आधीच्या काळात टीव्ही व व्ही.सी.आर. इतकीच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असत, पण आता टी.व्ही.युनिट, सेट टॉप बॉक्स, डी.व्ही.डी. प्लेयर, होम थिएटर, अ‍ॅम्प्लीफायर, वुफेर स्पीकर, ब्लू रे प्लेयर, गेम स्टेशन अशी बरीच वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स टी.व्ही.युनिट मध्ये ठेवलेली असतात. त्यांचे वायर्सचे खूप मोठे जंजाळ असते. या वायर्स वेगवेगळ्या गॅजेट्सला जोडलेल्या असतात. बाकीची गॅजेट्स जरी नसली तरी टी.व्ही.व सेट टॉप बॉक्सला पर्याय नाहीच. या दोघांची आपण वायर जोडणी पाहू या. केबल नेटवर्क ची वायर इमारतीच्या बाहेरून येते व सेट टॉप बॉक्सला जोडली जाते. सेट टॉप बॉक्समधून एक वायर/ कॉर्ड निघते व टी.व्ही.च्या पोर्टमध्ये कनेक्ट होते. टीव्ही सेटला पॉवर सप्लायची गरज असते व सेट टॉप बॉक्सलाही या दोन्ही पॉवर कॉर्डस् कनेक्ट करण्यासाठी इलेक्ट्रीक सॉकेट्स लागता. त्यांची योग्य जागा ठरवावी लागते. व्यवस्थित अभ्यासून, ड्रॉइंग करून जागेवर मार्किंग करावे व त्यानुसार टी.व्ही.युनिटसाठी लागणारे इलेक्ट्रीकल काम करून घ्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आताचे टी.व्ही.हे वॉल माऊंटेड म्हणजे भिंतीवर अडकवलेले असतात व सेट टॉप बॉक्स, इ खाली बेस युनिटमध्ये असतात. टी.व्ही.तून बेस युनिटमध्ये जाणाऱ्या वायर्स लोंबकळलेल्या दिसू नयेत म्हणून वॉल पॅनलिंग करणे गरजेचे आहे. जेथे टी.व्ही.चे ब्रॅकेट फिक्स केले जाते तेथे कारपेन्टरला सांगून जास्तीचे वूडन सपोर्टस् लावून घ्यावेत. जेणेकरून टी.व्ही.सुरक्षित राहील. पॅनलिंग करताना लाकडाची चौकट (फ्रेमवर्क) तयार केले जाते. हे फ्रेमवर्क टी.व्ही.लावण्याच्या भिंतीवर लावले जाते. या फ्रेमवर्कवर एक प्लस ठोकला जातो. हा सप्लाय कमीतकमी १२ एमएम जाडीचा असावा. काही कॉन्ट्रॅक्टर्स पैसे वाचवण्यासाठी कमी जाडीचा प्लाय वापरतात. एकदा का त्या प्लायवर लॅमिनेट अथवा विनियर लावलं की आतील प्लाय किती एमएम जाडीचा आहे हे कळायला मार्ग नसतो. म्हणूनच खात्रीच्या माणसाकडून काम करून घ्यावे, अन्यथा फसगत होण्याची खूप शक्यता असते. तसेच खात्रीचा माणूस जरी असला तरी या विषयाचे जुजबी ज्ञान असावे जेणेकरून वैयक्तिक देखरेख करता येईल. पॅनलिंगचे फ्रेमवर्क करताना वायर्स खालून वर जाण्यासाठी एक चॅनल बसवावा. हा चॅनल इतक्या मापाचा असावा की ज्यातून गरजेच्या सगळ्या वायर्स आरामात खालून वर जाऊ शकतील. हा चॅनल तयार करण्यासाठी रेडीमेड अ‍ॅल्युमिनियचा आयताकृती पाईपही वापरता येतो. हा चॅनल बसवल्यानंतरच पॅनलिंगचा प्लाय फिक्स करावा. हा चॅनल टी.व्ही.च्या मध्यभागापासून बेस युनिटच्या तळापर्यंत जातो व या दोन्ही ठिकाणी त्याला आऊटलेटस् बनवली जातात. याच आऊटलेट्समधून वायर्स बाहेर येतात व संबंधित गॅजेटस्ला कनेक्ट होतात. या पॅनलिंगची साईज टी.व्ही.च्या साइजवर अवलंबून असते. वॉल पॅनलिंग भिंतीपासून तीन इंच बाहेर येत या पॅनलिंगच्या भोवताली आपण अप्रत्यक्ष पडणाऱ्या प्रकाशाची व्यवस्था करू शकतो. यात वापरली जाणारी एल.ई.डी. स्ट्रीप लाईट दृष्टीस पडत नाही व केवळ प्रकाश दिसतो. यामुळे खूप सुंदर परिणाम साधता येतो. टी.व्ही.लावल्यानंतरही वर जागा उरते. या जागेत आपण एखादे डेकोरेटिव्ह लाइट फिक्चर लावू शकता तसेच एखादा छोटासा शोपीस ठेवण्यासाठी सुंदरशी काचेची शेल्फ लावू शकता. पॅनलिंगच्या अगदी वरच्या भागात साधारणपणे नऊ इंच बाहेर येईल असे एक छप्पर बनवू शकता. या छप्परामध्ये अगदी छोटे असे एल.इ.डी. स्पॉट लाइट फिक्स करू शकता. तसेच वॉल पॅनलिंगच्या फिनिशमध्ये म्हणजेच लॅमिनेट अथवा विनियरमध्ये काही रंगसंगती, सजावट करू शकता. असे बरेच पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपले पॅनलिंग वापरायला सोपे, कार्यक्षम व सुंदर बनवू शकता.

(इंटिरियर डिझायनर)
अजित सावंत – ajitsawantdesigns@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideas about tv unit design