निसर्गालाच परमेश्वर मानणारे आपले पूर्वज जेव्हढे निसर्गाकडून घेत होते तेव्हढेच कृतज्ञतेने त्याची परतफेड करत होते. आता ही कृतज्ञतेची जाणीवच राहिलेली नाही. सध्या सर्वत्र निसर्गाला ओरबाडणंच चाललंय. त्यामुळे निसर्गाची देण्याची क्षमताच आता संपत चालली आहे. ‘करण ग्रोव्हर’ यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणानुसार हरित इमारतीची उभारणीच हा ऱ्हास थांबवू शकेल. त्याच्या बरोबरीने निसर्गाच्या आक्रोशाची दखल घेऊन आता ‘ग्रीन सिटी’, ‘ग्रीन टाऊनशिप’ उभारणे ही काळाची गरज प्राधान्यावर अमलात आणली जावी. ५ जून या पर्यावरण दिनानिमित्त..
विविध भौगोलिक प्रदेशाच्या भारतभूमीचा सखोल अभ्यास करून त्यानुसार परिसरातील उपलब्ध साधनसामुग्रीप्रमाणे स्थानिक निसर्गाशी सुसंगत वास्तू निर्माण करणाऱ्या विख्यात वास्तुविशारदकांचा सर्वत्र नावलौकिक आहे. निसर्गाचे मोठेपण मान्य करत त्याच्याशी सुसंगत त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू म्हणजे कायमस्वरूपी ‘लँडमार्क’ आहेत. अशा वास्तू निर्माण करणाऱ्या शिलेदारांच्या पलटणीत लॉरी बेकर, बाळकृष्ण दोशी, चार्लस कोरिया, अनंत राजे, फिरोज रानडे, अच्युत कानविंदे, कार्बुझिए या नामावलीत करण ग्रोवर यांनाही मानाचे स्थान आहे. कारण आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वास्तुरचनाकाराबरोबर ग्रीन बिल्डिंगचे प्रणेते म्हणून त्यांची नाममुद्रा सर्वत्र आहे.
आपल्या अजोड कल्पकता- कर्तृत्वाने वास्तुरचनाकार म्हणून मान्यता मिळवताना करण ग्रोवर यांनी आधुनिक सुविधायुक्त घरांची निर्मिती करताना सभोवतालचा निसर्ग, भौगोलिक स्थिती आणि परिक्षेत्रातील उपलब्ध साधनसामुग्री केंद्रस्थानी ठेवल्याने एक पर्यावरणप्रेमी वास्तुविशारद म्हणून देश-परदेशात ते ओळखले जातात. आवड आणि कृती यांची सांगड घालण्यासाठी ग्रोव्हर यांनी आपल्या कार्यालयाची इमारत निसर्ग हिरवाईत निर्माण करून जोडीला जलचर-उभयचर प्राण्यांच्या सहवासाची जोडही दिली.
आपल्याकडील प्राचीन गृहरचना पर्यावरण संतुलन सांभाळणारी, मुबलक हवा- प्रकाश उपलब्ध असणारी तसेच सभोवतालच्या भौगोलिक वातावरणाशी सुसंगत अशी निर्माण केली गेली. त्यामुळे घराचे वातावरण निसर्गाचा समतोल राखणारे असल्याने त्या घरातील माणसांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर अनुकूल परिणाम साधणारा असा असायचा. हे सूत्र करण ग्रोवर यांनी प्रत्येक वास्तूचा आराखडा तयार करताना अमलात आणलाय. प्रत्येक प्रदेशाचा स्थानिक हवामानाचा विचार वास्तुनिर्मितीत होतच असतो. उदा : राजस्थानात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने घराचे छत सपाट, तर केरळ, कर्नाटक, कोकण प्रदेशात भरपूर पाऊस असल्यानी पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी तिरप्या छताची योजना केली जाते. अतिउष्ण प्रदेशात हवा प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी खिडक्यांवर सज्जे असून नक्षीकामाचे झरोके आढळतात.
ग्रोवर यांच्या म्हणण्याप्रमाणे, आज आपण दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असल्यानी नवीन गृहरचना साकारताना सभोवतालची भौगोलिक स्थिती, वातावरणाचा विचारच करताना दिसत नाही. आज प्रत्येक विकासक आपल्या नियोजित गृहसंकुलाची आकर्षक जाहिरात करताना त्याला ‘ग्रीन हाऊस’ हे विशेषण जोडतोय खरा. पण या ग्रीन हाऊस उभारणीसाठी उपरोक्त सूत्र – घटकांचा विचार केला गेलाय का? याबाबत ग्राहकवर्गाचा अभ्यास कमी पडतोय. कारण आकर्षक जाहिरातीबरोबर सवलतीचा भूलभुलैया यांचा प्रभाव ग्राहकांवर जास्त आहे.
पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यातून आपल्या समाजाच्या गुलामगिरीवर प्रकाशझोत टाकताना करण ग्रोवर म्हणताहेत की नियोजित वास्तू उभारणीत निसर्ग, भौगोलिक परिस्थितीबरोबर ग्राहकांनी आपल्या गरजादेखील अग्रक्रमाने विचारात घ्याव्यात. आपल्या पूर्वजांनी याचा विचार करूनच कायमस्वरूपी टिकणाऱ्या वास्तू उभारल्यात.. ब्रिटिश प्रशासनकाळात स्थापत्यकलेला शास्त्रीय जोड लाभली हे मान्य. नियोजित वास्तू बांधकाम करताना गरजेनुसार त्यांचे शेकडो नकाशे जमिनीची चाचणी एकूण खर्चाच्या अंदाजासह काम हाती घेण्यात येण्याची पद्धती सुरू झाली. बांधकामाच्या दृष्टिकोनातही बदल झाला. मात्र हे स्थित्यंतर होताना निसर्गाशी सुसंगत भारतीय प्रादेशिक वैशिष्टय़ाच्या कलापूर्ण बांधकामाची जी वाढ व्हायला हवी होती ती झाली नाही. कारण पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना भारतीय स्थापत्यकलेची सांधेजोड कधी झालीच नाही. कर्मठ इस्लामी वास्तुकलेवर त्यांचा प्रभाव जाणवत नाही. पूर्वी भारतीय वास्तू कलाकृतीत संगमरवर व काचेचा वापर क्वचितच होत असे. आता मात्र दोन्ही घटकांचा प्रभाव- वैभव दाखवण्यासाठी सर्रास केला जातोय. स्थानिक बांधकाम साहित्याकडे विकासकांचे दुर्लक्षच होत आहे.
आज शहरी जीवनाचा विकास साधताना परिसर भकास होतोय. हे आपण सर्वत्र अनुभवतोय. त्याचे मानवी जीवनावर प्रदूषणासारखे घातक परिणाम होताहेत. शहरवासीयांना निसर्गाची ओढ असणं स्वाभाविक आहे. त्यांतून त्यांचा हरित इमारती (ग्रीन बिल्डिंग) कडे ओढा वाढतोय. पण त्यांची संकल्पना ग्राहक वर्गात रुजलेली नसल्याने ग्रोवर यांच्या म्हणण्यानुसार, सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीशी, नैसर्गिक स्रोताचा जास्तीत जास्त उपयोग नियोजित बांधकामात व्हावा हे अभिप्रेत आहे. त्यासाठी विटांऐवजी त्या भूभागातील चिकणमाती आणि सिमेंट यांचे मिश्रणयुक्त विटा तयार करणे अपेक्षित आहे. हवा – प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर व्हावा. तसेच उभारलेल्या इमारतीला वातावरणाशी सुसंगत रंगरंगोटी हवी. या व्यतिरिक्त रेनहार्वेस्टिंग, सांडपाण्याचा वापर, घन – द्रव कचरा व्यवस्थापनाचा विचार हरित गृहरचनेसाठी प्राधान्यावर होणे गरजेचे आहे.
नैसर्गिक वातावरणातील शेतघर उभारताना (फार्म हाऊस) त्यासाठी फ्रेंच विंडोजचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय. या बाबतीत आपलं अभ्यासपूर्ण मत नोंदवताना ग्रोवर यांनी म्हटलंय की, वास्तुभोवती चौफेर फ्रेंच विंडोजचा वापर हे ग्रीन हाऊसच्या मूळ उद्देशाशी विसंगत आहे. त्यांनी प्रखर प्रकाशाबरोबर हवा खेळती राहाते काय? उभारलेली वास्तू सुसज्जपणासह आधुनिक आहे हे दाखवण्याचा त्यापाठीमागे प्रयास आहे. माझ्या मते ग्रीन बिल्डिंगमध्ये ४० टक्केच काचेचा वापर असावा. कारण आपल्याकडे अद्याप सूर्यप्रकाश किरणोत्सर्गातून काचेतून उष्णता अधिक जाणवते. मग घरात गारवा राहाण्यासाठी वातानुकूल यंत्राचा वापर केला जातोय. या यंत्रातून बाहेर हवेमुळे सभोवतालचे तापमान वाढतंय.
