मंडळी, नुकताच आपण गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला. त्यापूर्वी गणेश मंडळांना विजेपासून सुरक्षेबाबतच्या काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या होत्या; आशा आहे की सर्व संबंधितांकडून त्यांचे अनुपालन झाले असेल. गणेशोत्सवानंतर सर्वाना वेध लागतात ते नवरात्रीचे. घटस्थापनेला आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत म्हणजे नऊ दिवस महिषासुर राक्षसाला ठार मारण्यासाठी दुर्गादेवीने युद्ध केलं.
नवरात्रीनंतरच्या दहाव्या दिवशीही देवांविरुद्ध राक्षसांचं घनघोर युद्ध सुरू होतं. त्या दिवशी देवीने विजयी होऊन काशीमध्ये प्रवेश केला. तो दिवस म्हणजे आश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा हा दिवस वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी एक असून अत्यंत पवित्र मानला जातो.
नऊ दिवसांतील ही दुर्गा कशी आहे? ती अभय देणारी आहे, रणांगणी युद्धामध्ये वा महासंकटामध्ये ही दुर्गा रक्षण करणारी आहे. म्हणूनच मनुष्यप्राण्याचं रक्षण करण्यासाठी तिने शंख फुंकला आणि चक्र, गदा, परशू, अंकुश ही आयुधं घेऊन शत्रूशी युद्ध करण्यासाठी सिद्ध झाली. आजचा विचार करता संकटातून रक्षण करणं म्हणजे माणसाच्या रोजच्या आयुष्यातील धोक्यांपासून सुरक्षा प्राप्त करणं होय.
याच हेतूने आपण आज येणाऱ्या दोन महत्त्वाच्या सणांच्या बाबतीत जे सोहळे, डेकोरेशन आणि देखावे सादर होतात त्या वेळी विद्युत सुरक्षा प्राप्त करण्याबाबत चर्चा करणार आहोत. त्यातील पहिला सण म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी. पक्ष पंधरवडा संपल्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होऊन नवरात्रोत्सव सुरू होतो, ठीकठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन पूजा, आरती याबरोबरच मंडपात तात्पुरती वायरिंग करण्यात येऊन डीजे आणि दांडिया रास आयोजित केला जातो. वेगवेगळ्या नवरात्रोत्सव मंडळांत त्याच्या आकारमान आणि रेप्युटेशनप्रमाणे हा गरबा भव्य रंगमंचासहित मोठय़ा पटांगणात आयोजित केला जातो. अशा दांडिया मेळाव्यांमध्ये खूपच मोठय़ा प्रमाणात तात्पुरती वायरिंग केलेली असते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसांसाठी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होते. शेकडो, हजारो व्यक्तींचा इथे वावर असल्यामुळे निकृष्ट कामामुळे विद्युत सुरक्षेस धोका निर्माण होऊन अपघात संभवतो. त्यासाठी खाली काही मार्गदर्शक सूचना नवरात्र मंडळांसाठी दिल्या आहेत.
नवरात्र मंडळांसाठी विद्युत सुरक्षेबाबत काही टिप्स
* रंगमंचावर गाणारे कलाकार आणि वादक यांच्या वाद्यांसाठी लागणारा वीजपुरवठा शक्यतो भिंतीवर योग्य अंतरावर ठेवणे.
* त्यासाठी थ्रीपिन प्लगचा वापर करून सक्षम अर्थिग देणे जरुरी आहे, अन्यथा त्याचा परिणाम साउंड आउटलेटवर होऊ शकतो.
* सिंथेसायजर, इलेक्ट्रॉनिक गिटार अशी वाद्ये जो वीजपुरवठा घेतात तो अशा प्लगमधूनच घ्यावा. त्यासाठी स्टेजवर सर्वत्र वायरिंग फिरविल्यास कलाकारांच्या हालचालींवर बंधन येऊन सुरक्षेस बाधा येते.
* गरबा रास ज्या मैदानात आयोजित केलेली असते तेथील वायरिंग ही जमिनीवरून नेऊ नये, अन्यथा दांडिया खेळणाऱ्यांच्या पायात अडकून अपघात घडू शकतो.
* मंडपाच्या बाजूने लागणाऱ्या मजबूत लाकडी खांबावर कमीतकमी आठ फुटांच्या अंतरावरून ही वायरिंग नेण्यात यावी.
* मैदानातून नेण्यात येणारी ही सर्व वायरिंग जोडरहित (Joint less) असणे आवश्यक आहे. जोड द्यावाच लागला तर तो डबल इन्सुलेशनचा द्यावा, म्हणजे स्पार्किंग किंवा शॉर्ट सर्किटची शक्यता राहणार नाही.
