मला माझ्या आई आणि आजीच्या व्यवस्थापन कौशल्याचे नेहमीच कौतुक वाटत आलेय. विशेषत: स्वयंपाक खोली म्हणजे तर त्यांच्या व्यवस्थापन कलेचा उत्तम नमुनाच. कोणती वस्तू कुठे ठेवली म्हणजे ती पटकन मिळेल. कोणते डबे किती उंचीवर ठेवले म्हणजे पटकन काढता येतील हे त्यांना अनुभवाने उमगलेले आहे. पण आपल्या आजच्या गृहिणीला मात्र अनुभवाने हे ज्ञान मिळवावे इतका वेळ कुठे आहे! मग कोणी तज्ज्ञ व्यक्तीने स्वयंपाक खोली लावून दिली तर तिला ती हवीच आहे. मग माझ्यासारख्या इंटिरियर डिझायनरची जबाबदारी दुपटीने वाढते. माझ्या सख्यांसाठी स्वयंपाक खोली डिझाइन करताना त्यांच्या दृष्टिकोनातून मला विचार करावा लागतो. विशेष कस तेव्हा लागतो जेव्हा स्टोरेज डिझाइन करायचे असते.
स्वयंपाक खोलीतील स्टोरेजचे ढोबळ मानाने दोन भाग पडतात. पहिला भाग ओटय़ाखालील तर दुसरा ओटय़ावरील स्टोरेजचा. बरं या स्टोरेजचा विचार करताना त्यात वापरात येणाऱ्या जागेसोबतच त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल देखील फार महत्त्वाचे ठरते. बरोबरीने त्यात सौंदर्य आणि आधुनिकतेचा मिलाफ देखील दिसायला हवा. तसेही प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधणे हा माझा तरी छंदच आहे.
तर सगळ्यात प्रथम आपण ओटय़ा खालील स्टोरेज विषयी बोलू. ओटय़ा खालील भागात वापरण्यास सुटसुटीत अशा स्टेनलेस स्टील च्या ट्रॉलींचा पर्याय सर्वात छान. या ट्रॉली आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या आकारमानात आपण बनवून घेऊ शकतो. तरीही अनेक स्वयंपाक खोल्यांची अंतर्गत सजावट केल्यानंतर माझे स्वत:चे असे काही ठोकताळे मी बनवले आहेत. त्यानुसार जिथे ओटय़ावर शेगडी येते त्याच्या खाली शक्यतो मसाल्यांचा डबा, कालथा,पळ्या, कात्री, सुऱ्या यांचे निरनिराळे खण असणारा ड्रॉवर असावा. त्या खाली साधारण पणे ७ इंचाचा ड्रॉवर हा चहाचे भांडे तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर लहान भांडय़ांसाठी ठेवून सर्वात खाली व सर्वात मोठा ड्रॉवर हा कुकर, कढई यासारख्या मोठय़ा परंतु स्वयंपाक करताना झटकन हाताशी हव्या असणाऱ्या भांडय़ांसाठी राखून ठेवावा. त्याचप्रमाणे जागेच्या सोयीनुसार कप, बश्या यांसाठी एक लहान ड्रॉवर व ताटाळ्यासाठी एक मोठा ड्रॉवर राखून ठेवावा. खेरीज कांदे बटाटय़ांसाठी देखील एका ट्रॉलीची व्यवस्था करावी, फक्त त्या ट्रॉलीचा दर्शनी भाग सच्छिद्र ठेवावा जेणेकरून हवा खेळती राहून कांदे बटाटे सडणार नाहीत. यासाठी बाजारात मिळणाऱ्या तयार जाळ्या दर्शनी भागावर लावू शकतो- ज्या नीटनेटक्या पण दिसतात. जर तुमच्याकडे पाइप गॅस लाइन नसेल तर शेगडीच्या शेजारचाच एखादा गाळा सिलिंडर ठेवण्यासाठी मोकळा सोडायला विसरू नये. बऱ्याचदा ‘L’ आकाराच्या ओटय़ामध्ये जो कोपरा तयार होतो त्याचे काय करायचे, हा प्रश्न आपल्याला सतावतो, पण आता त्यासाठीही खास वेगळ्या ट्रॉली मिळतात, ज्यामुळे ओटय़ाखालील इंच न् इंच व्यवस्थित वापरला जाईल. हे सर्व करून उरलेल्या जागेत आपल्याकडे असणाऱ्या डबे व भांडय़ांचे वर्गीकरण करून त्यांच्या मापाने इतर ट्रॉली बनवून घ्याव्यात.
या ट्रॉली बनवून घेताना त्यासाठी कोणते स्टील वापरले जात आहे याचीदेखील माहिती आपल्याला असणे गरजेचे असते. चांगल्या प्रतीच्या ट्रॉली या ३०४ ग्रेडचे स्टील वापरून बनवल्या जातात ज्यांना गंज पकडत नाही. त्यामुळे आम्ही ३०४ ग्रेडच्याच ट्रॉली सुचवतो. पण जर अगदीच शक्य नसल्यास २०२ ग्रेडचे स्टील वापरून देखील ट्रॉली बनतात. अशा वेळी फक्त त्या ट्रॉलीचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी; जेणेकरून त्यांचे आयुष्य वाढेल.
