अलीकडच्या काही वर्षांत केवळ आपले सण साजरे करण्यापेक्षा वर्षभरातील सर्व महत्त्वाचे सण एकत्र मिळून साजरे करण्याचे प्रमाण वाढत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर गणपती, नवरात्र, दिवाळी हे त्या त्या जातीजमातीपुरते मर्यादित न राहता सर्वधर्मीय हे सण मोठय़ा उत्साहाने साजरे करताना नि त्यात सहभागी होताना दिसतात.
आता या सणांच्या मांदियाळीत भर पडली आहे ती जगभरात मोठय़ा प्रमाणावर साजरा होणाऱ्या ख्रिसमसची अर्थात नाताळची. नाताळ म्हटले की, विविध प्रकारचे केक्स्, पेस्ट्रीज्, ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज् व त्याच्याकडून मिळणाऱ्या भेटवस्तू अशी सगळी धम्माल डोळ्यांसमोर येते. अनेक जण आपल्या मुलांसाठी वैविध्यपूर्ण पद्धतीने घर सजवतात.
या नाताळमध्ये नि आपल्या दिवाळीमध्ये बरेचसे साम्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण दिवाळीत प्रामुख्याने भर असतो तो साफसफाई, सजावट नि गोडधोड -चमचमीत फराळ आणि कंदिलावर. नाताळमध्ये देखील तेच असते. चांदणीवाला कंदील, गोडधोड नि सजावट. ही सजावट घरात आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी करता येते. या संदर्भात हॉबी हॉलीडेज्च्या तज्ज्ञ असलेल्या प्रिया पाटील यांच्या मते, सजावटीसाठी खूप महागडय़ा गोष्टींची गरज नसते. सहज उपलब्ध असलेल्या मोजक्या गोष्टींचा वापर करूनही आकर्षक सजावट करता येते.
याबाबतीत त्या काही खास टिप्स् देतात.
स्नो मॅन
नाताळमधल्या प्रमुख आकर्षणांपकी एक म्हणजे स्नो मॅन. फळं, फुलं, कागदी बॉल्स् अशा विविध गोष्टींचा वापर करून हा स्नो मॅन बनविता येतो.
साहित्य : ए-फोर आकाराचा लाल रंगाचा कार्ड पेपर, ए-फाइव्ह आकाराचा हिरव्या रंगांचा कार्ड पेपर, पेन्सिल, पट्टी, कंपास, कात्री, जाडसर स्वरूपाचा पांढरा किंवा चंदेरी धागा, लाल वेल्वेटची लेस इ.
यासाठी ए-फोर आकाराचा लाल रंगाचा कार्ड पेपर घ्यावा. तो मधोमध दुमडावा. कार्डच्या खालच्या भागात तीन इंच व्यास असलेले वर्तुळ काढावे. त्यावर दोन इंच व्यास असलेले वर्तुळ काढावे. म्हणजे स्नो मॅनचे शरीर तयार होईल.
पांढऱ्या किंवा चंदेरी जाडसर धाग्यांचे एक सेंमी लांबीचे भरपूर तुकडे करून घ्या. स्नो मॅनच्या वर्तुळात्मक शरीरावर ग्लू पसरवून लावा नि त्यावर हे धाग्यांचे तुकडे चिकटवा. बर्फाचा पाऊस दाखविण्यासाठी आजूबाजूला धाग्यांचे एकेरी तुकडे चिकटवा .
लाल वेल्व्हेट लेसचा एक लहान तुकडा कापून घ्या. तो स्नो मॅनच्या मानेभोवती चिकटवा.
डोळ्यांसाठी काळ्या रंगाचा क्ले घेऊन त्याचे दोन छोटे गोळे तयार करा. लाल -पिवळ्या रंगांचा क्ले एकत्रित करून केशरी रंग तयार होईल. त्याचे छोटेसे नाक तयार करा. नो स्टीच फेब्रिक ग्लूचा वापर करून डोळे व नाक योग्य जागी चिकटवा.
