औद्योगिकीकरण आणि वेळ ह्यचा अनन्यसाधारण संबंध आहे. औद्योगिकीकरणामध्ये प्रत्येक मिनिटाला किंमत असते. पूर्वी खेडय़ातील लोक ऊन-सावलीवर आपले रोजचे व्यवहार पार पाडीत असत. म्हणजे दिवस उजाडल्यावर कामाला बाहेर पडायचे. दिवस कासराभर वर आला की न्याहारी करायची, आपली सावली पायाखाली आली की दुपारच्या जेवणासाठी घरी यायचे, आणि सावल्या लांबलांब होत गेल्या की दिवसभराचे काम संपवून घरी परत यायचे. इतके साधे आणि सोपे वेळेचे गणित बसलेले होते. पण औद्योगिक शहरातील प्रत्येक व्यवहारात मात्र वेळेला आणि म्हणूनच घडय़ाळाला फार महत्त्व आहे.
मुंबईसारख्या शहरात अगदी फार पूर्वीपासून लोक घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावत आहेत. कुठल्याही वर्षांचे रेल्वेचे टाइम टेबल काढून पाहिले तरी ह्यची साक्ष पटेल, कारण प्रत्येक मिनिटाचा हिशेब करून ते बनविलेले आहे हे दिसून येईल. कारण येथे प्रत्येक मिनिटाचा हिशेब करणे प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शहरामध्ये प्रत्येक कुटुंबात घडय़ाळ असणे अनिवार्य ठरत आले आहे. काही खासगी इमारतींच्या किंवा सिनेमागृहांच्या मालकाकडून आपल्या इमारतीवर दर्शनी भागात पादचारी व्यक्तीला सहज जाता-येता वेळ पाहता येईल अशा प्रकारे मोठय़ा घडय़ाळाची व्यवस्था केली जायची. आजही काही ठिकाणी काही इमारतींवर अशी सार्वजनिक घडय़ाळे आपले अस्तित्व टिकवून आहेत. फोर्टमधील मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा भाग असलेला राजाबाई टॉवरवरचे घडय़ाळ अचूक वेळ दाखवत अभिमानाने आजही ताठ मानेने उभे आहे. मुंबई शहराची आजही ती एक शान आहे. मुंबई भेटीवर येणाऱ्या पर्यटकाला आजही मुंबईतील एक प्रेक्षणीय ऐतिहासिक वास्तू म्हणून अभिमानाने तो भव्य आकाराचे घडय़ाळ असलेला टॉवर दाखवला जातो.
पूर्वी मनगटी घडय़ाळ हे पुरुषांसाठी जणू एक दागिनाच होता. त्यामुळे तो दागिना पुरुष कमावता झाल्यावरच हातावर मिरवू शकत असे. त्या काळातल्या बहुतेक तरुणांची नोकरी लागल्यावर स्वकमाईने पूर्ण करण्याची जी राखीव स्वप्ने असत, त्यात मनगटी घडय़ाळ आणि बूट आणि गॉगल ह्य वस्तू प्राधान्यक्रमाने असायच्या. विद्यार्थीदशेत त्याची इच्छादेखील पूर्ण करण्याची शक्यता नव्हती. घरंदाज किंवा श्रीमंत स्त्रिया अगदी नाजूक असे मनगटी घडय़ाळ अंगाखांद्यावरच्या इतर दागदागिन्यांसोबत हातावर समारंभात मिरवत असत. बाकी स्त्रियांना त्याची गरजच पडत नसे. पुरुषासाठी मनगटी घडय़ाळ तेव्हाच्या काळी अपूर्वाईची गोष्ट होती, तर त्यापुढे सामन्य गृहिणींची काय पत्रास. पण प्रत्येक घरात भिंतीवर लावायचे किंवा टेबलवर अथवा फळीवर ठेवायचे एक घडय़ाळ मात्र असायचेच.
