आयुर्वेदात तसेच पूजा साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तुळशीबद्दल आपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येकालाच जिव्हाळा वाटत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याकडे कुंडीत तुळशीचे रोपटे असावे. त्याप्रमाणे खूप जण हे रोपटे लावतातही. पण अनेक वेळा तुळस नीट वाढत नाही किंवा वाळून जाते किंवा अन्य काही अडचणी येतात. आजच्या लेखातून आपण तुळशीची लागवड व निगा याविषयी माहिती घेऊ या.
लागवड : तुळशीचे रोप पिशवीतून कुंडीत नीट लावून घ्यावे. याची कुंडी तयार करताना माती व सेंद्रिय खत याचे मिश्रण तयार करून कुंडी भरावी. यामध्ये थोडय़ा प्रमाणात कोकोपिटचा वापरही करता येऊ शकतो. मध्यम आकाराच्या कुंडीत तुळशीची लागवड करावी. तुळशीच्या झाडाला जास्तीत जास्त उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. दिवसातून ३ ते ४ तास किंवा जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळू शकला तर तुळशीची वाढ चांगली होते.
पाणी : तुळशीला पाणी घालताना काळजीपूर्वक घालावे. कुंडीच्या आकाराच्या मानाने पाण्याचे प्रमाण ठरवावे. कुंडीतील मातीत चिखल होईल एवढे पाणी घालू नये. वरची माती थोडी सुकल्या सारखी दिसली तरी चालते, पण जास्त पाण्याने तुळशीची वाढ नीट होत नाही. पाणी जास्त झाले तर तुळशीच्या चांगल्या वाढीवर परिणाम होताना दिसून येतो. कधी कधी जास्त पाण्यामुळे तुळशीची पाने पिवळी पडू लागतात.
छाटणी : तुळशीची थोडी वाढ झाल्यावर जर छाटणी केली तर जास्त फांद्या फुटून रोपटे हळूहळू भरदार दिसायला लागते. त्यामुळे झाडाची वाढ बघून योग्य त्या फांद्यांची छाटणी करावी. सुरुवातीची छाटणी म्हणजे सरळ वाढणाऱ्या रोपाचा शेंडय़ाकडील भाग कापणे. छाटणी केल्यामुळे नवीन फांद्या व पानांची संख्या वाढते व झाडाची उंची मर्यादित राहते. तुळशीला फुले आल्यानंतर तिच्या फांद्या अधिक जून होतात. तसेच झाडाची वाढही थोडी मंदावते. कारण झाडातील सर्व अन्नघटक बी बनण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे काही वेळेला तुळशीच्या फुलांचे तुरे लहान असताना काढून टाकण्याची पद्धत वापरली जाते. असे केल्यामुळे नवीन पानांची वाढ जोमात होते व झाड बरेच दिवस हिरवेगार राहते. जर तुळशीचे बी गोळा करायचे असेल तर फुलांचे तुरे लागायला लागल्यानंतर छाटणी करून नये.
खत व खुरपणी : तुळशीच्या कुंडीत वर्षांतून २ ते ३ वेळा थोडे थोडे सेंद्रिय खत मिसळावे. हे करताना वरची २ इंच माती सैल करून घ्यावी. त्यातील थोडी माती काढून त्यात सेंद्रिय खत घालून मातीत ते नीट मिसळून घ्यावे. खत घातल्यानंतर पाणी घालावे. कुंडीच्या आकाराच्या मानाने खत घालावे. जर कुंडीतील माती कडक झालेली दिसत असेल तर खुरपणी करून ही माती सैल करून घ्यावी.
रोग व कीड : सर्वसामान्यपणे तुळशीवर रोग व कीड यांचा प्रादुर्भाव फारसा दिसून येत नाही. पण जर ही झाडे सावलीच्या किंवा कमी उजेडाच्या ठिकाणी ठेवली तर या झाडांवर हळूहळू कीड व रोग दिसू लागतात आणि झाडांच्या वाढीवर या सर्वाचा परिणाम दिसू लागतो व कधी कधी पानांचा आकार थोडा लहान होतो. तुळस हे कडक सूर्यप्रकाशात वाढणारे झाड असल्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे दिवसाचे निदान ३ ते ४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी तुळशीची कुंडी ठेवावी.
तुळशीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
राम तुळस : हिरव्या पानांची ही तुळस सर्वाच्या परिचयाची आहे.
कृष्ण तुळस : या तुळशीची पाने कडक सूर्यप्रकाशात जांभळट-काळपट रंगाची होतात, पण सावलीत याची पाने थोडी हिरवट छटा असलेली राहतात.
कापूर तुळस : तुळशीच्या सर्वसामान्य पानांसारखेच पण थोडे टोकदार पान असलेली ही तुळस आहे. नावाप्रमाणे याच्या पानांना कापरासारखा सुवास असतो.
बॅसिल तुळस : पानांचा आकार सर्वसामान्य तुळशीसारखाच असतो. याच्या फुलांचे तुरे थोडे जास्त जांभळट दिसतात.
लेमन तुळस : या तुळशीच्या पानांना लिंबासारखा सुवास येतो म्हणून याला लेमन तुळस म्हणतात.
वैजयंती तुळस : याचे पान सर्वसामान्य तुळशीच्या पानापेक्षा थोडे मोठे रुंद व जास्त टोकदार असते.
कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावताना माती व खताचे योग्य प्रमाण, नंतरची निगा, आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन या सर्व बाबींचा नीट अवलंब करून तुळशीचे रोप छान वाढवता येते.
जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in