* स्टेजच्या मागच्या बाजूला अर्थिगचा खड्डा करून त्याजवळच सुरक्षित उंचीवर मेन स्विचबोर्ड उभारून भूमिगत केबलद्वारे सर्वत्र वीजपुरवठा वितरित करावा.
* अचानक लाइट गेल्यास गोंधळ होऊ नये म्हणून कमीतकमी ५० टक्के लोड घेईल असा जनरेटर रंगमंचापासून थोडा दूर ठेवावा, जो एका फोर पोल चेंज ओव्हर स्विचमार्फत मेन सप्लायशी जोडावा. त्याला नियमांप्रमाणे जवळच स्वतंत्र अर्थिग देणं आवश्यक आहे.
* अर्थ फॉल्ट होऊन शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून टोटल लोडप्रमाणे योग्य क्षमतेचा ई.एल.सी.बी. (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) लावावा. नियम क्र. ४२ प्रमाणे ते बंधनकारक आहे. हे संपूर्ण वायरिंगचे काम महाराष्ट्र शासनाच्या परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणं हे नियम क्र. २९ प्रमाणे बंधनकारक आहे.
* नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सदर वीज कंत्राटदाराचा टेस्ट रिपोर्ट आणि त्याच्या अर्जासहित संबंधित विद्युत निरीक्षक कार्यालयास सादर करणे.
* विद्युत निरीक्षक कार्यालयाने त्वरित कार्यवाही करून सक्षम अभियंत्याकडून योग्य अहवाल आल्यावर सत्वर वीजपुरवठा कंपनीला एनओसी देणे.
* वीज कंपनीने वरील ना-हरकत दाखला आल्यानंतर विद्युत नियमांच्या अधीन बाबीनुसार सदर नवरात्र मंडळास वीजपुरवठा सुरू करावा.
वीज कायद्या (Electricity Act 2003 ) च्या कलम ५४ प्रमाणे कुठल्याही ठिकाणी १०० लोकांपेक्षा जास्त माणसं आणि २५० व्ॉटपेक्षा जास्त लोड असेल तर त्याला विद्युत निरीक्षक आणि संबंधित डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला कमीतकमी सात दिवसांची पूर्वसूचना देणं बंधनकारक आहे. त्यानुसारच विद्युत निरीक्षक NOC देत असतात, हे ध्यानी असावे.
वर आतापर्यंत आपण नवरात्र आणि दसरा या दरम्यान सुरक्षेबाबत चर्चा केली. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली. असे म्हणतात की, दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंतचा हा माहोल आपल्या सर्वाना धुंद करून टाकतो. दिवाळी फराळ, फटाक्यांची आतषबाजी, आकाशकंदील, विद्युत रोषणाई, दिवाळी अंकांमधून साहित्याची मेजवानी असे बरेच कार्यक्रम साजरे होत असतात. तथापि या सर्व बाबींमध्ये विद्युत सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे.
आज आपण मुख्यत्वे याच गोष्टीची चर्चा करणार आहोत. दिवाळीला सर्व सणांचा राजा म्हटलं जातं व हा दिव्यांचा सण व तोही बऱ्याच कालावधीपर्यंत चालणारा असल्यामुळे दिव्यांची माळ, सीरिज, इत्यादी वापरून तात्पुरती वायरिंग करण्याची प्रवृत्ती ही बहुतांश लोकांत आढळते. हे करीत असताना अतिउत्साहात सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे अनेक प्राणघातक अपघात झाल्याचे आढळले आहे.
आपण प्रथम घरच्या घरी रोषणाईची कामे करणाऱ्यांचा आढावा घेऊ. आजकाल दिवाळीमध्ये प्रत्येक घरात बाल्कनीमध्ये आकाशकंदील व कमी-अधिक प्रमाणात दिव्यांच्या माळा लावल्या जातात. बाल्कनीमध्ये सामान्यत: थ्रीपिन प्लग दिलेले नसतात, मग आकाशकंदील किंवा सीरिजसाठी विद्युत प्रवाह हा आतूनच एखाद्या प्लगला करून घेतला जातो. हे करीत असताना वायर कमी पडली तर मुख्य प्लगला एक्स्टेंशन बोर्ड जोडून त्याला आकाशकंदील अथवा सीरिज जोडल्या जातात. हा बोर्ड व पुढील वायर्स जोडताना खालीलप्रमाणे काळजी घेणं जरुरी आहे.
* मुख्य प्लग करून बोर्डला कनेक्ट करताना थ्रीपिन टॉपने जोडणी करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्थिग न मिळाल्याने अपघात संभवतो.
* बोर्ड कनेक्ट केल्यावर त्याच्या वायर्स या भिंतीला क्लिप्सच्या मदतीने सरळ रेषेत न्याव्यात, म्हणजे कुणाच्याही पायात येणार नाहीत.
