गेल्या काही भागांत आपण स्वयंपाकखोलीच्या अंतर्गत रचनेविषयी विस्तृत चर्चा केली. त्यामुळेच मला वाटले आता स्वयंपाकखोलीतून बाहेर पडून घराच्या इतर भागांकडे वळायला काहीच हरकत नाही. मी असा विचार करतेच आहे, इतक्यात एक घटना आठवली. मागे आमच्या एका साइटवर आमच्या क्लायंटने आम्हाला कल्पना न देता फ्रिज आणला. आणल्यानंतर असे लक्षात आले की फ्रिजच्या बाजूला असलेल्या भिंतींमुळे फ्रिजचा दरवाजा पूर्ण उघडू शकत नाहीए. नंतर तो फ्रिज बदलून त्या जागी दुसरा फ्रिज आणून ती समस्या आम्ही तेथेच सोडवली.
तुमच्याही बाबतीत असे कधी घडले असेल. जसे की मायक्रोवेव्ह तर ठेवायचाय पण त्यासाठी लागणारा विजेचा पॉइंटच योग्य ठिकाणी काढला गेला नाही किंवा वॉशिंग मशीन नक्की कसे घ्यावे म्हणजे वर उघडणाऱ्या झाकणाचे की समोर उघडणाऱ्या झाकणाचे हे शेवटच्या क्षणापर्यंत ठरलेलेच नाही.
खरे तर काही दशकांपूर्वी चैनीच्या म्हणून गणल्या गेलेल्या या वस्तू म्हणजे आधुनिक गृहिणीचे मदतीचे हातच जणू. म्हणूनच अंतर्गत सजावट करताना सुरुवातीलाच जर आपल्या गरज, आवड, बाजारातील नव्या उपलब्धतेचा थोडा अभ्यास आणि त्याचसोबत योग्य अंतर्गत रचना यांचे नियोजन केले तर नंतर होणारा मनस्ताप सहज टाळता येतो.
तर स्वयंपाकखोलीतील हे मदतीचे हात कसे पारखून घ्यावेत आणि ते इन्स्टॉल करताना काय काळजी घ्यावी याबद्दलच बोलू या आज. विषय फ्रिजपासून सुरू झालाय तर फ्रिजविषयीच बोलू आधी. स्वयंपाकखोलीची रचना करताना फ्रिज ज्या ठिकाणी ठेवायचाय ती जागा आधी निश्चित करून घ्यावी, त्याचसोबत कोणता फ्रिज घेणार हे देखील आधीच ठरलेले असावे म्हणजे फ्रिजची लांबी-रुंदी व उंची इतकी जागा नेमकेपणाने सोडता येते. फ्रिजच्या दोन्ही बाजूंनी मिळून किमान तीन इंच मोकळी जागा ठेवणे आवश्यक असते. त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट जी अनेक अंतर्गत सजावटकरांच्याही लक्षात येत नाही ती म्हणजे फ्रिजचा दरवाजा नेहमी १८० अंशाच्या कोनात उघडतो म्हणूनच फ्रिज अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जेथे फ्रिजचा दरवाजा उघडण्याचा अडचण येणार नाही. काही अत्याधुनिक फ्रिजमध्ये पाण्याची लहान टाकीदेखील बसविलेली असते, जिला थेट नळाची जोडणी देता येते अशा वेळी पूर्वनियोजन असल्यासच प्लम्बिंगचे काम करून आधीच नळजोडणीचे प्रयोजन करता येते.
यानंतर स्वयंपाकखोलीतील अतिमहत्त्वाचे साधन म्हणजे शेगडी. तुम्ही जर ओटय़ावर ठेवण्याची शेगडी घेणार असाल तर काहीच चिंता नाही. फक्त गॅसची जोडणी त्या ठिकाणी आली म्हणजे झाले. परंतु जर ऌडइ म्हणजेच ओटय़ात आत बसविण्याची शेगडी घेणार असाल तर मात्र ओटय़ाची रुंदी व शेगडीचा कट आउट यात ताळमेळ साधणे आवश्यक, यासाठी ओटा बनत असतानाच नेमकी कोणत्या प्रकारची शेगडी घ्यायची हे निश्चित केलेले असावे.
शेगडीसोबतच विचार करायला हवा तो चिमणीचा. हल्ली बाजारात विविध आकारांमध्ये सुंदर चिमण्या उपलब्ध आहेत. चिमणीमध्ये मुख्यत्वे दोन प्रकार येतात. एक म्हणजे एक्झॉस्ट असणारी चिमणी. या चिमणीच्या वरील भागातून स्वयंपाकखोलीच्या थेट बाहेर जाईल, या प्रकारे डक्ट पाइपची व्यवस्था करावी लागते. या चिमणीमार्फत धूर किंवा वाफ थेट बाहेर फेकली जाते. दुसऱ्या प्रकारच्या चिमणीला एक्झॉस्टची सोय नसते. ज्या ठिकाणी स्वयंपाकखोलीला थेट डक्टची सोय करणे शक्य नसते, अशा ठिकाणी ही चिमणी वापरणे सोयीचे होते. यात असलेल्या कार्बन प्लेटमध्ये धूर, वाफ व फोडणीचे उडालेले अतिरिक्त तेल शोषले जाते. वेळोवेळी या प्लेट बदलल्या की ही चिमणीदेखील पहिल्या चिमणीइतकीच प्रभावीपणे कार्य करते. आणखी एक म्हणजे या दोन्ही प्रकारच्या चिमण्या निरनिराळ्या क्षमतांमध्ये उपलब्ध असतात. प्रत्येक चिमणीवर क्युबिक मीटरमध्ये तिची शोषणक्षमता लिहिलेली असते. त्यामुळे विनाकारण वारेमाप खर्च करण्याऐवजी आपल्या कुटुंबाला पुरेल इतक्याच क्षमतेची चिमणी आपण घेऊ शकतो.
