घराचे नूतनीकरण करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचे नियोजन कशा पद्धतीने करावे याविषयी मार्गदर्शन करणारा लेख.
घराचे रिनोवेशन अर्थात नूतनीकरण करणे हा वाटतो तितका सोप्पा विषय नाही. यात अनेक बाबींचा, अनेक लोकांचा समावेश आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला असेल. याचे मुख्य कारण आहे- काम रखडणे. अर्थात अपेक्षित वेळेत पूर्ण न होणे. योग्य नियोजनाच्या अभावामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय होतो व मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळेच बरेच जण इच्छा असूनही वर्षांनुवर्षे घराचे इंटिरियरचे काम करीत नाहीत, पण कधीना कधी ती वेळ येतेच.
घराचे नूतनीकरण करण्याआधी आपण काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वप्रथम आपणास आपले घर सजवण्यासाठी किती खर्च करायचा आहे ते ठरवावे व काम सुरू करण्याअगोदर त्या संपूर्ण रकमेची तरतूद करावी. पैशा अभावी आपले काम रखडल्यास खूप त्रास होऊ शकतो. घरात राहणे मुश्किल होते. आपल्याला आपल्या घराच्या कोणत्या भागात सगळ्यात जास्त खर्च करावयाचा आहे ते ठरवावे. बहुतांश लोकांचा भर लिव्हिंग रूमवर असतो. कारण तो घराचा दर्शनी भाग आहे. काही जण किचनवर भर देतात. तर काही जण बेडरूमवर जास्त खर्च करतात. कारण आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट बेडरूममध्येच करतो. ही वैयक्तिक बाब असली तरी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
आपण राहत्या घरी काम करणार आहात, का तात्पुरते दुसऱ्या घरी राहून रिकाम्या घरात काम करणार आहात ते ठरवावे. पर्यायी जागेची सोय होत असेल तर उत्तम. रिकाम्या घरात काम केल्याने काम लवकर होते. कामात एकसंधपणा, सुसूत्रता येते व पर्यायाने थोडे पैसेही वाचतात. उदाहरण बघायचे झाले तर राहत्या घरी काम करीत असताना एकेका रूमचे काम करावे लागते. सध्याचे फ्लोरिंग, इ. तोडून खाली उतरवावे लागते व इमारतीच्या आवारात जमवून ठेवावे लागते. तोडलेल्या रूमचे काम पूर्ण होण्यास साधारणपणे एक ते दिड महिना लागतो. तेवढा वेळ आपणास तोडलेले सामान ज्याला डेब्री (व कामगारांच्या भाषेत रॅबीट) असे म्हणतात. ते इमारतीच्या आवारात ठेवता येत नाही. तितका वेळ ठेवण्यास इमारतीची/ नियमावली परवानगी देत नाही. म्हणूनच ते डेब्री आपणास ट्रक बोलावून उचलावे लागते. यासाठी रु. २,५००/ ते रु. ३,५००/- इतका खर्च येतो. हा खर्च प्रत्येक रूम किंवा बाथरूमच्या टाईल्स तोडल्यावर पुन्हा करावा लागतो. हा पैशाचा अपव्यय आहे. हा भरुदड रिकाम्या घरी काम केल्यास सहन करावा लागत नाही. कारण सगळ्या घराच्या फरशा एकाच वेळी तोडल्या जातात, खाली उतरवल्या जातात व एकदाच किंवा जास्तीत जास्त दोनदा ट्रक बोलावूनच उचलल्या जातात. त्यामुळे जास्तीच्या ट्रक फेऱ्यांचे पैसे वाचतात. राहत्या घरी काम केल्यास धुळमातीचा काही प्रमाणात त्रास होतो, आवाजाचा त्रास होतो. तसेच कामगारही थोडे अवघडल्यासारखे असतात. रिकाम्या घरात कामगार त्यांच्या लयीत काम करू शकतात. सोसायटीची परवानगी असेल तर कामगार तेथे राहून देखील काम करू शकतात. त्यामुळे त्याच्या येण्या-जाण्याचा वेळ व खर्च वाचतो. कामगार जास्त वेळ कामासाठी देऊ शकतात. स्वत:ची किंवा नात्यात, ओळखीत पर्यायी जागा उपलब्ध असेल तर काहीच प्रश्न नाही. केवल सामान हलवण्याची तसदी घ्यावी लागेल. पण भाडय़ाने जागा मिळणे
थोडे कठीण आहे, कारण बहुतांश घरमालक निदान ११ महिन्यांचे अॅग्रिमेंट करण्याचा आग्रह धरतात. पर्यायी जागा जर तुमच्या घराजवळ मिळाली तर तुम्ही स्वत:देखील वेळोवेळी कामागर लक्ष ठेवू शकता.
