आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सुंदर म्हणजे नेमकं कसं? असं जर विचारलं, तर त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं असतं, त्या चित्राचं वर्णन ती व्यक्ती करते. बहुतेक वेळा हे वर्णन मनावर कोरल्या गेलेल्या, कुठे तरी पाहिलेल्या कोणाच्या तरी घराच्या चित्रावर आधारित असतं किंवा पाहिलेल्या वेगवेगळ्या घरांच्या अंतर्गत सजावटींच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या चित्राचं वर्णन असतं. पण हे स्वप्नातलं घर सत्यात साकारायचं ठरवल्यावर जेव्हा एखाद्या इंटीरिअर डिझायनरला आपण बोलावतो किंवा थेट कंत्राटदाराला बोलावून त्याला आम्हाला अशा प्रकारे घर सजवून हवं आहे, असं सांगतो, तेव्हा त्याचा अंदाजित खर्च त्याने सांगितल्यावर कधी कधी आपण आपल्या स्वप्नांना कात्री लावतो. मग बजेटमध्ये बसेल असं, त्यातल्या त्यात आपल्या कल्पनेतल्या घराच्या जवळ जाणारं घर सजवायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तडजोडीतून उभं राहिलेलं आपलं घर आपल्याला स्वत:लाच मग मनापासून आवडत नाही किंवा मग आहे ते कसं चांगलं आहे, हे आपण स्वत:च्या मनाला आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही पटवायचा प्रयत्न करतो. तसंच एखाद्याच्या घरी चांगलं दिसलेलं फíनचर किंवा शोभेच्या वस्तू आपल्याही घरात शोभून दिसतील असं सांगता येत नाही. दुसऱ्यांच्या घरातल्या रंगांच्या छटा आपल्या घरी तितक्याच उठावदार दिसतील हेही ठामपणे सांगता येत नाही. कारण घर सुंदर दिसण्यात खोल्यांचा आकार, त्याला साजेसा असलेला फíनचरचा आकार आणि प्रकार, खोल्यांमधली नसíगक आणि कृत्रिम प्रकाशव्यवस्था, आपल्या घरातल्या माणसांची संख्या, त्यांचे वयोगट, त्यांच्या सवयी आणि त्या सवयींना सामावून घेईल, अशी सजावट असे अनेक मुद्दे घर सजवताना विचारात घ्यावे लागतात. त्यामुळेच शक्यतो घर सजवताना एखाद्या घराची नक्कल करणं किंवा अनेक घरांमधल्या संकल्पनांची विचारशून्य भेसळ करणं म्हणजे गृहसजावट नव्हे, याचं भान राखणं गरजेचं असतं. मग घर नेमकं सजवायचं तरी कसं, असा प्रश्न साहजिकच पडणं स्वाभाविक आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागेचं नियोजन – जागेचं नियोजन हा सजावटीचा श्रीगणेशा आहे. एखाद्या खोलीसाठी जेव्हा अंतर्गत सजावट करायची असेल, तेव्हा सर्वात आधी त्या खोलीचा आकार आयताकृती आहे, की चौरस, त्याची लांबी-रुंदी किती आहे, या लांबी-रुंदीमध्ये भिंतीतून बाहेर आलेल्या कॉलम-बीमचा अडथळा आहे का, भिंतीतले खिडक्या-दरवाजे वगळून फर्निचर ठेवण्यासाठी निव्वळ लांबी-रुंदी किती उरते या सगळ्या बाबींचा विचार जागेच्या नियोजनात येतो.

