बांधकाम क्षेत्र आता बांधकामापुरते मर्यादित राहिलेले नाही. शहर नियोजन असो वा ग्रीन बिल्डिंग.. पर्यावरण असो वा उद्योग.. त्यातील बांधकामाचे विविध पैलू उलगडणारे सदर..
भारत सरकारने १०० ‘स्मार्ट सिटी’ विकसित करायचा मनोदय व्यक्त केला आहे, त्या संदर्भात काही गोष्टींविषयी जाणून घेणे गरेजेचे आहे.
झपाटय़ाने होणारे शहरीकरण आणि त्यातून निर्माण होणारे अनेकविध ‘शहरी’ प्रश्न हे सध्या असलेल्या यंत्रणेला डोईजड होत आहेत आणि भविष्यात त्याच समस्या भयानक स्वरूप धारण करणार हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून या समस्या वेगळ्या पद्धतीच्या यंत्रणेने हाताळाव्या लागतील हे निश्चित आहे. ‘स्मार्ट’ शहर बनवायची संकल्पना यातूनच जन्म घेते. या शहरांच्या भविष्यातील व्यवस्थापनेसाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून चोख यंत्रणा, चोख नियोजन करून योग्य ती एक दिशा मिळावी आणि या सगळ्यातून नागरिकांना त्या शहराचा एकूणच अनुभव आनंददायक व्हावा हे या योजनेमध्ये प्रतीत आहे.
वस्तुत: या शहरांना स्मार्ट बनवायचे मूळ त्या शहरांच्या व्यवस्थापनेशी जुळले आहे. शहर व्यवस्थापनाच्या विविध विभागांच्या नियंत्रण प्रणालींमध्ये सुसूत्रता आणणे पर्यायाने शासन स्तरावर नियंत्रणास सुलभता आणणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे.
‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेला काही बांधील असे नियम अथवा आराखडे नाहीत. ही कल्पना उदयास येत आहे आणि त्यात बरेच संशोधन होत आहे. शहरांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे निकष ठरवण्यात येत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणारे प्रश्न हे सगळ्यानांच भेडसावत असतात. त्यामुळे जगात इतरत्र अनेक ठिकाणी असे प्रयत्न झालेले दिसतात. जसे मसदार सिटी (वअए), बार्सिलोना, सोन्ग्डो सिटी (दक्षिण कोरिया) व इतर. या शहरांचा ‘स्मार्ट’पणा हा त्या त्या शहराच्या गरजेप्रमाणे आहे, वेगवेगळ्या निकषांवर आहे. आणि त्या निकषांवर ती शहरं चोखपणे उतरावी हे प्रयत्न तिथे झालेले दिसतात. या सगळ्या निकषांचं पर्यवसान तिथे राहणाऱ्या नागरिकाला उत्तम अशा सोयी-सुविधाद्वारे व्हावे, हा या योजने मागचा एक महत्त्वाचा हेतू. त्यामुळे अनेक तांत्रिक निकषांच्या पलीकडे जाऊन आनंदी नागरिक हा निकष निर्णायक ठरतो.
आपला आपल्या शहराचा अनुभव हा काही ठरावीक बाबतीतच असतो. आपल्याला दररोज लागणाऱ्या गोष्टींची ठिकाणे, मनोरंजनाची काही ठिकाणे, बाजारपेठा, रस्ते, स्टेशन व इतर. या व्यतिरिक्त आपल्याला या शहराच्या जिवंतपणाची दाखल नसते. पण आपले हे शहर काही न बोलता खूप काही करत असते, सोसत असते. शहराची ही आपल्याला न दिसणारी यंत्रणा सक्षम करणे हा या स्मार्ट शहरांचा गाभा आहे. या यंत्रणेच्या smartness वर शहराचा smartness अवलंबून आहे.
या नवीन शहर नियोजनात नागरी संरक्षण यंत्रणेला नवीन तंत्रज्ञाची जोड देऊन सक्षम बनवणे, जसे पोलीस यंत्रणेला इंटरनेटने सक्षम बनवणे, पोलीस स्टेशन घराघराशी जोडणे, सिग्नल यंत्रणा केंद्रित करणे व इतर अनेक गोष्टी. नागरी सुविधा सक्षम बनवणे, सगळ्या नागरिकांसाठी एकात्मिक ई-कार्ड यंत्रणा करणे, Prepaid कर भरायची यंत्रणा करणे. तेच ई-कार्ड नागरिकांचे ओळख पत्र करणे, तेच
कार्ड शहरातील बस अथवा रेल्वे प्रवासाठी वापरण्याजोगे करणे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करणे, वीज आणि पाणीपुरवठय़ासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. Online metering यंत्रणा करणे, prepaid यंत्रणा अमलात आणणे. वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे. शहर नियोजनात विशेष: बस, रुग्णवाहिका, सायकल मार्ग, पादचारी मार्ग यांची योजना करणे. तसेच कचरा, मैल, सांडपाणी व्यवस्थापनात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात अमूलाग्र असे काही बदल घडवून आणणे, अशा अनेक योजना या शहरांमध्ये अमलात येऊ शकतात. ही सगळी यंत्रणा आताही अस्तित्वात आहे, पण संघटित नाही. सामान्य माणसाला दिसेल असा त्याला एक चेहरा नाही. म्हणूनच उपलब्ध तंत्रज्ञाचा वापर करून ती संघटित करून त्यांच्यात सुसूत्रता आणण्यास व त्याचा एक चेहरा तयार करण्यास मदत होणार आहे.
या प्रत्येक विभागाला चालावयास प्रचंड मोठी यंत्रणा लागते. प्रचंड अभ्यास लागतो. विशेषज्ञ लागतात. काम करणारे तंत्रज्ञ लागतात. कामगार लागतात. या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही यंत्रणा जिवंत रहाते. हे आपल्या नकळत सतत घडत असते. पण या Smart City योजनेमुळे नागरिकांमध्ये त्या बद्दलची जाणीव निर्माण होऊन शहर व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याचा एक महत्त्वाचा उद्देशही साध्य होणार आहे. ‘स्मार्ट’ या अपेक्षित अर्थानुसार ‘चोख’ हा शब्द जवळचा. त्यामुळे जशी चोख यंत्रणेला चोखंदळ नागरिकांची गरज असते, तसे Smart City चे स्वप्न हे Smart Citizen शिवाय पूर्ण कसे होणार?
आर्किटेक्ट – parag.kendrekar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा