झाडं लावणं, शेती करणं आपल्यापुरता घरच्या घरी भाजीपाला तयार करणं यात लपलेल्या आनंदाचं गणित एकदा आपल्याला कळलं की मग नवे प्रयोग आपोआपच होऊ लागतील आणि निसर्गाची ही आनंदाची लिपी सर्वाना सहज वाचता येईल.
कमळाच्या छोटय़ा तळ्याजवळ बसून हा लेख लिहिताना मला खरंच मनापासून समाधान वाटतंय. आजूबाजूला पडलेल्या कडक उन्हातही मी शांतपणे फुलांच्या संगतीत, झाडांच्या सावलीत अगदी थंड वातावरणात किती आनंदाने लिहीत बसलेय. आणि हे सगळं मुंबईसारख्या एका गजबजलेल्या शहरातील उपनगराच्या इमारतीच्या गच्चीवर घडतंय.ही माझी छोटीशी बाग. स्वत:च्या कल्पनेतून साकारलेल्या या बागेने मला खूप समाधान, आनंद आणि विरंगुळा दिला. बागेत मी भरपूर फुलझाडं लावली आहेत. भाजीपाला पिकवतेय, पण यातली खरी मजा म्हणजे- इथे चक्ककमळं आणि कमळाच्या कुळातील वनस्पती आहेत.
कमळं तशी फार सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. गंमत म्हणजे खरं कमळ तरी कुठं आपल्याला ओळखता येतं. देवळाबाहेर विकायला असलेल्या किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, गणेश चतुर्थीला विकली जाणारी फुलं म्हणजे कमळं नाहीतच, ती असतात पोसरं. ही फुलंही कमळवर्गीयच, पण कमळं नव्हेत.
असं म्हणतात, निसर्ग आपल्याला शिकवतो, शहाणं करतो. या बागेची उभारणी करताना अक्षरश: सगळे धडे मी याच गुरूकडून घेतलेत. खूप अडचणी आल्या, भरपूर प्रश्न पडले. पुष्कळ चुकाही झाल्या, पण चिकाटी, संयम आणि निरीक्षण मात्र यातूनच अंगात मुरलं.
आमच्या सोसायटीला असलेली मोठी गच्ची- जी बरोबर आमच्याच घरावर होती. तिथे जायला पूर्वी जिनाच नव्हता. पण एक लोखंडी जिना करून घेतल्यावर इथे झाडं लावायची असं मी ठरवलं. शहरी शेतीचे वर्ग केल्यावर भले थोरले विटांचे वाफे करून शेती करण्याचा एक प्रयोग केला, पण तो फसला. दरम्यान एकदा आळंदीला गेले असताना डुडुळ गावचे सतीश गदिया यांची कमळ बाग पाहिली आणि कमळाची बाग करायचं नक्की केलं.
काही दिवसांनी त्यांच्याकडून दोन रोपं मिळाली. ती होती कमलिनीची. एकाचा रंग होता पिवळा तर दुसरं गुलाबी. एका छोटय़ा मातीच्या सुरेख नक्षीदार भांडय़ात शेणखत आणि मातीचा काला करून मी ही दोन्ही रोपं लावली. याला कधी एकदा फुलं येतील असं मला झालं होतं. गदियांच्या बागेतल्या याच रंगांच्या फुलांचं गारुड माझ्या मनावर होतं. पाच- सहा दिवस असेच गेले. मी रोपांना ताजं पाणी देत होते, लक्ष ठेवत होते, पण पानं काही वाढत नव्हती. शेवाळ मात्र भरपूर वाढलं होतं. पानांच्या कडाही अगदी शेवाळून गेल्या होत्या. काय करावं म्हणून शोधाशोध केली. नेटवर माहिती मिळवली. त्यातून एक-दोन औषधांची माहिती मिळाली. पण मला रासायनिक औषधं वापरायची नव्हती. मग हाताने रोज शेवाळ बाहेर काढून टाकण्याचा सपाटा लावला. ही युक्ती मात्र मानवली. शेवाळाचं प्रमाण कमी झालं आणि पानांची वाढ व्हायला लागली. दरम्यान, एका पुष्प प्रदर्शनातून मी मोठी गोलाकार कुंड घेऊन आले. दोन्ही रोपं त्या मोकळ्याढाकळ्या कुंडात नव्याने लावली. आता नक्की फुलं येतील या आशेवर मी होते. पण एक दिवस पाहते तो रोपांची अर्धी अधिक पानं कुरतडलेली. देठांचे भुंडे फरांटे तेवढे शिल्लक होते. आता ही कुठली नवीन समस्या आणखी, म्हणून पानं खाली-वर करून बघितली तर अख्खा वेलच काळ्या ठिपक्यांनी भरून गेलेला. हा प्रताप होता पाण गोगलगाईंचा, त्यांनी माझ्या रोपांवर यथेच्छ ताव मारला होता. रागारागाने मी त्या वेचून काढून टाकल्या आणि पुढे काही दिवस नेमाने तेच करत गेले. निसर्गाच्या शाळेत आत्ता कुठे मी प्रवेश घेतला होता. इथली प्रत्येक गोष्ट ही सहेतुक असते हे अजून मला कळायचं होतं.
