आपल्याला रंग हे काहीतरी सूचित करत असतात. कधी त्यांचं नातं हे निसर्गाशी असतं, तर कधी मानसिक किंवा सामाजिकदृष्टय़ा ते काहीतरी सूचित करत असतात. उदाहरणार्थ, निळा रंग हा आकाशाशी किंवा जलाशयाशी आपलं नातं सांगतो, तर वनस्पती म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर हिरवा रंगच येतो. पण ताजेपणा किंवा वाढ हीसुद्धा हिरव्या रंगाशीच निगडित असते. मनाचा टवटवीतपणा आणि प्रसन्नता हीसुद्धा कधी कधी हिरव्या रंगाचं द्योतक मानलं जातं. शेअर बाजारात विश्वसनीय आणि चांगली प्रगती करणाऱ्या कंपन्या- ज्यात गुंतवणूक करणं फायदेशीर आहे अशांना ब्ल्यू चीप कंपन्या म्हटलं जातं. त्याचं आकाश किंवा पाण्याशी काहीही नातं नाही. पण मनाचा विचार करता आकाशाकडे बघितल्यावर जसं शांत वाटतं, तसा मनाचा शांतपणा दर्शवण्यासाठीही निळ्या रंगाचा वापर होऊ शकतो. माणसांचे जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात, तसे ते रंगांचेही असतात. काही माणसं तापट असतात, एवढय़ातेवढय़ावरून ती भडकतात, तर काही माणसांवर कितीही संकटं कोसळली किंवा त्यांना अपमान सोसावा लागला, तरी त्यांच्यात फारशी चलबिचल होत नाही किंवा तशी झालेली दिसत नाही. कारण ती थंड स्वभावाची असतात. काहींना आयुष्य म्हणजे एखादा उत्सव वाटतो. अशी माणसं कायमच सगळं ‘एन्जॉय’ करतात. गमतीजमती करत जगणाऱ्या अशा माणसांना आपण ‘फनमेकिंग’ म्हणतो. काही माणसं मनाने खूप प्रेमळ असतात अशांच्या सहवासात आपल्याला त्यांच्या मायेची ऊब जाणवते. मनुष्यस्वभावाचे हे कंगोरे आपल्याला रंगांच्या जगातही पाहायला मिळतात. काही रंग भडक असतात, तर काही रंग पाहिल्यावर मनाला आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. काही रंगांची अशी मत्री असते की, जर ते एकत्रितपणे पाहिले, तर ते ‘फनमेकिंग इफेक्ट्स’ देतात. काही रंग जेव्हा एखाद्या खोलीत लावले जातात, तेव्हा त्या खोलीत आपल्याला उबदार वाटतं. कुठल्या खोलीचं प्रयोजन काय त्यानुसार आपल्याला त्या खोलीसाठी कुठली ‘कलर स्कीम’ निवडायची ते ठरवता येतं. त्यासाठी मुळात रंगांचे हे स्वभाव माहीत असणं आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा