राज्यात १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन दिन म्हणून पाळण्यात येतो. अग्निप्रतिबंधक उपाययोजनेत मॉक / फायर ड्रीलची उपयुक्तता अधोरेखित करणारा लेख.
१४ एप्रिल हा दिवस राज्यात ‘अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर अग्निसुरक्षा यंत्रणेतील त्रुटी व अग्निशमन तरतुदींचे व नियमावलींचे होणारे व्यापक उल्लंघन व आगप्रतिबंधक उपाययोजनेत मॉक / फायर ड्रीलची उपयुक्तता जाणून घेऊ या.
आजपर्यंत लागलेल्या एकूण आगीच्या घटना पाहता ५० टक्क्यांहून अधिक दुर्घटना लघुपथनामुळे म्हणजेच शॉर्ट-सर्किटमुळे घडल्या आहेत. राज्यातील अनेक इमारतींमधील विद्युत यंत्रणा धोकादायक बनली आहे.
वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स लोंबकळताना दिसतात व ठिकठिकाणी तुटलेल्या वायर्स बदलण्याऐवजी टेप गुंडाळून जोडल्या जातात. हे अत्यंत धोकादायक आहे. तसेच आग लागल्यावर लिफ्टचा अर्थात उद्वाहनाचा वापर करू नये असा साधा-सरळ नियम असूनसुद्धा ठाणे व पवई येथील इमारतींत आग लागल्यावर उद्वाहनाचा वापर केल्यामुळे गुदमरून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार घर मालकांना व सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपले घर / इमारत आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे याची तपासणी करून घेणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र वर्षांतून दोन वेळा सादर करणे बंधनकारक केले आहे.
अग्नी लेखापरीक्षण (फायर ऑडिट) तसेच अग्निप्रतिबंधक आणि सुरक्षा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्यानेच आगीच्या घटना गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या आहेत. इमारतींच्या अग्निसुरक्षेसाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असते तरी त्यानुसार खाजगी संस्थांकडून पुरेसे काम होत नसल्याचा ठपका अग्निशमन केंद्रानी ठेवला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने उंच इमारती, मॉल्स, व्यावसायिक इमारती आणि हॉटेल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली असता बहुतांश उंच इमारती, मॉल्स व हॉटेल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या तर काही ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे आढळून आले. तीच गोष्ट मंत्रालयाला लागलेल्या आगीची. मंत्रालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल-ऑडिट तोपर्यंत कधीच करण्यात आले नव्हते. त्यामुळे राज्याच्या सर्वोच्च यंत्रणेचे व्यवस्थापन किती निष्काळजी आहे ही बाब अधोरेखित होते.
अग्निशमनाची जुनी कार्यपद्धती, शिस्त आणि समन्वयाचा अभाव यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. परिणामी वित्तहानी आणि जीवितहानी होण्यास मदत होते. काळबादेवी येथील गोकुळ हाउसला लागलेल्या आगीत चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या अभ्यासगटाने अग्निशमन दलाच्या आग विझविण्याच्या जुन्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतला आहे व आग शमविण्यासाठी कशा पद्धतीने कारवाई करावी याचा अभ्यास करून नवी व पुनर्रचित कार्यप्रणाली लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याबाबतचे प्रशिक्षण अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावे आणि आग लागून आगीचा भडका उडाल्यानंतर गोंधळ होऊ नये म्हणून घटना अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे सूचित केले आहे.
आग लागल्यानंतर तातडीने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी रस्त्यावरील ‘फायर हायड्रॅंट’ पुनर्जीवित करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. शहरातील विविध भागांत वेगवेगळ्या वेळी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ज्यावेळी आग लागेल त्यावेळी त्या भागात पाणीपुरवठा सुरू असणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यावरील ‘फायर-हायड्रॅंट’करिता पाणीपुरवठय़ाची स्वतंत्र व्यवस्था कशी करता येईल याचा अभ्यास करण्यात येत आहे.
अग्नी लेखापरीक्षण पूर्ततेबरोबरच आगप्रतिबंधक उपाययोजनेतील खालील गोष्टीवर विशेष भर देऊन व्यापक जनजागृती, स्वयंशिस्त आणि अग्निशमन तरतुदींचे तसेच नियमावलींचे काटेकोरपणे पालन केल्यास वारंवार लागणाऱ्या आगीमुळे होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यास मदत होईल.
(अ) सोसायटीच्या इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखालील विजेचे सर्व मीटर्स, मेन स्विच व अन्य विजेची उपकरणे सुरक्षितस्थळी हलवावीत. पावसाळ्यात अशा भागात पाणी भरल्यास शॉक लागण्याची तसेच शॉर्ट सíकट होऊन आग लागण्याची अधिक शक्यता असते.
(ब) संस्थेतील सभासदांच्या सोयीनुसार दर महिन्यातून एकदा फायर ड्रील करण्यात यावे. आग लागल्यास सुसूत्रपणे काम कसे करावे व वरिष्ठांच्या सूचनेचे पालन कसे करावे याचा सराव करणे म्हणजेच फायर ड्रील होय. यामध्ये होज पाइप पूर्णपणे उलगडणे व पुन्हा व्यवस्थित गुंडाळून ठेवणे, पाइप व नोझल जोडणी, पाण्याची फवारणी व आगीत सापडलेल्या लोकांना / जखमी व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सूत्रबद्ध प्रात्यक्षिक केले जाते. त्यामुळे संकट समयी गोंधळून
न जाता एकत्रितपणे काम करण्याची सवय लागते. तसेच आपली अग्निशमन सामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री होते. अग्निशमन व्यवस्थेतील दोष व त्रुटी याची माहिती होऊन त्यामध्ये सुधारणा करता येते.
(क) संस्थेतील सभासदांना कोणतीही पूर्वसूचना न देता सहा महिन्यांतून एकदा मॉक फायर ड्रील म्हणजे लुटुपुटूची आग विझविणे अथवा प्रतिकात्मक आग विझविणे असे म्हणता येईल. या प्रकारात संस्थेत प्रत्यक्ष आग लागली आहे असे समजून सर्वाना आगीची घंटा वाजवून सावध केले जाते. त्यांना शिस्तबद्ध रीतीने संस्थेच्या आवारात जमण्यास सांगण्यात येते. आग विझविणारे वॉर्डन व सभासद व त्यांचे कुटुंबीय छोटय़ा प्रमाणात मुद्दाम लावलेली आग विविध प्रकारची अग्निशामके
(Fire Extinguishers ) वापरून विझविण्याचा सराव करतात. नंतर आवारात उपस्थित असलेल्या सभासद व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाची नोंद करून कोणी इमारतीच्या आत अडकून न पडल्याची खात्री करतात, त्यानंतर सर्व सभासद व त्यांचे कुटुंबीय आपापल्या घरी जातात. या सरावामुळे आगीशी सामना करताना आपले दोष व व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष आगीच्या वेळी होणाऱ्या चुका टाळण्यास मदत होते.
विश्वासराव सकपाळ nvish26rao@yahoo.co.in