अफगाण चर्च वारसा वास्तूच्या ‘अ’ श्रेणीत समाविष्ट झाले आहे. या चर्चच्या अवतीभवती अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात तरी ही वास्तू आपलं जुनं वैभव सांभाळून आहे. हे चर्च व त्याचा परिसर पाहताना दुर्मीळ अशी निरव शांतता आणि प्रसन्नता निश्चितच जाणवते. याचं कारण म्हणजे, दूरदृष्टी असलेल्या ब्रिटिश प्रशासक, कलाकारांना सौंदर्याच्या दृष्टीबरोबर शांततेचीही ओढ होती.
मुंबई शहरातील अनेक वारसा वास्तूंमध्ये प्रशासकीय वास्तूंची संख्या मोठी आहे. पण धार्मिक अधिष्ठान असलेली वेगवेगळी मंदिरे, मस्जीद, दर्गे यांच्या बरोबरीने ख्रिश्चन प्रार्थनास्थळांची चर्च स्वरूपाच्या वास्तूंची संख्याही मोठी आहे. दादर-गिरगावमधील पोर्तुगीज चर्च, माहीमचे चर्च, भायखळ्याचे ग्लोरिया चर्च या जुन्या प्रार्थनास्थळांव्यतिरिक्त दक्षिण मुंबईच्या टोकाला असलेल्या अफगाण चर्चलाही १५० वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे. तसाच एक कलात्मक चेहराही लाभलाय. ब्रिटिश अमदानीत ही भव्य वास्तू इ.स. १८५८ साली उभारली गेली. त्याला एका दु:खद, कटू प्रसंगाची पाश्र्वभूमी आहे.
इ.स. १८३८, १८४३ मध्ये सिंध-अफगाणयुद्धात हजारोच्या वर जे भारतीय आणि इंग्रज सैनिक-लष्करी अधिकारी मारले गेले, त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणार्थ या चर्चची निर्मिती १८५८ मध्ये झाली. स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू म्हणजे ‘विरगळ’ स्वरूपाची आहे.. या चर्चच्या वास्तूतून भव्यता आणि कल्पकता यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. मुंबई महानगरीत ब्रिटिश अमदानीत ज्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या त्यात या अफगाण चर्चचे स्थानही अग्रेसर आहे. तसेच मुंबई स्थळदर्शन करणाऱ्या पर्यटकांचे ते स्थान आहेच. आज १५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरही ही चर्च वास्तू आपले आगळेवेगळं स्थान वैभवासह सांभाळून आहे.
दक्षिण मुंबईच्या टोकाला सर्वपरिचित असलेले ससुन डॉक, कुलाबा बसडेपो हे सर्व परिचित स्टॉप पार केल्यावर अफगाण चर्चचा स्टॉप लागतो. हा स्टॉप येण्याआधीच बसमधून या चर्चचा उंच मनोरा आपल्या नजरेत येतो. रोमन कॅथलिक शैलीचा आणि एकूण ही चर्च वास्तू लाल, पिवळसर दगड, लाईम स्टोनच्या साह्य़ाने उभी राहिली आहे. चर्चच्या आवारातील वृक्षराजींनी परिसरातील सारे वातावरणही प्रसन्न आहे. ही इमारत म्हणजे गॉथिक स्थापत्य केलेचा एक नजराणा आहे. दूरवरून आपले लक्ष वेधून घेणारा वैशिष्टय़पूर्ण चर्चचा मनोरा २१० फूट उंचीचा आहे. या मनोऱ्यावर दाखवलेला क्रॉसही ठळकपणे दिसतो. मात्र हा मनोरा चर्चच्या प्रमुख वास्तूवर नसून, तो शेजारील दालनावर उभारला आहे.
ब्रिटिश राज्यकर्त्यांना गॉथिक शैलीच्या बांधकामामध्ये रस होता. त्याप्रमाणे नैसर्गिक वातावरणात वास्तू उभारण्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचे जाणवते. चर्चच्या आवारात प्रवेश करताक्षणीच अनेक प्रकारच्या वृक्षांचे अस्तित्व जाणवते. त्यातील पुरातन वड, पिंपळाच्या छायेत विसावण्याचा मोह होतो. प्रत्यक्ष चर्च वास्तूमध्ये प्रवेश करताना सोनेरी कलाकुसरीचे प्रवेशद्वार लागते. दुर्मीळ शांतता व स्वच्छता असलेल्या चर्चच्या ५० फूट लांब आणि २७ फूट रुंद अशा प्रार्थना सभागृहात आपण प्रवेश करतो. तेव्हा तेथील आठ खांबावरील आधारित कमानीवरील गॉथिक पद्धतीचा प्रभाव चटकन जाणवतो.
