रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्येही बाग आहे, फेऱ्या मारायला ट्रक्स केले आहेत. शिवाय कौलारू छप्पर असलेला एक गोल आकाराचा भाग आहे, ज्यात बाकं आणि कट्टे केले आहेत. हा भाग त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये सिनीअर सिटीझन्स एरिया म्हणून ओळखला जातो.’
‘‘आजी आज नेहमीपेक्षा लवकर आलात मदानावर?’’ देशमुख आजींनी विचारलं. सोबत देशमुख आजोबाही आले होते. इतक्यात देशपांडे आजींच्या मिस्टरांचे- सदानंद देशपांडेंचे शाळा-कॉलेजपासूनचे मित्र नाना पंडितही आले. त्यांनीही आजींना विचारलं, ‘‘काय सुषमा वहिनी, आज पहिला नंबर लावला वाटतं कट्ट्यावर?’’
‘‘होय नाना भावजी, आज या मदानाच्या कट्ट्यावरचा माझा शेवटचा दिवस आहे ना. या मदानाशी असलेलं माझं सत्तर वर्षांचं नातं संपणार.’’
‘‘वहिनी, अहो एवढं मनाला लावून घेऊ नका. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात की, तुम्हाला सुनीलसारखा मुलगा लाभलाय. तुमच्या भल्यासाठीच तो तुम्हाला घेऊन चाललाय ना त्याच्याकडे..’’
देशमुख आजींनी विचारलं, ‘‘अरे, हे काय ऐकतोय आम्ही नवीन? आम्ही अमेरिकेला होतो ना सहा महिने मुलाकडे. त्यामुळे इकडचे अपडेट्स नाहीत. देशमुख आजी-आजोबा दोन वर्षांपूर्वीच इथल्या नवीन टॉवरमध्ये राहायला आले होते. देशमुख आजोबांनी विचारलं, ‘‘देवकर आजीआजोबाही दिसत नाहीत आलेले..’’
‘‘तेही सध्या तीन महिन्यांसाठी दिल्लीला गेलेत मुलीकडे.’’ नाना म्हणाले.
‘‘मीही सुनीलला तेच सांगत होते की, हवं तर मी तीनचार महिने येते तुझ्याकडे. पण ऐकायलाच तयार नाही तो, कायमचंच येऊन राहा म्हणून मागेच लागला. शेवटी मला आता उद्या त्याच्याकडे राहायला जायचंय, कायमचंच.’’ देशपांडे आजींनी सांगितलं.
नाना म्हणाले, ‘‘अहो बरोबर आहे वहिनी. वरती झाडलोट करायला स्टुलावर चढलात आणि तोल जाऊन पडलात तुम्ही गेल्या आठवडय़ात. नशीब बरं म्हणून फ्रॅक्चर वगरे झालं नाही. नाहीतर आता या सत्तरीच्या वयात काही झालं तर निस्तरायला किती लागेल? या प्रकारामुळे सुनीलला तुमची काळजी वाटतेय. शिवाय तुमची सून घरीच असते. तीही तुमची काळजी घ्यायला तयार आहे. मग तुम्हाला तिथे एकटेपणही जाणवणार नाही. नाहीतर हल्ली म्हातारी माणसं नको म्हणून किंवा हवी असली, तरी घरी बघायला कोणी नाही, म्हणून काही वेळा त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. ज्यांचे हातपाय चालतायत असे लोकं चार-सहा महिने जाऊन येतात मुलांकडे. तेवढाच नेहमीच्या आयुष्यात बदल आणि विश्रांती.’’