निवडून बाहेर काढलेल्या गोगलगाई मी एका कंपोस्ट करायला ठेवलेल्या टबात टाकत होते. एक दिवस सकाळी एक शिंपीण आपल्या चोचीने कंपोस्टमधून काहीतरी निवडीत होती. आपली इवली शेपटी हलवत जेव्हा ती उडाली तेव्हा मघापासून तारेवर बसलेला लालबुडय़ा बुलबुल खाली आला आणि तोही काहीतरी तिथेच शोधू लागला. एरवी चुकूनही या पक्ष्यांचे पाय गच्चीवर ठरत नसत, ती ही मंडळी आता रोज यायला लागली. येता-जाता पाण्यात डुबक्या मारायला लागली.
एक नवा अध्याय सुरू झाला होता. वसंतात सोनचाफा बहरला. हिरव्यागार पानांनी नटला. मागच्या वर्षी लावलेल्या या देखण्या झाडाला या वर्षी कळ्यांचा बहर आला. एक दिवस सकाळी त्यावर चाललेली सुभगाची लगबग मी पाहिली. इवलासा हिरवा पक्षी आणि त्याची केवढी धांदल. दोन सुभगांची ती पाना-फांद्यांवरील पळापळ मनोरंजक वाटत होती. मी अगदी खिळून राहिले. पक्षी निरीक्षणासाठी लांबवर जायची गरजच उरली नव्हती. मी त्यांचं भरपूर निरीक्षण करून घेतलं. इकडे कमळ कुंडात वेगळंच नाटय़ रंगलं होतं. मधमाशांनी कुंडाचे काठ गच्च भरून गेले होते. काही तर बिचाऱ्या तोल जाऊन कुंडात पडल्या होत्या. वॉटर लिलीच्या पानांवर विसावून त्या पाणी पीत होत्या. त्यांच्या इवल्या पंखांची मोहक फडफड, त्यांची लयबद्ध हालचाल निरखणं यासारखा आनंद उरला नाही. पाण्यात गप्पी मासे सोडले होते. आता त्यांची संख्या वाढली होती. एकुणात माझ्या गच्चीवर कुंडात एक सुरेख जल परिसंस्था विकसित होत होती.
काही दिवसांतच वॉटर लिलीला सुरेख नाजूक फूल आलं, अगदी गदियांच्या बागेतल्या फुलाइतकं देखणं.
तो क्षण खूप सुंदर होता. उन्हाबरोबर हळूहळू ते विकसित होत होतं. तोवर छोटे भुंगेवर्गीय कीटक तिथे गोळा झालेच. आता माझा हा एक प्रयोग यशस्वी झाल्यावर मी अजून काही वॉटर लिलीच्या जाती जमवल्या. मग खऱ्या कमळाचे गड्डे लावले. बियांपासून रोपं तयार करण्याचे प्रयोग केले. तेही यशस्वी झाले.
हळूहळू बाग वाढत होती. आठ मोठी कुंडं, चौदा रंगाच्या वॉटर लिली आणि तीन रंगांची कमळं; शिवाय सोनचाफा, मोगरा, गुलाब, जाई, जास्वंद अशी फुलझाडं तर पाती चहा, बेल, तुळस, पानवेल, भुई आवळा अशा औषधीइतका पारा वाढला. त्या जोडीला पॅशन फ्रूट, पेरू ही फळझाडं होतीच. फुलांची संख्या आता चांगलीच वाढली होती. कमळवर्गीय फुलंच रोज वीसएक इतकी उमलत होती. जोडीला पिटूनिया डायनथस होतीच.
आता पुन्हा एकदा भाजी लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रताळी लावली होती. ती बऱ्यापैकी तयार झाली.
