आपल्याला हे माहीत आहे की, रंगांचा जन्मच मुळी प्रकाशातून होतो. काचेच्या लोलकाप्रमाणे असणाऱ्या पावसाच्या थेंबातून सूर्याचा पांढरा प्रकाश जेव्हा जातो; तेव्हा पाऊस आणि उन्हं एकाच वेळी आलीत की सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं. याबरोबरच आपल्याला हेही माहीत आहे की, कमी प्रकाशात रंग कोणता आहे, हे ओळखणं कधी कधी कठीण जातं. एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिची प्रतिमा, तिचे रंग याबाबतची माहिती मेंदूकडे पाठवण्याकरिता आपल्या डोळ्यात दोन प्रकारच्या पेशी असतात. कोन सेल्स अर्थात शंकू पेशी आणि रॉड सेल्स अर्थात दंडगोल पेशी. दंडगोल पेशींमुळे आपल्याला कमी प्रकाशातही दिसू शकतं, पण या पेशींमार्फत आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंग दिसू शकत नाहीत. शंकू पेशींमुळे आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंगांचं ज्ञान होतं. पण त्या पेशी केवळ जास्त प्रकाशातच त्यांचं प्रतिमाज्ञान करवून द्यायचं काम करू शकतात. शंकू पेशी या तीन प्रकारच्या असतात- तांबडय़ा, हिरव्या आणि निळ्या रंगांचं ज्ञान करवून देणाऱ्या या पेशींमुळेच आपल्याला रंगज्ञान होत असतं. अशा प्रकारे रंग आणि प्रकाश यांचं घनिष्ठ नातं आहे.
आपण एखाद्याच्या घरी एखाद्या खोलीत बघितलेली रंगछटा आपल्या मनावर मोहिनी घालते आणि मग आपण ठरवतो की, आपण जेव्हा आपल्या घरी रंग काढू, तेव्हा आपणही आपल्या घरातल्या त्या खोलीतल्या भिंती त्याच रंगछटेनं सजवायच्या. पण सावधान! कारण दुसऱ्याच्या घरात उठून दिसलेली ती रंगछटा आपल्याही घरात तितकीच उठावदार दिसेल, असं मात्र सांगता येत नाही. प्रत्यक्षात रंगछटा या आजूबाजूला पसरलेल्या नसíगक किंवा कृत्रिम प्रकाशामुळे उठावदार किंवा निरस वाटत असतात. काही रंगछटा या सावलीत किंवा कमी प्रकाशात बघायला बऱ्या वाटतात, तर काही रंगछटा या तीव्र प्रकाशात अधिक खुलून दिसतात. त्यामुळे आपण ज्याच्या घरी ती रंगछटा बघितली, तिथे आपण पाहिलं, त्या वेळी प्रकाश किती होता? ती दिवसाची वेळ होती की रात्रीची? दिवसाची वेळ असेल, तर एकंदर खोलीतल्या दरवाजे-खिडक्यांची स्थानं आणि संख्या किती होती? त्यानुसार खोली उजळणारा तो प्रकाश खोलीच्या कुठल्या भागातून येत होता? एखाद्या कोपऱ्यातून, की मध्यभागी असलेल्या एखाद्या खिडकी किंवा दरवाजातून? अशा अनेक प्रश्नांबाबत विचार करावा लागेल. जर आपण बघितलं तेव्हा रात्र असेल, तर खोलीत टय़ूबलाइट, किंवा तशाच प्रकारचा सफेद प्रकाश देणारी प्रकाशव्यवस्था होती, की बल्बच्या पिवळसर प्रकाशाप्रमाणे प्रकाश देणारे दिवे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला ती विशिष्ट रंगछटा का आवडली याचं उत्तर मिळू शकतं आणि मग त्या घरी आवडलेली ती रंगछटा खरोखरच आपल्याही घरी तितकीच प्रभावी वाटेल का, हे आपण त्या प्रश्नांसदर्भातली त्या घरची परिस्थिती आणि आपल्या घरची परिस्थिती याची तुलना करून ठरवू शकतो. हे सगळं केवळ भिंतींच्या रंगांनाच लागू नाही, तर फíनचरच्या लाकडाच्या पॉलिशचा रंग, सोफा आणि खुच्र्याची कव्हर्स, पडदे, बेडशीट्स अशा सर्वच गोष्टींच्या रंगसंगतीला लागू आहे.
