आज सकाळी वेळेवर जाग येईल की नाही, या चिंतेने अनिलना काल रात्रभर झोप नव्हती. घडय़ाळाचा काटा वेळ काढकाढ काढून पुढे सरकतच नव्हता असं वाटत होतं. त्यांना भास होत होता, जणू घडय़ाळ आपली दया येऊन आपल्याला आयुष्याचे शेवटचे काही तास वाढवून देतंय. सगळं आवरून आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून रात्री झोपायला १२ वाजले होते. ऑपरेशनच्या आधी १२ तास काही खायचं नाही म्हणून डॉक्टरांनी बजावलं होतं. म्हणून रात्री आठ वाजताच जेवण उरकलेलं. आधीच आजारामुळे खालावलेली शक्ती, त्यात आवराआवर करताना झालेली दमणूक आणि होणाऱ्या ऑपरेशनचा मनावर आलेला प्रचंड ताण, यामुळे खरं तर जेवणानंतर लगेचच डोळे मिटत होते. पण प्रत्यक्ष झोपायला पाठ टेकल्यावर मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. स्वाभाविकच आहे म्हणा, कॅन्सरसारखा जीवघेणा आजार असल्यावर कोणाला शांत झोप लागेल? आज रात्री मी जे जेवलो, हे माझं या घरातलं शेवटचं जेवण असेल का? ही या घरातली शेवटची रात्र ठरेल का? आणि वाचलोच तर पुढे काय? ऑपरेशन होऊन आल्यावर कसं होणार? आपण एकटा जीव सदाशिव! घरात सोबतीला दुसरं कोणीच नाही, म्हणून वॉचमनच्या भावाला रात्रीला सोबतीला राहायला तर सांगितलंय. दिवसासाठी दुसरा माणूस बघतो म्हणालाय; पण नाही मिळाला कोणी, तर काय करायचं? आणि रात्रीचा माणूसही आजारी पडला, येऊ शकला नाही, तर आयत्यावेळी दुसरं कोण मिळणार? व्हॉट्सअप, फेसबुकसारखी सोशल नेटवर्क्‍स आणि त्यावरचे ते भातुकलीतल्यासारखे लुटुपुटीचे फ्रेण्ड्स.. किती तकलादू असतं हे सगळं. चीअरअपचा अंगठा दाखवून ‘गेट वेल सून’चे मेसेजेस येतील माझ्या मोबाइलवर. त्यातले काहीजण एखाद्दोन दिवस येतीलही माझ्या सोबतीला. पण ऑपरेशन होऊन घरी आल्यावर मी बरा होईपर्यंत कितीजण प्रत्यक्षात दिवसेंदिवस माझ्याबरोबर बसतील? गरज लागेल आणि माणूस नसेल, तेव्हा मला पॉट देतील? मेलो तर काय एकमेकांना माझ्या नावाने रेस्ट इन पीस हे लिहायलाही वेळ नसल्यामुळे आरआयपीचा शॉर्टफॉर्म आणि जोडलेले हात पाठवले की, झाली त्यांची श्रद्धांजली.. आणि पुन्हा पुढचे जोक्स पाठवायला मोकळे.. मला आज या सगळ्याचं वाईट वाटतंय, कारण माझा मृत्यू माझ्यासमोर उभा ठाकलाय. पण यात नवीन असं काहीच नाही. ही तर जगाची नेहमीचीच रीत आहे. आणि अगदी पूर्वापार चालत आली आहे. तुमचा उपयोग आहे, तोपर्यंत गुळाला डोंगळे चिकटावेत तसे लोक तुमच्याभोवती जमा होतील. पण तो एकदाचा संपला की, ओल्या जमिनीवरून तेलाचा थेंब कुठेही न चिकटता घरंगळत निघून जावा, तसं तुमच्या मायेच्या ओलाव्यावरून ही माणसं अगदी अलगद तुमच्यापासून दूर जातात.. पण यात माझीच चूक आहे. नको तेवढा जीव मी लावतच का गेलो? कशातही गरजेपेक्षा जास्त गुंतणं आणि मग त्या बदल्यात अपेक्षा ठेवणं, यामुळेच ही अशी सगळी मानसिक कुतरओढ वाटय़ाला आली. अध्यात्म तरी वेगळं काय सांगतं? संसारात, या जगात जास्त गुंतू नका, फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहा, याचा