मग कोबी आणि मटार लावला. रीतसर बिया पेरून रोपं तयार केली. गच्चीवर माती वाहून नेणं नेहमीच जिकीरीचं होतं. मग सोसायटीतला वाळलेला पालापाचोळा जमा करून त्याने कुंडी भरली. वर थोडं शेणखत आणि गांडूळ खत टाकलं, उरलेली जागा कोकोपीटने भरली आणि दिल्या बिया लावून. आठ दिवसांत इवली हिरवळ उगवली. हळूहळू रोपं वाढत होती. खूप दाटली होती. मग त्यांना वेगळं केलं. स्वतंत्रपणे लावलं. काही दिवसांतच रोपं वाढीला लागली. मटाराला फुलं आली आणि कोबीची पानं तरारली. ती तरारलेली बाग म्हणजे माझ्या सुखाचा ठेवा होता. शनिवार-रविवारी आणि सुटीच्या दिवशी मी रोज पिवळ्या वॉटरलिलीच्या कुंडाजवळ बसत असे. कुंडावर गच्चीला टेकलेल्या सोनमोहराची गार सावली पडे. तिथे बसणं मला आवडू लागलं. अगदी उन चढेपर्यंत म्हणजे, बारा-साडेबारापर्यंत मला तिथे बसता येई. सकाळी लवकर उठून मी दुर्बीण, लेखन साहित्य घेऊन गच्चीवर बसे. सकाळी भरपूर पक्षी पाहायला मिळत. कुंडातल्या संथ पाण्यात माशांची लगबग पाहता येई. बदामाच्या झाडावर पोपट कर्कश ओरडत. त्यांचे हिरवे तुकतुकीत रंग आणि लालभडक वाकडय़ा चोची मोठय़ा मोहक दिसत. दुर्बिणीतून त्यांना छान न्याहाळता येत असे. उंबराच्या झाडावर रात्रभर आवाज करून थकलेली वटवाघळं उलटी लटकलेली असत. त्यातली काही सकाळी कोवळ्या उन्हात उंबरांची न्याहारी करत. एका पंजाने फांदी पकडून एका हाताने पिकी फळ खाताना त्यांची होणारी धावपळ पाहायला मजेदार वाटे.
कोवळ्या सकाळी बुलबुल, हळद्या, तांबट, नाचणं अशा छोटय़ा पक्ष्यांचा वावर असे. थोडी उन्ह आली की मात्र कावळे आणि कबुतरांची वर्दळ सुरू होई. कबुतरांचा कल पाणी पिण्यापेक्षा झाडांची नासाडी करण्याकडे अधिक होता.
हिवाळ्यात कमळाचे कंद शीत निद्रा घेतात. यावेळी कमळाला तुरळक पानं असतात. फुलांचा तर पत्ताच नसतो. कमळाची ती रया गेलेली तळी खरं तरं मला मुळीच बघवत नव्हती. पण निसर्ग हा द्रष्टा नाटककारच असतो. एका सकाळी त्या फिकुटलेल्या पानांवर सुरवंटाची जोडी मजेत पहुडलेली दिसली. हिरव्या मखमली रंगाच्या त्या गबदुल अळीने अर्धीअधिक पानं खाऊन संपवली होती. रागाने त्याला काढू गेले तर केवढे बारीक काटे बोचले, शिवाय कोपरापर्यंत हात लाल झाला. त्या जळजळीच्या अनुभवाने मात्र पुन्हा मी त्याच्या वाटेस गेले नाही. यथाअवकाश त्या दोन बकासुरांनी उरली-सुरली पानं खाऊन संपवली.
वेळीच काही उपाय करायला हवा होता. याची टोचणी मनाला लागून मी निराश होते. वॉटर लिलीची फुलंही मंदावली होती. पण अधिकच्या थंडीने पिटूनिया डायांथस आणि शेवंती बहरली होती. कोबीचे गड्डे भरायला लागले होते. मटाराला पिवळी पांढरी नाजूक फुलं धरली होती. एकंदर थंडी मानवणारी आणि न मानवणारी झाडं असे दोन तटच पडले होते बागेत. एका शनिवारी गच्चीवर गेले तर एका कुंडावर माशांच्या आशेने बसलेला पॉड हेरॉन दिसला. हा तर पाणथळीचा रहिवासी. इकडे कसा वाट चुकला म्हणून दुर्बीण डोळ्याला लावली आणि मनसोक्त निरीक्षण करून घेतलं. बागेतला हा नवा पाहुणा काही नवे संकेत देत होता. एक-दोन दिवसांनी या हेरॉन साहेबांनी गच्चीच्या उंचीएवढय़ा दुसऱ्या औदुंबराच्या झाडावर मुक्काम हलवला होता. रोज नियमाने तो तिथे येई. ध्यानस्त बसल्यासारखा अगदी निश्चल बसे. आजूबाजूला असंख्य चतुर उडत, पण याची अगदी चाहूलसुद्धा त्यांना नसे. चतुर थोडे अधिक निर्ढावले की मात्र हा संधी साधून त्यांच्यावर झडप घाली. एकावेळी आठ-दहा जणांना टिपून मगच तो त्यांना एकदम गिळत असे. साधारण दहा वाजेपर्यंत हेरॉनसाहेबांचा हा चतुर नाष्टा चाले. मग स्वारी उडून जाई.
