सुचित्रा साठे
दरवर्षी तीनशे पासष्ट दिवसांचं ‘नवं’ पॅकेज आपल्या हातात पडत असतं. ते उघडण्याची अपार उत्सुकता असते. एक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो. मुळातच आपण आनंदस्वरूप असल्यामुळे मनमोर थुईथुई नाचू लागतो. त्यासाठी कोणी झगमगाटात, रोषणाईत, रंगगंधाच्या दुनियेत हरवतात, तर कोणाची घरातच सुरांच्या सहवासात ब्रह्मानंदी टाळी लागते.
बदल हा मानवी जीवनाचा हवाहवासा असा अविभाज्य भाग असतो. तोचतोचपणा टाळण्यासाठी ‘बदल’ आवश्यक असतो. म्हणून बदल होत असतो. कधी घडवून आणला जात असतो. त्या बदलाचं स्वागत केलं जातं. शाळेच्या विश्वातून बाहेर पडून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला की लगेच वेलकम पार्टी दिली जाते. रोजच्या रामरगाडय़ातून सुटका होण्यासाठी चार दिवस निसर्गाच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न केला जातो. दु:खातून सावरण्यासाठीसुद्धा जागाबदलाला अग्रक्रम दिला जातो. ऋ तुराजाचं म्हणजेच ऋतुबदलाचं स्वागत केलं जातं. असा बदल काळाच्या पोटातही दडलेला असतो. दरवर्षी तीनशे पासष्ट दिवसांचं ‘नवं’ पॅकेज आपल्या हातात पडत असतं. ते उघडण्याची अपार उत्सुकता असते. एक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो. मुळातच आपण आनंदस्वरूप असल्यामुळे मनमोर थुईथुई नाचू लागतो. त्यासाठी कोणी झगमगाटात, रोषणाईत, रंगगंधाच्या दुनियेत हरवतात, तर कोणाची घरातच सुरांच्या सहवासात ब्रह्मानंदी टाळी लागते कशी, तर अशी..
भिंतीलाही कान असतात, त्यामुळे संगीतप्रेमी कानसेन कान टवकारतात, सूर बोलावतातच. त्या नि:शब्द आमंत्रणाचा स्वीकार करत, सुरांचा मागोवा घेत सगळे घरात हजर होतात. सागरामध्ये जशी एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत चैतन्याचा खेळ चालू ठेवते, तसे घरामध्ये एकापाठोपाठ एक गाण्याचे सूर निनादत राहतात. काळी तबकडी फिरत राहते. सूरसागर उचंबळत राहतो.
‘माझी प्रीत जगावेगळी, कुणी म्हणो खुळी बावरी’ या आशाताईंच्या गोड आवाजातील गीताने सूरमयी वातावरणाची नांदी होते. चित्रपटाचं नाव ‘झंझावात’ असलं तरी पी. रमाकांत यांच्या संगीत संयोजनामुळे कवी शांताराम आठवले यांचे शब्द ऐकणाऱ्याच्या अंतरीच्या राऊळी ‘प्रीती’चा नंदादीप प्रज्वलित करतात. वत्सला कुमठेकर ‘सरकारी पाहुणे’ या चित्रपटात ‘मेरी आँखे नशिली’ असं चक्क हिंदीतून गातात. दत्ता डावजेकरांच्या संगीतातून ते ‘जरा हटके’ व्यक्त होतं. ‘द्रौपदी’ नाटकातील ‘ठरला जणू मत्सर राजा’ हे गीत इंदिराबाई खाडिलकर यांच्या दमदार आवाजातून ऐकताना, प्रत्यक्ष ज्यांना ऐकायला मिळालं त्यांच्याबद्दल खरंच मत्सर वाटायला लागतो. संजीवनी मराठे यांच्या संजीवक शब्दातून खटय़ाळ कान्हाविषयीच्या गोपींच्या तक्रारीचा सूर सुधा माडगांवकर लावतात. ‘पिचकारी उडवतो, दहीदूध भरलेला घडा फोडतो, मग सासू छळते, पण..’ असं असूनही ‘हा छेडी मंजूळ रागरागिणी’ आणि ती ऐकताच राग पळून जातो आणि ‘जीव वेडावला’ अशी गोपिकांची मन:स्थिती होते. त्याचीच परिणती म्हणून म्हणते, ‘जाईन सोडून राधे तुझा शेजार’ हा आधी ठरलेला बेतही बारगळतो. हे नाटय़ सुधा माडगांवकर स्वर चौकटीत गातात, अगदी स्वत:च्या नावाला साजेसं. त्याच्यापाठोपाठ एक सुरेल बातमी देतात की, ‘रघुवीर आज घरी येणार’. कसे? तर ‘कमल फुलांच्या पायघडय़ावर कमल पदे पडणार’ म्हणजे नाजूकतेचा, कोवळिकीचा अगदी समसमासंयोग होणार आणि मग ‘कमळ कळ्यांचे अधर प्रभूचे, अधरांनी टिपणार’ असा संयत शृंगार रंगणार, तोही ‘तेरा’ कमलांच्या साक्षीने म्हणजे तेरा वेळेला कमल शब्द वापरून. हे शब्दसृष्टीचे ईश्वर असलेले गदिमाच करू जाणे. अशी शृंगाराची कल्पना करणंसुद्धा वर्तमानात शक्य नाही, नाही का?
या शृंगारात मन क्षणभर विश्रांती घेत असताना बडोद्याचे विनायकराव पटवर्धन ‘कान्होपात्रा’ नाटकातील ‘पति तो का नावडे’ हे पटदीप रागाची सोबत घेत स्पष्टपणे सांगून टाकतात. त्यांची शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर आधारलेली आलापी कान इतके तृप्त करते की ‘का नावडे’ याचा विचारच मनाला शिवत नाही. चालू झालेला पटदीप रेंगाळतो आणि के. जी. अलूरकर यांच्या संगीत संयोजनाखाली कुमारी शामला यांची ‘अनिल नभ सागरी’ अशी स्वराधिष्ठित सुखद झुळूक तनमनाला आल्हाद देते.
ही आल्हादकता आणखीन वाढते ती संगीत संयोजन, गीतकार स. अ. शुक्ल ऊर्फ कुमुद बांधव यांच्या ‘मन मोहना गडे बोलाना’ या रचनेने. कुसुम तालीम यांनी यदुनंदनाचा रुसवा काढण्यासाठी केलेली आर्जव, शब्दांना वेढलेलं भावाचं कोंदण खरंच हृदयाला स्पर्श करते. नवऱ्याचं नाव घेताना लज्जेचे गुलाब फुलणं हे आता इतिहासजमा झालंय. कारण सतत नाव ओठी असतंच असतं. त्यातून दोघंही एकेरीवर आलेले आहेत; परंतु ‘नांव तिकडचं घेऊ कसं ग बाई’ असा प्रश्न कांचनमाला शिरोडकरांना पडला होता. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांचा शाब्दिक आधार घेत त्यांनी तो सुरात गुंफून टाकला.
‘हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविलेस केसात उगा का?
वाऱ्याचे हळू पीस फिरवूनी, उसळल्यास हिरव्या लहरी का?’ ही इंदिरा संतांची बहारदार काव्यरचना रंगांशी खेळणारी. वसंत आजगांवकर यांच्या आवाजातून ऐकताना हातांनी ठेका धरला नाही तरच आश्चर्य. ‘वसंत’ सूरच तो. ‘आनंदाने उडू बागडू, हरखून जाऊ’ अशीच कानसेनांची अवस्था करून टाकतो.