* बऱ्याच वेळेला अगोदर प्लगमध्ये किंवा मेन स्विचमध्ये वायर टाकली जाते व नंतर पुढील काम करण्यात येते. हे काम करताना वायर सोलताना (कधी दातानेसुद्धा) स्विच अनवधानाने चालू केल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत.
* अनेक वेळेस थ्रीपिनचा वापर न करता वायर्स डायरेक्ट प्लगच्या छिद्रात खोचतात. अशा वेळी वायरिंगच्या खेचाखेचीमुळे अथवा ओव्हर लोडमुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग सुरू होऊन आग लागण्याचा संभव असतो.
* रोषणाई करताना वायर्सची जमिनीपासून पुरेशी उंची, अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे माणसे इकडून तिकडे फिरताना, सामान हलवताना त्या वायरमध्ये अडकतात. त्यामुळे वायर, पिन किंवा प्लगमधून सटकतो व चालू लाइनला स्पर्श झाला की अपघात होतो.
* रोषणाई करतानाच्या वायरमध्ये जे जोड (Joints) देण्यात येतात ते बऱ्याच वेळी उघडे असतात, त्यामुळे त्या जोडाला स्पर्श झाला की माणूस दगावून अपघात होतो.
* दिवाळीनिमित्त जी रोषणाई केली जाते ती बहुतांशी बाल्कनीच्या ग्रिलला निरनिराळ्या ठिकाणी जोडून अथवा सेलोटेपच्या मदतीने लावली जाते. अशा वेळी विजेच्या दिव्यांच्या माळेला स्पर्श होऊन किंवा माळेमुळे लोखंडी जाळी किंवा फ्रेममध्ये वीजप्रवाह आल्यास अपघात होतो.
* एकाच प्लगमध्ये बहुमार्गी पिन लावून अनेक ठिकाणी वायरिंगचा विस्तार केल्यामुळे त्या प्लगवर विजेचा भार येऊन वीजरोधक आवरण खराब होते व अपघात होण्याची शक्यता असते.
* अर्थिग करणे आवश्यक व ते व्यवस्थित झाले की नाही याची खातरजमा करावी.
* रोषणाईसाठी घेतलेल्या तात्पुरत्या वीजपुरवठय़ामध्ये दोन वायर एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी साधन वापरावे. व दोन वायरच्या आधारासाठी आणि अर्थिगसाठी जी.आय. वायर असावी.
* अंगणात वा परिसरात फिरविताना वरील दोन वायर्स जमिनीपासून कमीतकमी आठ फुटांच्या लाकडी बल्लीवरूनच न्याव्यात.
* घरातून बाहेर ज्या वेळी या वायर्स जातात त्या वेळी दारातून, खिडकीतून किंवा जाळीतून असणाऱ्या खोल जागा, उंचवटे किंवा शार्प कॉर्नर्सपासून त्यांचे संरक्षण केले पाहिजे.
* तसे न केल्यास आकाशकंदील अथवा रोषणाईला कनेक्ट करणाऱ्या वायर्सचे इन्सुलेशन निघून अपघात घडतात.
* सीरिज वायर किंवा तात्पुरत्या वायर या कधीही भिंतीला, कंपाउंडला वा लोखंडी वस्तूला चिकटून नेऊ नयेत.
* नियमांची व त्यांच्या परिणामांची कल्पना असल्याशिवाय कुठलेही काम करू नये.
* वीज वाहक तारेचा तसेच अर्थिगच्या जी.आय. वायरचा कपडे वगैरे टांगण्यासाठी उपयोग करू नये.
* रोषणाईसाठी वीजपुरवठा घेताना ३ पिन प्लग सॉकेटद्वारेच घ्यावा. तिसरी पिन कार्यक्षम अर्थिगला जोडावी.
* जमिनीखालून वायर घेताना ती जमिनीच्या खाली कमीतकमी २ फूट असावी व तिला विटा आणि रेतीचे संरक्षण असावे.
* सर्व जोड (ख्रल्ल३२) चांगल्या प्रकारे इन्सुलेशन टेपने सुरक्षित राहतील असे करावे. आकाशकंदील किंवा सीरिजसाठी तात्पुरती वायरिंग करताना प्लास्टिक लवचीक (Joints) वायर लटकल्या स्थितीत वापरू नये.
मित्रांनो, वर चर्चा केल्याप्रमाणे विद्युत नियमांचे पालन करून घरातील सर्वानी पूर्णपणे दक्षता घेऊन विद्युत रोषणाई आणि फटाके याबाबत कार्यवाही केल्यास आपण सर्वच संपूर्ण सुरक्षित दिवाळी साजरी करू हे नि:संशय.
प्रकाश कुलकर्णी -plkul@rediffmail.com
सदस्य राष्ट्रीय सुरक्षा परिषद