कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे. भाविक- पर्यटक व अभ्यासकांचे ते आकर्षण आहे. पण पडझड होत चाललेल्या या काष्ठशिल्पाधारी मंदिरांची आजची अवस्था पाहून मन खंतावते. पुरातन मंदिराच्या नवीन बांधणी, नूतनीकरणाच्या नावाखाली निर्माण होत ही मंदिरे नवीन चेहरा घेऊन उभारली जात आहेत. त्यात आकर्षकतेसह स्वयंपूर्ण सुसज्जपणाही असेल, पण आमच्या पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेली पारंपरिक कलाकृती नामशेष होत चालली आहे. हे थांबायलाच हवे नाहीतर आधुनिक मार्बलयुक्त, चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरावर देवदुर्लभ काष्ठशिल्पाकृती होती हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा नसणार.
भारत देशातील शिल्प वैभवात लेणी शिल्पकला संख्येने जास्त व अग्रेसर असली तरी वेगवेगळ्या प्रदेशातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आणि त्यातील मंदिर शिल्पकलाही वाखाणण्यासारखी आहे. देशातील प्रत्येक प्रदेशावर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या मंदिरांवर धर्माच्या अधिष्ठानासह अनेक सत्ताधाऱ्यांच्या वैभवानी साकारलेल्या विविध शिल्पकलेचा आविष्कार नजरेत भरणारा आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा- विदर्भ, खान्देश भूमीवरील जशी अजोड शिल्पाकृतीची मंदिरे आहेत, तशीच कोकण प्रांतातील मंदिरांचा कलापूर्ण ग्रामीण बाज आपलं वैशिष्टय़ सांभाळून आहे. कोकणाला आर्थिक सुबत्तेचं पाठबळ नसेल, पण अवर्णनीय निसर्गाचं जे वैभव लाभलंय त्या पाश्र्वभूमीवरची येथील मंदिरवास्तू म्हणजे हजारो वर्षांचा अलौकिक ठेवा आहे. ही मंदिरे म्हणजे समाज एकसंध ठेवण्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळी, उपक्रमांचे चालते-बोलते व्यासपीठ होते व आजही आहे.
माणसाच्या प्राथमिक अवस्थेपासून मंदिरवास्तूचा उदय झालाय. त्यावेळी डोंगर कपाऱ्यातील गुहेमधून मूर्तीची स्थापना करण्याचा प्रघात होता. त्यातील गुहामंदिरांचे अवशेष आजही आढळतात. आपल्या दैनिक गरजा भागवताना जोडीला प्रगती साध्य करणाऱ्या माणसाच्या कल्पकतेतून घरसदृश मंदिर वास्तुरचनेचा उगम झाला. कालांतराने त्यातून मग मंदिराशी संबंधित धार्मिक विधीसाठी तसेच भजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन इ, साठी मंदिराचा परिसर विस्तारित होणं आवश्यक होतं याची त्यावेळच्या स्थापत्यकारांना जाणीव होऊन मंदिर वास्तुकलेचा विकास झाला. त्याद्वारे मंदिरातील प्रदक्षिणा मार्गिका, प्रवेशद्वाराचा मंडप, दीपमाळ, छपरासह आकर्षक शिखर, सुरक्षित तटबंदी अशी मंदिर रचना अस्तित्वात आली. सह्यद्री पहाडावरील जलस्रोतासह वन वैभवाच्या पाश्र्वभूमीवरील या मंदिर शिल्पाकृती म्हणजे धर्माचं पावित्र्य संवर्धन करून अनेक लोकोपयोगी चवळींचे केंद्रस्थान बनली आहेत. आज देखील ग्रामीण भागातील आठवडय़ाचे बाजार हे एखाद्या मंदिर परिसरात भरताहेत.
मंदिरवास्तूशैलीच्या इतिहासाचा आढावा घेतल्यावर असे आढळते की, मंदिराच्या माध्यमाद्वारे समाजाची सर्वागीण उन्नती साधण्यासाठी अनेक विषयांच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले जात असे. उदा. वास्तुकला, शिल्पकला, नृत्यकला, संगीत, ग्रंथालय, पाठशाळा यांचे व्यवस्थापनासह प्रशिक्षण मंदिरामार्फत केले जात होते.
