घराला कोणता रंग द्यावा, याचं घरातील प्रत्येक सदस्याकडे वेगवेगळं उत्तर असतं. मग अशावेळी आपल्या घरासाठी योग्य रंगाची अचूक निवड कशी करावी याविषयी सांगणारं सदर..

आपल्याला रंगांची ओळख केवळ शाळेत चित्रकलेपुरती किंवा घराला रंग काढण्यापुरतीच असते. पण रंगांचंही विज्ञान आहे. रंग आणि प्रकाश या दोन गोष्टी हातात हात घालूनच येतात. रंग म्हटले की आपल्याला आठवतो तो शाळेत शिकवला जाणारा काचेच्या लोलकातून पांढरा प्रकाश परावर्तित झाला की बाहेर पडणाऱ्या सप्तरंगांचा न्यूटनचा प्रयोग! त्यामुळे सप्तरंगांचा असा शोध लावणारा न्यूटनच होता, हे आपल्या मनावर ठसवलं गेलं आहे. पण खरं तर हे शास्त्र मूळचं आपलंच! आपल्या वेदांमधून ज्याला गूढ म्हटलं जातं, अशा सांकेतिक भाषेत हे सगळं वैदिक काळापासून सांगून ठेवलं आहे.

रंगांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर ऋग्वेदात रंगांच्या स्रोताबाबत सांकेतिक भाषेत भाष्य केलं आहे. या वेदांचा अत्यंत परिश्रमपूर्वक सखोल अभ्यास करून त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न एच. एच. विल्सन (१८५७), राल्फ थॉमस हॉकिन ग्रीफिथ (१८९६) अशा ब्रिटिशांनी भारतात येऊन केला. त्यांनी केलेला अभ्यास हा खरंच कौतुकास्पद असला, तरी याबाबतचं सखोल ज्ञान आपल्याला पाश्चात्त्यांकडून मिळावं, हे दुर्दैव आहे. त्यांच्याबरोबरच वेदांचा अभ्यास इतरही ब्रिटिश, फ्रेंच, लॅटिन अशा विविध देशांमधल्या विद्वानांनी केला आहे.

ऋग्वेदातली मूळ ऋचा आणि तिचा अर्थ असा आहे-

आ। सूर्यो यातु सप्त अश्व:। क्षेत्रं। यत्। अस्य। उर्वयिा । दीर्घऽयाय।

रघु:। श्येन:। पतयत्। अंध:। अच्छ। युवा । कवि:। दीदयत्। गोषु। गच्छन्। (ऋग्वेद: ५.४५.९)

सात उमद्या घोडय़ांसह ज्याला दुष्कर (किंवा वक्राकार) तसेच दीर्घ मार्गाचे लक्ष्य गाठायचे आहे, तो सूर्यदेव येवो. आपल्या भक्ष्याकडे अत्यंत वेगाने झेप घेणाऱ्या बहिरी ससाण्यांच्या थव्याप्रमाणे वेगाने येणारा आणि चिरतरुण तसेच दूरदृष्टी असलेला सूर्यदेव फाकलेल्या प्रकाशकिरणांमधून येताना तळपतो. (भाषांतर : ऋग्वेद संहिता : अ कलेक्शन ऑफ एन्शियण्ट िहदू हिम्न्स : थर्ड अ‍ॅण्ड फोर्थ अष्टकाज ऑफ द ऋग्वेद- लेखक- एच.एच. विल्सन, प्रकाशक- :ब्लूएम. एच. अ‍ॅलन अ‍ॅण्ड कंपनी, लंडन, १८५७, पृष्ठे- ३१४)

याचं विवेचन असं आहे- सूर्याच्या रथाला असलेले सात घोडे म्हणजे सप्तरंग असून त्या घोडय़ांच्या लगामाच्या रशा म्हणजे वक्राकार सर्प आहेत. याचा अर्थ, सात रंगांच्या ‘वेव्हलेंग्थ्स’ असा घेता येईल (आणि म्हणूनच त्यांना विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळेच प्रत्येक रंगाला सूर्याच्या या ऊर्जेतून कमी-अधिक प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते). या वक्राकार मार्गातून मार्गक्रमणा करीत हा प्रकाश पृथ्वीपर्यंतचं फार दूरवरचं अंतर गाठतो असा याचा अर्थ. हे सातही रंग जर एकत्र केलेत, तर त्यातून मिळतो तो दिवसाचा पांढरा प्रकाश. हेच आपल्याला न्यूटनने सिद्ध करून दाखवलं.

आपल्या घरी रंग काढायचा असं ठरवलं की, आपण रंगाच्या दुकानात जाऊन विविध रंगछटांचं शेडकार्ड पाहतो आणि मग आपल्याला आवडणाऱ्या त्यातल्या एखाद्या रंगाची छटा आपण निवडतो. कार्डावर आवडलेला तो रंग मग िभतीवर लावल्यावर कधी आपल्या कल्पनेपेक्षाही जास्तच खुलून दिसतो, तर कधी कधी तो प्रत्यक्षात िभतींवर लावला गेला की, मनाला काही तरी विचित्र वाटतं आणि मग नकोसा वाटायला लागतो. रंग का आवडला नाही, हे मात्र आपल्याला उमजत नाही. पण तो मनाला भावलेला नसतो, हे मात्र खरं असतं. मग एक तर रंग काढणं खर्चीक असल्यानं पुन्हा काही काळाने रंग लावेपर्यंत तो रंग आपण अक्षरश: सोसतो किंवा सहन करतो. किंवा मग त्या रंगामुळे खूपच मनाला अस्वस्थ वाटत असेल, तर लगेचच आपण तो बदलून घेतो. काही रंग हे मनावर असा खोलवर परिणाम का करतात? काही रंगांमुळे मात्र आपल्याला एखाद्या खोलीत वावरताना उबदार आणि आल्हाददायक का वाटतं? याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे रंगांचंही एक विज्ञान आहे आणि ते विज्ञान जाणून न घेता आपण रंग निवडलेत की, आपल्या मनावर हे बरेवाईट परिणाम होत असतात.