निसर्गालाच परमेश्वर मानणारे आपले पूर्वज जेवढे निसर्गाकडून घेत होते तेव्हढेच कृतज्ञतेने त्याची परतफेड करत होते. आता या कृतज्ञतेची जाणीवच राहिलेली नाही. सध्या सर्वत्र निसर्गाला ओरबाडणंच चाललंय. त्यामुळे निसर्गाची देण्याची क्षमताच आता संपत चालली आहे. ग्रोवर यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणानुसार ग्रीन बिल्डिंग उभारण्याची महत्त्वपूर्ण भूमिकाच हा ऱ्हास थांबवू शकेल असा त्यांना विश्वास वाटतोय. त्याबरोबरीने निसर्गाच्या आक्रोशाची दखल घेऊन आता ग्रीनसिटी, ग्रीन टाऊनशिप उभारणे ही काळाची गरज प्राधान्यावर अमलात आणली जावी.
प्राचीन संस्कृतीच्या भारतात पर्यावरण संतुलनयुक्त गृहरचनेला खूप वाव आहे. पण नुसत्या चर्चा, परिसंवाद, कृतिसत्राचे आयोजन करून हरित गृह वास्तुरचना उभारण्याला यश येणार नाही. त्यासाठी हवी ती प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक निर्णयशक्ती. इतकेच नव्हे तर भवितव्यात निर्माण होणाऱ्या इमारती या हरित वास्तू उभारण्याची सक्ती करणे जरूरीचे आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी.
गेले सुमारे २५ वर्षे देशविदेशात वास्तुरचनाकार म्हणून नावलौकिक मिळवलेले करण ग्रोवर यांची सारी कारकीर्द सभोवतालच्या निसर्गसुसंगत देखण्या वास्तू उभारण्यात गेली आहे. त्यांनी बजावलेल्या अद्वितीय कामाची दखल घेऊन वॉशिंग्टनच्या अशोका प्रतिष्ठानने त्याचा यथोचित गौरव केला आहे. तसेच अमेरिकेच्या हरित गृहरचना परिषदेचा ऊर्जा नेतृत्व व पर्यावरणपूरक संरचनेचाही मानाचा पुरस्कार त्यांना लाभलाय.
इमारतीची आदर्श निर्मिती करताना सतत निसर्गराजाचे ऋ ण मानणाऱ्या करण ग्रोवर यांची सारी कारकीर्द म्हणजे हरित गृहरचना करण्याचे ध्यासपर्व आहे. या क्षेत्रात काम करताना वैचित्र्याच्या भूमीबरोबर हवामानासह सभोवतालचा सर्वश्रेष्ठ निसर्ग नजरेसमोर ठेवून नवनिर्मिती करायची हेही निश्चित केले होते. परंतु दुर्दैवाने आज या उपरोक्त घटकांचा विचार न करता या पाश्चिमात्यांचे अंधानुकरणासह दिखाऊपणाच नवीन इमारती उभारणीत दिसतोय. यातून पर्यावरणयुक्त, सुखकारक गृहरचना कशी निर्माण होणार?
भारतभूमीशी एकनिष्ठ असलेल्या करण ग्रोवर यांची देवभूमीवर मेहरनजर आहे. केरळमधील पारंपारिक लोकजीवनासह तेथील वास्तुशैलीवर ते कामयचे आकृष्ट झाले. केरळातील वास्तुनिर्मितीत जमीन, हवामानासह कृपांवत निसर्गाचं अनोखं दर्शन घडतंय हे त्यापाठीमागे कारण आहे. येथील वास्तूमधून त्या प्रदेशाची संस्कृती, जीवन शैलीचे अनोखे दर्शन घडते. १०० टक्के साक्षरतेबरोबर सभोवतालच्या निसर्गाचं मोल जाणण्याचा कृतज्ञताभाव येथील लोकांच्या ठायी आहे. धर्माचं अधिष्ठान असलेल्या केरळवासीयांनी निसर्गराजालाच परमेश्वर मानलंय हेही त्यापाठीमागे कारण आहे.
या त्यांच्या इच्छेतून त्यांची निसर्ग ओढ आणि कृतज्ञता भावही जाणवतो.
vasturang@expressindia.com
(समाप्त)