नैसर्गिक पाश्र्वभूमीच्या कोकण भूमीवरील सर्वच मंदिर शिल्प उभारताना शिल्पकारांनी परिसरातील भौगोलिक वातावरणाचा पर्यावरणासह अभ्यास केल्याचं जाणवतं. इतकंच नव्हे, तर मंदिरवास्तू नैसर्गिक वातावरणातच असावी असा जणू आग्रह होता. अनेक राजकीय स्थित्यंतरातून प्रवास करताना त्या त्या राजवटीचा प्रकार जसा कोकणाच्या मंदिर उभारणीवर पडलाय, तसेच त्याला अनुसरून नागर- भूमिज- वेसर वा द्रविड शैलीची मंदिरे उभी राहिली. काही ठिकाणी हेमाड पंथी मंदिर वास्तूही आपलं अस्तित्व दाखवतं. देवगिरीच्या यादवांच्या दरबारात मानाचं स्थान असलेला, मोडी लिपीचा जनक हेमाद्री ऊर्फ हेमाडपंथ हा एक निष्णांत अश्वपारखीही होता. हाच हेमाडपंथी वास्तुकलेचा जनक म्हणून समजला जातो. या वास्तुशैलीचे वैशिष्टय़ असे, की बांधकामाला पकड घेण्यासाठी चुना, मातीचा वापर केला जात नसे. मंदिरवास्तू बांधणीसाठी विविध कोनांच्या दगडांचा वापर केला जायचा. या दगडांना ठरावीक ठिकाणी खोबणी, खाचे तयार करून हे दगड एकमेकांत बसवून मंदिरवास्तू उभी केली जायची.
सह्यद्रीच्या अजस्र पहाडामुळे हा भला मोठा प्रदेश कोकण आणि त्यावरील घाटमाथा हे तीन भौगोलिक विभाग निर्माण झाले. या प्रदेशावर आपली अधिसत्ता गाजवणाऱ्या वेगवेगळ्या सत्ताधीशांचा देशांतर्गत आणि परदेशाबरोबर व्यापार चालत असे. कोकणच्या सागरी भागातून येणारा माल घाटावरील बाजारपेठेत जात असल्याने त्या मार्गातील शहरवस्ती – बाजारपेठा तयार झाल्या त्या परिक्षेत्रात मंदिराची उभारणी झाली (हा काळ म्हणजे इ.स. ८ ते १३ वे शतक) यातील बऱ्याच मंदिरांना धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक तसेच दंतकथांची पाश्र्वभूमी लाभलीय. यातील काही मंदिरं त्यावेळच्या सत्ताधीशांच्या काळात बांधलेली आहेत. पण कोकणातील बरीच मंदिरं शिलाहार राजवटीत बांधली गेली.
कोकणातील जवळजवळ सर्वच मंदिरं परिसरातील उपलब्ध दगड आणि टिकाऊ लाकडांपासून उभारण्यात वास्तुविशारदांनी आपलं कौशल्य पणाला लावलं आहे. मंदिर बांधकामासाठी ज्या जागेवरून दगड काढले गेले तेथे आपसूक पाण्याची कुंड आणि जलसाठे निर्माण झाले, हे विशेष.
कोकण प्रदेशातील जवळजवळ सर्वच मंदिरांना अवतीभवतीच्या वातावरणातील निसर्ग, पाण्याचा नैसर्गिक स्रोत तसेच पशू-पक्ष्यांचा अधिवास जसा लाभलाय त्याबरोबर बऱ्याच मंदिरांच्या प्रवेशद्वारीच्या दीपमाळा हे एक खास वैशिष्टय़ आहे. दीपमाळ निर्मितीसाठी प्रामुख्याने दगडांचा उपयोग केला गेला आहे. दगडाच्या वरील भागी निमुळता होणारा स्तंभ तयार करून तो दगडी चौथऱ्यावर बसवला जातो, त्यावर दगडाचेच पद्धतशीर ठरावीक अंतरावर हात बसवून या दीपमाळा तयार केल्या जातात. विविध उत्सव व सप्ताह प्रसंगी यावर पणत्यांची आरास साकारून जी रोषणाई केली जाते त्यातून मंदिराचं अनोखं सौंदर्य जास्तच खुलतं.
