पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यात अनेक सागर- महासागरांचा सहभाग फार मोठा आहे. ही विशाल सागरसृष्टी म्हणजे अजबखाना आहे. मानवी जीवनासाठी त्याचा अनेक प्रकारांनी जो उपयोग होत आहे त्यात जलवाहतुकींनी सुमारे २००० वर्षांपासून जी प्रगती केली ती थक्क करणारी आहे. मात्र ही जलवाहतूक सुरक्षित, विनासायास होण्यासाठी सागरी प्रवासाकरिता जे अनेक घटक आहेत; त्यातील सागर किनाऱ्यावरची दीपगृहे म्हणजे नौकानयनाला उपकारक अशी मार्गदर्शक ठरली आहेत. आजची जी अद्ययावत दीपगृहे अस्तित्वात आहेत त्याचा सारा प्रवास अनेक स्थित्यंतरांतून झालाय.
जगातील सर्वात प्राचीन दीपगृह इ.स. पूर्व ८०च्या सुमारास इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरानजीकच्या द्विकल्पावर संशोधक-शास्त्रज्ञ हॉलेमी यांनी उभारले होते. हे उंच दीपगृह प्राचीन काळातील सात आश्चर्यापैकी एक असे धरले जायचे. त्याच्या फेअरॉस या नावावरून दीपगृह बांधण्याच्या उद्योगाला ‘फेर्अी लॉजी’ असे संबोधले जाते. या दीपगृहाचे बांधकाम संगमरवरी दगडांचे होते. त्याची उंची १२० मी. इतकी होती यावरून त्याच्या उत्तुंगपणाची कल्पना येते.
त्यानंतर रोमन साम्राज्यकाळात इ.स. ८३ पासून दीपगृहं उभारली गेली. त्या काळी दीपगृहाच्या एखाद्या मजल्यावर कर्मचारीवर्गाची राहण्याची सोय केली जात असे. १८ व्या शतकापर्यंत जगात जी दीपगृहे होती ती कोळसा- लाकडाचा अग्निप्रकाश निर्माण करून जहाजांना मार्गदर्शन करत असत. आता मात्र अनेक स्थित्यंतरांतून विजेच्या प्रदीप्त दिव्यांचा शोध लागल्याने त्यात अनेक प्रकारच्या सुधारणांची प्रक्रिया चाललेलीच आहे.
दीपगृहाचे थोडक्यात वर्णन म्हणजे सागरी प्रवास करणाऱ्या जहाजांना दिशादर्शनासह धोक्याचा इशारा देण्यासाठी सागर किनारी, बंदरावर उभारलेली मनोरासदृश वास्तू. रात्रीच्या समयी सागरी प्रवास करणाऱ्या जहाजांना दिशादर्शनासह वाटेतील धोक्याचा इशारा देण्यासाठी जशी दीपगृहाची उभारणी करतात, तर दिवसा प्रवास निर्धोक-सुरक्षित होण्यासाठी या दीपगृहाच्या उंच मनोऱ्यावरील ठळक रंगीत पट्टय़ांच्या दर्शनानी दिशादर्शनाचा हेतू साध्य केला जातो. रात्रीच्या वेळी दीपगृहाच्या सर्वात वरच्या मजल्यावर जो दिवा असतो त्याच्या सातत्याच्या उघड-झाप पद्धतीनी अज्ञात प्रदेशात प्रवास करणाऱ्या जहाजांना योग्य मार्गदर्शन होऊन ती इच्छित स्थळी मार्गस्थ होतात.
भारतातही हजारो वर्षांपासून सागरीमार्गे व्यापार चाललाच आहे. स्थानिकांबरोबर परकीय व्यापारी जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी उपरोक्त पद्धतीची दीपगृहे उभारली गेली. मात्र त्यात स्थितंतरे होता होता बंदरावर जकात-महसूल गोळा करणाऱ्या कचेऱ्यांतून तसेच गोदीच्या प्रवेशद्वारीच उंच अशा खांबावर रॉकेलचे मोठे दिवे लावण्याची पद्धती अमलात आली. बंदर मुक्कामी उंच दीपगृहाप्रमाणे बंदर परिक्षेत्र सीमा दाखवणारे जे दिवे अस्तित्वात आले त्याद्वारे सागर किनाऱ्यावरील गोदी प्रशासनाची हद्द दाखविण्याचा उद्देश होताच.