देशमुख आजोबा म्हणाले, ‘‘हो, पण त्यातही परदेशी असलेल्या मुलांकडे जायचं म्हणजे तिथेही जाऊन आम्ही एकटेच हो. मुलगा आणि सून त्यांच्या नोकऱ्यांमध्ये आणि नातवंड त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये. मग अशा त्यांच्या रुटीनमध्ये दिवसभर आम्हाला एकटेपणच जाणवतं. शिवाय अमेरिकेतल्या टीव्हीवरचे प्रोग्रॅम्सही आपल्याला आवडतील असे नसतात. बरं मुलांशिवाय बाहेर कुठे एकटं जायची सोय नाही. एकतर अंतर लांबलांब. त्यामुळे गाडीशिवाय कुठे जाता येत नाही आणि मुलाच्या घराजवळ एक पार्क आहे, पण त्यात काही आपल्या या मदानावरच्या कट्ट्यासारखी मजा नाही. त्यापेक्षा आपल्या घरी राहिलं आणि स्काइपवरून दिवसा दोन दिवसांतून एकदा मुला-नातवंडांना हायबाय केलं की झालं.’’ देशमुख आजोबा म्हणाले.
त्यावर देशमुख आजी म्हणाल्या, ‘‘ते खरंय हो, पण आता जसं या देशपांडे आजी पडल्या तसं जर पडलं किंवा आणखी कुठल्या कारणाने हॉस्पिटलायझेशन झालं, तर मुलं जवळ नाहीत आणि आपण काही तिकडे कायमचे जाऊन राहू शकत नाही. शिवाय, अमेरिकेत मेडिकल ट्रीटमेंटही खूप महागडी आहे. त्यामुळे हातपाय चालतायत, आम्ही आता बासष्ठ-पासष्ठचे आहोत, तोपर्यंत ठीक आहे हो. पण आडवं पडलं तर काय, म्हणून मला बाई काळजी वाटते. त्यादृष्टीने देशपांडे आजी तुम्ही खरंच भाग्यवान आहात.’’
देशपांडे आजी म्हणाल्या, ‘‘पण तरीही वाईट वाटणं स्वाभाविक आहे. कारण या परिसरातच माझ्या वडीलांचं घर, त्यामुळे माझं सगळं बालपण इथेच गेलं, शिक्षणही जवळच्याच शाळा-कॉलेजात झालं. लहानपणी आईचा हात धरून या कट्ट्यावर बसायला आईबरोबर यायचे, मदानावरच्या गणपतीच्या मंदिरात जायचे. थोडं मोठं झाल्यावर तिथल्या साखर फुटाण्यांचा प्रसाद आणि तीर्थ घ्यायला आम्ही मत्रिणी जात असू. आम्हाला मोठी मजा वाटायची त्यात. एकदा तर शाळेतून खेळाच्या तासाला आम्हाला मदानावर आणलं होतं. मी तेव्हा दुसरीत होते. आमच्या खेळाच्या शिक्षिका- अलकाताई मदानाच्या एका बाजूला असलेल्या बाग आणि व्यायामशाळेजवळ आमचे व्यायाम प्रकार घेत होत्या आणि मी आणि माझ्या मत्रिणीने त्यांची नजर चुकवून मदानाच्या गणपतीच्या देवळात जाऊन फुटाणे घेऊन आलो होतो. त्या वयाला या एवढय़ा मोठय़ा मदानाच्या दुसऱ्या बाजूला एकटय़ाने जाणं हे खरंच धाडसाचं होतं. आम्ही आल्या आल्या बाई आम्हाला खूप ओरडल्या. त्यावर मी त्यांना आगाऊपणे सागितलं होतं की, ‘मी इथेच मदानाजवळ राहते आणि मत्रिणीबरोबर नेहमीच जाते देवळात मग हरवू कशा?’ त्यांना खरं तर माझा खूप राग आला होता, पण शाळेत वर्गात परत गेल्यावर त्यांनी आम्हाला शांतपणे समजावून सांगितलं की, आमची जबाबदारी त्यांच्यावर असते. आम्ही हरवलो असतो, तर आमच्या पालकांना त्या काय सांगणार? असं त्यांनी विचारल्यावर मी त्यांना सांगितलं, बाई प्रसाद आणायला गेले होते. तुम्हालाही आणलाय असं म्हणून त्यांना फुटाणे द्यायला हात पुढे केला. तेव्हा पटकन हसूच आलं त्यांना आणि त्यांनी मला जवळ घेऊन पुन्हा असं करू नको असं सांगून मला माफ केलं. मोठी होत गेले, तसा कॉलेजमधल्या मित्रमत्रिणींचा ग्रुप तयार झाला. आधी रोज संध्याकाळी या कट्ट्यावर आम्ही भेटायचो. मग एकेकाला नोकऱ्या लागत गेल्या, तसं मग फक्त रविवारी संध्याकाळीच भेटणं व्हायला लागलं. तेव्हाही हा कट्टा आमच्या मत्रीचा साक्षीदार होता. मध्येच अडवत नाना म्हणाले, ‘‘आणि हो मग याच भागात राहणाऱ्या आमच्या सदानंदबरोबर वहिनींची गाठ बांधली तीही याच कट्ट्याने बरं का!’’
