संपदा वागळे  waglesampada@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणी कावळा-चिमणीच्या गोष्टीतलं शेणाचं आणि मेणाचं घर ऐकलं होतं. पुढे पाच फूट रुंदीच्या भिंतींचं पेशवेकालीन घरही बघण्यात आलं. पण कागदी लगद्याने भिंती प्लॅस्टर केलेलं घर मात्र अलीकडेच बघितलं. प्रीता आणि प्रकाश नागनाथ या कलाप्रेमी दाम्पत्याचं ‘वत्सल’ नावाचं हे बंगलेवजा घर आहे कोथरुड, पुणे येथील महात्मा सोसायटीमध्ये.

बाहेरून बघतानाही या घराचं वेगळेपण डोळ्यांना जाणवतं. या चार मजली वास्तूला रंग दिलेला नाही की त्यावर प्लॅस्टरही केलेलं नाही. ब्रिटिशकालीन इमारतींप्रमाणे वीटा आणि आरसीसी हे दोन्ही घटक इथेही आपापल्या नैसर्गिक स्वरूपात विराजमान झाल्याने, आसपासच्या रंगरंगोटी केलेल्या बंगल्यांच्या घोळक्यातलं हे घर एखाद्या व्रतस्थ साधूप्रमाणे वाटतं.

या घराच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर हे दाम्पत्य राहतं. तिसऱ्या मजल्यावर लिफ्टचं दार उघडताच आपण प्रवेशद्वाराच्या लॉबीत शिरतो. इथूनच घराच्या छोटय़ामोठय़ा जडणघडणीत केलेला पर्यावरण जपणुकीचा प्रयत्न जाणवू लागतो.

येणाऱ्या पाहुण्याला बसण्यासाठी लॉबीत फेरो सिमेंटचा एक बाक आहे. दिसताना नाजूक वाटला तरी चार माणसांचं वजन पेलवू शकेल एवढी ताकद त्यात आहे. प्रारंभीच्या या लॉबीची रचना घराचा आकर्षण बिंदू ठरेल अशीच आहे. फेरो सिमेंटची गोलाकार भिंत, त्यापुढील फेरो सिमेंटचीच बैठक, भिंतीवरील रंगीत काचा, त्यातून पाझरणारा  रंगीबेरंगी प्रकाश.. हे दृश्य पाहणाऱ्याच्या मनाचा ठाव घेतं.

या घरात पाहावं तिकडे फेरो सिमेंटची करामत दिसते. हॉलमधील बैठका (सीटिंग अ‍ॅरेंजमेंट), स्वयंपाकघरातील ओटा, एव्हढंच नव्हे तर जिनाही फेरो सिमेंटनेच बनला आहे. प्रकाश नागनाथ हे सिव्हिल इंजिनीयर असून, गेली २५ वर्षे याच क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्या अनुभवातून हे फेरो सिमेंट प्रणालीतील घर साकार झालं आहे. त्यांच्या मते, घरातील आतील भिंती जर फेरो सिमेंटच्या केल्या तर अंतर्गत क्षेत्रफळ अंदाजे पाच ते सहा टक्क्यांनी वाढते.

कागदी लगद्याने प्लॅस्टर केलेल्या भिंती हे या घराचं प्रमुख वैशिष्टय़. या लगद्यात कुठे थोडं सिमेंट मिसळलंय तर कुठे फेव्हिकॉल. प्रत्येक भिंत ही वेगवेगळ्या प्रयोगाची परिणती आहे.

या भिंती उभ्या करण्यातली गंमत जागवताना प्रीता म्हणाल्या, ‘त्यावेळी आमचा शनिवार रविवार याच कामी यायचा. आम्ही दोघं, आमचं मित्रमंडळ, मुलाच्या मित्र-मैत्रिणी, त्यांचे आईवडील, नातेवाईक असे सर्व इथे एकत्र जमायचो. येताना आपापली साठलेली रद्दी आणायचो आणि मग ती मोठय़ा मोठय़ा टबात भिजवून त्या काल्याचं प्लॅस्टर बनवून भिंती लिंपण्याचा उद्योग चालायचा. बरोबर खाणंपिणं, गप्पागोष्टी, गाणी यांची जोड असल्याने ती एक साप्ताहिक सहलच झाली होती..

