आपल्याला रंग हे काहीतरी सूचित करत असतात. कधी त्यांचं नातं हे निसर्गाशी असतं, तर कधी मानसिक किंवा सामाजिकदृष्टय़ा ते काहीतरी सूचित करत असतात. उदाहरणार्थ, निळा रंग हा आकाशाशी किंवा जलाशयाशी आपलं नातं सांगतो, तर वनस्पती म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर हिरवा रंगच येतो. पण ताजेपणा किंवा वाढ हीसुद्धा हिरव्या रंगाशीच निगडित असते. मनाचा टवटवीतपणा आणि प्रसन्नता हीसुद्धा कधी कधी हिरव्या रंगाचं द्योतक मानलं जातं. शेअर बाजारात विश्वसनीय आणि चांगली प्रगती करणाऱ्या कंपन्या- ज्यात गुंतवणूक करणं फायदेशीर आहे अशांना ब्ल्यू चीप कंपन्या म्हटलं जातं. त्याचं आकाश किंवा पाण्याशी काहीही नातं नाही. पण मनाचा विचार करता आकाशाकडे बघितल्यावर जसं शांत वाटतं, तसा मनाचा शांतपणा दर्शवण्यासाठीही निळ्या रंगाचा वापर होऊ शकतो. माणसांचे जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात, तसे ते रंगांचेही असतात. काही माणसं तापट असतात, एवढय़ातेवढय़ावरून ती भडकतात, तर काही माणसांवर कितीही संकटं कोसळली किंवा त्यांना अपमान सोसावा लागला, तरी त्यांच्यात फारशी चलबिचल होत नाही किंवा तशी झालेली दिसत नाही. कारण ती थंड स्वभावाची असतात. काहींना आयुष्य म्हणजे एखादा उत्सव वाटतो. अशी माणसं कायमच सगळं ‘एन्जॉय’ करतात. गमतीजमती करत जगणाऱ्या अशा माणसांना आपण ‘फनमेकिंग’ म्हणतो. काही माणसं मनाने खूप प्रेमळ असतात अशांच्या सहवासात आपल्याला त्यांच्या मायेची ऊब जाणवते. मनुष्यस्वभावाचे हे कंगोरे आपल्याला रंगांच्या जगातही पाहायला मिळतात. काही रंग भडक असतात, तर काही रंग पाहिल्यावर मनाला आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. काही रंगांची अशी मत्री असते की, जर ते एकत्रितपणे पाहिले, तर ते ‘फनमेकिंग इफेक्ट्स’ देतात. काही रंग जेव्हा एखाद्या खोलीत लावले जातात, तेव्हा त्या खोलीत आपल्याला उबदार वाटतं. कुठल्या खोलीचं प्रयोजन काय त्यानुसार आपल्याला त्या खोलीसाठी कुठली ‘कलर स्कीम’ निवडायची ते ठरवता येतं. त्यासाठी मुळात रंगांचे हे स्वभाव माहीत असणं आवश्यक आहे.
पेस्टल कलर्स
‘पावडर ब्ल्यू’, ‘रोझ पिंक’ किंवा ‘लेमन यलो’ यांसारख्या रंगांमध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते फिक्के आणि शांत वाटतात. (आकृती-१) परंतु घरातल्या सर्वच खोल्यांमध्ये किंवा एखाद्या खोलीत भिंती, फर्निचर, गाद्या-उशांची कव्हर्स अशा सगळ्याचसाठी जर या पेस्टल कलर्सचा वापर केला, तर मात्र घर अगदी निस्तेज असल्यासारखं दिसेल.
उबदार आणि थंड रंग
रंगांच्या जरी शेकडो छटा असल्या तरी मुख्यत रंगचक्रावरचे रंग हे त्यांचे स्वभाव आणि त्यानुसार साधले जाणारे त्यांचे परिणाम यासाठी लक्षात घेतले जातात. सोबतच्या आकृतीत (आकृती-२) दाखवल्याप्रमाणे तांबडा, नािरगी आणि पिवळा या रंगांच्या शेजारीच असणारे रंग हे उबदार रंग आहेत, तर निळा आणि जांभळ्या रंगाच्या बाजूला असणारे रंग हे थंड रंग आहेत. हिरव्या रंगाची निळ्या रंगात मिसळून होणारी छटा थंड आहे तर पिवळ्या रंगात मिसळून होणारी छटा ही उबदार आहे.
भिंत पुढे आल्याचा आणि मागे गेल्याचा आभास निर्माण करणारे रंग
सर्वसाधारणपणे ज्या भिंतींना उबदार रंग लावले जातात अशा भिंती पुढे किंवा कधी कधी अंगावर आल्याचा आभास होतो. त्यामुळे खोली आहे त्यापेक्षा लहान झाल्यासारखी वाटते. फार प्रशस्त खोल्या असतील आणि त्या खोल्यांमध्ये फारसे फíनचर नसेल, तर त्या फार मोठय़ा वाटू नयेत यासाठी अशा रंगांचा वापर करता येईल. पण थंड रंगांमुळे मात्र याच्या विरुद्ध परिणाम साधला जातो. तिथे भिंती लांब गेल्यासारख्या वाटतात. त्यामुळे जागा लहान असेल, तर थंड रंगांचा वापर करायला हरकत नाही. त्यामुळे ती मोठी असल्याचा आभास अशा रंगांच्या साहाय्याने करता येईल. पण असं जरी असलं तरी खोलीत येणारा नसíगक प्रकाश किती आहे, यावरही थंड रंग निवडायचे की उबदार, किंवा त्यांची कुठली छटा निवडायची हे ठरतं. बऱ्याचदा या दोन्हीचा वापर कल्पकतेने करून घेऊन जागेचा आभास आणि खोलीतला प्रकाश यात संतुलन साधावं लागतं.
पांढरा-काळा
पांढरा आणि काळा यांना आपण रंग म्हणत असलो, तरी ते तांत्रिकदृष्टय़ा कुठलेही रंग नाहीत. त्यांचा वापर इतर रंगांची तीव्रता म्हणजेच टोन कमी-अधिक करून टिंट किंवा शेड तयार करण्यासाठी केला जातो. एखाद्या रंगात काळा किंवा पांढरा विविध प्रमाणात मिसळून त्या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या छटा तयार होतात, त्या एकाच रंगाच्या छटांचा वापर करूनही खोली सजवता येते. त्याला ‘मोनोक्रोम कलर स्कीम’ असं म्हणतात.
न्यूट्रल कलर्स
हा जो रंगांचा गट आहे त्यात बफ, क्रीम किंवा ग्रे यांसारखे रंग येतात. (आकृती-३). माती किंवा दगडाच्या रंगांच्या छटा असलेल्या या रंगांमध्ये उबदार किंवा थंड असा फरक करणं कठीण असतं. खोलीतल्या भिंती, फíनचर, सोफा कव्हर्स या सगळ्यांच्या रंगासाठी जे उबदार किंवा थंड रंग वापरले असतील, त्यांचं संतुलन या न्यूट्रल कलर्सच्या वापराने साधता येतं.
रंगांचे मूलभूत स्वभाव एकदा कळले की मग त्यांच्याबरोबर खेळतानाच त्यांचं व्यवस्थापन करणंही सोपं जातं आणि कुठल्या रंगाचा वापर कुठे करायचा हे हळूहळू समजू लागतं.
मनोज अणावकर
(इंटिरिअर डिझायनर)