‘‘काय हो नाना,’’ असं म्हणून देशपांडे वहिनी लाजल्या. तुम्ही सुनीलला चौथीत क्रिकेट शिकायला घातलंत तेव्हा सदा त्याला सकाळी साडेसहा वाजता याच मदानावर सोडायला यायचा. माझ्या शिरीषलाही मी त्याच्याबरोबर क्रिकेट शिकायला पाठवलं होतं. मग सदा आणि मी, आम्ही दोघंजण अर्धा तास मदानाला फेऱ्या मारायचो आणि अर्धा-एक तास इथेच कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो. मग मुलांना कधी घरी सोडून ऑफिसला जायचो, तर कधी आमची मालती आणि तुम्ही त्यांना घेऊन जायला यायचात. पण हळूहळू मुलं जसजशी मोठी होत गेली तसं त्यांच्या शिक्षणाचे व्याप आणि आपल्या नोकरीचे व्याप यामुळे मग मात्र जरा कट्ट्यावर येणं कमी झालं.’’ देशपांडे आजी म्हणाल्या.
नाना म्हणाले, ‘‘माझीही दिल्लीला बदली झाली. मग हा कट्टा सुटला. पण तुम्ही आणि सदा रिटायर्ड झाल्यावर पुन्हा एकदा कट्टय़ावर येऊन बसायला सुरुवात केलीत. दिल्लीत होतो तेव्हा निवृत्तीच्या उंबरठय़ावर असतानाच आमच्या मालतीला हार्ट अॅटॅक आला आणि दिल्लीहून मी परतलो तो एकटाच. कारण तेव्हा आमचा शिरीषही दिल्ली आयआयटीतून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन पुण्यात स्वत:चा बिझिनेस काढून स्थिरावला होता. मी तिथे जाऊन त्याच्या स्थिरावलेल्या संसारात पुन्हा एकटाच पडणार. सगळं आयुष्य मुंबईत गेलेलं. त्यामुळे पुण्यात करमेल की नाही, असंही वाटत होतं. मग मुंबईतच परतायचं ठरवलं. इथे आल्यावर मला सोबत मिळाली ती वहिनी तुम्हा दोघांची. संध्याकाळच्या वेळी घर एकटय़ाला खायला उठायचं. अशा वेळी या कट्टय़ावर येऊन बसलं की, तुम्हा दोघांबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जायचा हे कळायचं नाही. पण मग मी विचार केला की, असं कोणाच्या तरी आधारवर आणि भरवशावर आपण परावलंबी होऊन किती काळ जगायचं? उद्या तुम्हाला काही कामं असलीत, तुम्ही कुठेतरी गेलात तर पुन्हा एकटेपणा.. सदाच्या आणि मालतीच्या आठवणींनी मन कुरतडून निघणार आणि पुन्हा दुखावलेल्या निराश मनाने आयुष्याकडे ओझं म्हणून पाहात मरणाची वाट बघत जगणं. आणि तसंच झालं, पुढे सदाचं आजारपण उद्भवलं आणि सदा गेला. आजचा दिवस हा उद्यासारखा नसतो आणि येणारा दिवस बरं किंवा वाईट काय घेऊन येईल, हे सांगता येत नाही. त्यापेक्षा आपणच आपल्या मनावरचा हा ताण कमी करायला काहीतरी अधिक काळ चालेल असा उपाय शोधला पाहिजे, मन कुठेतरी