हिवाळ्यात बागेच्या वाढीच्या अवस्था निरखताना अशी निसर्गातली छोटी-छोटी रहस्यं सहज उलगडत होती. थंडी सरेतोवर मटाराला भरपूर शेंगा धरल्या. दोन-चार वेळा काढून सुद्धा बियांसाठी काही राखताही आल्या. कोबीचे हिरवे गड्डे टणक झाले आणि चार-सहांची भाजीही झाली. पालकाचे परोठे तर बहुतेक वेळेला होत होते. कढीपत्ता, पालक, पुदिना ताजा तोडून भाजीसाठी वापरण्यातली मजाच काही और होती. हळूहळू हवेतला गारवा सरला. बागेला सकाळ-संध्याकाळ पाणी लागू लागलं. कोबी तर जराशा उन्हानेही कोळपू लागला. पण जुन्या कापलेल्या गड्डय़ांखाली नवीन फुट जोमदारपणे वाढत होती.
कमळ आणि वॉटर लिलींना उन अगदी मानवलं होतं. भरपूर फूट फुटून चिक्कार कळ्यांनी सगळी कुंडं भरून गेली होती. दरम्यान इवल्या चांदण्यांच्या आकाराच्या दोन वॉटर लिली मी लावल्या. कास पठारावर आढळणारी कुमुदिनी एका कुंडात लावली. या कुमुदिनीला येणारी नाजूक झालरींची पांढरी फुलं म्हणजे बागेचं मुख्य आकर्षण ठरलं होतं.
चैत्रात पुन्हा सोनचाफा बहरला. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कळ्यांचा बहर अधिक होता. सोनमोहराला फुलांचे पिवळे घोस लगडले. बागेला आता नवीन वसंताचं रूप आलं. आता उन्हाळी भाज्या लावायच्या होत्या. पण गच्चीवर बागेत जेव्हा झाडांची संख्या वाढवायची असते तेव्हा नेहमी वजनाचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. यापूर्वी मी मातीला पर्याय म्हणून वाळलेला पालापाचोळा वापरला होता. थोडं सुकं शेणखत आणि कोकोपीटचा वापर केला होता. यामुळे गच्चीवर माती वाहून आणण्याचे कष्ट वाचत होते. शिवाय पाचोळा खताचं काम करत होता. कोकोपीट एखाद्या लादीच्या स्वरूपात मिळतं ती लादी एकदा आणून पुरेशा पाण्यात भिजवली की पाच-सहा कुंडय़ा भरता येतात. कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंडय़ांचा भुगा. त्याला वजन नसतं. खतं म्हणून आणि कीडनाशक म्हणून गोमूत्रमिश्रित पाणी वापरलं होतं. त्याचा अनुभव गाठीशी होताच. पण पॉन्ड हेरॉनच्या येण्यानंतर कमळाच्या कुंडात अचानकपणे एक हिरवी वनस्पती वाढू लागली होती. ती होती अझोला. अझोला ही खर तर नेचेवर्गीय वनस्पती. हिचा वापर पशुखाद्य म्हणून करतात. नायट्रोजन फिक्सिंग करणारी ही वनस्पती मी उन्हाळी भाजीसाठी खत म्हणून वापरली. झाडांना त्याचा फायदा झाला. आता या वनस्पतीचा आणखी कसा उपयोग करता येईल त्याचे प्रयोग मी करतेय.
याव्यतिरिक्त कमी खर्चात, उपलब्ध निरुपयोगी टाकाऊ गोष्टी वापरून रोजच्या भाजीसाठी फळभाज्या, पालेभाज्या कशा पिकवता येतील यावर प्रयोग करतेय. अनेक गोष्टी करायच्या आहेत. पुढच्या वर्षी स्टॉबेरी लावून पहाणार आहे. टय़ुलिपचे कंद लावणार आहे.
या सगळ्या प्रयत्नांतून जर चांगलं उत्पन्न घेता आलं तर अनेकांना घरी भाज्या पिकवता येतील. घराच्या घरी ताजं सकस अन्न उपलब्ध होईल. झाडं लावणं, शेती करणं आपल्यापुरता घरच्या घरी भाजीपाला तयार करणं यात लपलेल्या आनंदाचं गणित एकदा आपल्याला कळलं की मग नवे प्रयोग आपोआपच होऊ लागतील आणि निसर्गाची ही आनंदाची लिपी सर्वाना सहज वाचता येईल.
मैत्रेयी केळकर mythreye.kjkelkar@gmail.com