या घरासाठी ज्या विटा वापरल्या आहेत त्यादेखील पारंपरिक नव्हे तर सिमेंटचा कमीत कमी वापर करून बनवलेल्या. दगडाची वाळू, चुना, कंपन्यांतील निरुपयोगी पदार्थ (इंडस्ट्रियल वेस्ट) आणि फक्त तीन ते पाच टक्के सिमेंट हे यातील घटक. (या विटा बाजारात सहज उपलब्ध आहेत.)

टाईल्सचा कमीत कमी वापर हेदेखील या घराचं एक वेगळेपण. जमिनीवर तर सर्वत्र नैसर्गिक दगडच लावलेला दिसतो. कुठे कोटा तर कुठे कडाप्पा. टेरेसमध्ये कोबा. या रचनेमुळे घराला थंडावा आलाय.

हॉल आणि डायनिंग एरियावरचं छतही फेरा ेसिमेंट पद्धतीने बनवलंय. इथे फेरा सिमेंटच्या बीम्सचा तुळयांप्रमाणे वापर केलाय. या स्लॅबकडे खालून बघितलं तर यावरचं डिझाईन उलटय़ा ठेवलेल्या चौकोनी कुंडय़ांप्रमाणे दिसतं. या छताला प्लॅस्टर नाही की पीओपी नाही. ते आपलं काँक्रीटचा मूळ रंगच मिरवतंय.

घराच्या चौथ्या मजल्यावर दोन बेडरूम आणि या दोघांचं ऑफिस आहे. बेडरूमच्या छतावर पानांची नक्षी दिसते. या पाठचं रहस्य असं की, हा स्लॅब टाकताना या मंडळींनी खाली पडलेली बदामाच्या झाडाची खूपशी पानं गोळा केली आणि ती खालच्या थरात आधीच टाकली. त्यामुळे ती नंतर ठशांच्या (फॉसिल) रूपात चिरंतन राहिली.

घराचे दरवाजेही नैसर्गिक रंगरूपातून साकार झालेले दिसतात. विचारल्यावर कळलं की नागनाथ फॅमिलीचं गावात जुनं घर होतं, त्याचे वासे हे दरवाजे बनवण्याच्या कामी आलेत.

प्रशस्त खिडक्या आणि प्रत्येक खोलीला एक गच्ची, त्यामुळे हे घर मोकळं आणि हवेशीर वाटतं. मोकळ्या रचनेमुळे घराच्या चहूबाजूंनी समग्र कोथरुड दर्शन घडतं. वर बोनस म्हणजे समोरच एक हिरवीगच्च टेकडी आहे आणि दारात पानाफुलांनी बहरलेलं मुचकुंदाचं झाड. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातील नैसर्गिक निवास असंही या घराचं वर्णन करता येईल.

प्रीता स्वत: एक आर्टिस्ट आणि इंटिरियर डिझायनर असल्याने त्यांनी घराच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. टेरेसमध्ये स्थानापन्न झालेला कागदाच्या लगद्याचा बुद्ध, जिन्याजवळच्या भिंतीवर चितारलेलं डौलदार झाड, भिंतींना जुन्या कागदाचा फिल देऊन त्यावर लिहिलेल्या कविता, सुवचने.. यामुळे घराला एक कलात्मक उंची प्राप्त झाल्यासारखी वाटते.

घरात विविध प्रयोग आकाराला आले असले तरीही या कलाकारांचं समाधान झालेलं नाही. त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या संकल्पना येतच असतात. म्हणजे एक भिंत संपूर्ण शेणाने सारवणं किंवा छतावरच्या चौकोनात चित्रांची नक्षी रेखणं.. इ. त्यामुळे या घराला मधून मधून भेट दिली की काहीतरी नवीन, तेही निसर्गानुरूप बघायला मिळेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natural home in the green environment