आजमितीस जगामध्ये सुमारे १५०० दीपगृहे अस्तित्वात आहेत. त्यापैकी काही दीपगृहांना प्रखर प्रकाशझोताबरोबर दूरवर पोचणाऱ्या, आवाज देणाऱ्या प्रचंड घंटा असून काहींवर रेडिओ सिग्नलद्वारे दर्यावर्दीना त्वरित इशारा प्राप्त होतो.
दीपगृह कर्मचारीवर्गाचे काम :
रात्रीच्या प्रहरी सातत्याने प्रकाशझोत टाकण्यासाठी दक्ष राहणे. दिवसा जहाजांना इशारा देण्यासाठी मोठय़ा आकाराच्या आरशाचा प्रकाश परावर्तित करून सावध करणे. दीपगृहाच्या खिडक्यांची तावदाने स्वच्छ ठेवणे. दीपगृहावर प्रकाश सतत पेटता ठेवण्यासाठी इंधनाचा योग्य पुरवठा करणे. काही वेळा वातावरणात धुके निर्माण झाल्यास जहाजांना इशारा देण्यासाठी सातत्याने घंटानाद करून मार्गदर्शन करणे. काही समस्या निर्माण झाल्यास बंदर अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधणे.
महाराष्ट्राच्या ७२० किमी सागरी किनाऱ्यावरील बंदरावरच्या दीपगृहाची संख्या खालीलप्रमाणे-
दमण ते मुंबई १५, मुंबई बंदर क्षेत्रात ३१, अलिबाग २, चौल १, मुरुड जंजिरा ७, दाभोळ ६, रत्नागिरी- जयगड प्रत्येकी ५, राजापूर- विजयदुर्ग १-१, देवगड २, मालवण ५, वेंगुर्ले ५, गोवा परिसर १० यापैकी काही दीपगृहांचे काम जागतिक नौकानयन दळणवळण अखत्यारीत चालते. त्यांच्या दीपगृहांवरील प्रखर प्रकाशझोताचा इशारा सुमारे २५ ते ३० सागरी किलोमीटर अंतरापर्यंत दर्यावर्दीना दिसतो. समुद्रसपाटीपासून दीपगृहाची उंची आणि त्याच्यावरील प्रकाशझोताची पोचण्याची क्षमता याचे एक कोष्टक आहे. त्या आधारे दीपगृहाचे बांधकाम केले जाते. मुंबई बंदरानजीकचे कुलाबा दीपगृह हे सर्वश्रुत आहे. त्याच्या मजल्यानुसार त्याची अंतर्गत रचना आणि त्याची उपयुक्तता ध्यानी येते. हे एक प्रख्यात दीपगृह असल्याने साहित्य- चित्रपटातूनही त्याची दखल अनेकदा घेतली गेली आहे.
दीपगृहाद्वारे जे प्रकाशझोत टाकले जातात ते एकाच प्रकारचे नसतात. त्यांच्या प्रकाशझोतांच्या प्रकारावरून आणि पद्धतीनुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जसे स्थिर प्रकाश, चमकणारा प्रकाश, चमकसमूह प्रकाश, आच्छादित प्रकाश आणि आच्छादित समूह प्रकाश इ. यापैकी कोणत्या प्रकारचा दिव्याचा झोत दर्शवला जातो हे विशिष्ट खुणांच्या आधारे सागरी प्रवासातील नकाशात दाखवलेले आसते. या नकाशांना Navigation Chart असे म्हणतात.
दीपगृहाचे स्थापत्य वैशिष्टय़ :
सागरी जलवाहतूक अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जमिनीवरील दीपगृहांची उभारणी करण्यासाठी उंच टेकडी, डोंगरकडय़ांची जागा निवडण्यात येते. वादळी वारे आणि उसळत्या सागराच्या रौद्र रूपापासून सुरक्षित राहण्यासाठी दीपगृहाची इमारत गोलाकार आणि अष्टकोनी बांधली जाते. आणि या इमारतीच्या वरचा भाग निमुळता ठेवला जातो. दीपगृहाची इमारतरचना मनोरासदृश असावी असा जणू नियमच आहे. त्याचे बांधकाम करताना दगड-विटा तसेच काही प्रमाणात लाकूड वापरले जाते. आणि बांधकामाला मजबुती येण्यासाठी लोखंडी सळ्यांचाही उपयोग केला जातो. सर्वात वरच्या मजल्यावर प्रकाशझोत टाकणारा जो प्रखर दिवा बसवला जातो त्याच्या सुरक्षेसाठी भक्कम छप्पर बसवले जाते आणि दिव्यासभोवती लोखंडी कठडय़ाची रचना असते.
अखंड चाललेले दीपगृहाचे काम जबाबदारीसह अत्यावश्यक स्वरूपाचे असल्याने काही मजल्याच्या दीपगृहात कर्मचारीवर्गाची निवासव्यवस्था असते. ही सुविधा केल्याने दीपगृह संरचनेचा व्यास मोठा असतो. आता जगातील जवळजवळ सर्वच दीपगृहे ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित असल्याने आता मनुष्यबळ कमी लागते. दीपगृहाची उभारणी भूगर्भ शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार खडकांवर उभारणे हे खरे तर कौशल्याचे काम आहे. समुद्रावरील वादळ, सुसाट वारा, सागरी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून दीपगृहाचे बांधकाम सुरक्षित राहण्यासाठी ताशीव दगड एकमेकांत अचूकपणे अडकवून त्याचे बांधकाम साधले जाते. बांधकामात सिमेंट काँक्रीटचा उपयोग करण्याची पद्धती अमलात आल्यावर त्याला अधिक मजबुती येण्यासाठी लोखंडाच्या सळ्यांचा वापर करून बांधकाम केले जाते. विजेचा शोध लागल्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यने दीपगृहापर्यंत केबल पद्धतीची विद्युतवाहिनी टाकण्याची व्यवस्था केली जातेय..
दिवसाच्या वेळी दीपगृह दिसण्यासाठी त्याला जो रंग द्यायचा असतो तो दूरवरून दिसायला हवा. त्या रंगाची निवड केल्यावर बांधकामासाठी काँक्रीट तयार करताना त्या रंगाचे मिश्रण त्यात घातले जाते म्हणून तो रंग दीपगृहावर बराच काळ राहतो. दीपगृहाच्या नियोजित मनोरा वास्तूसाठी पाया खणताना जर वाळू, मातीचा गाळ लागल्यास जमिनीखाली खडक लागेपर्यंत आधार ठरणारे लोखंडी, सिमेंटचे खांब पुरले जातात आणि त्याच्या माथ्यावर सिमेंट काँक्रीटच्या तुळया ठेवण्यात येतात.
गतिमान प्रवासात आपण काही वास्तूंची तशी दखल घेत नसतो. पण त्यांच्या अंतरंगात डोकावल्यावर त्यांच्या अविरत अजोड कामाची कल्पना येते. मुकेपणानी, एकाकी काम करण्याची त्यांची व्रतस्थ कामगिरी खूप काही सांगून जाणारी असते. दीपगृहाचेही तसेच आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या महामानवांना मार्गदर्शक, दिशादर्शक दीपगृह उगाच का म्हणतात!
भारतातील दीपगृह प्रशासन कार्यपद्धती :
दीपगृहाच्या दैनंदिन कामकाजात समन्वय, सुसूत्रीकरण साधण्यासाठी एक प्रशासकीय भाग म्हणून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ते
खालीलप्रमाणे –
१) आंतरराष्ट्रीय स्वरूपाची जागतिक दळणवळणास उपयुक्त ठरणारी दीपगृहे ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करताहेत.
२) दुय्यम स्वरूपाची सागर किनाऱ्यावरील अन्य दीपगृहे राज्य सरकार संचालित बंदर खाते आणि पोर्ट ट्रस्टच्या नियंत्रणाखाली दैनंदिन कामकाज पार पाडत असते.
आपल्या देशाच्या ५,००० किमी लांबीच्या सागर किनाऱ्यावर सुमारे ३५० दीपगृहे आहेत. नवीन दीपगृह बांधण्यासाठी, त्याची वाढ, सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला अहवालासह सल्ला देण्यासाठी एक समिती नियुक्त केली असून त्यांचा सल्ला अमलात आणण्याची जबाबदारी दीपगृह महासंचालकांची असते. या महासंचालकांच्या अखत्यारीत पोर्ट ब्लेअर (अंदमान) कोलकोता, चेन्नई, पणजी, मुंबई, जामनगर या सहा ठिकाणी प्रादेशिक दीपगृह कार्यालये आहेत. या अवाढव्य खात्याचा एकूण खर्च चालवण्यासाठी प्रत्येक बंदरात प्रवेश करणाऱ्या देशी-विदेशी जहाजांकडून कर-महसूल वसूल केला जातो.