फíनचरची आखणी – एखाद्या खोलीत रेफ्रिजरेटर किंवा टी.व्ही. किंवा वॉिशग मशीन किंवा शिवणाचं यंत्र अशी कोणती उपकरणं येणार आहेत का, त्यांची लांबी-रुंदी-उंची किती असणार ते विचारात घेऊन मग त्यांच्याकरिता खोलीतल्या उपलब्ध जागा कोणत्या हे निश्चित करावं लागतं. ते एकदा का ठरलं की, मगच किती जागा उरते, ते पाहून त्यात त्या खोलीतलं गरजेचं फíनचर कसं बसवता येईल याचा विचार करावा लागतो. त्याकरिता पुरेशी जागा नसेल, तर फोल्डेड-मोल्डेड किंवा बहुउपयोगी अशा एखाद्याच फíनचर युनिटचा पर्याय कसा उपयोगात आणता येईल याचा विचार करून त्यांचं  डिझाइन तयार करावं लागतं. ही आखणी करत असताना आपल्या रोजच्या व्यवहारातल्या कामांचा क्रम, आपल्या सवयी यांचाही विचार गरजेचा असतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे वाहन आहे आणि त्याच्या चाव्या घरातून बाहेर पडताना हाताशी असाव्यात आणि घरी परतल्यावर त्या इथे-तिथे न पडता जागेवर जाव्यात यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच की-स्टँड किंवा जवळच्याच शोकेसमध्ये एखादा ड्रॉवर देऊन त्यात मोबाइल, चाव्या पाकीट वगरे वस्तू ठेवण्यासाठी कुलूप असलेला ड्रॉवर दिला, तर सुरक्षाही साधली जाते.

आकर्षक रंगसंगती – घरात नैसर्गिक प्रकाश कमी असेल, तर उजळ रंगछटांच्या माध्यमातून दिवसाचा प्रकाश परावर्तित करून थोडासा वाढवता येऊ शकतो. कधी कधी योग्य जागी आरशांचा किंवा फíनचरला काचेच्या दरवाजांचा वापर करूनही खिडकीतून येणारा प्रकाश खोलीत इतरत्र फिरवता येऊ शकतो. तसंच विशिष्ट खोल्यांकरिता विशिष्ट रंगछटांचा वापर त्या खोल्यांच्या उपयोगांनुसार केला, तर त्या खोलीचा जो उपयोग आहे, तो अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. त्यामुळे केवळ विशिष्ट रंग आवडतो म्हणून निवडण्यापेक्षा शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली रंगांची निवड ही अधिक परिणामकारक ठरते.

प्रकाशयोजना – नैसर्गिक तसंच कृत्रिम प्रकाशयोजना ही गृहसजावटीचा आत्मा आहे. शरीरात ज्याप्रमाणे आत्म्याचं चतन्य आल्यानंतरच प्राणी सजीव होतो, तद्वतच योग्य प्रकाशयोजनेनंतरच घराच्या सजावटीत प्राण फुंकले जातात आणि घराचं सौंदर्य उजळून निघतं.

गृहसजावटीची त्रिसूत्री – जागेचं नियोजन, फर्निचरची आखणी, रंगसंगती, प्रकाशयोजना आणि या सगळ्याकरिता स्वत: बाजारात फिरून उपलब्ध असलेल्या याबाबतच्या सजावटीच्या पर्यायांबाबत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगला पर्याय निवडण्यासाठी बाजारातलं सर्वेक्षण, या सर्व बाबींचा अभ्यास आणि त्यावर घरातल्यांबरोबर चर्चा आवश्यक आहे. सर्वेक्षण, अभ्यास आणि चर्चा या तीन गोष्टी म्हणजे गृहसजावटीची त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री अमलात आणल्यानंतरच मग एखाद्या इंटीरिअर डिझायनरला किंवा कंत्राटदाराला बोलावून जेव्हा, मला सुंदर घर कसं हवं आहे, हे सांगू, तेव्हाच आपल्या स्वप्नातलं घर तंतोतंत फारशा तडजोडीविना आपण सत्यात उतरवू शकू. कोणत्याही गोष्टीप्रमाणे गृहसजावटीच्या बाबतीतही या सगळ्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीला पर्याय नाही.

या सदराच्या माध्यमातून आतापर्यंत स्वयंपाकघर, लिव्हिंगरूम, बेडरूम, टॉयलेट, फ्लोअिरग आणि पेंटिंग याबाबतचं विस्तृत विवेचन दिलंच आहे. पण त्याबरोबरच वर सांगितलेली त्रिसूत्रीही लक्षात ठेवली पाहिजे. तसं केलं, तर खरोखरच तुमचं घर हे केवळ सुंदरच असणार नाही, तर तुमच्या कुटुंबाकरिता आवश्यक अशा सुखसोयींनीयुक्त असलेलं आणि म्हणूनच आरामदायी निवारा देणारी वास्तू ठरेल. येणाऱ्या नव्या वर्षांत तुमच्या घराला आनंददायी नवतेची सुंदर झळाळी लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करून या सदरातून निरोप घेतो.

मनोज अणावकर anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home decorating ideas