सुचित्रा साठे

गणपती जेव्हा घराच्या उंबरठय़ाबाहेर उभा राहतो तेव्हा निरांजन ओवाळून त्याला घरात घेताना गृहलक्ष्मीचे डोळे आनंदाने पाणावतात. त्याच्या येण्याने घर भरून जाते. त्या मंगलमूर्तीच्या सुखरूप वास्तव्याची जबाबदारी जरी संपूर्ण घरावर असली तरी ‘ती’ डोळ्यात तेल घालून सतर्क असते.

धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आढळे।

आपल्या उग्ररूपाने असा आषाढ गाजवल्यावर पाऊस जरा  रेंगाळतो. संधीचा फायदा घेऊन सूर्यकिरण लगबगीने मध्येमध्ये घुसतात. त्यांच्या येण्याने तेजाची पखरण होते. आषाढ अमावास्येला लावलेल्या कणकेच्या दिव्यांच्या स्निग्ध, शांत प्रकाशात श्रावण आणि त्याला चिकटलेला भाद्रपद दिसू लागतात. घराघरातील गृहिणींच्या व्यवस्थापनाला आव्हान देणारे हे दिवस. ‘‘कांदेनवमीला खायची तितकी कांदाभजी, कांद्याचे पदार्थ खाऊन घ्या. आता गौरीगणपती होईपर्यंत घरात कांदा-लसूण वापरायचं नाही. बाहेर खा काय खायचं ते.’’ घरांतल्या श्रद्धास्थानाने नियम घालून देत पळवाटही सुचवलेली असते. सुरकुत्यांच्या श्रीमंतीचा मान ठेवला जातो.

कितीतरी गोष्टी घरातल्या स्त्रीशक्तीला जबाबदारीने पार पाडायच्या असतात.  भिंतीवरील कालनिर्णयाकडे सतत लक्ष ठेवावंच लागतं. एखादीला श्रावण सोमवारी आपल्या पौरोहित्याच्या वर्गाच्या मैत्रिणींना रुद्र पठणासाठी बोलवायचे असते. त्यानिमित्ताने घर बघायला सगळ्याजणी येणार म्हणून घराच्या रूपाकडे तिचे सारखे लक्ष असते. आवराआवरीला प्राधान्य असते. रोज घरातल्या कुठल्या ना कुठल्या भागावर हात फिरवत ती चकचकीत करत असते. एखादीने घरी लेकीसुनेची  मंगळागौर ठरवलेली असते. शंकराची पिंडी फुलांनी सजवायची की गड्ड पेरून शेत साकारायचं हे तिला ठरवायचं असतं. तसं असेल तर गड्ड कधी, केव्हा, कशात पेरायचे हे तिचं विचारचक्र सतत फिरत राहतं. रोजच्या खानपानसेवेतून मिळालेल्या ‘रिकाम्या’ जागा ती सजावटीच्या तयारीने भरून काढते. लेकीसुनांच्या सासर-माहेरच्या मंडळींना बोलावलेलं असतं. त्यांची ऊठबस, आगतस्वागत, राहण्या-झोपण्याची सोय ‘उत्तम’ व्हावी याकडेही लक्ष ठेवायचं असतं. त्यातच शुक्रवारी जिवतीचा कागद देवघरांत ठेवून सवाष्णीला जेवायला बोलवायचं असतं. पुरणपोळ्यांचा घाट घालायचा असतो. नागपंचमीला तंबिट्टाचे लाडू सगळ्यांच्या हातावर ठेवायचे असतात. पुरणाची दिंड खायला घरातले आसुसलेले असतात. नारळीभात करून राखीपौर्णिमेला भावाकडे धावायचं असतं. कामवाल्याबाईची ‘दांडी’ गृहीत धरायची असते. लेकीच्या परीक्षेतील यशाबद्दल सत्यनारायण करायचा असतो. स्वत:मधला ‘कला’कारही जपायचा असतो. त्यासाठी श्रावणानिमित्त एखाद्याने ठेवलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची असते. गीत रामायणावरील नृत्याचा कार्यक्रम बघायचा असतो. वर्तमानपत्रात प्रासंगिक लेख लिहून द्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी वेळेचा सदुपयोग करायचा असतो. १५ ऑगस्टला ध्वजवंदनही साधायचं असतं. त्यात काळानुरूप पडलेली भर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या श्रावणाच्या कौतुकालाही दाद द्यायची असते.