दोन-तीन स्पॉट लाइटचा वापर करून त्या खोलीत कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था केली असेल तर [छायाचित्र (१)], एका दिव्याच्या प्रकाशापेक्षा जास्त असणाऱ्या या प्रकाशामुळे त्या खोलीतलं फíनचर अधिक ठसठशीत दिसतं. याउलट एका बल्बच्या प्रकाशात छायाचित्र (२) मध्ये दाखवलेल्या त्याच खोलीतल्या सोफ्याची रंगछटा अधिक गडद वाटते. छायाचित्र (३) मध्ये दिवसाच्या नसíगक प्रकाशात उजळून निघालेल्या त्या खोलीत फíनचरपेक्षा त्याची पाश्र्वभूमीच अधिक उठावदार दिसते आहे. छायाचित्र (४) मध्ये कँडल लाइटच्या मंद प्रकाशात फक्त मेणबत्त्यांच्या आजूबाजूचाच परिसर उजळून निघाला असून अप्रत्यक्ष प्रकाशामुळे फíनचरची एक वेगळीच रंगछटा दिसते आहे. छायाचित्र (५) मध्ये विविध प्रकारचे दिवे दाखवले आहेत. त्यातला बल्ब हा पिवळसर प्रकाश देतो. स्पॉट लाइट हा खोलीतला विशिष्ट भाग प्रकाशाने उजळून टाकतो. टय़ूबलाइटमध्ये दिवसाच्या प्रकाशाचा आभास निर्माण होतो. हॅलोजन दिवे हे पांढरट प्रकाश देतात, तर सीएफएलसारखे दिवे हे मंद पांढरट -निळसर प्रकाश देतात.
अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर रंगाची निवड करायची झाली, तर एका मोठय़ा कार्डबोर्डच्या तुकडय़ावर आपल्याला हव्या असलेल्या रंगाची छटा रंगवून तो कार्डबोर्ड खोलीतल्या वेगवेगळ्या भिंतींवर लावून बघायचा. खोलीतल्या खिडकीसमोर येणाऱ्या भिंतींवर प्रकाश अधिक असतो, तर ज्या भिंतींमध्ये खिडकी आहे, त्या भिंतीवर मात्र प्रकाश कमी असतो, त्यामुळे सर्व भिंतींवर तो कार्डबोर्ड लावून बघितला असता, त्यावरचा रंग त्या त्या भिंतीवर कसा दिसणार आहे, याची कल्पना येऊ शकते. या सर्व भिंतींवर दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रकाशात तो रंग एकदा निरखून घ्यावा व मगच तो आहे तसाच वापरायचा, की त्यात थोडा बदल करून वापरायचा याबाबतचा निर्णय घ्यावा. आपण आपल्या घरात नेहमी वापरत असलेले टंग्स्टनचे बल्ब हे पिवळसर प्रकाश देत असल्यामुळे निळा रंग हा या प्रकाशात हिरवट दिसतो, तर पांढरा रंग हा धुळकट पिवळसर दिसतो. याउलट फ्लोरोसण्ट टय़ूब्स किंवा बल्ब हे पांढरट प्रकाश देत असल्यामुळे सर्वच गोष्टी एकदम ‘कूल’ दिसतात आणि त्यामुळे खोलीभर एक मंद निळसर छटा जाणवते. यामुळे प्रकाश आणि रंग यांच्या संतुलनातून आपल्याला हवा असलेला परिणाम साधता येतो. याचा उपयोग करून आपल्याला खोलीतला प्रकाश सुधारता येतो. उदाहरणार्थ, सूर्य पूर्व-पश्चिम दिशेत फिरत असल्यामुळे जर आपल्याला दिवसा थोडय़ा काळोखी वाटणाऱ्या अशा उत्तराभिमुख खोलीसाठी रंगछटा निवडायची असेल, तर या खोलीसाठी उबदार रंगांची निवड केली, तर खोलीतला काळोख कमी व्हायला मदत होऊ शकते. याउलट सर्वसाधारणपणे वास्तुरचनेला अनुसरून पूर्वेला असलेलं स्वयंपाकघर सकाळच्या वेळी उन्हामुळे उजळून निघतं. अशा वेळी या खोलीला जर निळ्या किंवा हिरव्या रंगासारखे थंड रंग लावले, तर जेवण शिजत असल्यामुळे सतत गरम हवामान असलेल्या आणि उन्हामुळेही उबदार असणाऱ्या या खोलीत डोळ्यांना थंडावा वाटायला मदत होते. या सगळ्या विवेचनावरून हे स्पष्ट होतं की, आपण खोलीतला ‘मूड’ अर्थात मानसिक आंदोलनं आणि त्यामुळे मनावर होणारे परिणाम यांचं व्यवस्थापन करू शकतो आणि विविध खोल्यांकरिता त्या त्या खोल्यांच्या कार्यानुसार आवश्यक तो मूड तयार करू शकतो.
(इंटिरिअर डिझाइनर)
मनोज अणावकर anaokarm@yahoo.co.in