घडय़ाळ मग ते मोठे भिंतीवर लावायचे किंवा टेबलवर अथवा फळीवर ठेवायचे असो किंवा मनगटावर बांधण्याचे असो, इथून तिथून घडय़ाळ म्हटले की ते चावीचेच घडय़ाळ हे मात्र ठरलेले. ह्य चावीच्या घडय़ाळाला रोज न चुकता चावी देणे आवश्यक असते. रोज न चुकता चावी देण्याचे काम कुटुंबातील एकालाच नेमून दिलेले असे, कारण कुठलेही यंत्र एकहाती वापरले तरच ते यंत्र चांगले टिकते आणि बिनचूक काम करते, ह्य यंत्र व्यवहारातील सत्यावर त्याकाळी लोकांचा पक्का विश्वास होता. असे चावी दिलेले घडय़ाळ हाताच्या पंजात पकडून अगदी हलकेच त्याला एक झटका देऊन अगदी अलगद कानाला लावून त्यातील ती अगदी नाजूक आवाजात होणारी टिकटिक ऐकणे हा भलताच आनंदाचा क्षण असायचा. ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर तो स्पष्टपणे उमटायचा. बहुतेक कुटुंबे चाळीत वास्तव्यास असल्यामुळे सताड उघडय़ा दरवाजातून दिसणाऱ्या शेजारच्यांच्या घडय़ाळात पाहात आपल्या घडय़ाळाला चावी देणारा एक तरी महाभाग रोज दृष्टीस पडायचाच. काहींच्या घरातील घडय़ाळ अगदी वक्तशीर चालणारं घडय़ाळ म्हणून शेजारीपाजारी नाव कमावून असायचे. त्या कुटुंबाला त्याचा भलताच अभिमान वगैरे असायचा. वेळप्रसंगी तो जाहीरपणे व्यक्तही केला जात असे. त्याकाळी काही कंपन्यांची घडय़ाळे अचूक वेळ दाखविणारी घडय़ाळे म्हणून प्रसिद्ध पावलेली होती, फवर ल्युबा, हेस, वेस्ट एंड अशा काही कंपन्या त्यासाठी नामांकित होत्या. साठ-सत्तरच्या दशकात स्वदेशी कंपनी एचएमटीने मनगटी घडय़ाळे बाजारात आणली, तीही बहुतेक चावीचीच घडय़ाळे होती. अशा चावीच्या भिंतीवर लावण्याच्या घडय़ाळात अजून एक सोय म्हणून अंतर्भूत असायची ती म्हणजे, घडय़ाळ चालू आहे हे दर्शविण्यासाठी कायम हलत राहणारा लंबक आणि प्रत्येक तासागणिक जितके वाजले असतील तितक्या संख्येने टोले देऊन घडय़ाळाकडे नजर न टाकताच आत्ता किती वाजलेत हे समजण्याची सोय. आणखी एक सोय त्याकाळी प्रत्येक घडय़ाळात असणे अगत्याचे असायचे, ती म्हणजे नेमून दिलेल्या वेळी वाजणारा गजर. पहाटे वेळेवर उठण्यासाठी त्याचा आजही उपयोग होतो. चावीच्या घडय़ाळात त्यासाठी वेगळी चावीची व्यवस्था असायची आणि तीदेखील वेळोवेळी आठवणीने पिळून ठेवायला लागायची. चावीच्या घडय़ाळाचा दर्जा आणि अर्थातच त्याची किंमत घडय़ाळ किती ज्वेल्सचे आहे ह्यवर ठरत असे. सतरा ज्वेल्सचे घडय़ाळ म्हणजे फार चांगल्या दर्जाचे असे. त्यावेळी
त्या ज्वेल्सच्या घडय़ाळात काय प्रयोजन असते ते कळत नव्हते. माझा तरी त्यावेळी असाच समज होता कीश्रीमंत लोक त्यामध्ये हिरे जडवून घेत असावेत. नंतर समजलं की त्यामध्ये आपण ज्याला दागिन्यामधील रत्ने वैगैरे म्हणतो तसा उपयोग त्यात नाही, तर काही तांत्रिक कारणासाठी यंत्रामध्ये त्याचा उपयोग करण्यात आलेला असतो.
