मुंबई, नेफा, अमेरिकेतील वास्तव्यात मला प्राणिमात्रांचा सहवास खूप लाभला. या सहचरांमध्ये आणि माझ्यात एक दृढ नातं निर्माण झालं. त्यांच्या आठवणींचा एक कप्पा कायम माझ्या हृदयात राहील..
लहानपणी मी रहात होते ते घर त्या काळात बऱ्यापैकी आधुनिक होतं. आमची बिल्डिंग एका मोठय़ा वाडीतल्या वेगवेगळ्या आकाराच्या बिल्डिंग्जमधली सगळ्यात नवीन आणि सुंदर बिल्डिंग होती. वाडीच्या पुढच्या आणि मागच्या भागात खूप चिंचांची झाडं होती. मोठी जिवंत झरे असलेली विहीर होती. विहिरीच्या मागच्या बाजूला बोरीची, जांभळाची झाडं होती, उंबराचं झाडही होतं. अनेक झाडं होती, त्यामुळे पक्षीही खूप होते. आमच्या घराच्या मागच्या दारातून चिंचांच्या झाडांवर बगळ्यांचे थवे बसायला लागले की आई म्हणे, ‘‘पावसाळा जवळ आला; मागच्या गॅलरीला ताडपत्री लावून घ्यायला पाहिजे.’’ शेजारच्या लहान कौलारू घरावर रोज सकाळी आई स्वत: जेवायला बसण्यापूर्वी पोळीचा लहान तुकडा पक्ष्यांसाठी टाकत असे. लगेचच कावळा येऊन आपला घास खाऊन टाकत असे. वाडीतल्या बाकी कुठल्याही झाडावर न बसणारे पोपट थव्याने येऊन उंबराच्या झाडावर बसत. थोडय़ा वेळात थव्याने उडूनही जात. वाडीची आठवण म्हणजे प्रिन्सची आठवणही आलीच. प्रिन्स वाडीच्या मालकांचा कुत्रा. मालकांचं घर वाडीपासून जरा लांब होतं. प्रिन्स मालकांच्या घरून रोज सकाळी वाडीत येत असे आणि वाडीतच रमत असे. वाडीत हमालाच्या डोक्यावर सामान लादून कोणी पाहुणे आले, की प्रिन्स त्यांच्यावर खूप भुंकत असे. वाडीतलं कोणीतरी त्यांच्याकडे जाऊन प्रिन्सला शांत करेपर्यंत काही पाहुण्यांची आणि हमालाची खैर नसे. असा तिखट प्रिन्स वाडीतल्या लहान-मोठय़ांचा मित्र होता. लहान मुलं त्याच्या पाठीवर ‘घोडा घोडा’ करीत आणि तोही सगळं चालवून घेत असे.
चिमण्यांच्या लहानशा आकारंनी म्हणून की काय, त्यांचा वावर घरातल्या माळ्यांवरही खूप असे. अंडी घालण्यापूर्वी घरटं बांधायची त्यांची लगबग बघण्यासारखी असे. घरटय़ातून बारीक चिवचिवाट ऐकल्यावर आम्हाला कळत असे की अंडय़ांमधून पिल्लं बाहेर आली आहेत. थोडे दिवस जाऊ दिले, की चिवचिवाट कमी कमी व्हायला लागे. पिल्लं मोठी होऊन घरटय़ातून उडून गेल्याची ती खूण असे. मग माळ्यावरचं घरटं आम्ही काढून टाकत असू. घरटय़ात कापूस, हरवलेला केसांना बांधायचा गोफ, लोकरीचे तुकडे असं काहीबाही मिळे. वाडीत मांजरं फारशी दिसत नसत. त्यांचा सुळसुळाट खेडय़ातल्या आजोबांच्या घरी फार होता. मांजरांची भीती मला फार वाटे. ती जवळ आली, तर ओरबाडतील असं वाटे. त्यांचे डोळे, त्यांची ‘वाघाची मावशी नाव सिद्ध करणारी चेहरेपट्टी आणि लुच्च्या स्वभावाच्या गोष्टी-सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. मांजर जवळ आलं की मी ‘हाड, हाड’ म्हणत