आता हिरवा कार्ड पेपर घेऊन तो टोपीच्या आकाराचा कापा नि डोक्यावर चिकटवा. पांढऱ्या किंवा लिक्विड एम्ब्रॉयडरी स्वरूपात उपलब्ध असलेल्या व्हाइट कोनचा वापर करून सभोवताली आकर्षक सजावट करा.
माईल स्टोन पेंटेड विथ ग्लास कलर्स
तऱ्हेतऱ्हेच्या माईलस्टोन पेंटिंग्जचा वापर ख्रिसमस ट्रीवर किंवा दाराबाहेर सजावटीसाठी केला जातो.
यासाठी ए-फोर आकाराचा एक पांढरा कागद घेऊन त्यावर चार किंवा पाच इंचांच्या आकाराचे चेरी व पानांचे चित्र काढावे. लिक्विड एम्ब्रॉयडरी गिल्टर सिल्व्हरचा वापर करून हे डिझाइन ओएचपी शीटवर ट्रेस करुन घ्यावे. कमीत कमी पचंवीस ते तीस वेळा ट्रेस करावे. ट्रेस केलेला भाग व्यवस्थित सुकल्यानंतर चेरी व पानांना प्रामुख्याने लाल व हिरवा रंग द्यावा. आता ओएचपी शीटवरून डिझाइनचे कटआउट करा.
कटआऊट सुकल्यानंतर अंदाजे अकरा इंच व्यास असलेल्या वर्तुळाचा कटआऊट करा. या कटआऊट केलेल्या वर्तुळात आणखी एक नऊ इंच व्यासाचे वर्तुळ काढा. रिंग करण्यासाठी आतील वर्तुळाचा कटआऊट करा.
ख्रिसमस ट्री
ख्रिसमस ट्रीशिवाय नाताळची सजावट पूर्णच होऊ शकत नाही. शिवाय पेपरची ही ट्री बनवायला देखील सहज सोपी आहे. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य म्हणजे हिरवा टिंटेड पेपर, कात्री, पाण्याचे भांडे. एक लंबगोल आकाराचे लाकूड घ्या. झाडाची साल म्हणून एक रिकामा टिश्यू रोल घ्या. हा रोल लंबगोल वुडन प्लेकला एका बाजूने फेव्हिकोलच्या साहाय्याने चिकटवा .
लंबगोल लाकडाला पांढऱ्या अॅक्रेलिकने तर टिश्यूरोलला डार्क ब्राऊन रंगाने रंगवा. आता हिरव्या रंगांचा कार्ड पेपर घेऊन त्याची पाच, चार, तीन, दोन सेंमी आकाराची चार वर्तुळे तयार करा. वर्तुळाच्या प्रत्येक केंद्रिबदूपर्यंत एक छेद देऊन त्याचे कोन तयार करा आणि गमाने चिकटवा.
तयार झालेल्या या कोनांच्या कडांना झालरीप्रमाणे कापा. सर्वात मोठा गोल खाली आणि लहान गोल वरती या क्रमाने कोन चिकटवा.
क्वििलग स्ट्रीप्सच्या सहाय्याने पाच सलसर गुंडाळ्या तयार करून त्यांना पानांचा आकार द्या. म्हणजे छान स्टारसारखे फूल तयार होईल. हे तयार फूल ट्रीच्या सर्वात वरती लावा.
लाकडाच्या सभोवताली आवडता रंग द्या. त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे गिफ्ट बॉक्स ठेवून अथवा इतर आवडीच्या गोष्टींव्दारे सजावट करा.
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, नाताळची सजावट जितकी सोपी तितकीच कल्पकतेला भरपूर वाव देणारी आहे.
नाताळसाठी घरसजावट..
नाताळमध्ये नि आपल्या दिवाळीमध्ये बरेचसे साम्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Written by झियाऊद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 19-12-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home decorations for christmas