोरच दिसते. मात्र पुढे सरकावे तर हत्ती तलाव अन् गंगासागर असे दोन भले मोठे तलाव समोर दिसतात आणि पलीकडे बालेकिल्ला व त्याची तटबंदी दृष्टीस पडते. या तलावांनी राजवाडा व त्या परिसरातील घरांस पाणी तर पुरवलंच परंतु तत्कालीन युद्धशास्त्रास अनुरूप असं कृत्रिम खंदकांचं संरक्षणही पुरविलं. हे योगायोगाने घडलेलं नव्हतं. त्यामागे आमच्या त्या हिरोजी इंदुलकरांचा विचार दडलेला होता. किंबहुना हे सारंच पूर्वनियोजित होतं असं राजगडावरील इतर वास्तूंच्या अभ्यासानंतर मोठय़ा विश्वासानं म्हणता येतं.
इथं विषय सुरू आहे उत्कृष्ट प्रतीच्या उपलब्ध दगडांचा. गिरिदुर्गाच्या बाबतीत तर तो जागीच उपलब्ध असे. मात्र जलदुर्गाच्या बाबतीत तसं नसे. कोकणात काळाभोर अग्निजन्य खडक किनारपट्टीच्या जवळपास अभावानेच आढळतो. तिथं सहज आढळणारा जांभा दगड तटबंदीच्या कामाला निरुपयोगी. तो केवळ इमारती बांधकामासाठी उपयुक्त. मग समुद्राची उधाणगाज अंगावर घेण्यासाठी सह्यद्रीच्या अग्निजन्य खडकांचीच गरज भासली. मग गरजेएवढा दगड सह्यद्रीमधील घाटमार्गाच्या आजूबाजूंस खाणी पाडून पंचवीस-तीस मलांवरील किनारपट्टीवर पोहोचवला गेला अन् मगच तिथे उभे राहिले भलेभक्कम जलदुर्ग. या दुर्गाची मजबुती आज अगदी साडेतीनशे वर्षांनंतरही दृष्टीस पडते आहे. मात्र यातही अपवाद असायला हवाच. तो सिंधुदुर्गाच्या बांधकामात दिसतो. सिंधुदुर्गासाठी लागलेला सारा दगड त्या बेटावरच दगडांच्या खाणी काढून वापरला गेला. हा दगड अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. अधूनमधून पांढरे पट्टे असलेला, तांबूस निळसर अशा प्रकारचा आहे. इतर कोणत्याही जलदुर्ग वा गिरिदुर्गामध्ये वापरलेल्या दगडांपेक्षा हा निराळा आहे असं निरीक्षण तिथं जाताजाता नमूद करावंसं वाटतं.
सातवाहन काळात रचायला सुरुवात झालेल्या अश्मदुर्गाचा उल्लेख येथे केला नाही तर दगडांचा हा विषय अपूर्ण राहील. चिरेबंदी तट व दरवाजांची बांधणी अस्तित्वात येण्याअगोदर दुर्गाचे हे भाग अखंड कातळातून कोरून काढले जात. त्यासाठी सहस्रावधी घनफूट कातळ उभा कोरून काढला जात असे. त्यासाठीची स्थळे निवडताना कातळाची प्रत निश्चितच पहिली जात असे. आईब असलेला कातळ टाळूनच या प्रकारचे कोरकाम होत असे. जीवधन, शिवनेरी, चावंड, हडसर, त्र्यंबकगड, रतनगड, कोथळीगड, अजिंठा-सातमाळा रांगेतील बहुतांश दुर्ग अशी अनेक उदाहरणे याच्या पुष्टीसाठी देता येतील. ज्या पद्धतीने हे दुर्ग रचले गेले, तीच पद्धती त्या कालखंडातील लेणी कोरतानाही वापरली गेली हेही इथं सांगावसं वाटतं.
किंबहुना, ते आपल्या महाराष्ट्रदेशी असलेल्या दुर्गाच्या संकल्पनेच्या प्राचीनत्वाचे एक गमक ठरते!
n discover.horizon@gmail.com