अर्थ तोच. आज खरं तर वयाची साठी ओलांडलेली असताना मृत्यूचं भय का वाटावं? आयुष्यभर आणि त्यातही अलीकडेच नोकरीतून झालेल्या निवृत्तीनंतर हे एकटेपणाचं जीणं ओझं वाटत असताना अनेकवेळा मृत्यूची आळवणी केली होती आणि आज खरोखरच तो समोर उभा ठाकला असताना भीती नेमकी कशाची वाटतेय? वेदनांची.. त्या भोगत असताना कोणाच्याही नसलेल्या साथीमुळे असलेल्या एकटेपणाची की, हा मृत्यूही या विश्वासघातकी माणसांप्रमाणेच प्राण घेण्याऐवजी जीवनदान देईल याची? वेळोवेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झाडाची पिकली पानं गळावीत, तशी एकेक करून सगळी नाती गळून पडलीत आणि आज मीच माझ्याशी असलेल्या शेवटच्या नात्यातून मोकळा व्हायची वेळ आली असताना, ही उदासी कशाला? पण एक मात्र बरं झालं, अचानक आडवे पडलो तर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला कोण असणार, या चिंतेतून मात्र या हळूहळू फोफावणाऱ्या कॅन्सरने मला मुक्त केलं. त्यामुळे मला माझ्या पायाने चालत जाऊन स्वत:च अ‍ॅडमिट होऊ देण्याइतकी दया या आजाराने मला दाखवली आहे. अनेकांचे बळी घेणारा हा कॅन्सर म्हणूनच मला आज दयाद्र्र वाटतो आहे. असा हा विचारांचा कोसळणारा पाऊस कधी थांबला ते अनिलना कळलंच नाही आणि पहाटे कधीतरी साडेतीन-चार वाजायच्या सुमाराला त्यांना झोप लागली.
अनिलना सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. रात्रभर बाहेर पडून गेलेल्या पावसानंतर मोकळ्या झालेल्या आकाशात विस्फारून आलेल्या कोवळ्या उन्हाच्या तिरिपेने त्यांच्या मनातही आशेची तिरीप निर्माण केली होती. केवळ अडीच-तीन तासांची झोप होऊनही का कोण जाणे, पण मनाला एक प्रकारची प्रसन्नता, शांतता आणि ताजेपणा जाणवत होता. तापलेल्या जमिनीवर नुकत्याच कोसळून गेलेल्या पावसाच्या सरींनी जमीन शांतवावी, तसं मनातल्या विचारांचा निचरा होऊन गेल्यानंतर आता खूप शांत वाटत होतं. पावसाचं पाणी जमिनीने जिरवावं, तसं आतापर्यंत अनेक संकटं, दु:खाचे प्रसंग आणि त्यातून झालेल्या वेदना जिरवणाऱ्या मनाची जमीन पुन्हा एकदा नव्या वेदना जिरवायला तयार झाली होती. इतकं सगळं सहन करायची ताकद त्यांना मिळत होती, ती त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे आणि विनोदबुद्धीमुळे. जणू हे दु:ख सहन करण्यासाठी देवाने या स्वभावाच्या रूपाने कवचकुं डलंच दिली होती. मनात कितीही दु:खाचं साचलेपण असलं तरी, चेहऱ्यावर कायम हसू आणि हजरजबाबी विनोद. यामुळे अनिल जिथे जायचे तिथे वातावरणात कायमच एक प्रकारचा जिवंतपणा आणायचे. अंघोळ आटोपून ऑपरेशन होणार असलेल्या जवळच्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये जायला ते निघाले. हॉस्पिटल तसं जवळच असल्यामुळे लगेचच तिथे पोहोचले. काऊंटरवरच्या रिसेप्शनिस्टने वेगवेगळे फॉर्म भरून घेतले. मग म्हणाली, ‘‘सर तुमच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना आता या फॉर्मवर सही करायला सांगा.’’
