प्राची पाठक prachi333@hotmail.com
विविध कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रमुख पदावरच्या लोकांच्या खुर्चीवर टॉवेल्स टाकून ठेवलेले असतात. सरकारी कार्यालयांमध्ये तर हमखास असतात. टॉवेल्स असे कुठेही टाकून ठेवायच्या समर्थनार्थ डोक्याचे तेल लागते, घाम लागतो, हात पुसायला काही हवे वरचेवर वगरे कारणे देताही येतील, पण अमुक गोष्ट त्या खुर्चीला चिटकू नये म्हणून जे केलेले असते, ते फार क्वचित साफ केले जाते. एकेक वेळी तर गरज नसेल तरी केवळ एक सवय होऊन गेलीये म्हणून असे टॉवेल्स टाकून ठेवतात. अंध औपचारिकतेचा एक भाग! बेसिनच्या बाजूला, टॉयलेटमध्ये दारांच्या मागे लावलेले टॉवेल्स, नॅपकिन्स धुतलेच जात नाहीत कित्येक ठिकाणी. खूप वापर झाल्यावर एकदा कधीतरी ते बदलले जातात. धुतले जातात. त्या खुर्चीवरच्या टॉवेल्स/नॅपकिन्सचे झालेले असते, तसेच यांचेही होते! म्हणजे, एकीकडे सोवळ्याच्या त्या कापडाचे अवडंबर माजवायचे आणि ते सोवळेच अत्यंत कळकट्ट-फाटके असायचे! बरं, सगळ्याच खुच्र्याना सरसकट असं तेल- बिल लागत नाही आजकाल. इझी टू क्लीन मटेरियल असते खुर्चीचे. ओल्या फडक्यानेसुद्धा साफ केले जाऊ शकते. मोठय़ा गाडय़ांमध्ये, कारमध्ये सीट कव्हर खराब होऊ नये म्हणून असेच टॉवेल्स, नॅपकिन्स अंथरूण ठेवलेले असतात. ते महिनोन् महिने स्वच्छ होत नाहीत. या टॉवेल्सना, नॅपकिन्सना धुवायची कटकट नको, मेंटेनन्स नको म्हणून कुठे ते हद्दपार केले जातात टॉयलेट्समधून. त्या जागी येतात हॅन्ड ड्रायर्स. ते चालतील तोवर नीट चालतात, नाहीतर बंद पडतात. पेपर नॅपकिन्स ठेवले तर लोक वापरतात आणि कुठेही कसेही फेकतात, ही एक समस्या होऊन बसते. पुन्हा टॉयलेटच्या परिसरात सततच राहिल्याने ते पेपर नॅपकिन्स कसे सूक्ष्मजीवांनी घेरलेले असू शकतात, हॅन्ड ड्रायर्स वापरले तर कसे आपल्या सर्वागावर टॉयलेटमधील साचलेले सूक्ष्मजीव उडू शकतात, अशा अर्थाचे फॉर्वर्डस् पाहून आपण आधीच घाबरून गेलेलो असतो. काही अंशी त्यात तथ्य असते. स्वच्छता ही लक्षपूर्वक राखली जायची गोष्ट असल्याने त्यात कमी पडलो तर वेगवेगळ्या स्तरांवर काहीतरी परिणाम होतच राहतात.
सार्वजनिक जागी एकवेळ माणसं याबद्दल जागरूक असतील, पण आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या टॉवेल्सचे काय? कधी आपल्या वापरातले टॉवेल्स आणि नॅपकिन्स यांनाच लक्ष करून घरात सहजच चक्कर मारून बघा. काय हालत झालीये त्यांची, ते तपासा. चिंध्या लोंबकळत असलेले, फाटलेले, उसवलेले, वेळच्या वेळी बदलले न गेलेले नॅपकिन्स असतील तर ठीकठाक करून धुवायला टाकता येतात. आधीचे बदलून दुसरे नॅपकिन्स/टॉवेल्स तिथे लावता येतात. त्यांचेही एक वेळापत्रक ठरवून घेता येते. किती वापर आहे त्यानुसार कधी ते बदलले पाहिजेत, कधी-कसे धुतले पाहिजेत, ते पक्के करता येते. साध्या सुती नॅपकिन्सला छोटासा हुकसारखा कापडी तुकडा एका कडेला शिवून ते टांगायची चांगली सोय करून घेता येते. जुन्या नाडय़ांचे तुकडे त्यासाठी वापरता येतात. गिफ्टससोबत येणाऱ्या लेसेससुद्धा या कामी वापरता येतात. खूपच डागाळलेले नॅपकिन्स, टॉवेल्स छोटय़ा तुकडय़ांमध्ये कापून घेऊन उशीच्या जुन्या खोलीत टाकून त्यावर टिपा मारल्या तर छान पायपुसणे होऊन जातात.
अंघोळीचे टॉवेल्स कोणत्या कापडाचे आणि किती लांबी-रुंदीचे लागतात, त्यांचा विचार करून गरजेनुसार आणि घरातल्या सदस्यांच्या संख्येनुसार आणता येतात. ते वापरण्यापूर्वीच त्यांचे निघालेले धागे दोरे काढून टाकता येतात. आवश्यक तिथे टिपा मारून घेता येतात. प्रवासात जाडजूड टॉवेल्सपेक्षा सुती पातळ पंचे झकास कामी येतात. ते चटकन वाळतातसुद्धा. तसेच पातळ नॅपकिन्स जवळ बाळगता येतात. अंग पुसायला लागणारे टॉवेल्स वेगळे ठेवायचे. बेसिनपाशी ठेवायचे नॅपकिन्स वेगळे करायचे. स्वयंपाक घरात लागणारे वेगळे. अशी सगळीच सोय आणि त्यांची स्वच्छता वरचेवर लावून घेता येते. स्वयंपाक घरात तर दिवसातून दोनदासुद्धा स्वच्छ नॅपकिन्स बदलायची वेळ येऊ शकते. त्यातही भांडी-ताटं पुसायची सोय वेगळी आणि ओले होणारे हात पुसायचे नॅपकिन्स वेगळे ठेवता येतात. ओटा-टेबल्स पुसायची स्वयंपाक घरातली फडकीसुद्धा आणखीन वेगळी काढून ठेवता येतात. बेसिनपाशी घरातल्या लोकांच्या संख्येनुसार किती काळाने नॅपकिन्स बदलले गेले पाहिजेत, त्याचा आढावाच घेऊन टाकायचा. ठरवलेले अमलात आणायचे. साध्या साध्या गोष्टींमधली स्वच्छता आणि त्यातले बारकावे हेच समृद्धीचाही एक मार्ग असतात. त्याने नवीन वस्तू आणण्यावर वचकदेखील राहतो आणि आहे ते नीटनेटके वापरायची सवयही लागते.
राबवून बघाच ही नॅपकिन मोहीम!