गुंतवलं पाहिजे की, ज्यामुळे आपला वेळही जाईल आणि हातून काहीतरी चांगलं काम घडल्याचं समाधानही मिळेल. त्यातूनच मग जवळच्याच रामाच्या देवळाच्या मागच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतल्या मुलांचा शाळेचा अभ्यास घ्यायला त्या देवळातच सुरुवात केली. मग हळूहळू माझंही या कट्टय़ावरचं येणं रविवारपुरतंच झालं.’’ एवढं सांगून नाना बोलायचं थांबले. देशपांडे आजींच्या डोळ्यांत पाणी बघितल्यानंतर नाना म्हणाले, ‘‘सॉरी वहिनी, माझ्या लक्षातच नाही आलं, बोलायच्या ओघात मी सदाच्या जाण्याचा उल्लेख केला आणि तुम्हाला दुखावलं.’’
डोळे पुसत देशपांडे आजी म्हणाल्या, ‘‘तुमचा काय दोष त्यात नाना? जे व्हायचं होतं, ते झालं.’’
नाना म्हणाले, ‘‘सुरुवातीला मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे बदलाबद्दल अश्रू ढाळत बसण्यापेक्षा बदललेल्या परिस्थितीतही आपण नव्याने आनंद कसा शोधू शकतो याचाच विचार करा, म्हणजे मग हा कट्टा सुटला, याचं वाईट वाटणार नाही.’’
देशपांडे आजी म्हणाल्या, ‘‘खरंय नाना तुमचं. सुनील सांगत होता, त्याच्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्येही बाग आहे, फेऱ्या मारायला ट्रक्स केले आहेत. शिवाय कौलारू छप्पर असलेला एक गोल आकाराचा भाग आहे, ज्यात बाकं आणि कट्टे केले आहेत. हा भाग त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये सिनीअर सिटीझन्स एरिया म्हणून ओळखला जातो.’’
नाना म्हणाले, ‘‘बघा मी म्हटलं की नाही, काळ बदलला, वास्तू बदलली, माणसं बदललीत, तरी तुमच्या सगळ्यांना एकत्र आणायच्या स्वभावाने ते विश्व तुम्ही पुन्हा निर्माण करू शकाल.’’
देशमुख आजी-आजोबा हे सगळं शांतपणे ऐकत होते. एकदम घडय़ाळाकडे देशमुख आजींचं लक्ष गेलं. ‘‘अरेच्च्या साडेसात कधी वाजले ते कळलंच नाही. चला देशपांडे आजी, मला निघायला हवं.’’
देशमुख आजोबा म्हणाले, ‘‘हो आम्ही निघतो आता. अधूनमधून रविवारी वगरे कधीतरी मुद्दाम वेळ काढून येत जा भेटायला.’’
नाना म्हणाले, ‘‘हो मलाही आता निघायचंय. उद्या सकाळी शिरीषकडे पुण्याला जायला निघायचंय. तो आणि त्याची बायको दोघंजणं कॉन्फरन्ससाठी पंधरा दिवस ऑस्ट्रेलियाला जात आहेत. त्यामुळे नातवंडांच्या सोबतीसाठी मी पंधरा दिवस पुण्याला जाऊन येणार आहे.’’ सगळ्यांनी देशपांडे आजींना शुभेच्छा दिल्या आणि सगळे घरी जायला निघाले. देशपांडे आजीही घरी गेल्या.
