पावलोपावली घाण आत यायला टपलेली असते. अशा वेळी शिस्तीचा प्रेमळ धाक घालणाऱ्या ज्येष्ठांसारखं, दारात ‘पायपुसणं’ हजर असतं. किंबहुना ‘पाय पुसतो आल्यागेल्याचे, करू द्या ही चाकरी, यजमाना सुखी रहा संसारी’ हे व्रत ‘लाथा खाऊन’ निभावत असतं. घराची स्वच्छता  संभाळण्यात लक्षणीय भूमिका बजावत असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असं म्हणतात की रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणं केव्हाही श्रेयस्कर. कधी कधी अस्वच्छता हे रोगाचं कारण होऊ शकतं. म्हणून आपण घराची साफसफाई करत असतो. ही साफसफाई वेगवेगळ्या प्रकारची असते. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून घेणं, स्वयंपाकघरातील भांडी घासूनपुसून ठेवणं, कपडे धुणं, केरकचरा काढणं, त्याची योग्य विल्हेवाट लावणं, प्रसाधनगृहांची स्वच्छता संभाळणं अशी काही दैनंदिन कामं असतात. तर जळमटं,  कोळीष्टक काढणं, सामानाची हलवाहलव करून केर काढणं, आवराआवरी करणं अशी अधूनमधून वेळ असेल तेव्हा किंवा गौरीगणपती, दसरादिवाळीच्या निमित्ताने केलेली स्वच्छता मोहीम असते. घराची रंगरंगोटी, दुरुस्ती, सोयीसाठी केलेले बदल अशी खिशाला ‘जड’ असणारी अमूकएक कालावधीचं बंधन नसलेली कामं पण घराच्या आरोग्य संपदेत भर टाकणारी, आरोग्यवर्धक आणि आवश्यक अशी असतात.

याशिवाय आणखीन एका बाबतीत घराची स्वच्छता संभाळावी लागते. घर म्हटलं की माणसांची आतबाहेर ये-जा आलीच. रस्त्यावरची घाण, चप्पल बूटाने तुडवतच आपण घरी येतो. बालगोपाळ मंडळी अंगणामधील मातीत मनसोक्त खेळूनच घरात डोकावतात. (अर्थात तसं त्यांनी खेळलं पाहिजे हे ही तितकंच खरं) म्हणजे पावलोपावली घाण आत यायला टपलेली असते. अशा वेळी शिस्तीचा प्रेमळ धाक घालणाऱ्या ज्येष्ठांसारखं, दारात ‘पायपुसणं’ हजर असतं. किंबहुना ‘पाय पुसतो आल्यागेल्याचे, करू द्या ही चाकरी, यजमाना सुखी रहा संसारी’ हे व्रत ‘लाथा खाऊन’ निभावत असतं. घराची स्वच्छता  संभाळण्यात लक्षणीय भूमिका बजावत असतं.

खरं तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस थोडा कडक पेहराव करून जाड वायरच्या, प्लॅस्टिकच्या किंवा काथ्याच्या रूपात पसरून त्यावर चप्पल बूट घासून प्रत्येकाने आत जावे, असा पायपुसण्याचा मनोदय असतो. चप्पल बूटांना लागलेला चिखल, त्यात अडकलेली घाण, बारीक दगड आपल्यात सामावून बरीचशी स्वच्छता साधण्याचा त्याचा म्हणजे पायपुसण्याचा प्रयत्न असतो. आरोग्यसुरक्षा दिल्याचं आत्मिक समाधान मिळविण्यासाठी ते आसुरलेलं असतं. परंतु सर्वसाधारणपणे प्रत्येक मजल्यावर दोन-तीन कुटुंबे वास्तव्याला असल्यामुळे त्याच्यासाठी दाराबाहेर जागा देण्याचे त्याचे लाड पुरवले जात नाहीत. शिवाय चोराची ‘नजर’ असतेच. बंगला किंवा उच्चभ्रू वसाहतीत मात्र त्याची ही इच्छा कधी कधी सहज पुरी होते. एरवी नाईलाजाने त्याला उंबरठा ओलांडून घरात जावे लागते. तिथे त्याला वाटेत  ‘आडवे’ यावेच लागते. ‘बाहेरून येणाऱ्याने आपल्या अंगावर चप्पल बूटांचे पाय चांगले आपटावे. मग ते चप्पल बूट काढून स्टँडमधे ठेवावे आणि मग आपल्या कापडी रुपातील मऊ स्पर्शाचा अनुभव घ्यावा’, असं झालं की ‘मनासारखे झाले माझ्या’ म्हणत ते रंगून (मळून) जाते. पण.. कधीतरी घरांत येणारा घाईघाईत ‘आपल्याच नादात’, चप्पल बूट न काढताच सोफ्यावर धडकतो. रस्त्यावरची सगळी गलिच्छता घरांत डोकावते. घरभर होते. सेवा देण्याची आच, तत्परता असूनही हा निष्काळजीपणा, मनमानी, आरोग्य, निरक्षरता बघून पायपुसणे केविलवाणे होत पडून राहते. रांगणारं पिल्लू घरात असेल तर, घर स्वच्छ ठेवण्यात आपण निरुपयोगी ठरलो, याबद्दल पायपुसणे स्वत:लाच आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडते.

