सहकारी गृहनिर्माण संस्थेत मालकी तत्त्वावर सदनिका असेल तर त्याच वेळी नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन करणे आवश्यक आहेच, पण ते करीत असताना त्याच्यासंबंधी कायदेशीर तरतुदी काय आहेत हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे.
हिंदी भाषेत एक म्हण प्रचलित आहे- ‘हम मर गये दुनिया डूब गई.’ मथितार्थ असा की माणूस मृत्यू पावला की त्याच्यासाठी हे जग बुडून गेलेले असते, म्हणजे त्याच्यापुरते या जगाचे अस्तित्व संपलेलेच असते. मृत व्यक्तीसाठी हे शब्दश: खरे असले तरी त्याच्या मागे जिवंत असणाऱ्यांना या जगात राहायचे असते आणि त्या जगाचे कायदे आणि नियम पाळणे यांना बंधनकारक असते. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या नावावर असलेल्या चल आणि अचल संपत्तीचा ताबा कायदेशीर वारसाकडे सोपविण्यासंबंधी मृत्यूपूर्वी कायदेशीर तजवीज करून ठेवणे अपेक्षित असते. त्यासाठी नामनिर्देशनाची अर्थात नॉमिनेशनची कायदेशीर तरतूद आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेत मालकी तत्त्वावर सदनिका असेल तर त्याच वेळी नामनिर्देशन करणे आवश्यक आहेच, पण ते करीत असताना त्याच्यासंबंधी कायदेशीर तरतुदी काय आहेत हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे, म्हणून हा लेखप्रपंच.
हल्लीचा काळ लक्षात घेता आणि राहत्या जागांना आलेले सोन्याचे मोल लक्षात घेता, ही प्रक्रिया अगदी सावधपणे आणि नीट विचारपूर्वक पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदनिकेचे हस्तांतर कायदेशीर आणि सहज सोपे होऊ शकते. अन्यथा सर्व संबंधितांसाठी मोठी कायदेशीर लढाई ठरू शकते, ती खर्चीक आहेच शिवाय त्याचा निकाल लागायला वर्षांनुवर्षे वाट पाहावी लागते. अचल संपत्तीचा वारसा हक्क हा कौटुंबिक मामला असून, ज्या त्या कुटुंबाने तो कायदेशीररीत्या प्राप्त करून घेणे अभिप्रेत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेत असणारी वैयक्तिक मालकीची सदनिका ही संबंधित गृहनिर्माण संस्थेचा एक हिस्सा असते. सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सभासद मृत पावला की त्याच्या मालकीच्या गृहनिर्माण संस्थेत असलेल्या सदनिकेचा ताबा कोणाकडे द्यावा, यासंबंधी संस्थेच्या कार्यकारिणीला कायद्याबरहुकूम निर्णय घेणे शक्य व्हावे म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी लागू असलेल्या बायलॉजमध्ये त्यासंबंधी विस्तृत उपाययोजना सांगितलेली आहे. संस्थेच्या कार्यालयात असणारी सदर पुस्तिका सभासदांनी नीट अभ्यासावी.
अचल संपत्तीच्या वारसा हक्कासंबंधी लोकांच्या मनात बरेच समज-गैरसमज आहेत. आणि त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेतील काही सभासद नामनिर्देशन करण्यासंबंधी चालढकल करतात. परंतु असे करणे कोणाच्याही हिताचे नाही. एखाद्या सभासदाने नामनिर्देशन केलेले नसेल तर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारिणीला मॉडेल बायलॉजप्रमाणे आपले कर्तव्य पार पडणे क्रमप्राप्त असते. संबंधित मृत सभासदाच्या मालकीच्या सदनिकेबद्दल नामनिर्देशनासाठी मॉडेल बायलॉजमध्ये ज्या तरतुदी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे संस्थेच्या कार्यकारिणीकडून कारवाई केली जाते. परंतु त्यात बराच कालावधी जातो, शिवाय मृत सभासदाच्या कुटुंबीयांत त्यावरून तंटे-बखेडे निर्माण होत असतात. माझ्या मते, सदनिका असो किंवा इतर अचल संपत्ती असो, त्या संबंधीची खरेदी-विक्री करण्यासाठी ज्या कागदपात्रांची पूर्तता कायद्याने करावी लागते त्यातच नामनिर्देशनाचाही अंतर्भाव करता येणे शक्य आहे का, याचा विचार व्हायला हवा. कारण सदनिकाधारकास नंतर त्यात बदल करता येतोच. सहकार खात्याने याचा विचार करावा. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेत ज्यांची सदनिका असेल त्या प्रत्येक सभासदाने न चुकता नामनिर्देशन करून संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. पण कार्यकारिणीने ते त्यांच्या रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे की नाही याची खात्रीदेखील करून घेणे अगत्याचे आहे.
नामनिर्देशन करताना एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा. कारण मध्यंतरीच्या काळात न्यायालयाने इतर अशाच काही प्रकरणामध्ये काही महत्त्वपूर्ण निकाल दिलेले असतात. त्याचाही विचार करणे महत्त्वाचे आणि उपयुक्त असते.
मोहन गद्रे gadrekaka@gmail.com