अनिल म्हणाले, ‘‘नातेवाईक नाहीत. पण मित्र  चालतील का?’’
रिसेप्शनिस्ट म्हणाली, ‘‘हो, चालतील की, त्यांना चालणार असेल, तर त्यांनी सही केली तरी चालेल.’’ तिने असं म्हटल्यावर अनिलनी तो फॉर्म घेतला आणि त्यावर सही केली. त्यावर रिसेप्शनिस्ट थोडीशी वैतागून म्हणाली, ‘‘अहो सर, मित्र सही करणार आहेत म्हणालात ना? मग तुम्हीच काय केलीत?’’
अनिलनी हसत विचारलं, ‘‘कोणताही माणूस स्वत:चा शत्रू असतो का? मी माझा मित्रच आहे, म्हणून केली सही. अहो मॅडम, मित्राला बोलावलंय. पण तोही माझाच मित्र, वेळेवर येईल, याची काय खात्री? उगाच खोळंबा नको. आणि हो, डॉक्टरांशी माझं कालच बोलणं झालंय. त्यांना सांगितलंय की, मीच सही करणार आहे आणि माझं काही बरं वाईट झालं तरी कोणी तुम्हाला जाब विचारायला येणार नाहीत.’’ अनिलनी हसत-हसत सांगितलं. डॉक्टर चालेल म्हणालेयत, तेव्हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. काऊंटरवरचे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर अनिलना वॉर्डबॉय कपडे चेंज करायला घेऊन गेला आणि नंतर त्यांना त्यांच्या बेडवर नेऊन सोडलं. आता डॉक्टर येतील पुढल्या तपासण्या करायला. तोपर्यंत पडून राहा, आराम करा, काका,’’असं सांगून वॉर्डबॉय निघून गेला.
बेडवर पडल्यापडल्या आजूबाजूच्या पेशंट्सकडे अनिल पाहात होते. हे हॉस्पिटल तसं जनरल हॉस्पिटल होतं. ते काही कॅन्सरचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नव्हतं. पण घराजवळ असल्यामुळे आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर हे ओळखीचे असल्यामुळे ऑपरेशननंतरच्या फॉलोअप व्हिजिटसाठी इथेच ऑपरेशन करायचं त्यांनी ठरवलं होतं. आजूबाजूला त्यांची नजर फिरायला लागली, तेव्हा काही पेशंट्स वेदनांनी विव्हळत होते, तर एका पेशंटला शरीरभर नळ्या आणि सुया लावल्या होत्या. पण कोमात असल्यामुळे तो शांतपणे झोपला होता. काही पेशंट बरे होऊन घरी जायच्या मार्गावर होते. इतक्यात अनिलांच्या बेडकडे त्यांचा मित्र आला. त्याला पाहून त्यांचा चेहरा फुलला. पण खटय़ाळ स्वभाव. त्यामुळे अशाही परिस्थितीत गप्प बसतील ते अनिल कसले? ते त्याला लगेच म्हणाले, ‘‘आलास विठ्ठल? ती रिसेप्शनिस्ट मघाशी ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करण्यासाठी तुझी चौकशी करत होती. पण तुझं आपलं नेहमीचंच, वरातीमागून घोडं. इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, डॉक्टर आफ्टर डेथ.’’
‘‘झालं का तुझं डेथ पुराण सुरू?’’ विठ्ठलनी विचारलं. त्यांचाही स्वभाव तसा थोडा फटकळ, पण प्रेमळ होता. त्यामुळे अनेकदा अनिल आणि विठ्ठल यांचे खटके उडायचे. पण वेळोवेळी एकमेकांचं तोंड न बघण्याच्या शपथा घेऊन किंवा अबोला धरूनही पुन्हा एकत्र येऊन दोघांची मत्री अनेक वर्षे जपलेली होती. विठ्ठलना अनिलनी अनेक कठीण प्रसंगांमध्ये मदत केली होती. त्याची त्यांना जाण होती. आताही कावलेल्या स्वरात पण हॉस्पिटल असल्याचं भान ठेवून काहीशा दबक्या आवाजात विठ्ठल म्हणाले, ‘‘अरे खरं तर हे आता सांगायची वेळ नाही. पण मी रागावलोय तुझ्यावर. एवढा मोठा आजार झाला आणि तू एका शब्दाने मला काही थांगपत्ता लागू दिला नाहीस. आणि काल मला फोन करून एखाद्या समारंभाचं आमंत्रण द्यावं तसं कळवतोस, उद्या सकाळपासून ये. माझं कॅन्सरचं ऑपरेशन आहे, ही काय पद्धत आहे? एखाद्या चांगल्या नावाजलेल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जायचं सोडून इथे कशाला आलास? नंतरच्या चेकअपला जवळ पडेल. हा काय विचार आहे?’’