या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो. रात्री जागून आरास पूर्ण होते. एखाद्या मैत्रिणीने समाजहिताचं भान ठेवून सार्वजनिक गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी मांडवात होणाऱ्या नको त्या गोष्टी टाळण्यासाठी पुढाकार घेऊन भाद्रपद प्रतिपदेपासून भागवत सप्ताह ठरवलेला असतो. लहानथोरांना ‘त्या’ कामांत गुंतवण्याची समयसूचकता दाखवलेली असते. गणपतीबाप्पांचं आगमन झाल्यावर जमणार नाही म्हणून एखादीला पहिले दोन दिवस तरी तिथे उपस्थिती लावायची असते. खरोखर क्षणभरही विश्रांती न घेता प्रत्येक गृहिणी प्रत्येक क्षण कामाने भरून काढणारी ‘क्षणभरी’ झालेली असते.

ज्यांच्या घरी उभ्याच्या गौरी असतात, त्यांची तर खूपच गडबड असते. खास आरास, दिव्यांच्या माळा, रांगोळी काढली जाते. गौरींसाठी नवीन साडय़ा, दागिने घेतले जातात.  घरातली बच्चे कंपनी खुशीत बागडत असते. गौरी आलेल्या दिवशी खास पालेभाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या विदशी पुरणावरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी सोळा भाज्या करण्याची पद्धत असते. पुरणाच्या पाच दिव्यांनी पंचारती केली जाते.

तिची हरितालिका आणि गणपतीच्या पूजेची तयारी एकात एक होऊन जाते. त्यातल्या त्यात हरितालिका आणि गणेश चतुर्थी वेगवेगळ्या दिवशी आल्यामुळे घरातील स्त्रीवर्गाला अगदी हायसं वाटत असतं. उपवास न करणारेच साबुदाणा खिचडीवर ताव मारतात. षोडशोपचारी पूजेची तयारी, त्यासाठी घासूनपुसून लख्खं केलेली देवाची उपकरणी, नैवेद्य याचं नेमकं नियोजन करताना तिच्या पायाला अगदी भिंगरी लागते. पाश, अंकुश ही आयुधं हातात धरून ठेवणारा, आनंद हाच स्थायीभाव हातातल्या मोदकाच्या प्रतिकातून प्रकट करणारा, कुरतडणे हा ज्याचा स्वभाव आहे त्या मूषकावर आरूढ होऊन जणू उपासकांची कुरतड सुस करणारा श्री गणेश जेव्हा घराच्या उंबरठय़ाबाहेर उभा राहतो तेव्हा निरांजन ओवाळून त्याला घरात घेताना गृहलक्ष्मीचे डोळे आनंदाने पाणावतात. त्याच्या येण्याने घर भरून जाते. त्या मंगलमूर्तीच्या सुखरूप वास्तव्याची जबाबदारी जरी संपूर्ण घरावर असली तरी ‘ती’ डोळ्यात तेल घालून सतर्क असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गुरुजी पूजा सांगायला आले की हवंनको बघायला ती हातातली सगळी कामे बाजूला ठेवून तिथेच रेंगाळते. पूजा झाल्यावर आरती आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला की तिचा जीव भांडय़ात पडतो. मग तिला गौरींचे वेध लागतात.

घरातल्या छोटय़ा कंपनीला हाताशी धरून ती सात गुळगुळीत खडे अंगणातून शोधून आणते. काहींच्या घरी गौरीचे मुखवटे असतात. माहेरवाशीण म्हणूनच तिचं स्वागत होतं. तिला जास्त वेळ राहायला मिळावं म्हणून पंचांगातील मुहूर्त कळला की लगेच गौरींना घरात आणण्याची तयारी केली जाते.

षोडशोपचारी पूजेची तयारी, त्यासाठी घासूनपुसून लख्खं केलेली देवाची उपकरणी, नैवेद्य याचं नेमकं नियोजन करताना तिच्या पायाला अगदी भिंगरी लागते. पाश, अंकुश ही आयुधं हातात धरून ठेवणारा, आनंद हाच स्थायीभाव हातातल्या मोदकाच्या प्रतिकातून प्रकट करणारा, कुरतडणे हा ज्याचा स्वभाव आहे त्या मूषकावर आरूढ होऊन जणू उपासकांची कुरतड सुस करणारा श्री गणेश जेव्हा घराच्या उंबरठय़ाबाहेर उभा राहतो तेव्हा निरांजन ओवाळून त्याला घरात घेताना गृहलक्ष्मीचे डोळे आनंदाने पाणावतात.