‘गुरुदत्त पाहिले कृष्णा तीरी, शतदीप उजळले माझ्या उरी’ ही कवी सुधांशु यांची भक्तिरचना. गायक आणि संगीतकार आर. एन. पराडकर यांच्या घोटीव, सुरेल आवाजातून ऐकताना अपार करुणेने मिटलेल्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंच्या सरी बरसत राहतात. भक्तीच, पण ती शब्दांवर, सुरांवर करणारे गदिमा आणि सुधीर फडके यांचे ‘एकटी’ चित्रपटात पाश्र्वभूमीवर वाजत एकटेपणा जिवंत करणारे, ‘स्वार्थाविण ना धर्म जाणती’ ही मनोवृत्ती ठळकपणे दाखवणारे करुण गीत म्हणजे ‘आईलाही विसरून जाती, या देशातील पिले अडाणी, चल सोडून जा हा देश पक्षिणी.’ मनाला घायाळ करणारी, पोटात खड्डा पाडणारी ही कातर सुरावट घराला नीरव शांततेत बुडवून टाकते.
या वातावरणातून जागं व्हायला मदत करतात ते ठाणेभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचे ‘मंदारमाला’तील आश्वासक स्वर, ‘हरि मोरे जीवन प्राण अधार’ या आधारावरच प्रभुगुंजन सुरू होते ते मधुकर जोशी यांच्या गीताने. ‘मधु’कर म्हणजे शब्दातून मध गोडवा ठिबकणारच. सुमनताईंच्या गोड आवाजातून आणि देवांच्या सुरेल स्पर्शातून भगवंताला साद घातली तर ‘घनश्याम’ रूपात तो दर्शन देणारच. ‘मधुवंतीच्या सुरासुरांतूनी आळविते मी नाम, एकदा दर्शन दे घनश्याम’ नुसती साद ही घराला प्रसन्नपणा बहाल करते.
या प्रसन्नतेत भर पडते ती, ‘कधी करिशी लग्न माझे’ या चित्रपटातील ‘डोळे असूनी डोळे भरूनी तुला साजणा’ या प्रेमगीताने. नजरेला नजरेमधला भाव उमगतो आणि काय घडतं तर एक रम्य कल्पना जनकवी पी. सावळाराम यांच्या शब्दांतून समोर येते. डोळ्यांचा खरा उपयोग होतो. ‘नटूनी थटूनी येत आज, कपोलात पहिली लाज’, डोळे ती टिपून घेतात आणि ऐकणारे मोहरतात.
बालगंधर्वाच्या आवाजातील माधुर्य पांघरतं आणि मा. दीनानाथ यांच्या आक्रमकतेला अंगीकारत पं. सुरेश हळदणकरांचा आवाज जणू स्वरराज्य करतो आणि ‘फुलपाखरा, दिलदारा’चे सूर घरात भरून जातात. या आक्रमणानंतर, ‘अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ’ हे इंदिरा संतांचे गीत सुमन स्वरातून वातावरणात बदल घडवून आणते.
या बदलाला हलकासा छेद देत ‘गंगेत घोडं न्हालं’ या चित्रपटातील ‘प्रेमात तुझ्या मी पडले रे’ हा गदिमा, बाबूजी आणि आशाताई यांचा प्रतिभाविलास ऐकून सगळेच सुरांच्या प्रेमात पडून चिंब भिजतात.
सात स्वरांची अशी असंख्य आंदोलनं घरात निनादत राहतात. त्यात घर हरवून बसते आणि मग..
‘कुणी तरी मजला जागे केले, जागेपणी मी मला विसरले’, प्रत्येकाच्या ‘मन की बात’च जणू रमेश अणावकर सांगून जातात. बाळ सावरे त्याला गेय बनवतात. कृष्णा कल्ले यांचा आगळा सूर मिटल्या डोळ्यासमोरच्या सृष्टीमध्ये अलगद सर्वाना फिरवून आणतो. खरं तर घर जागेच असते. येणाऱ्या नवीन वर्षांचे सूरमयी स्वागत करायला ते उत्सुकतेने वाट बघत असते.