रंगांचे मनावर होणारे परिणाम लक्षात घ्यायचे असतील, तर या रंगविज्ञानाबद्दल थोडीशी माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढल्या वेळी रंग काढताना आपण या माहितीच्या आधारे आधीच विविध खोल्यांसाठी ‘रंगांचं नियोजन’ करू शकू आणि रंगाचा वापर व त्यानंतर येणारा अनुभव यांच्या ‘ट्रायल अ‍ॅड एरर’ अर्थात ‘चुकांतून शिका’ पद्धतीमुळे रंग काढण्याच्या कामासाठी जे हजारो रुपये खर्च होतात, ते वाया जाणार नाहीत.

शाळेत शिकवल्या गेलेल्या न्यूटनच्या त्या प्रयोगातून आपण हे शिकलेलो आहोत की, काचेच्या प्रीझममधून अर्थात लोलकातून प्रकाशकिरण गेला की, त्याचं विकेंद्रीकरण होऊन आपल्याला तांबडा, नािरगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे सात रंग पाहायला मिळतात. इंद्रधनुष्य हे त्याचंच एक उदाहरण असल्याचंही आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर चित्रकलेत आपल्याला रंगचक्रही शिकवलं जातं. या चक्रात तांबडा, नािरगी, पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा असे सहा रंग असतात. (आकृती (१) पाहा). यातले तांबडा, पिवळा आणि निळा हे रंग कुठल्याही रंगांपासून तयार करता येत नाहीत. ते मूळचेच रंग आहेत. त्यामुळे त्यांना ‘प्रायमरी कलर्स’ किंवा ‘मुख्य रंग’ असं म्हणतात. उरलेले तीन रंग म्हणजे नािरगी(तांबडा आणि पिवळा), हिरवा (पिवळा आणि निळा) आणि जांभळा (निळा आणि तांबडा) हे रंग या मुख्य रंगांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना ‘सेकंडरी कलर्स’ किंवा ‘दुय्यम रंग’ असं म्हणतात, तर कोणताही एक दुय्यम रंग, हा रंगचक्रावर त्याच्या शेजारी दोन्ही बाजूंना असणाऱ्या दोनपकी कोणत्याही एका मुख्य रंगांमध्ये मिसळून तयार होणाऱ्या सहा रंग छटांना ‘टर्शरी कलर्स’ म्हणजेच ‘तृतीय रंग’ असं संबोधलं जातं. या रंग चक्रावर ज्या रंगांचं स्थान एकमेकाच्या विरुद्ध आहे अशा रंगांना ‘कॉम्प्लिमेंटरी कलर्स’ म्हणतात. तांबडा व हिरवा, निळा व नािरगी आणि जांभळा व पिवळा हे रंग या चक्रावर एकमेकांच्या विरुद्ध असून त्यांना एकमेकांचे ‘कॉम्प्लिमेंटरी कलर्स’ असं म्हटलं जातं. हे रंग एकमेकांवर उठून दिसतात. त्यामुळे ते एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे रंगाच्या या जोडय़ाचा वापर जर खोली सजवण्यासाठी केला. तर ती अधिक उठावदार दिसू शकते. पण तांबडा, पिवळा आणि निळा हे मुख्य रंग दिसायला थोडेसे भडक आहेत. लहान मुलांच्या खोल्यांकरता मात्र त्यांचा वापर अत्यंत कल्पकपणे केला, तर ते अधिक उठावदार दिसून त्या खोल्यांमध्ये त्यांना वावरताना गंमत वाटते.

अर्थात कुठल्याही रंगाला फिक्क्या आणि गडद अशा दोन्ही प्रकारच्या रंगछटा असतात. फिक्केपणा किंवा गडदपणाच्या या तीव्रतेला इंग्लिशमध्ये ‘टोन’ असं म्हणतात. तसंच मराठीत जरी आपण फिक्क्या आणि गडद अशा दोन्ही प्रकारच्या रंगछटांना छटाच म्हणत असलो, तरी इंग्लिशमध्ये फिक्क्या रंगछटांना ‘टिंट’, तर गडद रंगछटांना ‘शेड’ असं म्हटलं जातं. एखाद्या रंगाची टिंट तयार करण्यासाठी आपल्याला त्यात पांढरा रंग मिसळावा लागतो, तर शेड तयार करण्यासाठी त्यात काळा रंग प्रमाणानुसार मिसळावा लागतो.

रंगांचे मनावर होणारे परिणाम लक्षात घ्यायचे असतील, तर या रंगविज्ञानाबद्दल थोडीशी माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढल्या वेळी रंग काढताना आपण या माहितीच्या आधारे आधीच विविध खोल्यांसाठी ‘रंगांचं नियोजन’ करू शकू आणि रंगाचा वापर व त्यानंतर येणारा अनुभव यांच्या ‘ट्रायल अ‍ॅड एरर’ अर्थात ‘चुकांतून शिका’ पद्धतीमुळे रंग काढण्याच्या कामासाठी जे हजारो रुपये खर्च होतात, ते वाया जाणार नाहीत.

मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in