त्यांना लांब राहायला सांगत असे. खेडय़ातली भावंडं म्हणत, मांजराला ‘छुत, छुत’ म्हणायचं, ‘हाड, हाड’ नाही. आजोबांच्या घरातल्या गोठय़ात जायला मात्र मजा वाटे. गोठय़ात चार बैल आणि दोन गायी असत. त्यांची वेगवेगळी नावं असत. मधले काका धारा काढीत. वर फेसाने भरलेली दुधाची कासंडी माजघरात आली की पुढची जबाबदारी आजीची असे. दूध उकळविणं, विरजणं, घुसळ खांब्याच्या मदतीने ताक, लोणी आणि शेवटी तूप करणं. आजी गोठय़ातल्या गायी, बैलांना प्रेमाने वागायला शिकवत असे. गावात पक्के रस्ते होण्याच्या आधी पावसाळा सोडून इतर वेळी जवळच्या शहरातल्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचायला बैलगाडीचा प्रवास अटळ असे. गाडीवान बैलांना पळवायला पराणीचा उपयोग करीत तेव्हा मला ते बघवत नसे. मी आजीच्या मागे भुणभुण करी. ‘‘आई, विठय़ाला सांग की पराणी नाही वापरायची.’’ (आजीला मी ‘आई’ म्हणत असे.) आजीच्या बारीक, लुकलुकणाऱ्या डोळ्यांमध्ये नातीचं कौतुक दाटून येत असे. माझा बैलगाडीचा प्रवास आनंदात होत असे.
शाळा-कॉलेजचं शिक्षण चालू असताना मैत्रिणीच्या भावानी पिंजऱ्यात ठेवलेले लव्हबर्डस, ओळखीच्या एका नातेवाईकांनी अंगणात मोठय़ा पिंजऱ्यात पाळलेल्या लेग-हॉर्न जातीच्या कोंबडय़ा, कुठे एखाद्या ओळखीच्या घरात ठेवलेल्या माशांच्या पेटय़ा, पिंजऱ्यात ठेवलेला बोलका पोपट अशा प्राण्यांशी गाठीभेटी होत, पण जास्ती जवळीक साधता आली नव्हती. शिक्षण पुरं झालं, यथावकाश लग्न झालं. पती मोहन केंद्र सरकारमध्ये बांधकाम खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर होते. बदलीची नोकरी. लग्नाच्या वेळी दिल्लीत चालू असलेल्या नोकरीतली पहिली बदली झाली ती नेफामध्ये. नेफा हा नॉर्थ इस्ट फ्रॉन्टीयर एजन्सीचा संक्षिप्त फोर्म. आता ह्यला अरुणाचल प्रदेश म्हणतात. चीनबरोबर वादात असलेल्या भागात आपल्या हद्दीत रस्ते बांधण्याचं काम चालू होतं. दिबांग व्हॅली डिव्हिजनच्या रोइंग ह्याशहरात आम्ही राहायला गेलो. हिमालयाच्या रांगांच्या तळात हे गाव. खूप पाऊस, बरीच थंडी, उन्हाळा नाही. शहरात मोजकेच बंगले बांधले होते. आमचा बंगला मोठा आणि बऱ्यापैकी अद्ययावत होता. घरात, बागेत काम करणारे दोन नेपाळी नोकर सरकारनेच दिलेले होते. आल्या आल्या एकदा माझ्या एक वर्षांच्या मुलीला घेऊन मी खिडकीजवळ बसले होते आणि बाहेर बघितलं, तर रस्त्यावरून दोन मोठे हत्ती लाकडाचे दोन ओंडके ओढत नेत होते. ओंडक्यांना बांधलेली साखळी हत्तीच्या एका पायात घातलेली होती. माझी मुलगी अजून बोलू लागली नव्हती, पण तिच्या गोल डोळ्यांत आश्चर्य मावत नव्हतं. दारावरून जाणारे, कधी अंगणातून मागच्या आवारात येऊन ओंडक्याची डिलिव्हरी करणारे हत्ती लवकरच चांगलेच परिचयाचे झाले, तिच्या आणि आमच्याही!
