मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम सामोरा येणारा फर्निचर प्रकार म्हणजे शू रॅक. खरे तर रॅक म्हणजे शटररहित ओपन फळ्या असलेली स्टोरेज व्यवस्था. आधीच्या काळात अशा रॅकमध्ये चपला, बुटांची सोय केली जायची. नंतर त्या रॅकचे रूपांतर शटर असलेल्या शू स्टोरेजमध्ये झाले, पण ‘शू रॅक’ हेच नाव प्रचलित राहिले. बऱ्याच घरी शू रॅक डिझाइनसंदर्भात दुर्लक्षित राहिलेला दिसतो. मुख्य दरवाजाच्या बाहेर जर शू रॅक ठेवण्यासाठी योग्य जागा असेल व सोसायटीची परवानगी असेल तर शू रॅक घराबाहरे ठेवलेला उत्तम. पर फारच कमी जणांना ही संधी मिळते. बहुतांश घरी शू रॅक घरीच आढळतो. शू रॅकचे डिझाइन महत्त्वाचे आहे. शू रॅक अर्थातच मुख्य दरवाजाजवळच असावा जेणेकरून चप्पलांची धूळ, माती घरात पसरणार नाही.

बरेच जण इंटिरियर करूनही शू रॅक बाहेरून विकत घेतात, पण तो रेडीमेड शू रॅक लिव्हिंग रूमच्या डेकोरबरोबर मॅच होत नाही. शू रॅक हा लिव्हिंग रूमच्या फर्निचरचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याचे डिझाइन चांगले असणे गरजेचे आहे. शू रॅकची उंची दोन फुटांपर्यंत मर्यादित न ठेवता साडेतीन ते चार फूट इतकी घ्यावी. रुंदी अडीच ते तीन फूट असावी. अर्थात हे आपल्या लिव्हिंग रूमच्या लेआऊटवर अवलंबून आहे. टॉपवर काचेचा वापर करावा. टॉपवर स्टील स्टड्स लावून त्यावर काच फिक्स करता येते.  टॉपवर एखाद इंच खोल खड्डा बनवून त्यावर काट ठेवता येते. या एक इंचाच्या खड्डय़ात मार्बल किंवा ग्लास पेबल्स ठेवून आपण शू रॅकची शोभा वाढवू शकता. टॉपवर नुसतीच काट ठेवूनही चांगला लुक येतो. ग्लास टॉप शू रॅक खूप सुंदर बनवतात. शू रॅकचे बाहेरील फिनिश हे लिव्हिंग रूमच्या फिनिशला मॅच करणारे असावे. पण शू रॅकच्या आतील भागास पांढऱ्या रंगाचे लॅमिनेट लावून घ्यावे. पांढऱ्या रंगाच्या लॅमिनेटमुळे आतील भाग स्वच्छ राहतो. तसेच एखादी ओली चप्पल ठेवली तरी प्लायवुडचे लॅमिनेटमुळे रक्षण होते. चपलांचा कुबट वास येऊ नये यासाठी व्हेंटिलेशनची सोय असावी. व्हेंटिलेशनसाठी शटर्स लुव्हर्ड प्रकारची करता येतात. यासाठी कुशल सुताराची गरज आहे. हे बनवणे थोडे वेळखाऊ आहे, पण दिसायला सुंदर असते. हार्डवेअरच्या दुकानात तयार व्हेंटिलेशन पॅनल मिळतात. तेदेखील आपण वापरू शकता. शू रॅकमध्ये नेहमी एअर फ्रेशनरच्या वडय़ा ठेवाव्यात जेणेकरून कुबट वास राहत नाही.

शू रॅकच्या आतील बाजूस साधारणपणे सहा इंच उंचीचे कप्पे असावेत. शू रॅकमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या चपला, बूट ठेवावेत. खास प्रसंगासाठी वापरण्यात येणारे फूटवेअर शक्यतो शू रॅकमध्ये स्टोर करू नये. यासाठी वेगळी जागा शोधावी. बेडरूममधील वॉर्डरोबच्या स्कर्टिग ड्रॉवर्समध्ये खूप फूटवेअर ठेवता येते. या ठिकाणी खास फूटवेअर ठेवल्यास शू रॅकमध्ये गर्दी होत नाही. शू रॅकमध्ये एखादा कप्पा रद्दीसाठी राखून ठेवता येईल, जेणेकरून वर्तमानपत्राची रद्दी कुठे ठेवावी हा प्रश्न सुटेल. तसेच शू पॉलिश, शू ब्रश, व्हाइटनर अशा गोष्टींसाठीही निराळी जागा डिझाइन करता येईल.

घरातील सभासदांच्या संख्येवर शू रॅकच्या कप्प्यांची संख्या ठरते. हल्ली प्रत्येकाचे ऑफिस शूज, वॉकिंग शूज, चप्पल, स्लीपर्स असे बरेच जोड असतात. याची नोंद घेऊन शू रॅकचे डिझाइन करावे. शू रॅकच्या वरील भागात दोन ड्रॉवर्स करावेत. या ड्रॉवर्समध्ये काही गरजेच्या गोष्टी ठेवता येतील. शू रॅक टॉपवर गाडीच्या, बाईकच्या, घराच्या किल्ल्या टांगण्यासाठी सुबकसा की- स्टॅण्ड ठेवता येईल. एखादी फ्लॉवर अरेंजमेंट, इनडोअर प्लान्ट ठेवता येईल. एखाद्दुसरी फोटोफ्रेम किंवा छोटासा आर्टइफेक्ट ठेवता येईल. अर्थातच हे सगळे एकत्र ठेवण्याची गरज नाही. यातील आपल्या आवडीनुसार मोजक्याच गोष्टी कलात्मकरीत्या मांडाव्यात.

एकंदरीत शू रॅक हा सुंदर दिसला पाहिजे व आपल्या इंटिरियरला मॅच झाला पाहिजे. घरी प्रवेश केल्यावर शू रॅक हे पहिले फर्निचर असल्यामुळे चांगले डिझाइन खूप गरजेचे आहे.

(इंटिरियर डिझाइनर)

अजित सावंत ajitsawantdesigns@gmail.com

Story img Loader