चर्च अंतर्गत प्रार्थनास्थळानजीक एका बाजूस दगडी फलकावर कोरलेली चर्चच्या बांधकामाची माहिती आपल्याला प्राप्त होते. चर्च उभारणीतील पाश्र्वभूमीची कल्पना येण्यासाठी पत्थरावर कोरलेली माहितीही बरीच बोलकी आहे. प्रत्यक्ष प्रार्थनास्थळी प्रवेश करताच भव्य सभामंडपाचे दर्शन होते. इतर चर्चमध्ये जशी भाविकांसाठी लाकडी बाके असतात तशी सोय येथे नाही. हिरव्या रंगाच्या गाद्या असलेल्या लाकडी खुच्र्याची व्यवस्था आहे. इंग्रजी राजवटीत लष्करी सैनिकांचीही हजेरी या चर्चमध्ये असायची. तेव्हा त्यांच्या सोयीसाठी बंदुकी अडकवण्याकरता खोबणी केल्याचे आढळते, तर फादर धर्मगुरूंना प्रवचनासाठी उभे राहाण्यासाठी संगमरवरी स्टेजची सोयही केली गेली आहे. या भव्य प्रार्थनास्थळांच्या अंतर्गत वास्तूंवर अनेक रंगी-बेरंगी चित्राकृतींनी या चर्चचे सौंदर्य वाढवले आहे. या चित्ताकर्षक कलाकृतीद्वारे येशूच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे सादरीकरण म्हणजे ‘स्टेनग्लास’ चित्रकलेचा एक आकर्षक नमुना आहे. ही स्टेनग्लास कलाकृती विल्यम वेल्स या प्रख्यात चित्रकाराने सादर केली आहे. इंग्रजी अमदानीत बऱ्याच वास्तूंचे सौंदर्य खुलवण्यासाठी या स्टेनग्लास कलाकृतीचा उपयोग केला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, जी.पीओ. इमारत, राजाबाई टॉवर या वास्तूंत ही कलाकृती आहेच.
अफगाण चर्चचे मूळ नाव ‘जॉन द इव्हँजालिस्ट चर्च’ असे होते. हे चर्च दक्षिण मुंबईच्या कुलाबा येथील नेव्हीनगर परिसरात उभे आहे. चर्चच्या आकर्षक छतासाठी सागवानी टिकाऊ लाकडाचा उपयोग केला गेला आहे, तसेच चर्चच्या वैभवाला साजेशी अशी कलात्मक टाइल्स, स्टेनग्लास खिडक्या इंग्लंडहून आयात केल्या होत्या. चर्चच्या बांधकामावर देखरेखीसाठी ब्रिटिश वास्तू विशारदांना पाचारण करण्यात आले होते. चर्चमधील प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या भव्य घंटाही अद्याप आहेतच. चार्लस कोझियर यांनी या घंटा चर्चला देणगी म्हणून दिल्यात. हा चार्लस कोझियर काही काळ कुलाबा येथे रहात होता.
आता हे चर्च वारसा वास्तूंच्या ‘अ’ श्रेणीत समाविष्ट झाले आहे. या चर्चच्या अवतीभवती अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात तरी हे अफगाण चर्च त्यांत उठून दिसते. हे चर्च ऑफ सेंटजॉन या नावानेही ओळखले जायचे. १८३८ मधील अफगाण युद्धात ब्रिटिश सेनेचा पुरता दारुण पराभव झाला त्याचे शल्य त्यांना होतेच..
ईस्ट इंडिया कंपनीने ऑक्सफर्ड सोसायटीच्या मदतीने या चर्चचा आराखडा तयार करण्याचे सुचवले. त्यानुसार विल्यम बटरफिल्ड या वास्तुविशारदाने चर्चचा आराखडा तयार केला. त्याला सरकारदरबारी मान्यताही लाभली.
हे चर्च व त्याचा परिसर पाहताना दुर्मीळ अशी निरव शांतता आणि प्रसन्नता निश्चितच जाणवते. याचे कारण म्हणजे दूरदृष्टीचे ब्रिटिश प्रशासक- कलाकाराना सौंदर्याच्या दृष्टीबरोबर शांततेचीही ओढ होती. अफगाण चर्चची वास्तू बघितल्यावर हेच जाणवतेच.
अरुण मळेकर