गावात वीजपुरवठा संध्याकाळी ५-६ तासच असे. स्वयंपाकघरात जळण म्हणून लाकडंच वापरली जायची. हत्तीने ओंडका आणून टाकला, की तो तोडून लहान फाटे करायची जबाबदारी प्रत्येक घराची असे. आकाराने सगळ्यात मोठा असलेला हत्ती हा प्राणी नेफामध्ये जवळून पाहिला आणि छोटय़ा जळवाही तिथेच पहिल्यांदा पाहिल्या. जळवा झाडांवर, पाण्यात, गवतात पडून राहिलेल्या असतात. पशू, पक्ष्यांचं, माणसांचं रक्त हाच त्यांचा आहार. पायाला मऊ मऊ लागणाऱ्या गवताचं अप्रूप शहरातून गेल्यामुळे असेल, पण सुरुवातीला तरी मला खूपच आनंद वाटे. अशीच मी मऊ मऊ गवताचा स्पर्श अनवाणी पायांनी एन्जॉय करत होते आणि सहज बघितलं तर पायाच्या अंगठय़ातून बरंच रक्त येत होतं. दुखत तर नव्हतं, ठेचही लागलेली नव्हती. रक्त बघून मी घाबरून ओरडले. माळी टीकाराम तिथेच काम करत होता. तो धावत आला. त्यानी मग मला सांगितलं की तो लीच (जळू)चा प्रताप आहे. गवतात पडून असलेल्या जाळवा बोटांना चावतात (तुम्हाला काहीही दुखत नाही किंवा जाणवतही नाही). त्यांचा आहार म्हणजे आपलं (किंवा जनावरांचं)रक्त. पोट भरलं, की त्यांचा आकार चांगला मटारच्या मोठय़ा शेंगेइतका होतो. जळू जेव्हा रक्त पिऊन पडते, तेव्हा आपली आठवण म्हणून अगदी बारीक लाल ठिपका बोटावर ठेऊन जाते. कुठलीही जखम नसल्याने प्रकरण तिथेच मिटते. खळखळ वाहणाऱ्या पाण्याचे तोंडावर शिपकारे मारताना कधी कधी नाकात जळू चिकटल्याच्या गोष्टीही ऐकायला येत. जसजशी जळू रक्त पिते, तसतसा तिचा आकार वाढत जातो. नाक ब्लॉक होण्याचं भय असतं. तंबाखूचं पाणी, जळणारी काडी, पायात कायम बोटं झाकणारी पादत्राणं, गवतात न चालणं, वाहत्या नदी-नाल्यांचं पाणी तोंड धुवायला न वापरणं, हे काही उपाय-पण हे आपल्यासारख्या शहरी लोकांसाठी. तिथले भूमिपुत्र सगळीकडे निसर्गात प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस देत मजेत वावरत असतात.
हत्तीच्या खालोखाल आकाराने मोठा असलेला मिथुन नावाचा प्राणी इथेच पाहिला. गाय आणि रेडय़ाचा क्रॉॅस असं त्याचं वर्णन ऐकलेलं आठवतं. इकडचे आदिवासी शेतीकरिता मिथुनचा उपयोग करीत. गायींचा त्यांना एरव्ही फारसा उपयोग नसे. ते लोक गायी भाडय़ाने देत. ओकिन लोगो नावाच्या गाव-बुरा (पाटील) नी आम्हाला त्यांची गाय वापरायला दिली. आमच्या माळ्याने सांगितलं, गायीला बेसन आणि उडीद डाळ मिसळून चांगला खुराक दिला, की ‘गायीचं दूध गाढं होईल, आपली मुनिया (आमची मुलगी) ही रोज चांगलं दूध पील.’ नेफामधल्या तीन वर्षांच्या मुक्कामात आमच्याकडे कायम कुठली ना कुठली गाय असे.