पर्यायी जागा न मिळाल्यास हिरमोड व्हायचे कारण नाही. कारण अत्यंत काटेकोर नियोजन करून आपण त्रास न होता आपल्या घराचे सुंदर नूतनीकरण करू शकता. यासाठी अनुभवी तज्ज्ञांची मदत घ्यावी. राहत्या घरी काम करण्याचा एक छान फायदाही आहे. तो म्हणजे तीन/ चार महिन्याच्या भाडय़ाचे हजारो रुपये वाचतात. ते आपण कामासाठी वापरू शकतो.
नूतनीकरणाचे काम सुरू करण्याअगोदर आपण खास कामासाठी म्हणून एक फाईल तयार करावी. त्यात आपल्या बजेट संबंधी व आपणास करावयाच्या असलेल्या कामासंबंधी नोंदी कराव्यात. घरातील इतर सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या आवडी-निवडी, गरजा जाणून घ्याव्यात. आपणास घराच्या नूतनीकरणा संदर्भात जी काही माहिती असेल त्याची नोंद त्या फाईलमध्ये करावी व ती आपण आपल्या इंटिरियर डिझाइनरला दाखवावी. यामुळे आपले व आपल्या डिझाइनरचे काम बऱ्याच अंशी सोपे होईल.
डिझाइन व बजेट ठरवल्यानंतर खात्रीच्या कंत्राटदारांकडून कोटेशन्स मागवावीत. त्या कोटेशन्सचा पूरेपूर अभ्यास करावा. उदा. रंगकामासाठी १००० चौ. फुटासाठी रु. २९/- प्रतिफूट या दराने एकूण रक्कम रु. २९,०००/- इतकी होते. यात चार गोष्टी तपासाव्यात. सर्वप्रथम १००० चौ. फुट हे प्रमाण बरोबर आहे का? दुसरे म्हणजे रु. २९/- प्रति चौ. फूट हा दर सद्य बाजारभावाच्या दृष्टीने योग्य आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे कॅलक्युलेशन अचूक आहे का? व चौथी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेसिफिकेशन्स तपासणे. स्पेसिफिकेशन्स म्हणजे करण्यात येणार असलेल्या कामाची संपूर्ण माहिती. रंगकामासंबंधी सांगावयाचे झाले तर त्यातदेखील बऱ्याच गोष्टी आहेत. रंग लावायच्या आधी लावण्यात येणारा प्रायमर व पुट्टी कोणत्या कंपनीची आहे. रंग कोणत्या कंपनीचा आहे. तसेच रंगाचे फिनिश कोणते आहे म्हणजे लस्टर फिनिश आहे का रॉयल टच/ वेल्वेट फिनिश आहे का टेफलॉन कोटींग आहे. हे रंगकाम कोणत्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे. या सगळ्या अभ्यासण्या योग्य बाबी आहेत, जेणेकरून फसवणूक होत नाही. साध्या वाटणाऱ्या रंगकामाची सुद्धा इतकी स्पेसिफिकेशन्स असतात. तर सिव्हिल व कारपेंटरीची किती स्पेसिफिकेशन्स असतात, तर सिव्हिल व कारपेंटरीची किती स्पेसिफिकेन्स असतील याचा आपणास अंदाज येऊ शकतो. हे तपासण्यासाठी जुजबी माहिती पुरेशी नाही म्हणूनच तज्ज्ञांची मदत घेणे हितावह ठरते.
कंत्राटदार निवडताना त्याच्याकडे अनुभवी कामगारांची फौज आहे याची खात्री करावी. जेणेकरून कामगारांअभावी काम बंद पडणार नाही. कामगार व कंत्राटदार दोन्ही अनुभवी असणे खूप गरजेचे आहे.
काम सुरू करण्याअगोदरच काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करावी.
काम सुरू करण्याअगोदर सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन सोसायटीचे सदनिका नूतनीकरणाबाबतचे नियम जाणून घ्यावे. जर सोसायटीची परवानगी घेणे अपेक्षित असेल तर परवानगी मागणारे व तशी गरज नसेल तर सोसायटीस सूचित करणारे पत्र सोसायटी ऑफिसमध्ये द्यावे. या पत्राचा मसुदा आपला इंटिरियर डिझाइनर आपणास देतो. साधारणपणे आम्ही इमारतीस कोणत्याही प्रकारचा धोका न पोचवता रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता, सोसायटीचे नियम पाळून महानगरपालिकेचे नियम पाळून घराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करू, अशा आशयाचे हे पत्र असते. या पत्राची पोचपावती घ्यावी व नियम असल्यास सोसायटी सेक्रेटरीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे.
हे आणि असे बरेच नियम आपणास सोसायटीच्या नियमावलीमध्ये आपणास आढळतील. जितकी सोसायटी मोठी तितकी नियमांची संख्या व काटेकोरपणा अधिक. सोसायटीस जर आपल्या कामामुळे काही नुकसान पोहोचले तर आपण भरलेल्या अनामत रकमेतून भरपाई केली जाते. शक्यतो कामाच्या सुरुवातीसच आवश्यक असणारे मटेरियल खरेदी करून मागवून घ्यावे. जेणेकरून सामाना
अभावी काम थांबणार नाही तसेच आपण निवडलेले मटेरियल बाजारात मिळेनासे झाले तरीही अडचण निर्माण होणार नाही. प्लायवूड, सिमेंट अशा गोष्टीत ही अडचण येत नाही, पण लॅमिनेटस्, विनियर, हार्डवेअर फिटिंग्ज, टाईल्स या बाबतीत ही अडचण निर्माण होऊ शकते.
काम सुरू असताना डिझाइन व इतर बाबतीत घेतलेले निर्णय बदलू नयेत. त्यामुळे कामाचे व कंत्राटदाराचे नुकसान होते. काही जण दर दोन दिवसाआड निर्णय बदलतात. त्याची परिणीती नुकसानात व पर्यायाने वादात होते.
इंटिरियर डिझाइनर हा अनुभवी व उत्तम महाविद्यालयातून शिकलेला असावा. त्यास इतर आवश्यक गोष्टींबरोबरच इमारतीचे तांत्रिक ज्ञानही असते. आपल्या घराचे नूतनीकरण करताना हे ज्ञान प्रचंड महत्त्वाचे ठरते. केवळ तीन/ सहा महिन्याचा क्रॅश कोर्स करून इंटिरियर डिझाइनर बनलेल्या टोळीपासून सावधान.
बरेच जण एखाद्या कंत्राटदाराला हाताशी धरून घराचे काम करतात. यापैकी बहुतांश कंत्राटदारांना व घरमालकांनाही इमारतीच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान नसते. म्हणूनच पुरेशा ज्ञानाअभावी घरात केलेले फेरफार हे केवळ घरासाठीच नव्हे तर पूर्ण इमारतीसाठी धोकादायक ठरतात. चुकीच्या पद्धतीने नळजोडणी करणे, इलेक्ट्रीकल काम चुकीच्या पद्धतीने करणे. चुकीच्या प्रकारे तोडफोड करणे. इमारतीच्या स्ट्रक्चरला म्हणजे कॉलम व बीमला नुकसान पोहचवते.. हे आणि असे अनेक भयंकर प्रकार काही इमारतींमध्ये केलेले आढळतात व त्याचे त्यांना काहीही सोयरसुतक नसते. असे करणे कटाक्षाने टाळावे, कारण या कामांची फळं अतिशय वाईट प्रकारे भोगावी लागतात. स्वत:लाही आणि निष्कारण इतरांनाही! या बाबतीत अतिशय कळकळीने सांगूनही बरेच घरमालक स्वत:च्या सोयीसाठी, स्वार्थीपणाने अशा बेकायदेशीर गोष्टी करतात. लपवून करतात किंवा आठमुठेपणाने करतात. या बेकायदेशीर गोष्टींमुळे संपूर्ण इमारतीस धोका पोहोचल्याची, इमारत पडल्याची, मनुष्य व वित्तहानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. संबंधित व्यक्तींना जबर दंड व तुरुंगवासही घडतो. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला अत्यावश्यक आहे.
आपण भलेही आपल्या घराचे मालक आहात, आपल्याकडे खूप पैसाही आहे, पण तरीही आपल्याला सगळे नियम लागू होतात. त्यामुळे नियमांच्या व कायद्याच्या चौकटीत राहूनच नैतिकतेचे काम करावे.
आपल्या घराचे नूतनीकरण सुरू करण्याअगोदर व केल्यानंतर वर नमूद केलेल्या खबरदारीच्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले काम नियोजित बजेटमध्ये व वेळेत अप्रतिमरित्या नक्कीच पूर्ण होईल.
नुतनीकरण करताना सोसायटीची नियमावली
* इंटिरियर डिझायनरचे पत्र देणे.
* अंतर्गत रचना बदलत असाल तर घराचा नवीन लेआऊट प्लॅन सोसायटीला देणे.
* काम पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी कळवणे.
* मटेरियल नेण्या-आणण्यासाठी लिफ्ट वापरू नये. जर सव्र्हिस लिफ्ट असेल तर कटाक्षाने त्या लिफ्टचाच वापर करावा.
* कामगारांनी लिफ्टचा वापर करू नये.
* रोज दुपारी २ ते ४ या वेळेत काम बंद ठेवावे.
* सकाळी ९.३० च्या आधी व संध्याकाळी ६.३० नंतर काम करू नये.
* कामगारांनी साईटवर रात्री मुक्काम करू नये.
* कामगारांनी स्वत:बरोबर ओळखपत्र बाळगणे.
* कामगारांनी इमारतीच्या आवारात इतरत्र फिरू नये.
* कामगारांची इमारतीबाहेर जाताना इमारतीच्या सुरक्षा रक्षकांकरवी तपासणी करणे.
* गेटपासशिवाय कोणतेही सामान इमारतीच्या आवाराबाहेर जाऊ न देणे.
* आवारात बाहेरून येणाऱ्या सामानाची तपासणी करणे.
* दर रविवारी, सणासुदीला व सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी काम बंद ठेवणे.
* तोडफोड करून खाली उतरवलेले सामान (डेब्री) इमारतीच्या आवारात विशिष्ट ठिकाणीच ठेवावे.
* डेब्री दिवसाच्या विशिष्ट वेळीच ट्रकद्वारे इमारतीच्या आवाराबाहेर काढणे.
* डेब्री अमुक एक दिवसांच्या कालावधीपर्यंतच आवारात ठेवणे.
* बाहेरून आवारात येणारे सामान दिवसाच्या विशिष्ट वेळीच आत आणणे.
* संपूर्णपणे स्वच्छता ठेवणे.
* नुतनीकरणाचे काम सुरू करण्याअगोदर सदनिका धारकाने अमूक एक रक्कम अमानत रक्कम म्हणून सोसायटी ऑफिसमध्ये भरणे.
अजित सावंत – ajitsawantdesigns@gmail.com