अनिलनी शूऽऽ करत जमेल तेवढय़ा दबक्या आवाजात सांगितलं, ‘‘मला ना मदतीला येणाऱ्या माणसांचं हेच आवडत नाही. म्हणूनच तुला कळवलं नाही. मदतीला आल्यानंतर फक्त मदतच करावी. पण माणसं माझी अक्कल काढणार आणि मदत करणार म्हणून आपले सल्लेही ऐकले पाहिजेत हा आग्रह धरणार. हेच मला बिलकूल आवडत नाही. प्रत्येकाच्या स्ट्रेंग्थ्स आणि वीकनेसेस वेगवेगळे असतात आणि त्यानुसार तो निर्णय घेत असतो, हे लक्षात ठेवून मदतीला जाणाऱ्या माणसाने आपल्या दृष्टिकोनातून विचार करून काय चूक आणि काय बरोबर, हे ठरवण्यापेक्षा ते ज्याचं त्याला ठरवू द्यावं. आपण फक्त मागितलेली मदत करावी. हे होणार नाही म्हणूनच आधीपासून कळवलं नाही. तू काय बाबा, चार दिवस येशील मदतीला. मला नंतर केमोथेरपी किंवा लाईट वगरे घ्यायला लागलेत तर आणि नंतर वर्षांनुर्वष चेकअपसाठी खेटय़ा मारायच्यात. तेव्हा काय सगळ्यावेळी तू असणार?’’ विठ्ठल त्यावर पटकन हसले. अनिलनी विचारलं, ‘‘काय झालं? हसण्यासारखं काय बोललो? अरे तुझ्या लक्षात येतंय का, कालपासून माझ्याशी फोनवर बोलताना आणि अगदी आता मी इथे आल्यावरही परतपरत मरण, सुटका वगरे गोष्टी तू करतोयस आणि वर्षांनुवर्ष चेकअपला यायच्याही गोष्टी करतोयस. किती हे विरोधी बोलतोस?’’
अनिल म्हणाले, ‘‘कशाची गॅरंटी आहे रे? मरण येईल याचाही भरवसा नाही आणि जगेन याचाही भरवसा नाही. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायची तयारी जशी आयुष्यभर वेगवेगळ्या संकटांमध्ये ठेवली, तशीच आताही ठेवावी लागतेय.’’
‘‘खरंय बाबा अनिल, शत्रूच्यासुद्धा वाटय़ाला येऊ नये अशी दु:खं आणि संकटं तुझ्या वाटय़ाला आलीत. तू म्हणून ती भोगलीस’’ विठ्ठल म्हणाले.
त्यावर अनिल म्हणाले, ‘‘नाहीतर दुसरं काय करू शकतो आपण? जीव वगरे द्यायचा प्रयत्न करून काही उपयोग नसतो. कारण इतर गोष्टींप्रमाणे त्यातही अपयश आलं, तर धडधाकट असताना आपण किमान हातपाय हलवून स्वत:चं पोट तरी भरू शकतो, तेही करता येणार नाही. विठ्ठल, तो बघितलास तिकडे कोमात असलेला पेशंट? इतक्या नळ्या लागल्यायत, सुया खुपसल्या आहेत, पण चेहऱ्यावर बघ किती शांत भाव आहेत. कारण काही कळतच नाहीये. सगळा त्रास काय तो आजूबाजूच्यांना. त्याला काहीच कळत नाहीये. विठ्ठल,  हे जे सगळं माणसाच्या दु:खाचं मूळ आहे ना, ते माणसाच्या मेंदूत आहे. व्हेअर देअर इज ब्रेन, देअर इज पेन. संवेदना आहे, तिथे वेदना आहे बघ. म्हणून तर ऑपरेशनच्या आधी अ‍ॅनेस्थेशिया देतात ना. संवेदना गेल्या की, वेदना गेल्या.’’ काही वेळापूर्वी शेजारच्या पेशंटकडे तपासायला आलेल्या निवासी डॉक्टरांनी आणि नर्सने हा संवाद ऐकला होता. त्या पेशंटची तपासणी उरकून ते अनिलना तपासायला आले.