इथली घरं जमिनीपासून दोन-तीन फूट उंचीवर बांधलेली असतात. घराखालची मोकळी जागा आमच्या माळ्याने कोंबडय़ांचं खुराडं म्हणून वापरायला सुरुवात केली. रविवारच्या चापाखोआ गावाच्या बाजारातून थोडय़ा कोंबडय़ा आणून त्यांनी हा कुकुटपालनाचा उद्योग सुरू केला. लवकरच खूप अंडी मिळू लागली. बागेतले केळीचे घड, अननस, भाज्या, गायीच्या दुधापासून केलेला खवा, अंडी ह्य सगळ्याची देवाण-घेवाण मित्र परिवारांमध्ये कायमच चाले.
कस्तुरी मृगाच्या नाभीतून कस्तुरी काढून ती कलकत्त्याला विकायचा उद्योग काही बंगाली लोक करीत. रॉ-फॉर्ममधली कस्तुरी कोणीतरी दाखविलेली आठवते. हॉर्न बिल हाही त्या भागात आढळत असावा. एका आदिवासीने शिकार केलेल्या हॉर्न बिलचं डोके दाखविलं होतं.
नेफामधून आल्यावर आम्ही काही वर्षे मुंबईत राहिलो, तेव्हा मुलाच्या आग्रहाखातर आम्ही एक छोटं (पॉमेनेरियन जातीचं)पांढऱ्या रंगाचं, टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांचं कुत्र्याचं पिल्लू घरी आणलं. त्याचं नांव ‘फेदर्स’ ठेवलं. फेदर्स आमच्याबरोबर अमेरिकेतही पुष्कळ वर्षे राहिला. आजी हा त्याचा घरातला सगळ्यात जास्ती आवडता मेंबर होता. फेदरच्या आठवणी आमच्या सगळ्यांच्याच मनात अजूनही आहेत आणि त्या तशा रहाणारही आहेत.
अमेरिकेतलं माझं घर साऊथ फ्लॉरिडा भागात तळ्याच्या काठावर आहे. तळ्यात बेडूक डराव, डराव करायला लागले, की आम्हाला कळतं, पाऊस लवकर येणार. पाण्यातले साप खाणारा करकोचा, बदकं, कधी कधी मागच्या अंगणात मुक्कामाला असतात. बदकीणबाई आणि तिच्या पिल्लांची रांग कधी कधी घराच्या पुढच्या बाजूला येऊन रस्ता क्रॉस करत असतात, तेव्हा सगळा ट्रॅफिक शांतपणे थांबलेला असतो. काही वर्षांपूर्वी इगुआना नावाच्या प्रचंड मोठय़ा सुसरीच्या जातीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांनी साऊथ फ्लॉरिडाचं कलरफुल लँडस्केप नष्ट करायला सुरुवात केली. चांगला पाच, सहा फूट लांब असलेला ह्य सरपटणाऱ्या प्राण्याला रंगीत फुलं- विशेषकरून जास्वंदी, शेवंती-म्हणजे गोळ्या, चॉकलेटांइतकी प्रिय. सगळ्या साऊथ फ्लॉरिडाच्या बागांमध्ये फक्त पांढरी फुलं शिल्लक रहाणार असं वाटायला लागलं. पण निसर्गाने समतोल राखायला मदत केली असावी. लागोपाठ दोन, तीन र्वष खूप कडाक्याची थंडी पडली. इगुआना थंडीत जगू शकत नाहीत. कदाचित लोकांनी शिकारही केली असेल. बऱ्याच वर्षांत बागेत दिसले नाहीएत.
तळ्यातले प्राणीमित्र वरचेवर भेटत राहातात. जेव्हा आम्ही मुलीच्या घरी जातो, तेव्हा फेदर्सच्या आठवणी त्यांच्याकडची पॅचेस नावाची छोटी कुत्री जाग्या करते. ती खूप चुळबुळी आणि तितकीच प्रेमळ आणि हुशार आहे. आमची ओळख तिने स्वत:च्या डोक्यात पक्की करून ठेवली आहे. आम्ही कितीही दिवसांच्या अंतराने भेटलो, तरी शेपटी हलवत आमच्याकडे येऊन बाईसाहेब आमचं स्वागत करतात. असा प्राणिमात्रांचा सहवास आयुष्यात खूप मिळाला. त्यांनी आयुष्य समृद्ध केलं आहे.
शशिकला लेले – naupada@yahoo.com