‘आ मच्या गणपतीला यायचं हं!’ असं आग्रहाने कुणीतरी बोलवावं आणि आमचा गणपती केवळ दीड दिवसांचाच आहे असं सांगावं, म्हणजे पाहुण्याच्या मनाला एस्सेलवर्डच्या मोठय़ा राईडमधून झपकन खाली कोसळायला होते. शहरं वाढायला लागली तशी राहती घरं वेशीबाहेर फेकली गेली. त्यात सणाच्या दिवसात जागेची, माणसांची अडचण, कामाची व्यस्तता तर असतेच, पण ‘पाहुण्यांची ऊठबस’ करण्याची जबाबदारी केवळ महिला वर्गावरच लादलेली असल्याने घरगुती १० दिवसांचे गणपती ७, ५ ते दीड अशा दिवसांवर आले.
गणपती येतो येतो आणि जातो जातो. परंतु यातही आपला उत्साह कमी होत नाही. घरात बच्चेकंपनी उत्साहात असते. दीड दिवसांसाठी खूप सारा डेकोरेशनचा पसारा करता येत नाही. पर्यावरणप्रेमी बच्चे व त्यांचे पालक थर्माकोल वापरत नसल्याने सजावट करताना आणखीनच ताण येतो. छोटय़ा कुटुंबामध्ये मदतीलाही फार कुणी जवळ नसतं. म्हणूनच तुमच्यासाठी नव्या धाटणीच्या घरांना शोभेल अशा सजावटीच्या कल्पना देत आहोत.
लहानपणापासून जे पाहात आलोय त्यानुसार सजावटीच्या पारंपरिक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. त्या जरा बाजूला ठेवून घरातील बच्चेकंपनीची व गुगल व यूटय़ूबची मदत घ्यावी लागेल. (साधारण मागची भिंत उजळ रंगाची व २ बाय ४ च्या टेबलाला गृहीत धरून कल्पना देत आहे.)
- निसर्गप्रेमी असाल तर घराजवळच्या नर्सरी, बगिच्यामधून खरे गवताचे बेड विकत घ्या. आणि चौरंगाची जागा किंवा टेबलावर पसरवा. या बेसवर बऱ्याच कल्पना फुलवता येतील.
- या ग्रासबेडवर मागे तुम्हाला कमी उंचीच्या फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवता येतील.
- याच ग्रासबेडमागे फेंगशुईच्या बांबूची रांग करू शकता. यात गणपती विसर्जनानंतर ही रोपं तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा सोसायटीत ठेवू शकता. अथवा पाहुण्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. अशी रिसायकल व सोपी मखर सजावट होऊ शकते.
- हल्ली प्लास्टिकची ग्रासबेड मिळतात, तशा वेलीही मिळतात. त्या वेलीची चादर गणपती मागे एका रेडीमेड जाळीवर उभी डकवू शकता. (खऱ्या रोपांपेक्षा हे थोडं खर्चीक होईल.) पण याचा पुनर्वापर कित्येक वर्षे करता येऊ शकतो.
- गणपतीच्या मागे उजळ रंगाची प्लेन भिंत असेल तर बाजारात मिळणारी विविध रंगी फुलपाखरे त्यावर चिटकवून भिंतीला आकर्षक बनवू शकता. किंवा पारदर्शक कागद/प्लास्टिकवर मूळ आकार असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रिंट घेऊन त्या कात्रीने नीट कापावे व टू-वे टेपने भिंतीवर चिटकवल्यास हे खरे भासतील.
- ओरिगामीची आवड असेल तर तुमच्यासमोर खूप स्वस्त व सोपे पर्याय आहेत. उजळ, रंगीत, टेक्सचर असणारे कागद बाजारात सहज मिळतात. युटय़ुबवर जाऊनीं२८ १्रॠं्रे म्हणून सर्च केल्यास गोलाकार पंखे, फुलपाखरे, पक्षी, फुले, बनवता येतील. त्याचा वापर करून गणपतीची मागची भिंत सजवता येईल.
- याच पाश्र्वभूमीवर गणपतीचे वाहन असणारे ओरिगामीचे उंदीर उभे राहतात. त्यांच्या मोठय़ा ते छोटय़ा आकाराच्या विविध रंगी आवृत्त्या तयार करा व चौरंगाच्या दोन्ही बाजूने चिटकवा.
- आकर्षक सजावट म्हणजे विविध रंग वापरायलाच पाहिजे असा हट्ट नको. एकाच रंगात, एकाच रंगाच्या विविध रंगछटा (शेड्स) वापरल्यास सजावटीला एक कलात्मकता येते. त्यासाठी तयार गोलाकार सफेद आकाश कंदील घेऊ शकता. त्यावर छोटी खोटी फुले किंवा वेली टाकून टेबलाच्या मागून व वरून सोडू शकता.
- युटय़ुबवर विविध आकाराची फुले बनविण्याची पद्धती आहेत. त्यात तुम्ही पांढऱ्या रंगाची विविध जाडीच्या कागदावर फुले बनवून घ्या. ही फुले अगदी शाळेतील मुलेही झटपट करू शकतील. शेजारच्या मुलांची हक्काने मदत घेऊन अशा फुलांना ‘ग्लुगन’ने किंवा व्हाइट गमने प्लेन कागदावर चिटकवावी. त्यापुढे असणारा रंगीत बाप्पा शोभून दिसतो.
- विविध प्रकारच्या माध्यमात काम करण्याची आवड असल्यास गुगलवरून मोठय़ा आकाराची वॉलपेपर इमेज सर्च करावी. त्यात तुम्ही गणपतीची विविध नावे, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र असे देखील शोधू शकता. त्या इमेजला सनबोर्डवर (व्हिनाइल) प्रिंट करून घ्या आणि असे २-३ सनबोर्ड एकमेकांना चिटकवून अर्धषटकोनात उभे करा. ही पाश्र्वभूमीदेखील अनोखी भासते.
- सध्या आधुनिक घरात प्रोजेक्टर किंवा मोठे स्क्रीन असणारे स्मार्ट टीव्ही असतात. त्यात झरा, नदी समुद्राचा व्हिडीओ घेऊन ती रिपीट मोडवर ठेवा. आणि व्हिडीओसोबत समुद्र, झऱ्याचा आवाज युटय़ुबवरच मिळेल. त्यामुळेही आपला गणपती आणि आपण खरोखरच समुद्राच्या किनारी आहोत असा भास देतील.
अशा रीतीने पटकन होणारे व जास्त खर्चीक नसणारे घरगुती असे मखर करण्यात तुम्हाला वेगळा आनंद नक्की मिळेल.
सजावटीत महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे लाइटस्- प्रकाशयोजना. पण उत्साहाच्या भरात गणपतीच्या मुखावरच मोठा झोत सोडलेला असतो. त्यामुळे वातावरण आल्हाददायक न राहता तप्त झाल्याचा भास होतो, हे टाळावे.
खूप झकपक व दिव्यांच्या माळा लावून डान्सफ्लोअरचे वातावरण तयार होते. काचेच्या ग्लासात/ वाडग्यामध्ये या चायनीज चमचम माळा सॉफ्ट मोडवर सोडाव्यात व त्यात तांदूळ भरून घ्यावे. खूपच चांगला परिणाम साधला जातो.
chitrapatang@gmail.com