डॉक्टर म्हणाले, ‘‘काका किती छान बोलता हो तुम्ही.’’
नर्स म्हणाली, ‘‘अगदी खरं तेच बोललात. आम्हीही इतके वर्ष पेशंटच्या बाबतीत हेच बघत आलोय. इथे येणाऱ्या सगळ्याच पेशंटना काही ना काही दुखणी असतात, म्हणून तर ते इथे येतात. पण या दुखण्यांचा फार विचार, काळजी न करणारे, शांत स्वभावाचे पेशंट असतात ना, ते कधी दुखतंय-दुखतंय म्हणून आरडाओरडा करत नाहीत. पण सारखी स्वत:चीच काळजी करत राहणारे पेशंट मात्र, उगाचच सारखा त्रागा करत राहतात. पण काका तुमचा खंबीरपणा आणि एकूणच आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन आवडला.’’
‘‘काका, मनाने खंबीर असलेले पेशंट नेहमी आजारावर मात करून बरे होऊन घरी जातात. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीही नक्की बरे होऊन घरी जाणार.’’ डॉक्टरांनी दिलासा दिला. ‘‘बरं काका, आता थोडय़ा वेळात तुमचे सर्जन येतील. ते तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलावतील. तोपर्यंत त्यांनी आम्हाला काही टेस्ट करून घ्यायला सांगितलं आहे. त्या करून घेऊया. अगदी आता आहात तसेच रिलॅक्स्ड राहा.’’ मग ब्लड टेस्ट्स, एक्स-रे, वगरे झाले. साधारण दीडएक तासानंतर ऑपरेशन करणारे डॉक्टर अरुण काटकर आले. त्यांनी अनिल आणि विठ्ठलना त्यांच्या खोलीत बोलावलं. डॉक्टर सांगायला लागले- ‘‘तुम्हाला छातीच्या मधल्या भागात दोन्ही बाजूच्या बरगडय़ांच्या मधल्या भागात जी गाठ हाताला लागत होती, त्याचा काही भाग आपण आधी काढून घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. त्यात कॅन्सर असल्याचं दिसून आल्यामुळे आज ऑपरेशन करायचा निर्णय घेतल्याचं मी तुम्हाला याआधीच सागितलं होतं. म्हणून तर आजचं ऑपरेशन आपण ठरवलं. खरं तर यापेक्षा जास्त माहिती आम्ही पेशंटना देत नाही. कारण ते खचून गेले तर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देणार नाहीत. पण तुम्ही आग्रहच धरलाय आणि तसे तुम्ही खंबीर आहात असं दिसतंय. शिवाय तुमचे कोणी नातेवाईक नाही, असंही तुम्ही मला म्हणाला होतात. त्यामुळे मग तुम्हाला सांगायचा निर्णय मी घेतला.