परिसरातील उपलब्ध साधनसामुग्रीनुसार मंदिरवास्तू उभारली जाणं हे स्वभाविक आहे. त्यानुसार कोकणातील मंदिर उभारणीत काळा दगड, जांभा दगडाप्रमाणे टिकाऊ लाकडाचा वापर करण्यात आल्याचं जाणवतं. मंदिर सौंदर्य खुलवण्यात लाकडावरील अनोखं कोरीव काम हे येथील मंदिरवास्तूचं वैशिष्टय़ आहे. कोकणातील छोटय़ा-मोठय़ा नगरात अनेक मंदिरांत लाकडीकामाचा कलापूर्ण आविष्कार बघायला मिळतो. मंदिरांचे लाकडी खांब, तुळया, सज्जे, दरवाजे, उत्सव प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या पालख्या, मुखवटे यातून कोकणची काष्ठशिल्पाकृती दिसून येते. ही काष्ठशिल्पाकृती निर्माण करणारे कुणी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कारागीर नव्हेत तर अंगभूत कलाकृतीद्वारे देवाच्या दारी सेवा रुजू करणारे स्वयंभू कलावंताची ही देवदुर्लभ-अजोड कलाकृती आहे. इतकंच नव्हे, तर भक्तगणांनी नवस बोलून इच्छापूर्ती झाल्यावर मंदिराला अर्पण केलेल्या अनेक आकर्षक लाकडी वस्तू म्हणजे काष्ठशिल्पाकृतीचा अनोखा खजिनाच आहे.
कोकण मंदिरातील काष्ठशिल्प निर्मितीसाठी या कारागिरांनी परिसरातील सहज उपलब्ध साग- फणस- आंबा या वृक्षांच्या लाकडांचा उपयोग मोठय़ा दूरदृष्टीने केला आहे. कारण या वृक्षांचे लाकूड टिकाऊ आहे. मंदिरातील उपलब्ध जागेत काष्ठशिल्प कलात्मकरीत्या बसवण्यासाठी या अज्ञात कारागिरांनी भूमिती शास्त्राचा आधार घेतला असणार. ही काष्ठशिल्पं निर्माण करताना कारगिरांनी पारंपरिक छिन्नी, हातोडा, गिरमिट इ. साधनांचा उपयोग केलाय, हे विशेष. मंदिरातील सुशोभित काष्ठशिल्प दीर्घकाळ टिकण्यासाठी जवसाच्या तेलाचा उपयोग केला जातो. आता मात्र रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेलं द्रावण वापरण्याचा प्रघात सुरू झालाय.
संस्थानाची पाश्र्वभूमी असलेली कोकणातील सावंतवाडी हे तर लाकडी खेळणी आणि फळाफुलांच्या प्रतिकृती बनवण्यात प्रख्यात आहे. स्थानिक लोकात या कलाकृतीला ‘चित्र’ असे संबोधतात. या प्रकारच्या काष्ठशिल्पातून स्त्री- पुरुषांच्या हुबेहूब प्रतिमा सादर करून त्याद्वारे ऐतहिासिक-धार्मिक प्रसंगीचे सादरीकरण करण्यात येथील काष्ठशिल्पकार वाकबदार आहेतच.
कोकणातील बऱ्याच मंदिरवास्तूंचा आकार चौरस असा आहे. जांभा दगडाच्या जोत्यावर त्याची उभारणी झाल्याचे आढळते. दगडविटांच्या भिंतींनी उभारलेल्या मंदिरातील अंतर्गत भागात मजबूत लाकडी खांब आणि भक्कम तुळया दिसतात. नियोजित बांधकामाचे वजन पेलण्यासाठी अनेक खांबांची उभारणी मंदिरात असते. कोकणात पाऊस खूप पडत असल्याने पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी उतरत्या छपराची रचना मंदिरावर असते. काही ठिकाणी ही छप्पर रचना दोन टप्प्यांत आहे. (उदा : वालावल येथील पुरातन लक्ष्मीमाता मंदिर) मंदिराचे छत कौलानी आच्छादले जाते. त्याकरिता प्रामुख्याने नळीची आणि मंगलोरी कौले वापरात आहेत. पाऊस- वाऱ्यापासून सुरक्षेसाठी कौले बसवण्यासाठी बांबूच्या कामटय़ा, लाकडी पट्टय़ाचा सर्रास उपयोग केलेला दिसतोय.