साधारण सहा महिन्यांनी दिल्लीहून आलेले देवकर आजी-आजोबा, देशमुख आजी-आजोबा आणि नाना यांची मफील पुन्हा एकदा जुन्या कट्टय़ावर जमली होती. तेवढय़ात नानांचा मोबाईल खणाणला.. ‘‘नाना भावजी, मी सुषमा देशपांडे बोलतेय.’’ नानांना देशपांडे आजींचा आवाज ऐकून खूप आनंद झाला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, ‘‘अहो ऐकलंत का, देशपांडे वहिनींचा फोन आहे. थांबा हा मी फोन स्पिकरवर ठेवतो. आम्ही सगळे कट्टय़ावरच जमलो आहोत. आत्ताच तुमचा विषय निघाला होता. शंभर र्वष आयुष्य आहे तुम्हाला.. बोला काय म्हणताय?’’ देशपांडे आजींच्या आवाजातही आनंद जाणवत होता, म्हणाल्या, ‘‘नाना तुम्ही म्हणाला होतात ना तसंच झालं, इकडे नवा ग्रुप मिळालाय. शिवाय तुमच्यासारखेच काही चांगले उपक्रमही आमच्या या ग्रुपच्या मदतीने सुरू केले आहेत. त्यातला एक तर गमतीशीर आहे. आम्ही ग्रुपमधले पाच-सहाजण संध्याकाळी इथे या बंदिस्त कट्टय़ावर येताना नुसत्याच गप्पा मारण्याऐवजी पाच-सहा वेगवेगळ्या भाज्या प्रत्येकी दोन-दोन किलो घेऊन येतो आणि गप्पा मारता मारता त्या भाज्या निवडून साफ करतो. मग आमच्या सोसायटीत घरकाम करणाऱ्या काही गरीब बायका आम्हाला त्यांची कामं आटोपून येऊन भाज्या निवडायला, चिरायला आणि प्लॅस्टिक बॅगांमध्ये भरायला मदत करतात. मग सोसायटीतल्या नोकरी करणाऱ्या बायकांना या चिरलेल्या भाज्यांची पाकिटं आम्ही देतो. त्यामुळे आमचाही वेळ जातो आणि नुसत्याच गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी हातून कोणाला तरी उपयोगी पडेल असं काम होतं. शिवाय, यातून येणारं जे उत्पन्न आहे, ते सगळेजण भाज्यांसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत वाटून घेतो आणि त्या घरकाम करणाऱ्या बायकांनाही रोजगार मिळतो. नाना, आत्ता मी फोनवरून आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच आमच्या या कट्टय़ावर यायचं आमंत्रण देतेय. नक्की यायचं हां सगळ्यांनी. मला कळवा कधी येताय ते. थोडी घाईत आहे, बायका भाज्या घेऊन आल्या आहेत. बरं फोन ठेवते मी आता.’’ देशपांडे आजी नव्या ठिकाणी रुळल्याचं बघून सर्वाना आनंद तर झालाच, पण त्यांची ही संकल्पनाही त्यांच्या जुन्या ग्रुपला आवडली. नाना म्हणाले, ‘‘बघा, नुसत्याच गप्पा मारण्यापेक्षा हातपाय चालताहेत, तोपर्यंत असे हे नवे आणि खरोखरच नव्या पिढीच्या गरजा ओळखून त्यांच्या एखाद्या समस्येवर उत्तर शोधणारे उपक्रम राबवले, तर आपला उपयोगही होतो, वेळही जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानिमित्ताने नव्या पिढीबरोबर जुन्या पिढीचा दुवा सांधला गेला की, जनरेशन गॅप कमी व्हायलाही थोडी मदत होऊ शकते. हा नवा उपक्रम बघायला जायची उत्सुकता सगळ्यांच्यात निर्माण झाली. मग पुढल्या आठवडय़ात देशपांडे आजींच्या नव्या कट्टय़ावर जायचं ठरवून सगळेजण आपापल्या घरी जायला निघाले.’’
anaokarm@yahoo.co.in