वर म्हटल्याप्रमाणे, पुरुषासाठी त्याकाळी मनगटी घडय़ाळ हा एक दागिना होता. जो कर्मचारी कचेरीत येण्याच्या आणि जाण्याच्या बाबतीत अतिशय वक्तशीर म्हणून त्याच्या सहकारी मित्रात प्रसिद्ध असायचा, त्याला सेवेतून निवृत्त होताना दिल्या जाणाऱ्या निरोप समारंभात भेटवस्तू म्हणून हमखास मनगटी घडय़ाळ देण्याची प्रथा होती. नोकरीत असताना ज्याला कधीही वक्तशीर राहण्यासाठी घडय़ाळाची गरज पडली नव्हती, अशालाही सेवानिवृत्तीनंतर उपयोगात यावे म्हणून घडय़ाळ भेट दिले जात असे.
पूर्वी रेडियो अगदी क्वचित कुटुंबात पाह्य़ला, ऐकायला मिळत होता. काही लोक आपली घडय़ाळे रेडियोवर सकाळी सांगितल्या जाणाऱ्या वेळेप्रमाणे लावू लागले होते. त्यामुळे त्याकाळी बऱ्याच लोकांचा समज म्हणा किंवा गैरसमज किंवा प्रवाद म्हणा असा होता, की रेडियो टाइम आणि रेल्वे टाइम हे वेगवेगळे असतात. कारण ज्यांच्या घरी रेडियो नसायचा, अर्थातच असेच लोक बरेच असायचे, असे लोक आपल्या हातावरची घडय़ाळे रेल्वे फालाटाच्या छताला टांगलेल्या भव्य आकाराच्या घडय़ाळाला साक्षी ठेवून त्या बरहुकूम लावून घेत असत. त्यामुळे प्रमाणित वेळ ह्यसंबंधी रेल्वे टाइम आणि रेडियो टाइम हे असे दोन कथित प्रकार त्याकाळी होते.
यंत्र म्हटले की, त्यासाठी दुरुस्तीही पर्यायाने आलीच. त्यामुळे घडय़ाळ दुरुस्ती आणि रेडियो दुरुस्तीचे वर्ग काही ठिकाणी चालवले जात. त्यावर काही लोक आपला उदरनिर्वाहदेखील चालवायचे. काही नोकरपेशाचे लोक घडय़ाळ दुरुस्ती हा नोकरी शिवाय अधिकचे उत्पन्न मिळवायचे साधन किंवा जोडधंदा म्हणूनही करत असत.
बॅटरीवर चालणाऱ्या घडय़ाळांचा शोध लागून ती बाजारात सहज उपलब्ध झाल्यावर मात्र चावीची घडय़ाळे मागे पडली. पूर्वी प्रत्येक कुटुंबात हमखास आढळणाऱ्या वस्तूंची जागा आधुनिक काळाला उपयुक्त आणि साजेशा वस्तूंनी घेतल्यानंतर त्या वस्तू इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. त्यात आता चावीच्या किंवा किल्लीच्या घडय़ाळाचीदेखील गणना होऊ लागली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
चावीच्या घडय़ाळाची टिकटिक ही त्या घडाळ्याला दिलेली चावी संपल्यावर आपोआप बंद पडते, म्हणून मानवी जीवनाची अनिश्चितता लक्षात घेऊन जसे नियतीच्या हातातले खेळणे म्हटले आहे, त्याच बरोबर त्याला चावीचे घडय़ाळदेखील त्यामुळेच म्हटले जात असावे.
ऐतिहासिक वस्तूंच्या यादीत लवकरच किल्लीच्या किंवा चावीच्या घडय़ाळाचादेखील अंतर्भाव करावा लागेल. त्या मार्गावर आज ती बरीच पुढे आहेत.
मोहन गद्रे- gadrekaka@gmail.com
वस्तु स्मृती: चावीचे घडय़ाळ
मुंबईसारख्या शहरात अगदी फार पूर्वीपासून लोक घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावत आहेत.
Written by मोहन गद्रे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-06-2016 at 01:55 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Key ring watches