ओटय़ाखालील स्टोरेजइतकेच महत्त्वाचे ओटय़ावरील स्टोरेजदेखील असते. याचा उपयोग वस्तू साठवणीसोबतच काचेच्या दरवाजांनी व अप्रत्यक्ष लाइटिंगने सजवले असता छान डिस्प्ले युनिट म्हणूनही करता येतो. त्याचप्रमाणे निरनिराळे आधुनिक हार्डवेअर फिटिंग वापरून काही वर उघडणारे तर काही बाजूला उघडणारे दरवाजे लावले तरी स्वयंपाक खोली छान ट्रेंडी दिसते. थोडा हलकाफुलका लुक हवा असेल तर अॅल्युमिनिअम प्रोफाइल व फॉॅस्टेड ग्लासचे दरवाजे वापरावेत.
हे स्टोरेज वापरण्याला सुटसुटीत व्हावे यासाठी मात्र काही नियम पाळायला हवेत. ओटय़ापासून किमान सव्वादोन फूटावर हे स्टोरेज लावावे व त्याची उंची देखील अडीच फुटापेक्षा जास्त नसावी; जेणेकरून वरील खणातील वस्तू देखील पटकन काढता येतील. शिवाय भिंतीपासून या स्टोरेजची रुंदी सव्वा फूट असावी म्हणजे काम करत असताना त्याचा अडथळा वाटणार नाही.
ओटय़ावरील व खालील स्टोरेजखेरीज एखाद्या कोपऱ्यात किंवा फ्रिजच्या बाजूला फ्रिजच्याच उंचीचे एखादे उभे स्टोरेज आपण देऊ शकतो. यामधील उभ्या ट्रॉलीमध्ये कोल्ड्रिंकच्या बाटल्या किंवा इतर काही उंच आकाराचे डबे वैगेरेसारख्या वस्तू राहू शकतात, शिवाय ते दिसायलाही खूप आधुनिक आणि आकर्षक दिसते.
हे सर्व स्टोरेज बनविण्यासाठी लागणारे प्लायवूड, लॅमिनेट आणि सर्वात शेवटी, पण महत्त्वाचे हार्डवेअर फिटिंग्जबद्दलही आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं. स्वयंपाक खोलीत शक्यतो मारिन प्लायवूड वापरावे. भलेही ते थोडे महागडे होईल पण पुढच्या अनेक वर्षांच्या वापरासाठी ते उपयुक्त ठरेल. अगदीच बजेटचा प्रॉब्लेम असल्यास किमान टफ ग्रेडचा तरी प्लायवूड वापरावा. परंतु थोडे पैसे वाचविण्याच्या मोहापायी कमर्शिअल प्लायवूड अथवा कोणतेही हलके मटेरियल वापरण्याची तडजोड मात्र निश्चित करू नये.
प्लायवूडसोबतच येते ते लॅमिनेट. तसं पाहिलं तर लॅमिनेट हे प्लायवूडचे संरक्षक कवचच. पण संरक्षणाबरोबरच ते सौंदर्यवृद्धीचे कामही करते. यात अनेक रंग, पोत उपलब्ध असतात. नव्या ट्रेंडप्रमाणे थोडे उठावदार (flashy) रंग वापरण्याची सध्या फॅशन आहे. एकाच उठावदार रंगाच्या लॅमिनेटने सजविलेली स्वयंपाक खोली एकदम हटके दिसते. सध्या तर बाजारात खास स्वयंपाक खोलीसाठी म्हणून वेगवेगळ्या लॅमिनेटच्या रेंज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियादेखील सोपी झाली आहे. स्वयंपाक खोलीसाठी लॅमिनेट निवडताना शक्यतो गुळगुळीत व चकचकीत लॅमिनेटला प्राधान्य द्यावे, कारण यावर डाग किंवा तेलकटपणा फार टिकत नाही व तो स्वच्छही पटकन करता येतो.
आता उरला प्रश्न हार्डवेअरचा. हार्डवेअरमध्ये ड्रॉवर चॅनेल्स तसेच स्टोरेज दरवाजांसाठी लागणारे फिटिंग्ज व हॅन्डल्सचा समावेश करता येईल. सध्या बाजारात नामवंत कंपन्यांचे टेलेस्कोपिक ड्रॉवर चॅनेल्स तसेच दरवाजांसाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक हिंजेस सहज उपलब्ध आहेत जे आपण निर्धास्त वापरू शकतो. हॅण्डलमध्ये देखील पितळ, स्टील व व्हाइट मेटल असे प्रकार मिळतात. पितळेचे हॅण्डल हे सर्वात महाग परंतु सौंदर्य आणि भक्कमपणातही उजवे. त्याखालोखाल स्टीलचे हॅन्डल. यात फार डिझाइन्स नाही मिळाले तरी टिकायला मात्र हेच चांगले. सर्वात शेवटी व्हाइट मेटल. सध्या बाजारात हे सहज मिळतात तसेच स्वस्त देखील असतात, पण व्हाइट मेटल हे थोडे ठिसूळ असल्याने लवकर तुटू शकते. याबरोबरच अॅल्युमिनिअम प्रोफाइल हॅण्डल हा देखील एक देखणा पर्याय आपल्याकडे आहे.
अशा तऱ्हेने दर्जात कोणतीही तडजोड न करता खिशाला परवडेल अशा किमतीत एक सुंदर स्वयंपाक खोली आपण उभी करू शकतो.
गौरी प्रधान – ginteriors01@gmail.com