कोकणातील सभामंडप- गाभारा (गर्भगृह) दिसणारच. सभामंडपाचा विनियोग प्रामुख्याने कीर्तन, प्रवचन, भजन ग्रामसभा यासाठी होत असतो. मंदिरांच्या मजबूत लाकडी खांबावर आधारलेल्या छतावरही काष्टशिल्पांची कलाकृती दिसते. कोकणातील सभामंडपांना भिंती नाहीत सभा मंडपापाठोपाठ दृष्टीस पडतो तो मंडप. सभामंडप व मंडप हे परस्परांना जोडलेले असतात. मंडपाला लागूनच आधारासाठी लाकडी खांब असून प्रदक्षिणा पथमार्गिकेची योजनाही असते. हे लाकडी खांब चौकोनी, षट्कोनी, वर्तुळाकार आकाराचे दिसतात. तर काही ठिकाणी लाकडी खांबावर पौराणिक प्रसंगाचे चित्रणही दिसते. मंदिरातील अखेरच्या टप्प्यात येतो तो म्हणजे गाभारा (गर्भगृह) येथे मूर्तीचे दर्शन घडते. चौकोनी किंवा गोलाकार दगडी गाभाऱ्याच्या भिंती यासुद्धा उंचीनी मोठय़ा असतात. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार उंचीनी कमी असून त्यावर चित्राकृती आढळते. देशातील दक्षिण प्रदेशात मंदिर शिल्पात दगडातील अप्रतिम कलाकृतीचे कोरीव काम पाहायला मिळते, तर कोकणातील पुरातन मंदिरातून आढळणारी काष्टशिल्पे ही पारंपरिक पद्धतीची अप्रतिम स्थानिक लोककला आहे.
रायगडसहित रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यत निसर्गासह अनोखे पारंपरिक शिल्प पाहायला मिळते. चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, सातवाहान आणि यादव साम्राज्याची सत्ता या प्रदेशानी दीर्घकाळ अनुभवलेली असल्याने कोकण भूमीला पुरातन इतिहास आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त सत्ताधीशांच्या काळात काही मंदिरांची उभारणीही झालीय. त्यातील प्रमुख मंदिरे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यतील गुहागरचे व्याडेश्वर, चिपळूण नजीकचे परशुराम मंदिर, केळशीचे महालक्ष्मी देवस्थान, राजापूरचे अंजनेश्वर- कनकादित्य मंदिर; आरवलीचे आदिनारायण मंदिर व मार्लेश्वरचे मंदिर तर आंबवचे दुर्मीळ सूर्यनारायण मंदिर.. सिंधुदुर्ग जिल्ह्यतही कणकेश्वर, आंगणेवाडीची भराडी देवी, विमलेश्वर, रामेश्वर मंदिर, वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर, आरावलीचे वेतोबा मंदिर ही प्रमुख मंदिरं आपला पारंपरिक चेहरा टिकवून आहेत. या मंदिरावर अजोड कलाकृतीचा नझारा नसेल, पण कोकणच्या लोककलेसह स्थानिक संस्कृतीचे निश्चितच दर्शन घडते. कोकण प्रदेशाचा विकास तर व्हायलाच हवा. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण विकास साधताना आमच्या इतिहास संस्कृती या पुरातन वारसा दौलतीचा ऱ्हास नव्हे. कोकणातील बऱ्याच जुन्या मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी, तसेच जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले जात आहे. त्याद्वारे जुन्या मंदिरानजीक नवीन मंदिर किंवा जुन्या मंदिराच्या जागेत संपूर्णत: नवीनच आधुनिक धाटणीचे मंदिर उभारताना मूळ मंदिर वारसावास्तूसह काष्ठशिल्पाकृती नष्ट होतेय.. कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे. भाविक-पर्यटक-अभ्यासकांचे ते आकर्षणही आहे. पण पडझड होत चाललेल्या या काष्ठशिल्पाधारी मंदिराची आजची अवस्था बघून मन खंतावते.. पुरातन मंदिराच्या नवीन बांधणी नूतनीकरणाच्या नावाखाली निर्माण होत असलेली ही मंदिरे नवीन चेहरा घेऊन उभारली जात आहेत. त्यात आकर्षकतेसह स्वयंपूर्ण सुसज्जपणाही असेल. पण आमच्या पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेल्या पारंपरिक कलाकृती नामशेष होत चालली आहे.. हे थांबायलाच हवे, नाहीतर आधुनिक मार्बलयुक्त, चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरांवर देवदुर्लभ काष्ठशिल्पाकृती होती हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा नसणार.
अरुण मळेकर vasturang@expressindia.com