तुम्ही विचारलं होतंत की, हा नेमका कसला कॅन्सर आहे. याला ‘सीयूपी’ म्हणजे ‘कॅन्सर ऑफ अननोन प्रायमरी-ओरिजन’ असं आम्ही मेडिकल टम्र्समध्ये म्हणतो. अननोन प्रायमरी-ओरिजन असं म्हणायचं कारण, यामध्ये पहिला टय़ुमर म्हणजे कॅन्सरची जी पहिली गाठ तयार होते, ती सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही. ती आकारानेही बऱ्याचदा लहान असते. पण तो टय़ुमर शरीराच्या इतर भागांमध्ये अनेक लहान लहान टय़ुमर तयार करतो आणि या इतर गाठींकडे लक्ष जाऊन कळेपर्यंत हा कॅन्सर शरीरात बऱ्याच पुढच्या स्टेजपर्यंत गेलेला असतो. त्यामुळे ८० ते ८५ टक्के केसेसमध्ये पेशंट दगावतात. पण तुम्ही सुदैवाने उरलेल्या १५ टक्क्यांमधले पेशंट आहात, हे मला सांगायला आनंद वाटतो. प्राथमिक टय़ुमरची शरीरातली जागा शोधणं हे कठीण असतं. पण तुमच्या बाबतीत एक प्राथमिक आणि अजून एकच गाठ तयार झाली आहे आणि या दोन्ही गाठींची जागा आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही गाठी काढून टाकल्यात की, त्यानंतर कदाचित तुम्हाला केमोथेरपीचे काही डोसेस द्यावे लागतील. त्यानंतर मात्र, धोका बऱ्यापकी कमी होऊ शकेल. तुम्हाला झालेला कॅन्सर हा स्कीन म्हणजे चामडीचा कॅन्सर आहे. थोरेसिक कॅव्हिटी म्हणजे छातीच्या पोकळीत मेडिआस्टिनममध्ये म्हणजे पोकळीच्या मध्यवर्ती भागात बरगडय़ांच्या बाजूच्या भागाशी निगडित असलेल्या स्कीनमध्ये या गाठी आहेत. पुरुषांमध्ये सर्वसाधारणपणे असा कॅन्सर आढळतो. स्कीनचे दोन थर असतात. यातल्या एपीडर्मीस या वरच्या थरात तीन प्रकारच्या पेशी असतात. यापकी बेसल प्रकारच्या पेशींमध्ये हा कॅन्सर असून त्याला बेसल सेल कार्सनिोमा असं म्हणतात आणि तो नॉन मेलानोमा या प्रकारात मोडतो. यात बरं व्हायचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच तुम्ही बरं व्हायची शक्यता जास्त आहे. खरं तर हे सगळं तुम्हाला कळणार नाही म्हणून मी केवळ तुम्ही बरे होणार एवढंच सांगितलं असतं तर तुम्हाला वाटलं असतं की, केवळ तुमच्या मनाला बरं वाटावं म्हणून मी खोटं बोलतोय. म्हणून मुद्दाम हे सगळं तपशीलवार सांगितलं. ’’
हे सगळं ऐकल्यावर अनिलच्या मनाला शांती मिळाली. मग दुपारी चार वाजता ठरल्यानुसार ऑपरेशन पार पडलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं डॉक्टरांनी विठ्ठलना सांगितलं. थिएटरमधून बाहेर पडल्यावर आधी रिकव्हरी रूम आणि नंतर आयसीयूमध्ये हलवलं गेलं. इथे एकदाच फक्त बघून यायची परवानगी विठ्ठलना दिली होती. साडेसहा-सातनंतर हळूहळू अॅनस्थेशिया उतरल्यावर छातीतली दुख अनिलना थोडीथोडी जाणवायला लागली. विठ्ठल सगळा वेळ बाहेर वेटिंगरूममध्ये बसून होते. खरं तर अशावेळी बाहेरचा माणूस काहीच करू शकत नाही. पण पेशंटला काही लागलं, तर आपण जवळच असल्याचं समाधान बाहेर बसलेल्या माणसाला असतं आणि आतल्या पेशंटला बाहेर कोणीतरी आपलं असल्याचा आधार मनाला वाटत असतो. दुसरा दिवस उजाडला. अनिल आता बऱ्यापकी शुद्धीवर आले होते. दोन दिवसांनी त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवलं. हळूहळू लिक्विड डाएटवरून डाळभातवगरे चालू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं. हॉस्पिटलमध्ये जेवण मिळायची