‘खरं तर उतणार नाही, मातणार नाही, स्वच्छता संभाळण्याचा वसा टाकणार नाही’ ही पायपुसण्याची भूमिका. ती मनापासून निभावण्यासाठी ते पायांत घुटमळत असते. घरातला त्याचा वावर कापडी स्वरूपातच असतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जसे दुसऱ्याने वापरलेले जुने कपडे मुद्दाम घातले जातात. तोच ‘नियम’ पायपुसण्याला लागू होतो. एखादा सौेंदर्यदृष्टीने, कौतुकानं चारी कडा शिवलेल्या आयताकृती कोऱ्या स्वरूपात ‘याला’ कामाला लावतो. सुरुवातीला काही दिवस पाणी टिपण्याच्या बाबतीत ‘याचा’ असहकार ठरलेला. नंतर मात्र नरमाईने आपल्या ‘ऊबदार’ सेवेला हा हजर होतो. ‘तुझी चरणसेवा’ म्हणत थकल्याभागल्या ओल्या पायांना असं टिपतो नां की ज्याचं नाव ते. प्रसाधनगृहाच्या बाहेर तर अगदी राखीव सीट. तसं स्वयंपाकघरातही हाकेला ‘ओ’ देत पायपुसणे तत्परतेने धावून जाते. पावसाळ्याच्या दिवसांत दुसऱ्यांची पावले कोरडी करण्यासाठी आधी त्याला     स्वत: कोरडे व्हावे लागते, त्या दिवसांत ते कठीण असते म्हणून यजमानाने आपल्याकडे जातीने लक्ष देऊन पायपुसण्यांच्या संख्येत वाढ करून आपल्याला बदलत ठेवावे ही त्याची माफक अपेक्षा.

स्पर्शातला खरा जादुगारच ते. घरात दुडदुडणारी पावलं असली की ते सतत कार्यरत रहाणार. खरखरीत, ओबडधोबड फरशी असण्याचे दिवस आता गेले. सगळीकडे नको इतका गुळगुळीतपणा. त्यामुळे याच्यावरची जबाबदारी आणखीन वाढली. कोणाचेही पाऊल घसरू नये, साष्टांग नमस्कार घातले जाऊ नयेत, आयुष्याच्या संध्याकाळी हाडं मोडू नयेत, ‘हाडं’ वैर साधू नये म्हणून ‘हे’ स्वत: ओले होते आणि इतरांच्या पावलांना कोरडे ठेवते. पाऊल मग ते ‘वाकडे’ असू दे किंवा निष्कारण बदनाम झालेले ‘पांढरे’ असू दे, हे स्थितप्रज्ञच. पावलांना धूळ लागू नये म्हणून जपणारी ‘शाम’ची पाऊले असोत किंवा ‘ये पाँव जमीपर मत रखिये मैले हो जायेंगे’  असं ज्या पावलांविषयी बोललं जातं ती पाऊले असू देत, ‘पाऊलवाट’ तयार करणारी पाऊले असू देत किंवा ज्या पावलांवर डोकं टेकून मुक्त होता येईल अशी संतसज्जनांची पाऊले असू देत, आपल्या मुलायम स्पर्शाने दास्यभक्तीचं व्रत अनुसरायला हे ‘पायपुसणे’ एका पायावर तयार असते. किंबहुना जाणाऱ्या येणाऱ्यांनी ‘पायधुळ’ आपल्यापाशी झाडावी हीच तर अपेक्षा. पदस्पर्शाने आपला उद्धार न होता आपली ‘जागा’ कायम रहावी आणि इमानेइतबारे ‘कार्य’ चालू रहावे हीच त्याची मनीषा. आपल्याकडे ‘घाण’ साठवून घरामधे निरामय आनंद निर्माण करणे म्हणजे जणू दुसऱ्याच्या उत्कर्षांसाठी स्वत: झिजणं, हालअपेष्टा, कुचेष्टा कमीपणा सहन करणं, हा संस्कार आपल्या आचरणातून व्यक्त करण्यासाठी पायपुसण्यासारखं निरपेक्ष, मोठं मन लागतं.

‘वरलिया रंगाला’ भूलणाऱ्या सध्याच्या काळात अनेकविध रंग, अकार, पोत याची ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन’ साधलेली आकर्षक डोअर मॅटस् ‘भाव’ खाताना दिसतात. त्याला पाय लावायचा ही कल्पनाही करवत नाही. खरं तर ‘डोअरमॅट’ पेक्षा ‘फूटमॅट’ म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं. या आधुनिक रूपापेक्षा आपल्या स्पर्शातून माया, प्रेम, जिव्हाळा, काळजी व्यक्त करणारं जुनं ‘पायपुसणं’ जणू घराचं भलं चिंतणाऱ्या ज्येष्ठाची भूमिकाच पार पाडत असतं. असं असूनही गृहलक्ष्मीचा किंवा ज्येष्ठांचा ‘पायपुसणं’ म्हणून उद्धार होतो, किंमत केली जाते त्यावेळी ‘पुसणार’ कोणाला असं वाटत रहातं.

खरं तर ‘पायपुसणं’ ही कोणत्याही वास्तूमधील, कोणत्याही वस्तूपेक्षा पहिल्यानंबरवर असलेली सर्वात आवश्यक वस्तू. म्हटलं तर घरात दडलेली किंवा बाहेरून येणारी, ‘आरोग्य तेथे वास करी’ची हमी देत ‘वास्तू’रंग खुलवणारी, मग त्याच्या योग्यतेचा विचार वास्तुनिर्मिती करताना होऊन त्याच्यासाठी ‘कायमस्वरूपी’ जागा (दरवाजाची उघडझाप सहज होईल अशी आयताकृती खाच) वास्तुरचनेत ठेवली तर ते पायांनी लाथाडलं जाणार नाही, नाही का?

सुचित्रा साठे – vasturang@expressindia.com