घरात लावण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी मागील काही लेखांपासून आपण माहिती घेत आहोत. घरात अशा पण काही जागा असतात जिथे भरपूर उजेड असतो किंवा दिवसाचे काही तास सूर्यप्रकाश येत असतो. अशा जागी ठेवण्यायोग्य काही झाडांविषयी आजच्या लेखातून माहिती घेऊ या.

१ केलेडियम (Caladium) : साधारणपणे अळूच्या पानांच्या आकाराची पाने असलेले हे झाड आहे. याच्या पानांवर विविध रंगांचे ठिपके व रेषा असलेले प्रकार मिळतात, जसे की हिरव्या पानांवर लाल व पांढरे ठिपके, काहींवर लाल रेषा व पांढरे ठिपके, काहींवर हिरवट पांढरे पट्टे व ठिपके इत्यादी. या झाडांना भुसभुशीत माती लागते. त्यामुळे याच्या कुंडीत मातीबरोबर योग्य प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत किंवा इतर कोणतेही सेंद्रिय खत वापरावे. पानांवरील ठिपके व रंगछटांचे सौंदर्य वाढण्यासाठी या झाडांना जास्त उजेडाच्या ठिकाणी ठेवावे. या झाडांना सुरुवातीच्या काळात व्यवस्थित पाणी लागते. नंतर मातीतील ओलावा व झाडाची वाढ बघून पाण्याचे प्रमाण ठरवावे.

२ कोलियस (Coleus) : पानांचे गडद रंग असलेले अनेक प्रकार यात उपलब्ध असतात. साधारणपणे २ रंगांची रंगसंगती असलेली पाने असतात. यात लहान पानांच्या व मध्यम पानांच्या प्रजाती मिळतात. या झाडांना भुसभुशीत माती लागते. त्यामुळे योग्य प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे असते. भरपूर उजेड किंवा दिवसाचे काही तास सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी ही झाडे छान वाढतात. जास्त उजेडाच्या ठिकाणी पानांचे रंग जास्त गडद व उठावदार दिसतात. सावलीच्या ठिकाणी हे रंग थोडे फिकट होतात. या झाडांना जास्त पाणी चालत नाही. त्यामुळे योग्य तेवढेच पाणी घालावे.

३ क्रोटॉन (Croton) : या झाडामध्ये पानांचे आकार व पानांवरील रंगछटा यात भरपूर वैविध्य आढळते. रुंद पानांचे व निमुळत्या पानांचे अनेक प्रकार यात उपलब्ध आहेत. याच्या पानांमध्ये हिरवट पिवळा, केशरी, लाल, काळपट अशा अनेक रंगांच्या रंगछटा असलेले प्रकार मिळतात. पानांच्या सौंदर्यासाठी ही झाडे अनेक ठिकाणी लावली जातात. साधारणपणे ४ ते ५ फुटांपर्यंत ही झाडे वाढू शकतात. ही झाडे भरपूर उजेडाच्या ठिकाणी ठेवावीत. त्यामुळे त्यांच्या पानांचे रंग आकर्षक व उठावदार दिसतात. या झाडांना पण भुसभुशीत माती लागत असल्यामुळे मातीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. पाण्याचे प्रमाणही योग्य असावे. कमी पाण्यामुळे तसेच कमी उजेडामुळे रंग फिकट दिसू लागतात. त्यामुळे योग्य जागी ही झाडे ठेवावीत.

जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in

Story img Loader