आजकाल पाणवठा म्हणजे सर्वसाधारणपणे पाण्याच्या टाकीजवळून किंवा सोयीप्रमाणे गौरी आणल्या जातात. त्यासाठी घरात गौरीच्या पावलांच्या जोडय़ा रांगोळीने काढल्या जातात. बाहेरून ती घरात प्रवेश करते आहे, हे कळावं अशी पावलं काढली जातात. प्रत्येक खोलीत ती वावरते हे दाखवण्यासाठी प्रत्येक खोलीत पावलांची जोडी काढली जाते. घरातल्या दोघी महिला गौरी आणण्याचं काम करतात. त्यापैकी एकजण तबकामध्ये पूजेची तयारी आणि सात खडे घेऊन बाहेर टाकीजवळ जाते. तिथे खडे पाण्याने धुऊन चांदीच्या वाटीत ठेवले जातात. गंधपुष्प, हळदकुंकू, फुले वाहून घंटा वाजवत, म्हणजे जणू आगमनाची वर्दी देत या गौरी घरापर्यंत आणल्या जातात. घराच्या मुख्य दाराशी उंबरठय़ापाशी आल्यावर दुसरी स्त्री, गौरींना घेऊन येणारीच्या पायावर दूधपाणी घालते. गौरींचे औक्षण करते. गौरींना घेऊन येणारी स्त्री गौरी नियोजित जागेवर स्थानापन्न होईपर्यंत बोलत नाही. मग गौरींना घरभर फिरवून घर दाखवले जाते. कपाटं उघडून दूधदुभतं (फ्रिज), धनसंपदा दाखवली जाते. सगळीकडे घंटानाद करत फिरवल्यावर देवघरांत, गणपतीबाप्पाजवळ किंवा ठरवलेल्या जागी ठेवले जाते. ज्यांच्या घरी उभ्याच्या गौरी असतात, त्यांची तर खूपच गडबड असते. खास आरास, दिव्यांच्या माळा, रांगोळी काढली जाते. गौरींसाठी नवीन साडय़ा, दागिने घेतले जातात.  घरातली बच्चे कंपनी खुशीत बागडत असते. गौरी आलेल्या दिवशी खास पालेभाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या विदशी पुरणावरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी सोळा भाज्या करण्याची पद्धत असते. पुरणाच्या पाच दिव्यांनी पंचारती केली जाते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांनी निर्माण झालेला हा देह, त्याचं प्रतीक म्हणजे ज्योत. ‘हे ईश्वरा तुझ्यावरून प्राण ओवाळून टाकत आहोत’ म्हणजेच आमच्या देहापेक्षाही तू आम्हाला जास्त प्रिय आहेस, ही त्यामागची भावना. सुवासिनीला जेवायला बोलावून तिची ओटी भरली जाते. संध्याकाळी शेजारीपाजारी, परिचितांची गौरीदर्शनाला रीघ लागते. नवीन भरजरी साडय़ा, दागिने घालून सजलेला महिलावर्ग, अत्तर गुलाबपाणी, फुलं यांचा संमिश्र सुगंध, भेटीगाठीचा आनंद यामुळे वातावरण चैतन्यमय होऊन जाते. या सगळ्याच्या मागे गृहिणीचे कल्पक आयोजन असते.

नंतर गौरीगणपती विसर्जनाचा दिवस उजाडतो. ‘पाहुणे’ जाणार म्हणून घरातील सगळ्यांनाच जरा जड वाटत राहते. संध्याकाळी गौरी परत चालल्या हे बाहेरच्या दिशेने वळलेल्या पावलांवरून सूचित केले जाते. या माहेरवाशिणीचे दोन दिवस कोडकौतुक, लाड केले जातात. ‘स्त्रीजन्माचा’ योग्य आदर करावा, स्वागत करावे, मान द्यावा हेच जणू प्रतीकात्मकरीत्या साजरे केले जाते. गौरीगणपती दोघांनाही आठवणीने दहीपोहे किंवा तळलेल्या करंजी मोदकाची शिदोरी दिली जाते. उत्तरपूजा झाल्यावर विसर्जनासाठी तलावपाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सगळे मार्गस्थ होतात. झांजांच्या तालावर ‘गौरीगणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’चा नाद सर्वत्र घुमतो. श्रावणापासून गजबजलेलं ‘घर’ कृतकृत्यतेचा आनंद मिरवत शांतनिवांत होतं.

suchitrasathe52@gmail.com