सोय होती. पण आपल्या मित्रासाठी विठ्ठल घरून जेवणाचा डबा घेऊन येत होते. विठ्ठलच्या पत्नी, मुलगा आणि सून अनिलना भेटून गेले. अनिलना आता छातीतली दुखही आता बरीच कमी झालेली जाणवत होती. ते त्यांच्या बेडवर बसायला लागले. शेजारच्या पेशंटबरोबर आणि त्यांच्या नातेवाईकांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा रंगायला लागल्या. आपल्या आणि इतरांच्या आयुष्यातले अनुभव, अडचणी, आणि त्यावर आपण तसंच इतर लोकांनी कशी मात केली हे अनिल त्या पेशंटना सांगत असताना त्यांचं दु:ख खरंच इतरांपेक्षा कमी कसं आहे, हे त्या पेशंटना जाणवायला लागल्यामुळे त्या पेशंटचा जगण्याचा आत्मविश्वास बळावायला लागला. हसरा चेहरा आणि अधूनमधून विनोदाचा शिडकावा यामुळे वॉर्डबॉय, नर्स आणि निवासी डॉक्टरांचेही अनिलकाका लाडके झाले होते. त्यामुळे अनिलना एक नवं कुटुंब मिळालं होतं. योगायोगाने आणखी एक गोष्ट घडली. त्यांच्या शेजारच्या बेडवर एका प्रकाशकाचा नातेवाईक होता. त्या प्रकाशकाने अनिलना एक नवी कल्पना सुचवली. तो म्हणाला की, तुम्ही या हॉस्पिटलमधल्या पेशंटच्या मनावरचा भार तर तुमच्या उपस्थितीने आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून कमी केलात. तसंच इतर हॉस्पिटलमधल्या, वृद्धाश्रमांमधल्या वृद्धांनाही तुम्ही आनंद देऊ शकता.
अनिल म्हणाले, ‘‘अरे बाबा, माझे आता केमोथेरपीचे डोसेस सुरू होतील आणि अजूनही अशक्तपणा आहेच. मी कुठे जाणार हे सगळं करायला?’’
त्यावर तो प्रकाशक म्हणाला. तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून ऑडिओ बुक्सचं रेकॉìडग करून घेऊ. ज्या पेशंटना किंवा वृद्धांना लांब कुठे जाता येत नाही, वाचायचं म्हटलं, तर दृष्टी साथ देत नाही अशांना किमान चांगलं ऐकू येत असेल, तर इअरफोन लावून पडल्याडल्यासुद्धा तुमच्या या गप्पा, वेगवेगळ्या कादंबऱ्या, पुस्तकं ही श्राव्य स्वरूपात ऐकता येतील. तुमचा आवाज अजून खणखणीत आहे. तुम्हाला झेपेल, जमेल तसं आम्ही घरी येऊन रेकॉìडग करून घेऊ आणि तुमच्या आवाजातली ही ऑडिओबुक्स राज्यभरात किंवा जिथे जिथे मराठी माणसं आहेत, तिथे पोहोचवू. अनिलना ही कल्पना आवडली. ते लगेच तयार झाले. कारण यात त्यांचे बरेच प्रश्न सुटणार होते. एकटेपण सरणार होतं. दिवसभराच्या कामामुळे घरी कोणी ना कोणी असणार. त्यामुळे दिवसाच्या सोबतीचा प्रश्न सुटणार होता. निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा, याचाही प्रश्न सुटणार होता आणि समाजासाठी काहीतरी केल्याचं समाधानही मिळणार होतं. अनिलना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता.  इथे येताना सोबत आणलेली सगळी नकारात्मकता घरी परत जाताना कॅन्सरच्या गाठीसारखीच मनातून काढून टाकलेली होती. हॉस्पिटलमध्ये जायला निघताना आलेल्या टेन्शनची आठवण होऊन अनिलना हसू आलं. या हॉस्पिटलने केवळ आजारातूनच उभं केलं नाही, तर आयुष्याच्या संध्याकाळी स्वत:च्या पायावर उभं करतानाच स्वत:चं असं एक मोठं सामाजिक कुटुंबही या हॉस्पिटलने दिलं होतं. त्यामुळे प्रफुल्लित मनाने सर्वाचा निरोप घेऊन अनिल तिथून बाहेर पडले..
मनोज अणावकर -anaokarm@yahoo.co.in

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद