अपार्टमेंट संघाच्या व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्यासाठी निवडलेल्या पदाधिकाऱ्यांची काय काम करावे, याचे विवेचन यात असून, त्यानुसार संघाचे कामकाज चालवावे लागते. बऱ्याच अपार्टमेंट संघांमध्ये पदानुसार काम कोणते करावे याची माहिती नसते. त्यामुळे संघाचे कामकाज उपविधीनुसार चालविले जात नाही. म्हणून या लेखात त्याचे सविस्तर विवेचन देत आहे.
नियम क्र. ३२ – पदनाम (डेसिग्रेशन)
प्रत्येक अपार्टमेंट असोसिएशन (संघाचा)ची स्थापना झाल्यानंतर खालील व्यक्ती निवडावे म्हणतात.
१) अध्यक्ष- १ पद २) उपाध्यक्ष- १ पद ३) सचिव- १ पद ४) खजिनदार- १ पद
याव्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास सहाय्यक खजिनदार किंवा सहाय्यक सचिवाचे पददेखील संघाला भरता येऊ शकेल. सर्वसाधारणपणे १००च्यावर अपार्टमेंटधारकांची संख्या असेल तेथे जादा पदांची व व्यक्तींची आवश्यकता भासते.
नियम क्र. ३३- व्यवस्थापक समिती संघाचे कामकाज चालविण्यासाठी दरवर्षी सदस्यांची निवड करेल व त्यांचा कालावधी व्यवस्थापक समिती ठरवेल.
नियम क्र. ३४- व्यवस्थापक समितीच्या बहुमताने समिती सदस्याला काढून टाकता येऊ शकते. त्यामुळे कोणते कारण असो किंवा नसो. त्यानंतर नवीन सदस्यांची निवड पुढील सभेमध्ये करता येते. त्यासाठी स्वतंत्र सभादेखील बोलावता येऊ शकते.
नियम क्र. ३५- अध्यक्षाचे अधिकार- प्रत्येक अपार्टमेंट संघाचा अध्यक्ष संघाचा प्रमुख म्हणून काम करेल व प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवेल व सभेचे कामकाज पाहील. तसेच तो त्याच्या अधिकारात अपार्टमेंटधारकांमधून कोणालाही व्यवस्थापक समिती सदस्य म्हणून निवडू शकेल. अध्यक्ष म्हणून तो त्याचे संपूर्ण अधिकार संघाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे चालविण्यासाठी वापरेल.
नियम क्र. ३६ – उपाध्यक्षांचे अधिकार- प्रत्येक अपार्टमेंट संघाचा उपाध्यक्ष ज्यावेळी संघाचा अध्यक्ष उपलब्ध नसेल किंवा तो काम करू शकत नसेल; तर त्याच्या जागी बसून संघाचे कामकाज चालवेल. जर अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपलब्ध होत नसतील किंवा काम करू इच्छित नसतील तर तात्पुरती सोय म्हणून व्यवस्थापक समितीमधील कोणी एक व्यक्ती संघाचे कामकाज चालवेल; पण संघाचे दैनंदिन कामकाज खोळंबले जाणार नाहीत.
नियम क्र. ३७ सचिवाचे अधिकार- प्रत्येक अपार्टमेंट संघाच्या समितीमध्ये सचिवपदाला फार महत्त्व असते. कारण सचिवांकडे संघाची सभा बोलावणे, त्याची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभेचे इतिवृत्त तयार करणे तसेच संघाची हिशोबपुस्तके, नोंदवह्य़ा अद्ययावत करणे या प्रकारची सचिव पातळीवरील कामे करावी लागतात. तसेच संघाचे दप्तर अद्ययावत ठेवून प्रत्येक अपार्टमेंटधारकांचे प्रश्न व्यवस्थापक समितीमार्फत सोडविण्याचे मुख्य कार्य सचिवाला करावे लागते.
नियम क्र. ३८- खजिनदाराची कामे- अपार्टमेंट संघाचा खजिनदार संघाच्या आर्थिक हिशोबास जबाबदार असतो. संघाच्या ठेवी योग्य ठिकाणी ठेवणे, संस्थेचा जमा-खर्च ठेवणे, लेखापरीक्षण करून घेणे या प्रकारची आर्थिक व्यवहाराची कामे खजिनदाराची असतात.
अपार्टमेंटधारकाची कर्तव्ये
नियम क्र. ३१ – मासिक वर्गणी ठरविणे- प्रत्येक अपार्टमेंटधारकाच्या घोषणापत्रातील त्याच्या हिश्श्याच्या प्रमाणात अपार्टमेंटचा दैनंदिन खर्च किती होतो त्या प्रमाणात नक्की करावा लागतो. त्यानुसार प्रत्येक अपार्टमेंटधारकाने त्याच्या हिश्श्याची रक्कम संघाला नियमितपणे अदा करावी लागते. त्यामध्ये इमारतीचा विमा उतरविणे व त्यांची रक्कम ठरविणे, तसेच राखीव निधी ठरविणे, मासिक खर्च ठरविणे याप्रमाणे विभागणी करून ते प्रत्येक सभासदास वेळोवेळी लेखी कळविण्याचे काम व्यवस्थापक समितीला करावे लागते.
नियम क्र. ४०- देखभाल व दुरुस्ती खर्च
१) प्रत्येक अपार्टमेंटधारकाने त्याच्या सदनिकेतील दुरुस्तीचा खर्च स्वत:च करावयाचा असतो. त्यानुसार व्यवस्थापक समितीने त्याचा तपशील तयार करून देणे आवश्यक आहे.
२) प्रत्येक अपार्टमेंटधारकाने स्वत:च्या सदनिकेतील दुरुस्तीचा खर्च कोणकोणत्या बाबीवर करावा याचा तपशील पुढीलप्रमाणे- १) नळ, २) वीज, ३) गॅस, ४) टेलिफोन, ५) वातानुकूलित यंत्र, ६) स्वच्छतागृह व त्यातील सोयी, ७) दरवाजे, ८) खिडक्या, ९) दिवे, इ.
३) याव्यतिरिक्त सामायिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो अपार्टमेंट संघाने ठरवला असेल तो प्रत्येक अपार्टमेंटधारकाने त्याच्या हिश्श्याच्या प्रमाणात संघाला वेळोवेळी दिला पाहिजे.
नियम क्र. ४१
१) प्रत्येक अपार्टमेंटधारकाने जर सदनिका निवासासाठी घेतली असेल तर त्याचा वापर निवासासाठीच करणे आवश्यक आहे.
२) प्रत्येक अपार्टमेंटधारकाने त्याच्या सदनिकेमध्ये अंतर्गत बदल करावयाचा झाल्यास तसे संघाला लेखी कळवून त्याची पूर्वपरवानगी घ्यावी. जर ३० दिवसांत अपार्टमेंट संघाच्या व्यवस्थापनाकडून काही उत्तर आले नाहीतर संघाची अंतर्गत दुरुस्तीस हरकत नसल्याचे समजावे.
टीप- आराखडय़ानुसार बांधलेल्या सदनिकेत बदल करावयाचा झाल्यास महानगर पालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
नियम क्र. ४२- सामायिक जागेचा वापर
१) सदनिकेच्या बाहेरील जागेमध्ये किंवा जिन्यामध्ये किंवा जिन्याखाली किंवा अन्यत्र कोणताही अपार्टमेंटधारक त्या जागेत कोणतीही वस्तू किंवा सामान ठेवू शकणार नाही. त्या जागेचा वापर सर्वानी करावयाचा असतो. त्यात कोणतेही अडथळे निर्माण करता येणार नाहीत.
२) सामानाची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र जागा किंवा मार्ग करून ठेवला असल्यास त्यामध्ये कोणतेही अडथळे कोणालाही उभे करता येणार नाहीत.
नियम क्र. ४३
१) प्रत्येक अपार्टमेंटधारक संघाने नेमलेल्या व्यवस्थापकास आपल्या सदनिकेत प्रासंगिक कारणाने प्रवेश करावयाचा झाल्यास त्याला मज्जाव करता येणार नाही. त्या वेळी सदनिकेचा मालक उपस्थित असो किंवा नसो.
२) एक अपार्टमेंटधारक दुसऱ्या अपार्टमेंटधारकाच्या व्यक्तीस किंवा त्याला स्वत:ला त्याच्या सदनिकेत दुरुस्तीच्या कारणास्तव प्रवेश करू देईल. उदा. बाथरूम गळती, किचन, ओटा गळती, इ. कारणास्तव अन्य व्यक्तीच्या गाळ्यामध्ये गळती होत असल्यास दुरुस्तीसाठी तसेच तपासणीसाठी मजुराला किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला गाळ्यात प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपसात चर्चा करून मार्ग काढावा. त्यासाठी व्यवस्थापनाने सहाय्य करावे.
नियम क्र. ४४
१) कोणताही अपार्टमेंटधारक इमारतीवर संघाच्या पूर्वपरवानगीशिवाय जाहिरातीचे फलक, पोस्टर्स लावणार नाही.
२) कोणत्याही अपार्टमेंटधारकाला शेजारील सदनिकेतील व्यक्तींना त्रास होईल या आवाजाने रेडिओ, दूरदर्शन, गाणी लावता येणार नाहीत. तसेच पाळीव प्राणी सदनिकेत ठेवावयाचे झाल्यास महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी.
३) अपार्टमेंटच्या बाल्कनीमधून किंवा खिडकीमधून ओले कपडे पिळून वाळत घालण्याचे प्रत्येक अपार्टमेंटधारकाने टाळले पाहिजे.
४) तसेच अपार्टमेंटच्या खिडकीमधून किंवा बाल्कनीमधून खाली केरकचरा, कागद, घाण टाकता कामा नये.
५) अपार्टमेंट संघाने निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी केबलचे यंत्र (डिश), एसी मशीन, सोलर पॅनेल, इ. लावू नये. ज्यायोगे इमारतीच्या बाहेरील भागाला नुकसान पोहोचेल. शक्यतो त्यासाठी सामायिक गच्चीचा वापर केल्यास इमारतीला धोका पोहोचणार नाही.
याप्रमाणे प्रत्येक अपार्टमेंटधारकाने नियमांचे पालन योग्यप्रकारे केल्यास सहकार्याच्या भावनेतून अपार्टमेंटधारक गुण्यागोविंदाने नांदू शकतील असे वाटते व एकमेकांत वाद निर्माण होणार नाहीत.
अॅड. जयंत कुलकर्णी – advjgk@yahoo.co.in