शेगडी, चिमणी याचबरोबर मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर हे देखील आधुनिक स्वयंपाकखोलीचे अविभाज्य भाग झाले आहेत. शक्यतो सव्र्हिस प्लॅटफॉर्मवर या वस्तूंच्या जागा निश्चित कराव्यात, जेणेकरून पटकन वापरता येतील. त्यातूनही स्वयंपाकखोलीला थोडा अत्याधुनिक टच द्यायचा असल्यास बिल्ट इन मायक्रोवेव्ह किंवा बिल्ट इन ओव्हनदेखील घेता येईल. हे बिल्ट इन म्हणजे काही भयंकर प्रकरण नाही बरे! बिल्ट इन म्हणजे ही साधने थेट एखाद्या कपाटात बसविता येणे. याकरिता खास प्रकारचे मायक्रोवेव्ह, ओव्हन तसेच फ्रिजदेखील मिळतात, आपण फक्त त्यासाठी अपेक्षित असे कपाट बनवून घ्यायचे. हे सगळे तर झाले अन्न शिजविण्याची आणि साठवण्याच्या साधनांविषयी पण आधुनिक स्वयंपाकखोली ही फक्त स्वयंपाकापुरती मर्यादित नाही नं! जागेच्या अभावामुळे बऱ्याच वेळा वॉशिंग मशीनलादेखील स्वयंपाकखोलीतच सामावून घ्यावे लागते. तसेच भारतीय घरांमधून अजून रुळला नसला तरी डिश वॉशर हा भविष्यातील स्वयंपाकखोलीचा अविभाज्य भाग बनणार हे नक्की. त्यामुळे जर आपण नव्याने स्वयंपाकखोलीची रचना करीत असू तर या दोन साधनांचा विचार करूनच पुढे गेलेले बरे.
वॉशिंग मशीन व डिश वॉशर यांचे आकारमान साधारणत: सारखेच असल्याने त्यांना शेजारी शेजारी ठेवता येते. या दोघांसाठी विजेची जोडणी देताना मात्र प्लग पॉइंट त्यांच्या मागील भागात तर स्विच मात्र वरील बाजूस हाताशी ठेवावे म्हणजे वापरणे सोपे जाईल. तसेच दोन्हींकरिता प्लम्बिंगचे कनेक्शनदेखील द्यावे. आणखी एक डिश वॉशरसंबंधात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे झाकण हे साधारणपणे त्याच्या उंचीइतकेच असते व ते समोर खालच्या बाजूस उघडते. त्यामुळे जिथे डिश वॉशर ठेवायचाय तेथे समोर किमान तीन फूट जागा उपलब्ध असली पाहिजे. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीनदेखील जर स्वयंपाकखोलीत ओटय़ाखाली ठेवणार असाल तर ते समोर उघडणाऱ्या दरवाजाचेच घ्यावे. जर वर उघडणाऱ्या दरवाजाचे वॉशिंग मशीन असेल तर मात्र त्याच्या वरील भागात किमान दोन फुटांपर्यंत तर मोकळी जागा असली पाहिजे.
अरेच्चा! सगळं बोलून झालं पण पिण्याच्या पाण्याचं काय? पाणी शुद्धीकरण यंत्र म्हणजेच वॉटर फिल्टर हा आजच्या काळाचा ना टाळता येणार घटक. वॉटर फिल्टरमध्ये फड आणि वश् असे मुख्य दोन प्रकार येतात. जर आपल्या इमारतीला क्लोरिफिकेशन केलेले हलके पिण्याचे पाणी पुरवले जात असेल तर आपण वश् प्रकारचा वॉटर फिल्टर घ्यावा पण, जर पाणी बोर वेलचे असेल तर मात्र फड प्रकारचा वॉटर फिल्टर घेणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्या प्रकारचा वॉटर फिल्टर आपल्याला हवा आहे आणि कोणता आवश्यक आहे याची आधी पडताळणी करून मगच फिल्टर निवडावा.
तर अशा तऱ्हेने स्वयंपाकखोलीच्या अंतर्गत सजावटीबाबत बराच ऊहापोह आपण गेल्या काही भागांत केला. मुळात माझ्या मते घराला जर शरीराची उपमा दिली तर स्वयंपाकखोली हे त्याचे हृदय. म्हणूनच या हृदयाची व्यवस्थित काळजी घेतली तर घराचे स्वास्थ्यदेखील छान राहील.
गौरी प्रधान ginteriors01@gmail.com