मागील लेखातून आपण तुळशीची निगा व प्रकार याविषयी माहिती घेतली. आज आपण गुलाबाविषयी जाणून घेणार आहोत. गुलाब हे एक असे फूल आहे की प्रत्येकालाच असे वाटत असते, की ते आपल्या बागेत असावे व छान फुलावे. पण अनेक वेळा असे होते की झाड नीट वाढत नाही किंवा नीट फुलत नाही. आजच्या लेखातून गुलाबाची निगा व काळजी कशी घ्यावी हे बघू या.
गुलाबामध्ये अनेक रंगांची फुले बघायला मिळतात. लाल, गुलाबी, पिवळी, पांढरी व या सर्वाच्या छटा असलेली फुले अनेकांना भुरळ घालतात. यात गावठी गुलाब, वेल गुलाब, हायब्रीड टी अशा अनेक जातींचे गुलाब मिळतात. फुलांच्या या राजाची काळजी व निगा हा एक फारच महत्त्वाचा विषय आहे. गुलाबाचे रोप कलम निवडताना चांगले टवटवीत व रोग नसलेले निवडावे. गुलाब लावण्यासाठी मध्यम किंवा मोठय़ा आकाराची कुंडी वापरावी. कुंडीला २ ते ३ छिद्रे असावीत; जेणेकरून पाण्याचा निचरा नीट होईल. कुंडी भरण्यासाठी सेंद्रिय खत व मातीचे मिश्रण आधी तयार करून घ्यावे. त्यात थोडय़ा प्रमाणात कडुनिंब पेंड वापरली तर चांगले. या मिश्रणात सेंद्रिय खताचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे; जेणेकरून माती भुसभुशीत राहण्यास मदत होईल. कुंडी भरण्यासाठी हे तयार केलेले मिश्रण वापरावे. गुलाबाच्या रोपाची पिशवी अलगदपणे ब्लेडच्या साहाय्याने कापून घ्यावी. रोपाची हुंडी न फोडता सावकाशपणे हे रोप कुंडीत लावून घ्यावे. गुलाबाच्या झाडाला काटे असल्यामुळे ही झाडे हाताळताना काळजी घ्यावी. यासाठी बागकामासाठीचे हातमोजे वापरले तरी चालते.
पाणी व्यवस्थापन : कुंडीत झाड लावल्यानंतर व्यवस्थित पाणी घालावे. मातीच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे लागते. माती जर वालुकामय असेल तर पाणी कमी दिवसांच्या अंतराने घालावे लागते. पण माती जर पाणी धरून ठेवणारी असेल तर जास्त दिवसांच्या अंतराने पाणी घालावे. पाणी घालताना एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की या झाडांना ओलावा लागतो-ओल नाही. त्यामुळे निरीक्षणावरून पाणी किती व कधी घालावे हे ठरवावे. सामान्यपणे उन्हाळ्यात दर २ ते ३ दिवशी तर थंडीत दर ४ ते ५ दिवशी पाणी घातले तरी चालते. पावसाळ्यात हवेतील दमटपणा व मातीची परिस्थिती बघून पाणी कधी घालावे हे ठरवावे. पाणी घालताना खोडाजवळ कधीही घालू नये. खोड ओले झाले तर गुलाबाची वाढ नीट होत नाही. गुलाबाला त्याच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाणी लागते. नंतर हे प्रमाण कमी करावे. उन्हाळ्याच्या दिवसात कुंडीत आच्छादनाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते.
गुलाबाची छाटणी : झाडाचा आकार चांगला राहण्यासाठी तसेच फुलांची संख्या वाढण्यासाठी गुलाबाची छाटणी करणे गरजेचे असते. सामान्यपणे फुले येऊन गेल्यानंतर गुलाबाची छाटणी करावी. फांद्यांची लांबी आवश्यकतेनुसार कमी करावी. छाटणी केल्यानंतर नवीन फांद्या जोमाने वाढून त्यावर फुले येतात. छाटणी करते वेळी वाळलेल्या फांद्या, वाळलेली फुले, वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या फांद्या तसेच रोगट फांद्या व रोगट पाने काढून टाकावीत. छाटणी करताना चांगल्या सिकेटरच्या साहाय्याने एकाच कापात फांदी कापावी. छाटणीनंतर कुंडीत सेंद्रिय खत घालून मिसळावे. तसेच काही दिवस पाणी व्यवस्थित घालावे; जेणेकरून नवीन येणाऱ्या फांद्या चांगल्या वाढू शकतील.
गुलाबाच्या कुंडीतील मातीचे अधूनमधून निरीक्षण करून माती जर कडक झाली असेल तर ती खुरपीच्या मदतीने सैल करून घ्यावी. खोडाजवळील माती तशीच असू द्यावी. गुलाबाचे झाड हे कडक सूर्यप्रकाशात वाढणारे झाड असल्यामुळे दिवसाचे किमान ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी गुलाबाची कुंडी ठेवावी. गुलाबाला साधारणपणे दर ३ महिन्यांनी सेंद्रिय खत घालावे. यामध्ये गांडूळ खताचा वापरही करता येऊ शकतो. अशा प्रकारे भरपूर सूर्यप्रकाश, पुरेसे सेंद्रिय खत, योग्य पाणी व्यवस्थापन, पाण्याचा योग्य निचरा व मुळांना पुरेशी हवा या गोष्टी नीट मिळाल्या तर गुलाबाची झाडे छान वाढतात.
जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in