आपल्या घराचं रिनोव्हेशन करताना आपण अडगळमुक्तीचा मुहूर्त नक्कीच काढू शकता. किंबहुना काढावाच लागतो. रिनोव्हेशन सुरू करण्याअगोदरच अडगळ काढून टाकावी जेणेकरून शििफ्टग करायचे सामान कमी होईल. नवीन घरात रिनोव्हेशन करणार असाल तर जुन्या घरातील अडगळ नव्या घरी नेणे कटाक्षाने टाळावे. कामी येणारे मोजकेच सामान घेऊन जावे, जेणेकरून आपणास नवीन रिनोव्हेटेड घराचा आनंद मिळू शकेल.

आपल्या भारतीय स्वभावात एखादी गोष्ट टाकून देणे विशेष जमत नाही. मग ती गोष्ट जीर्ण, जुनी असो, बिनकामाची असो, बिघडलेली असो वा तुटकीफुटकी असो. बहुतांश गोष्टींमध्ये आपली भावनिक गुंतवणूक झालेली असते. काही पाश्चात्त्य देशांप्रमाणे ‘यूज अँड थ्रो’ ही संकल्पना आपल्याकडे तितकीशी रुजलेली दिसून येत नाही. वस्तूंची (बिनवापराच्या) विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जात नाही. त्या साचत जातात व पर्यायाने अडगळ निर्माण होते. कपाटात, लोखंडी कपाटावर, कपाट व भिंत यातील फटीत कपाटाखाली, माळय़ावर, बिनवावरातल्या खोलीत, बाल्कनीत, बॉक्स ग्रिलमध्ये, जिन्यात, गच्चीवर, इमारतींच्या चौकात, कंपाउंडमध्ये अशा असंख्य ठिकाणी ही अडगळ आपले अस्तित्व मोठय़ा दिमाखात टिकवून असते. या सगळय़ा अडगळ साठवण्याच्या अगदी हुकमी जागा आहेत व यात सगळय़ात वरचा क्रमांक लागतो तो माळय़ाचा. भंगारात देण्यासाठी ठेवलेले सामान, फुटक्या बादल्या, डबे, जुनी भांडी, प्लॅस्टिकचे जुने सामान, पितळेची भांडी, पाण्याच्या टाक्या, पिंप, पाण्याचे पाइप, मोडकी खेळणी, गंजलेली बाबागाडी किंवा सायकल या आणि अशा गोष्टींचं माळय़ावर राज्य असतं. कपाट व भिंतीमधील फटीत क्रिकेट बॅट, स्टम्प्स, बॅडमिंटनची रॅकेट, हॉकी स्टीक उभे राहून पार कंटाळलेले असतात, कारण त्यांच्याशी खेळणारे आता मोठे झालेले असतात. किंवा त्यांचा इंटरेस्ट संपलेला असतो. कपाटावर बॅग्ज व डिनर सेट्स (न उघडलेले) ठेवलेले असतात. कपाटात न होणारे व जुने कपडे असतात. नादुरुस्त मनगटी घडय़ाळं, जुने इअरिंग्ज असतात. बाल्कनीत जुना फुटबॉल, रद्दी, जुन्या छत्र्या ठेवलेल्या असतात.

बॉक्स ग्रिल तर कहर आहे. काही जण त्यात इतकं सामान साठवतात की एक दिवस ते कोसळेल अशी शंका यायला लागते.

काही गोष्टींना सेंटिमेंटल व्हॅल्यू असते. काही गोष्टी कालबाहय़ झालेल्या असतात. काही गोष्टी दुरुस्त करायला मुदतीची वाट पाहात असतात. काही मासिकांची/ वर्तमानपत्रांची कात्रणं भविष्यात कामी येऊ शकतील अशा आशावादावर आपली जागा टिकवून असतात. अशा असंख्य गोष्टी आपल्याला आपल्याच घरी आढळतील. एक गंमत म्हणून आपल्या घराच्या सगळय़ा कोपऱ्यांची चौकशी करा. बघा.. आपल्याला अशा कितीतरी गोष्टी आढळतील, ज्या आपण टाकून देऊ शकता.

परदेशात अडगळ फेकली जाते व ऐतिहासिक वारसा प्राणपणाने जपला जातो आणि आपल्याकडे अडगळ जपून ठेवली जाते व ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो.

या अडगळीतील वस्तूंचा कळत नकळत आपल्यावर नकारात्मक परिणाम होणारच. प्रगतीत अडथळे निर्माण होणार म्हणूनच अडगळ लवकरात लवकर नाहीशी करावी. अडगळमुक्त झाल्यावर घराच्या प्रसन्नतेत कमालीची वाढ होते व याचा सकारात्मक परिणाम घरात राहणाऱ्यांवर होतो. अडगळ काढण्याचा मुहूर्त सापडत नाही हा सगळय़ांनाच भेडसावणारा प्रश्न आहे.

आपल्या घराचं रिनोव्हेशन करताना आपण अडगळमुक्तीचा मुहूर्त नक्कीच काढू शकता. किंबहुना काढावाच लागतो. रिनोव्हेशन सुरू करण्याअगोदरच अडगळ काढून टाकावी जेणेकरून शििफ्टग करायचे सामान कमी होईल. नवीन घरात रिनोव्हेशन करणार असाल तर जुन्या घरातील अडगळ नव्या घरी नेणे कटाक्षाने टाळावे. कामी येणारे मोजकेच सामान घेऊन जावे, जेणेकरून आपणास नवीन रिनोव्हेटेड घराचा आनंद मिळू शकेल.

ध्यानधारणा अथवा नामस्मरण करून जशी आपण आपल्या मनातील जळमटे नाहीशी करतो, लंघन करून शरीरास साफ ठेवतो, तसेच घरातील अडगळ नाहीशी करून घर प्रसन्न ठेवावे, कारण आपले घर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते.

(इंटिरिअर डिझायनर)

अजित सावंत

ajitsawantdesigns@gmail.com

Story img Loader